बंदा : (१६७०-१७१६ ?). शिखांचे दहावे. म्हणजेच शेवटचे, गुरू ⇨गोविंदसिंग (१६६६-१७०८) यांच्यानंतर शिखांचे राजकीय व सैनिकी नेतृत्व करणारे एक अंत्यंत शूर पुरूष. बंदा यांचा जन्म पूर्वीच्या पूंछ संस्थानातील राजौरी नावाच्या गावी एका रजपूत घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामदेव आणि त्यांचे स्वतःचे मूळ नाव लक्ष्मणदेव असे होते. एकदा शिकार करताना त्यांच्या हातून एक गाभण हरिणी मारली गेली. त्यामुळे त्यांना पश्चाताप झाला. मग त्यांनी जानकीप्रसाद नावच्या एका गुरूचे शिष्यत्व पतकरले आणि माधवदास हे नाव धारण करून ते बैरागी बनले. याच अवस्थेत ते फिरत फिरत पंचवटी येथे आले आणि तेथे त्यांनी बरीच वर्षे तपश्चर्या केली. तेथेच त्यांनी लूनी वा औघडनाथ नावाच्या एका जोग्याकडून योग, मंत्रविद्या, जादूटोणा इत्यादीचे ज्ञान मिळविले. लूनी व औघडनाथ ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आहेत की एकाच व्यक्तीची नावे आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कालांतराने त्यांनी नांदेड येथे आश्रम उभारला. तेथे बैरागी म्हणून त्यांची कीर्ती बरीच पसरली. त्यामुळे उत्सुकता निर्माण होऊन गुरू गोविंदसिंग त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले.
आपल्या भेटीत गोविंदसिंगानी त्यांना पंजाबमधील राजकीय स्थिती समजावून सांगितली तसेच त्यांना स्वातंत्र्यप्राप्ती व अन्यायनिवारण यांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. गोविंदसिंगांचा प्रभाव पडल्यामुळे माधवदास यांनी स्वतःला त्यांचा बंदा (सेवक) म्हणवून घेतले. म्हणूनच पुढे त्यांना बंदासिंग, बंदा बैरागी, बंदा बहादूर इ. नावे मिळाली. गोविंदसिंगानी बंदांचे गुरूबक्षसिंग असे नामकरण करून त्यांना सोन्याने मढवलेले पाच बाण दिले. इतकेच नव्हे, तर गुरू अंगदांचे वंशज बाबा बिनोदसिंग व बाबा काहनसिंग गुरू अमरदासांचे वंशज बांजसिंग व स्वतःच्या फौजेतील निवडक पाच सैनिकीही त्यांच्या सोबत दिले. त्यानंतर गोविंदसिंगांच्या आदेशानुसार आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी पंजाबात जाऊन त्यांनी शिखांचे मोठे सैन्य उभारले. तेथे अनेक लढाया करून त्यांनी मुसलमानींची कित्येक ठाणी जिकंली. सरहिंदच्या ज्या वजिराने गुरू गोविंदसिंगांची मुले चिणून मारली होती, त्या वजिराची हत्या करून त्यांनी सूड उगवला. पर्वतप्रदेशातील राजांनाही त्यांनी जिकंले. अशा रीतीने लाहोरपासून पानिपतपर्यंतचा प्रदेश त्यांच्या अंमलखाली आला. याच काळात त्यांनी लोहगड येथे आपली राजधानी स्थापन केली.
सतत चाललेल्या युध्दांमुळे राज्याची घडी बसविण्यास त्यांना फारसा वेळ मिळाला नाहीच परंतु मिळालेल्या थोड्या फार काळातही त्यांनी जमीनदारीची पध्दत नष्ट केली. भंगी, चांभार इ. तथाकथित हलक्या जातींच्या लोकांनाही मोठे अधिकार दिले. नाणी, मुद्रा इ. माध्यमातून राजकीय अधिकार वापरताना त्यांनी ते स्वतःच्या नावाने न वापरता, गुरू नानक व गुरू गोविंदसिंग यांच्या नावांनी वापरले तसेच सरहिंदच्या विजयानंतर त्यांनी राजशकही सुरू केला.
