बंधनागार : इंग्लिशमधील ‘कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प’ या संज्ञेचा बंधनागार हा मराठी पर्याय असून विसाव्या शतकातच बंधनागारांचा विशेष प्रमाणात उपयोग करण्यात आला. १८९५ मधील क्यूबातील उठावाच्या वेळी तेथील स्पॅनिश गव्हर्नर जनरलने पहिल्यांदा बंधनागारांचा उपयोग केला. १८९९-१९०२ मधील द. आफ्रिकेतील बोअर युध्दाच्या संदर्भात ब्रिटिश सेनाधिकारी फिल्ड मार्शल अर्ल होरेशिओ हर्बर्ट किचेनर यानेही बंधनागारांचा उपयोग केला. बंधनागारांचे हे आद्य प्रयोग लष्करी कारवाई सुकर करण्यासाठी होत व म्हणून बंधनागारांत डांबलेल्या नागरिकांवर कसल्याही प्रकारचे आरोप त्यात अभिप्रते नव्हते.

सर्वकषसत्तेच्या आणि हुकूमशाही राजवटीतील राज्यकर्त्यांचे बंधनागार हे एक दहशतीचे साधन असते. राज्यकर्त्यांच्या वांशिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक विचारप्रणालीला विरोध करणाऱ्यांना बंधनागारांत डांबून ठेवले जाते. आर्थिक विकासासाठी किंवा श्रमिकांना शिस्त लावण्यासाठीही बंधनागाराचा उपयोग केला जाई. वांशिक, राष्ट्रीय अथवा वर्णविषयक भिन्नतेवरून विशिष्ट मानवसमूहांना वेगळे ठेवण्यासाठी बंधनागारे वापरली जातात. रशिया व इतर समाजवादी देशांत बंधनागारांस श्रमिक सुधारणागार (करेक्टिव्ह लेबर कॅम्प) असे नाव दिलेले आढळते. जर्मनीमध्ये नाझी राजवटीत नॉर्डीक जर्मन नसलेल्या लोकांसाठी तसेच तथाकथित शारीरिक व मानसिक विकृतिग्रस्त लोकांच्या तसेच तथाकथित शारीरिक व मानसिक विकृतिग्रस्त लोकांच्या निर्मूलनासाठी निर्मूलनागार (एक्सटर्मिनेशन कॅम्प) असा एक प्रकार होता.

बंधनागारांची स्थापना व व्यवस्था राज्यकर्त्यांच्या लहरीप्रमाणे केली जाते. बंधनागारांत बंद्यांना जी शिक्षा व वागणूक दिली जाते. त्यांबाबत कसलेच निश्चित नियम नसतात. पुष्कळदा राज्यकर्त्यांच्या इच्छेनुसार बंद्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याचे प्रयत्न केले जातात, आधुनिक मनोवैज्ञानिक साधनांचा तसेच प्रचारयंत्रणेचा उपयोग केला जातो. दुःसाह्य हवामानाचे प्रदेश तसेच खाणी व जंगले यांचा परिसर इ. ठिकाणी बंधनागारे उभारली जातात.

आधुनिक स्वरूपाची निर्मूलनागारे विसाव्या शतकातच जर्मनीत उदयास आली. पहिल्या महायुध्दानंतर बंधनागार व तत्सम संस्था आणि त्यांची कार्यपध्दती यांच्या उच्चाटनांसाठी आंतरराष्ट्रीय पातळी वर कार्य सुरू झाले. या कार्याच्या स्वरूपावरून असे दिसते की, गुलामगिरी किंवा दास्यत्व, वेठबिगार, विनावेतन श्रम, भूदासपध्दती आणि बंधनागार यांच्यात काही बाबतीत साम्य आहे. राष्ट्रसंघाने वरील प्रथांच्या अभ्यासासाठी १९२६ मध्ये एक चौकशी मंडळ नेमले होते. दुसऱ्या महायुध्दानंतर १९४९ सालापासून संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या सनदेतील अनुच्छेद ३० (मानवी हक्क) प्रमाणे अभ्यासास प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या सहकार्याने १९५१ साली एका समितीची नियुक्ती झाली. त्या समितीच्या चार सदस्यापैकी भारताचे रामस्वामी मुदलियार हे एक सदस्य होते. या समितीच्या १९५३ सालच्या अहवालावरून काही राष्ट्रांत राजकीय दबाव आणण्यासाठी राजकीय सैध्दांतिक शिक्षणासाठी तसेच राज्यकर्त्यांना अप्रिय व प्रतिकारक वाटणाऱ्या मतधारकांना शिक्षा देण्यासाठी व आर्थिक उत्पादनासाठी वेठबिगारी व तत्सम साधनांचा उपयोग केला जात असल्याचे दिसले. रशियाचा निर्देश या संदर्भात केला होता. जून १९५७ मध्ये वेठबिगार, दास्यत्व यांसारख्या प्रथांच्या उच्चाटनासाठी एक अधिवेशन भरविण्यात आले. १९५९ सालापर्यंत या अधिवेशनाच्या शिफारसी केवळ चोवीस राष्ट्रांनी मान्य केल्या होत्या.

