बंबाखू : (हिं. सरसन बंदा, भाटुआ घास,टोक्रा गु. वाकुंबा इं. ब्रूम-रेप लॅ. ऑरोबँकी ईजिप्टिका, ऑ. इंडिका कुल-ऑरोबँकेसी). ही परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारी) ⇨औषधी मैदानी भागांत भारतात सर्वत्र आढळते. तिच्या शरीरात हरितद्रव्य नसते. ब्रॅसिका, कॅनाविस,सोलॅनम, निकोटियाना, पॅपॅव्हर, झिया, कॅरथॅमस इ. वंशातील वनस्पतींवर ती आढळते. ती क्रुसिफेरी (ब्रॅसिकेसी) कुलातील (मोहरी कुलातील) वनस्पतींवर विशेषकरून नेहमी आढळते. [⟶ जीवोपजीवन] आश्रय देणाऱ्या वनस्पतींच्या मुळांपासून आपल्या शोषकद्वारे परजीवी अन्नरस घेते. या परजीवींचा पिवळा रसाळ कोंब सरळ जमिनीवर येतो. त्याला सच्छदक (तळाशी लहान उपांगे असलेली) निळी फुले येतात. ऑ. सर्नुआ ही जाती दिसण्यास काहीशी ऑ. ईजिप्टिकासारखीच असते पण तीची फुले छदकहीन (तळाशी उपांगे नसलेली) आणि तौलनिक दृष्ट्या फिकट रंगाची असून बऱ्याच दाट कणिशांवर येतात तसेच ती भारतात हिमालयामध्ये ४,००० मी. उंचीपर्यंत सर्वत्र आढळते. ती सामान्यतः सोलॅनेसी कुलातील (धोत्रा कुलातील) वनस्पतींवर जास्त करून आढळते. व ऑ. सर्नुआ, प्रकार डेझर्टोरम (ऑ.निकोटिॲनी) हा तिचा प्रकार द. भारतात तंबाखूवर सर्रास आढळतो. [⟶ तंबाखू]. ऑ. रॅमोझा ही जाती जम्मू व काश्मीरमध्ये गांजा व लसूण घास यांवर आढळल्याची नोंद आहे यूरोपात ती सोलॅनेसी कुलातील पिकांवर आढळते. ऑ.आल्वा (ऑ.एपिथायमम) ही जाती प्रपिंडीय (ग्रंथीयुक्त) केसाळ ओषधी असून तिची फुले तांबूस किंवा जांभळी तपकिरी असतात ती गवत व थायमस वंशातील जातींवर परजीवी असते. व ती हिमालयात काश्मीर ते कुमाऊँ येथे ४००० मी.उंचीवर आढळते. ऑरोबँकीच्या एकूण दहा जाती आढळतात व इतर जाती जगभर आढळतात उ. गोलार्धातील उष्ण व उपोष्ण कटिंबंधात विशेषेकरून संख्येने त्या अधिक आहेत. ऑ. मायनर आणि ऑ.हेडेरी या जातीही भारतात अनुक्रमे ⇨क्लोव्हर व ⇨आयव्ही यांवर आढळतात.
ऑरोबँकी वंशातील जाती लहान रोपट्यासारख्या असून त्यांना लहान खवल्यासारखी पाने असतात ई. केमिन (१९२०) यांच्या मते या खवल्यांचा वापर या वनस्पती अन्न साठविण्यासाठी करतात. जमिनीतील खोड काहीसे गाठीसारखे व खवलेदार असते त्याचा जमिनीवर वाढणारा भाग सरळ व फुलोऱ्याचा दांडाच असतो. फुले द्विलिंगी, एकसमात्र (एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) असून छंदांच्या किंवा लहान जोडीच्या बगलेत त्या दांड्यांवर येतात. संदले २-५ पुष्पमुकुट दोन ओठांप्रमाणे (द्वयोष्ठक) पाच जुळलेल्या पाकळ्यांचा केसरदले, चार, दीर्घद्वयी (दोन लांब व दोन आखूड) किंजपुटात कप्पा परंतु बीजके अनेक [⟶फूल]. बोडांची दोन शकले अनेकदा किंजलास चिकटून राहतात. बिया बारीक व अनेक असतात.
बंबाखूच्या जाती उपद्रवकारक व दीर्घकाळ जगणारे तण आहेत आणि त्यांना अगदी बारीक व असंख्य बिया येतात. प्रचंड बीजोत्पादन व त्याच्या जोडीला १० वर्षापर्यंत टिकणारी त्यांची अंकुरणक्षमता आणि वाऱ्याद्वारे होणारा प्रसार यांमुळे त्याचे नियंत्रण करणे मुष्कील झाले आहे. बीजधारणेपूर्वी बंबाखू उपटून काढणे व जाळून नष्ट करणे हा एकच खात्रीचा तिच्या नियंत्रणाचा उपाय आहे. त्याशिवाय इतर अनेक तणनाशके उपयुक्त असून त्यांतील २, ४-डीसारख्या तणनाशकाच्या फवरणीने तिचे चांगले नियंत्रण होते, कारण त्यामुळे बी तयारच होत नाही.
जनावरांसाठी चारा म्हणून बंबाखूचा वापर करणे सोईचे नाही कारण त्याचे बी जनावरांच्या आतड्यातून उगवणक्षम अवस्थेत ज्या शेणातून बाहेर पडते त्याचे शेणखत वापरल्यास उलट बंबाखूचा प्रसारच होण्यात मदत होते. बंबाखूचा (ऑ.ईजिप्टिका) उपयोग अतिसार थांबविण्यासाठी व जनावरांच्या घशातील फोडावरील उपचारात करतात. ऑरोबँकेसी या फुलझाडांच्या कुलात (द्विदलिकीत वर्गातील) समावेश पर्सोनेलीझ गणात केला जातो [⟶सोलॅनेसी] या कुलाचे ⇨स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलाशी (नीरब्राह्मी कुलाशी) जवळचे आप्तसंबंध असून तिच्यापासून किंवा दोन्हींच्या सामान्य पूर्वजांपासून ऑरोबँकेसी कुल विकास पावले असावे,असे मानतात.
संदर्भ : 1.C.S.I.R. The Wealth of India, Raw Materlals, Vol. VII, New Delhi, 1966.
2. Mitra, G.N.An Introduction to Systematic Botany and Ecology ,Calcutta, 1964.
जमदाडे, ज. वि. परंडेकर, शं. आ.
“