त्यांच्या या पराक्रमामुळे दिल्लीचा बादशाह व बहादुरशाह चिडला आणि त्याने लोहगडाला वेढा घातला, परंतु बंदा त्या वेढ्यातून निसटले (३० नोव्हेंबर १७१०) आणि त्यांनी पुन्हा लढा सुरू केला. बहादुरशाहाच्या मृत्यूनंतर (१७१२) फरूखसियर हा बादशाहा झाला. त्याने दिलेरजंगाला बंदा यांच्यावर चालून जाण्यास सांगितले. त्याच्या वेढ्यातूनही ते निसटले. तरीही मोगल सैन्य त्यांचा सतत पाठलाग करीत होते. शेवटी ते गुरूदास नांगल या खेड्यात अडकून पडले. तेथे जनावरांचे मांस, झाडांची पाने, झाडांच्या सालींची भुकटी, एवढेच नव्हे तर स्वतःच्या मांड्यांचे मांस खाऊनही त्यांच्या सैनिकांनी आठ महीने निकरीने लढा दिला. शेवटी ते पकडले गेले की स्वतःहून शत्रूच्या स्वाधीन झाले. याविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत.
बंदांना पकडल्यानंतर दिल्लीला नेण्यात आले. तेथे मुसलमान होण्यास नकार दिल्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली (१६वा १९ जून १७१६). परंतु बंदा हे तुरूंगातून निसटले अथवा त्यांना मृत समजून फेकून दिल्यानंतर त्यांच्या अनुयायांकडून त्यांना वाचविण्यात आले आणि पुढे १७४१ पर्यंत ते जगले. असे काही इतिहासकार मानतात. जम्मू-काश्मिरमधील ‘भाबर’ या गावापासून सु. ५ किमी. अंतरावर त्यांची समाधी असून तेथे दरवर्षी मोठी यात्रा भरते.
बंदाचे वर्तन पूर्णांशाने शिखांसारखे नसल्यामुळे अनेक शिखांनी त्यांना पाखंडी मानून विरोध केला आणि त्यामुळे ते पराभूत झाले, असे काही इतिहासकार मानतात. त्यांच्या मते बंदा यांनी गुरूचा ब्रम्हचर्यपालनाचा आदेश झुगारून छांबच्या राजकन्येशी विवाह केला. गोविंदसिंगांजवळ शिखांची गुरूपंरपरा संपत असतानाही आपण अकरावा गुरू असल्याचे त्यांनी म्हटले. सरहिंदच्या वजिराची हत्या केल्यानंतर कार्यभाग संपल्यामुळे निवृत्त व्हावे, असा गोविंदसिंगांची पत्नी माता सुंदरी यांना आदेश दिला असताही, तो बंदांनी मानला नाही. शिखांमध्ये बंदीया (वा बंदाई) म्हणून स्वतंत्र पंथ चालू केला. परंपरागत घोषणांच्या जागी काही नव्या घोषणा रूढ केल्या. गुरू गोविंदसिंगांनी मांसाहार सांगितला असतानाही तो वर्ज्य मानला. केस ठेवण्याचा आग्रह धरला नाही. त्यांच्या या वर्तनामुळे शिखांमध्ये दुफळी निर्माण झाली. व त्यांच्या मृत्यूनंतर शिखांना नेता उरला नाही, असे काही इतिहासकारांचे मत आहे. यांखेरीज, शिखांचा उच्छेद करण्याचा बादशाहाचा दृढ निर्धार, त्यांची प्रचंड शक्ती, त्याने आमिष दाखवून शिखांमध्ये पाडलेली फूट, हिंदूंची तटस्थता, श्रीमंत शिखांच्या मदतीचा अभाव, डोंगरी राजांचे वैर, ऐनवेळी साथीदारांनी सोडून जाणे इ. गोष्टीही त्यांच्या पराभवाला कारणाभूत झाल्याचे सांगितले जाते.
युध्दप्रसंगी कत्तली केल्या असल्यामुळे काही इतिहासकार त्यांना क्रूर व मुस्लिमद्वेष्टे मानतात परंतु त्यांनी केलेल्या कत्तली या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या होत्या. अन्यायी राजसत्तेला शह देण्यासाठी त्यांनी हा मार्ग स्वीकारला होता, असे दिसते. त्यांच्या सैन्यात पाच हजार मुसलमान होते आणि त्यांना तेथे नमाज वगैरे धार्मिक कृत्ये करण्याचेही स्वातंत्र्य. यावरून ते मुस्लिमद्वेष्टे होते, असे म्हणता येत नाही. मोगली सत्ता अजिंक्य नाही आपण तिचा पराभव करू शकतो आणि आपण स्वातंत्र्य मिळवून स्वतःचे राज्य स्थापन करू शकतो. हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. म्हणूनच, एक स्वातंत्र्य सेनानी या नात्याने भारतीय इतिहासातील त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
संदर्भ : 1. Gandasingh, Life of Bandasingh Bahadur, Amritsar, 1935.
२. ठाकूर, ईश्वरसिंघ, शीख लोकांचा संक्षिप्त इतिहास, पुणे, १९६३.
साळुंखे, आ. ह.