नाझी जर्मनीतील बंधनागारे : हिटलरच्या कारकीर्दीत ज्यूंच्या निर्मूलनाची मोहीम सुरू झाली. हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी नाझी राज्यकर्त्यांचा पोलीसप्रमुख हाइन्खि हिमलरवर होती. बंधनागारे व निर्मूलनागारे स्थापण्यास आणि त्यांतील कार्यक्रम पार पाडण्यास शुट्सस्टाफल संस्था जबाबदार असे. आडॉल्फ आइकमान हा ज्यू निर्मूलन कार्यास प्रामुख्याने जबाबदार होता. जर्मनीने पादाक्रांत केलेल्या राष्ट्रांतील व प्रदेशातील ज्यू व बुध्दीवंताचे निर्मूलन करण्याची जबाबदारी ‘आइनसाटझग्रुपेन’ (Einsatzgruppen) या संघटनेवर होती. ज्यूं च्या निर्मूलन कार्यक्रमास अंतिम उत्तर म्हणून ओळखले जाई. बंधनागार आणि निर्मूलनागारास जर्मन भाषेत ‘सम्मेलागार’ म्हणतात.

ट्रेब्लिंका, सॉबिबूर, ब्येल्स्क, लूब्लीन, कुल्महोफ आणि औशाव्हित्स अशा सहा निर्मूलनागारांतून पोलंडमध्ये १९४२ च्या मध्यापर्यंत ज्यूंची कत्तल घडत होती. हायड्रोजन सायनाइड या विषारी वायूने ज्यू मारले जात. त्यासाठी प्रचंड कोशाकार इमारती होत्या. निर्मूलनागारांचे खरे स्वरूप गुप्त ठेवण्यासाठी त्यांना श्रमिकांची किंवा युध्द कैदांची परिपालन, परिरक्षण किंवा स्थलांतर आगरे म्हटले जाई. बंधनागारात स्लाव्ह वंशीय, रशियन, ज्यू व बिगर ज्यू यांस बंदिस्त करून त्यांच्यावर वैद्यकीय प्रयोग केले जात. या प्रयोगामुळे तसेच उपासमार व थंडीमुळे लाखो बंदी मरत असत.

हिटलरच्या ज्यू निर्मूलनाच्या कार्यक्रमांची माहिती अमेरिका, ग्रेट ब्रिटन व रशिया यांना मिळत असूनसुध्दा त्यांनी त्याकडे काणाडोळा केला. ज्यूनिर्मूलन तसेच इतर तथाकथित आर्येतर लोकांची चाललेली ससेहोलपट थांबविण्याचे कार्य हाती घेतल्यास, हिटलरविरूध्दच्या युध्दकार्यास खीळ पडेल, असे कारण त्यासाठी दाखविण्यात आले. कदाचित ज्यूंचे शिरकाण झाल्याने यूरोपीय ख्रिस्ती समाज व राज्यकर्त्यांची पूर्वापार चालत आलेली समस्या दूर होईल, म्हणूनही वरील राष्ट्रांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे. असेही एक मत प्रचलित आहे. बारावा पोप पायास यानेही नाझींच्या अघोरी कृत्यांच्या उघडपणे धिःकार केला नाही तथापि ख्रिस्ती धर्मसंस्थांनी हजारो ज्यूंचे नाझीपासून संरक्षण केले. १९४३ च्या मॉस्को येथील जाहीरनाम्यात ज्यू लोकांना नाझीचे बळी म्हणून जाहीर करण्याचे टाळले होते. डेन्मार्क, फिनलंड, स्वीडन आणि जपान या राष्ट्रांनी हजारो ज्यूंना आश्रय दिला होता. न्यूरेवर्ग खटल्यात (ऑक्टोबर १९४५–ऑक्टोबर १९४६) आडॉल्फ आइकमान याच्यावरील तेल आविव्ह येथील खटला (मे १९६३) व नाझी जर्मनीच्या गुप्त पोलीस खात्याच्या कागदपत्रांवरून जगाला वरील घटनांची माहिती मिळाली.

