बंगाल : भारताच्या ईशान्य किनाऱ्यावरील फाळणीपूर्वीचा (१९४७) प्रांत. विद्यमान बांगला देश (पूर्व बंगाल-क्षेत्रफळ १,४२,७७६ चौ.किमी.) व भारतातील पश्चिम बंगाल राज्य (क्षेत्रफळ ८७,८५३ चौ.किमी.) या दोहोचा अंतर्भाव असलेल्या या प्रांताचे क्षेत्रफळ २,३०,६२९ चौ.किमी. होते. फाळणीच्या वेळी बंगालमधील ३० जिल्ह्यांपैकी पूर्वेकडील चौदा जिल्हे पूर्व पाकिस्तानात व सोळा जिल्हे भारतात (प.बंगाल) समाविष्ट करण्यात आले. आग्नेयीस ब्रह्मदेश, वायव्येस नेपाळ व ईशान्येस भूतान या देशांनी तर नैर्ॠत्येस ओरिसा, पश्चिमेस बिहार, उत्तरेस सिक्कीम व पूर्वेस आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम (केंद्रशासित) या भारतातील राज्यांनी बंगाल प्रांत सीमित झाला होता. त्याच्या दक्षिणेस बंगालचा उपसागर आहे. ⇨ कलकत्ता हे बंगालच्या प्रशासनाचे केंद्र होते.

भौगोलिक दृष्ट्या हा प्रदेश गंगा-ब्रह्मपुत्रेसारख्या मोठमोठ्या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांत मोडतो. त्याचा दक्षिणेकडील बहुतेक प्रदेश सपाट व गाळयुक्त आहे. उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याकडील डोंगररांगा असून हा प्रदेश सरासरी ३,६६० मी.पेक्षाही जास्त उंचीचा आहे. याच भागात दार्जिलिंग व जलपैगुरी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. पूर्व बंगालमध्ये त्या मानाने कमी उंचीचे डोंगर आहेत. त्यांपैकी आग्नेयीकडील चितगाँग टेकड्यांचा प्रदेशच सरासरी ६१० मी. उंचीचा आढळतो. बंगालचा पश्चिमेकडील प्रदेश कमी उंचीचा व पठारी आहे. गंगा, पद्मा, ब्रह्मपुत्रा, मेघना, जमुना इ. मोठ्या नद्या व त्यांच्या उपनद्या यांमुळे बहुतेक भागांत गाळाची मैदाने तयार झाली आहेत. बंगालमधील दक्षिण किनारपट्टीचा भाग जंगलांचा व दलदलींचा असून त्यांत अनेक बेटे आहेत आणि याच भागांत ‘सुंदरबन ’ या नावाने ओळखला जाणारा दलदलीचा प्रदेश आढळतो. मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाने पावसाळ्यात आणि हिमालय पर्वतातील बर्फ वितळल्याने उन्हाळ्यात नद्यांना मोठे पूर येऊन गाळाच्या संचयनाने त्यांची पात्रे बदलतात. या नित्य स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रतिवर्षी या भागात मोठी प्राणहानी व वित्तहानी होत असते.

बंगालचे हवामान उष्ण असून पाऊसही भरपूर पडतो. मात्र स्थलपरत्वे तपमानात व पर्जन्यमानात फरक होतो. पं. बंगालच्या उत्तर भागात उन्हाळयात तपमान कमी असते तर दक्षिण भागात ते जास्त असते. हाच फरक पर्जन्याच्या बाबतीतही आढळतो. या मानाने पूर्व भागात प्रदेशपरत्वे या प्रकारचा फरक फारसा आढळत नाही. बंगालमधील जंगलांत वाघ, चित्ते, हत्ती इ. प्राणी आढळतात. हा प्रदेश कृषिप्रधान असून सर्व प्रकारची पिके घेतली जातात. या भागातील भात व ताग या मुख्य पिकांबरोबरच चहा, तंबाखू इ. पिकांनाही उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्व आहे. यांशिवाय खाणींतून कोळसा, तांबे इ. खनिजेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. या प्रदेशातील कलकत्ता, डाक्का, चितगाँग, हावडा, नारायणगंज, दार्जिलिंग इ. शहरांना पूर्वीपासूनच व्यापारी व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व आहे.

प्राचीन साहित्यात ⇨ अंग (विद्यमान बिहारमधील प्राचीन जनपद) आणि वंग देशांचा उल्लेख आढळतो. यापैकी ‘वंग ’म्हणजे पूर्व बंगाल होय. या भागात नद्यांना येणाऱ्या पुरांपासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या उंच टेकडीवजा अडथळ्यांना ‘आल’ म्हणत. यावरूनच ‘वंगाल’ &gt ‘बंगाल’ अशी व्युत्पत्ती असावी, असे अबूल फज्लने म्हटले आहे. बंगालविषयी अनेक शिलालेखांतही उल्लेख आढळतात. या भागाला ‘सोनारगांव’ असेही म्हणत. मुसलमानी अंमलात मुस्लिम इतिहासकारांनी प. बंगालला ‘लखनौती’ किंवा ‘गौड’ असे नाव दिले. त्यामुळे कधीकधी संपूर्ण बंगालला ‘गौंड-बंगाल’ असे संबोधिले जाई.

