बंदोपाध्याय,करूणानिधान : (१९ नोव्हेंबर १८७७-५फेब्रुवारी १९५५). एक बंगाली भावकरी. शांतिपूर गावी जन्म. वडिलांची बदलीची नोकरी असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये शिकून अखेर शांतिपूर येथून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर कलकत्त्याच्या रिपन कॉलेजमध्ये शिक्षण पण राजकीय घडामोडींमध्ये जास्त लक्ष घातल्यामुळे ते पदवी घेऊ शकले नाही. शांतिपूर व कलकत्ता येथे शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. शेवटी त्यांनी बरेचसे आयुष्य भटकेपणात व्यतीत केले. शांतिपूर येथे ते निधन पावले.

बंग-मंगल (१९०१) हा करूणानिधानांचा पहिला काव्यग्रंथ. कॉलेजमध्ये शिकत असतानाच लिहिलेले हे काव्य रचनात्मक दृष्ट्या अपरिपक्व असले, तरी कवीच्या मनातील प्रखर देशभक्तीचा प्रत्यय देणारे आहे. याशिवाय त्यांचे प्रसादी (१९०४) झरा-फुल (१९११), शांतिलाल (१९१३) धानदूर्बा (१९२१) इ. संग्रह महत्त्वाचे आहेत. ‘सुदूर स्मृति’, ‘दुष्टु’ ‘बासना’ इ. त्यांच्या लोकप्रिय कविता प्रथम मानसी या पत्रकातून प्रकाशित झाल्या होत्या.

करूणानिधान हे ⇨रविंद्रनाथ टागोरांच्या परंपरेतील भावकवी होत. त्यांच्या कविप्रकृतीवर ⇨देवेंद्रनाथ सेन यांचाही प्रभाव आहे. त्यांच्या कवितेतील भक्तीसावर वैष्णव संप्रदायाचीही काहीशी छटा आहे. त्यांच्या प्रेमकवितेत कौंटुबिक जिव्हाळा जाणवतो. करूणानिधानांनी विपुल लेखन केले नाही व फारसे विषयही हाताळले नाहीत. अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाच्या उद्रेकातून निघालेली त्यांची कविता रवींद्रयुगातही स्वतःचे स्वतंत्र्य स्थान निर्माण करू शकली. १९५० मध्ये त्यांचा वंगीय साहित्य परिषदेने सत्कार केला व त्यांना मानपत्र दिले १९५३ मध्ये आकाशवाणीवर झालेल्या बंगाली कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५१ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना ‘जगत्तारिणी सुवर्णपदक’ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

आलासे, वीणा.