रशियातील बंधनागारे : १९१७ सालापूर्वी रशियात झारशाही होती. झारशाहीत सामान्य बंदिशाळांव्यतिरिक्त कुप्रसिध्द बंधनागारे सायबीरियात होती. ⇨फ्यॉडर डॉस्टोव्हस्कीच्या झापिस्की इच्चू म्योर्तवच दोम (इं. शी. मेम्वार्स ऑफ द हाऊस ऑफ द डेड) या कादंबरित इतर काळात बंधनागारातील व्यक्तीनां मिळणाऱ्या वागणुकीविषयी माहिती मिळते. डॉस्टोव्हस्की हा स्वतःही काही काळ बंधनागारांत होता. लेनिन, ट्रॉटस्की, स्टालिन, इ. क्रांतिकारकांना बंधनागारांत काही वर्ष काढावी लागली. स्टालिनच्या कारकीर्दीत परराष्ट्रमंत्री असलेल्या आंद्रे व्हिशिनस्की यांच्या प्रिझनर्स ऑफ कॅपिटॅलिस्ट (इं. शी.-१७३७) या ग्रंथावरून १९१२ साली झारशाहीच्या श्रमिकागारांत ३२,००० व्यक्ती होत्या. तसेच त्या वेळी सर्व प्रकारच्या बंद्यांची संख्या सु. १,८३ ९४९ होती, असे दिसून येते.

रशियात बोल्शेव्हिक राज्यक्रांती १९१७ साली झाली. राज्यक्रांती नंतर बोल्शेव्हिक राज्यकर्त्यांनी बंधनागारांत आमूलाग्र बदल केले. १६२३ साली तोम्माझो कांपानेल्ला (१५६८-१६३९) याच्या लेखनात परदेशीयांचा संपर्क आणि आचारविचार या प्रदूषणापासून सूर्यनगरीच्या नागरिकाचे रक्षण करणे आवश्यक असते. हा सिध्दांत मांडलेला आहे. लेनिनच्या कारकीर्दीत प्रतिक्रांतिकारक व घातपात करणाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी चेकाची स्थापना झाली. लेनिननंतर स्टालिनच्या काळात शेकडो बंधनागारे उभी राहिली. स्टालिनच्या विरोधकांना तसेच त्याच्या सामुदायिक शेतीच्या मोहिमेस विरोध करणाऱ्या  शेतकऱ्यांना बंधनागारांत डांबून ठेवण्यात आले. १९२८ सालच्या दुसऱ्या क्रांतीनंतर विरोधी विचारसरणीच्या शेतकरी, व्यापारी, अभियंते, तंत्रज्ञ, विचारवंत  इत्यादींना बंधनागारांत डांबण्यात आले. स्टालिनच्या ‘महाशुध्दीकरण’ कार्यक्रमात (१९२८-३८) सु. ७० लक्ष निरपराध व्यक्तींना बंधनागारांत ठेवण्यात आले होते. हजारोंना गुप्त रीत्या ठार मारण्यात आले. याच कार्यक्रमात होल्गा जर्मन, क्रिमियातील कझाक, तार्तर, काल्मूक लोक अशा अल्पसंख्याक जमातींचे निर्मूलन करण्यात आले.


तथाकथित राष्ट्रेद्रोही, वर्गशत्रू व जनतेचे शत्रू यांना शोधण्यासाठी व त्यांच्यावर पुढील इलाज करण्यासाठी बोल्शेव्हिक राजकर्त्यानी झारशाहीतील ओखराना या गुप्तपोलीस संघटनेप्रमाणे गुप्तपोलीस संघटना स्थापन केली. आज ही संघटना के. जी. बी. नावाने ओळखली जाते. स्टालिनच्या वेळी रशियात बंधनागारासच श्रमिक सुधारणागार म्हणत. या सुधारणागारांत बंद्यांचे ‘शुध्दीकरण’ केले जात असे. तसेच बोल्शेव्हिक समाजाला ग्राह्य होईल, असे शिक्षण देण्यात येई. के.जी.बी.च्या ‘गुलाग’ या संस्थेतर्फे या बंधनागारांचे व्यवस्थापन केले जाई. श्रमिकसुधारणा संहितेप्रमाणे आगारांचे पुढील तीन प्रकार आहेत : (१) व्यक्तिस्वातंत्र्य व नागरिकस्वातंत्र्याला वंचित केलेल्यांची आगारे (२) तथाकथित वर्गशूत्रू व जनशत्रू  यांचे आगारे. (३) वरील दोन्ही आगारांतसुध्दा ज्यांची सुधारणा झाली नाही, त्यांना शिक्षा देण्यासाठी असलेली आगारे.

स्टालिनच्या कारकीर्दीत बंद्यांची संख्या पुढीलप्रमाणे होती. १९२८−तीन हजार १९३०-६ लक्ष १९३१-३२-२० लक्ष १९३३-३५ -५० लक्ष १९३७-७० लक्ष. बरीस पास्तेरनाक याच्या डॉक्टर झिवागो व अल्यिक्सांदर सॉल्जनीत्सिन याच्या ए डे इन लाईफ ऑफ डेनिसोव्हिच् ,फर्स्ट सर्कल इ. रशियातील कादंबऱ्यांवरून बंधनागारे बंदिजीवन इत्यादीवर प्रकाश पडतो. न्यिकलाई यझॉव्ह, लायरय कगनॉव्हिच, जी.जी. यागोडा इ. स्टालिनचे सहकारी कुप्रसिध्द होते.

