बंदोपाध्याय, चारूचंद्र : (११ ऑक्टोबर १८७६-१७डिसेंबर १९३८). भारती (१८७७-१९२७) मासिकाभोवती निर्माण झालेल्या साहित्यपरिवारातील एक प्रधान बंगाली कथालेखक व कादंबरीकार. माल्डा जिल्ह्यातील चांचल गावी जन्म. बलागड येथील इंग्रजी शाळेतून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १८९९ मध्ये बी.ए. पदवी घेऊन काही काळ त्यांनी माल्डा येथील शाळेत शिक्षक म्हणून आणि नंतर अलाहाबाद इंडियन प्रेसच्या संपादनविभागात नोकरी केली. कलकत्त्याच्या इंडियन पब्लिशिंग हाउसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. १९१६ मध्ये कलकत्ता विद्यापीठात एम.ए.चे वर्ग सुरू झाले. त्यावेळी आशुतोष मुखोपाध्याय यांच्या आमंत्रणावरून त्यांनी बंगाली साहित्याचे विनावेतन अध्यापन केले. १९२४ मध्ये डाक्का विद्यापीठांच्या निमंत्रणावरून ते तेथे बंगालीचे अधिव्याख्याता झाले व तेथून १९३६ मध्ये सेवानिवृत्त झाले. यानंतरही दोन वर्षे डाक्का येथील जगन्नाथ इंडरमीडिअट कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले. १९२८ मध्ये डाक्का विद्यापीठाने त्यांना एम.ए.ची सन्मान्य पदवी दिली. प्रवासी ,मॉडर्न रिव्हू इ.पत्रकांच्या संपादनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. संस्कृत ,उर्दू, फार्सी, जर्मन व फ्रेंच या भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या.
चारूचंद्रांचा पुष्पपात्र (१९१०) हा पहिला कथासंग्रह. याशिवाय सओगात (१९११), धूपछाया (१९१२), बरण-डाला (१९१३), मणिमंजीर (१९१७), देऊलियार जमाखर्च (१९३८) इ. कथा संग्रह विशेष महत्त्वाचे आहेत.या कथासंग्रहांवर मोपासा, स्ट्रिन्बॅर्थ, झ्यूल, लमेअत्र इ. पाश्चात्य लेखकांच्या निवडक कथांची दाट छाया आहे. आगुनेर फुलकी (१९१४) ही त्यांची पहिली कादंबरी फ्रेंच कादंबरीकार प्रॉस्पेअर मेरीमे यांच्या कोलंबा कादंबरीवर आधारित आहे. याशिवाय यमुना पुलिनेर भिखारिणी (१९१७, व्हिल्हेल्म हाउफ यांच्या कादंबरीवर आधारित) सर्वनाशेर नेशा (१९२३, प्रॉस्पेअर मेरीमे यांच्या कार्मेंवरून) नोंगर छँडा नौका (१९२४ जपानी लेखक शिमे फुताबाते यांच्या व्हिक्टोरियावरून) इ. कादंबऱ्या विदेशी लेखकांच्या कृतींच्या आधारे लिहिलेल्या आहेत. बरण-डाला, स्त्रोतेर फूल (१९१५), दुईतार (१९१७), हेरफेर (१९१८,) नष्टचंद्र (१९२५) इ. कादंबऱ्यांची कथावस्तू मुळात रवींद्रनाथ टागोरांनी सुचविली, असे लेखकाने स्वतः नमूद करून ठेवले आहे. रबिरश्मि (३ खंड, १९३८) आणि रवींद्रसाहित्य परिचिती (१९४२) हे रवींद्रांच्या साहित्यावरील त्यांचे समीक्षाग्रंथ आहेत. याशिवाय त्यांनी जयश्री (१९२६) हे नाटक व राबेया (१९१२) हे चरित्रही लिहिले आहे.
चारूचंद्राच्या लेखनात भावविवशता अधिक आहे. निषिध्द प्रेमावर भर देऊन काही लेखन केल्यामुळे ते आधुनिक लेखक गणले जातात. त्यांच्या मुक्तिस्नान व यमुना पुलिनेर भिखारिणी या दोन कादंबऱ्यांवर बंगाली चित्रपटही निघाले. विदेशी साहित्याचे अनुवाद लहान मुलांसाठी काही संपादित ग्रंथ चारूचंद्रानी तयार केले आहेत. संपादनकार्यातील त्यांची चिकाटी व परिश्रम बंगाली साहित्यविश्वात अजरामर आहेत. कन्नड भाषेत चारूचंद्रांच्या दुईतारचे एरडु सेलेटा (१९४७) व मुक्तितस्नांनचे जिरूगी मनेगे (१९४७) ही भाषांतरे झाली असून ती मेरूवंडी मल्लारी यांनी केली आहेत. कलकत्ता येथे चारूचंद्राचे निधन झाले.
आलासे, वीणा