स्टालिनच्या मृत्यूनंतर न्यिक्यित ख्रश्चॉव्हने सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षाच्या विसाव्या अधिवेशनात स्टालिनच्या दहशती व हिंचारारी कृत्यांचा परिस्फोट केला आणि राजकीय विरोधकांना बंधनागारात डांबण्याची पध्दत बंद केली तथापि गुंड, काळाबाजार करणारे, चोर इत्यादीसाठी बंधनागारे चालू ठेविली. बंधनागाराची प्रथा अन्यायाची असल्याने ती बंद करणे उचित आहे, असे ख्रुश्चॉव्हला पटले. तसेच दंडेलीने करवून घेतलेले उत्पादन खुषीने झालेल्या उत्पादनापेक्षा कमीच होते हे उघड झाले. मार्क्सने वेठबिगार, भूदास आणि दास यांचे उत्पादन त्यांची गणसंख्या वाढविली तरीसुध्दा स्वतंत्र कामगारांच्या उत्पादनाशी बरोबरी करू शकणार नाही, असा सिध्दांत मांडला, स्टलिनच्या मृत्यूनंतर बंधनमुक्तीचा आदेश १९५३ व १९५४ साली जाहीर झाला. १९५३-५७ या काळात सु. ७०% बंदी मुक्त झाले. सुमारे ६६% बंधनागारे बंद करण्यात आली. ख्रुश्चॉव्हच्या कारकीर्दीत (१९५३-५४) १९५६ नंतर राजकीय मतभिन्नते वरून कोणालाही बंधनागारात पाठविले नव्हते. १९६४ साली ख्रुश्चॉव्हला पदच्युत करण्यात आले. त्याचे पद ल्येऑन्यिन ब्रेझन्यव्ह यास देण्यात आले. ख्रुश्चॉव्हाच्या कारकीर्दीतील उदारता कमी झाली. १९६६ साली सोव्हिएट विधी नियमावलीच्या १९०-१९१ नियमांप्रमाणे सोव्हिएट राज्य व सामाजिक प्रणाली यांची अप्रतिष्ठा होईल. अशी प्रचारात्मक खोटी कृत्ये गुन्हा समजण्यात येतील असा दंडक जाहीर झाला. या नियमांचा आधार घेऊन विरोधी विचारप्रणालीच्या लोकांना बंधनागारात किंवा वेड्यांच्या इस्पितळात बंद करणे सुरू झाले. ब्रेझन्यव्ह या ने स्टालिनच्या कारकीर्दीतील बंधनावर व्यवस्थापकांना बंधनागारांचे कारभारी नेमले. के.जी.बी.ची लेनिनग्राड, कझान्य, चेर्न्यवॉव्हस्क, मीन्स्क, ऑरेल येथे वेड्यांची इस्पितळे आहेत. तथाकथित ‘राजकीय किंवा बुध्दिवंत वेड्यांना’ तेथे डांबण्यात येते.

दुसऱ्या महायुध्दानंतर बोल्शेव्हिक रशियाच्या सैनिक सहाय्याने पोलंड, रूमानिया, चेकोस्लोव्हाकिया, बल्गेरिया इ. राष्ट्रांत समाजवादी राजवटी आल्या. त्यांनी रशियाप्रमाणे दहशह व हिंसाचारी मार्गांनी विरोधकांचा बंदोबस्त केला. रूमानियात डॅन्यूज काळा समुद्र कालवा बांधण्यावर हजारो बंदीना राबविण्यात आले. पोलंडमध्ये सायलेशियातील मृत्यूसदृश कोळसा खाणीत राजकीय बंद्यांना कामावर लावले. चेकोस्लोव्हाकियात १२४, हंगेरीत १९९ व पोलंडमध्ये ९७ बंधनागारे होती.

पहा : ज्यूविरोधवाद दास्य नाझीवाद न्यूरेंबर्ग खटले भूदासपध्दती वेठबिगार. 

संदर्भ :

1. Arendt, Hannab, The Origins of Totaltarinism, New York, 1951. 

2. Bullock, Alan,Hitler, A,Study in Tyranny Boston, 1962. 

3. Conquest,Robert ,The Great Terror Stallr Purge of the Thirtles, London, 1968.

4. Khrushchev Nikita, Trans,Talbott,Strobe,Khrushchev Remembers, London, 1971. 

5. Morse, A.D. While Six Millen Died London, 1968,

दीक्षित, हे. वि.