या प्रदेशात पाषाणयुगापासून मानववस्ती असल्याचे काही पुरावे उपलब्ध झाले आहेत. नवपाषाण युगातील मानवाने उभारलेली प्रचंड शिलास्मारकेही येथे आहेत. ताम्रयुगातही बंगालमध्ये मानवी वस्ती असावी. वैदिक आर्यांपूर्वी भारतात आलेले ऑस्ट्रिक व द्रविड लोक बंगालमध्ये राहिले होते. अथर्ववेदात व शतपथ ब्राह्मणांत त्यांचा ‘प्राच्य लोक’ असे उल्लेख आढळतो. पाणिनीने अग,वंग इत्यादींचा प्राच्य जनपदे म्हणून उल्लेख केलेला आहे. सांख्यदर्शनप्रणेता कपिलमुनी सुंदरबनचा रहिवासी होता व त्याच्या आदेशावरूनच भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली, अशी आख्यायिका आहे. इ.स.पू. सहाव्या शतकातील या प्रदेशात असणाऱ्या जनपदांविषयीचा उल्लेख प्राचीन बौद्ध व जैन साहित्यांतही आहे. त्या काळात एक प्रबळ व वैभवसंपन्न प्रदेश म्हणून तो ओळखला जाई. इ.स.पू. चौथ्या शतकापासून या प्रदेशावर मौर्य घराण्याची सत्ता होती. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर येथे कुशाणांचे राज्य आले, असे सापडलेल्या शिलालेखांवरून व नाण्यांवरून दिसून येते. यानंतर मात्र इ.स. चौथ्या शतकापर्यंतचा बंगालचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. चौथ्या शतकानंतर गुप्त घराणे, गौड राजे, तर सातव्या शतकात हर्षवर्धन, आठव्या शतकात पाल राजे अकराव्या-बाराव्या शतकांत हिंदुसेन घराणे इत्यादींच्या सत्ता या प्रदेशावर होऊन गेल्या. बंगालचा त्यापुढील राजकीय इतिहास पुढे थोडक्यात दिलेला आहे.

इ.स. १२०० च्या सुमारास तुर्की मुसलमानांनी बंगालवर आपली सत्ता प्रस्थापित केली. १५७९ मध्ये पोर्तुगीजांनी बंगालमधील सातगाव भागात आपला अंमल बसविला. त्यावेळी या प्रदेशावर मोगलांची सत्ता होती. डच, फ्रेंच व पोर्तुगीज यांच्या व्यापाराला शह देण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात (१६३३ किंवा १६४२) बंगालमध्ये हुगळी येथे आपली पहिली वसाहत स्थापन केली. १६९० मध्ये कंपनीने कलकत्ता शहराची (हुगळीजवळ) स्थापना केली. १७५६ मध्ये सिराजउद्दौलाने कलकत्ता शहर काबीज केले. याच वेळी कलकत्त्याच्या तथाकथित अंधकारकोठडीत अनेक इंग्रज गुदमरून मेल्याचे सांगतात. १७५७ मध्ये झालेल्या ⇨ प्लासीच्या लढाईमुळे बंगालमधून मुस्लिम सत्तेचे उच्चाटन झाले व बंगाल हा ब्रिटिश सत्तेखाली आला. याच्या शेजारील आसाम, बिहार, ओरिसा या राज्यांवरही बंगाल इलाख्याचाच (प्रेसिडेन्सीचा) अंमल होता. मुस्लिम अंमलातील बेबंद कारभाराला कंटाळलेल्या बंगाली लोकांनी इंग्रजी अंमलाचे स्वागतच केले. भारताच्या इतर प्रदेशांच्या मानाने बंगालमध्येच पश्चिमी संस्कृतीचा व आधुनिक विचारप्रणालींचा ठसा अधिक लवकर व खोलवर उमटला. भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय यांनी धर्मिक-सामाजिक सुधारणांचा बंगालमध्ये पाया घातला. त्यांनी ‘ब्राह्मोसमाजा’ची स्थापना करून या सुधारणावादी चळवळीला चालना दिली. ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिमचंद्र चतर्जी, स्वामी विवेकानंद इत्यादींनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. बंकिमचंद्र, अरविंद घोष यांनी पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय चळवळीही सुरू केल्या. या काळातच १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. तिला या नेत्यांनी विरोध केला व त्यातूनच स्वदेशीची चळवळ सुरू झाली. १९०६ साली अरविंद घोष व बारींद्रकुमार घोष या बंधूंनी वंदेमातरम्युगांतर पत्रांद्वारे क्रांतिकारक विचारप्रणाली मांडली. खुदिराम बोस, बारींद्रकुमार, प्रफुल्लचंद्र चाकी इत्यादींनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला. या उद्रेकामुळे १९१२ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस यांसारख्या थोर राष्ट्रभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्वही केले. 


  

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात बंगालमध्ये भाषिक ऐक्य होते तरी हिंदू व मुस्लिम या धर्मभावनेने येथील लोक वेगवेगळे होते. १९४१ मध्ये बंगालमधील एकूण लोकसंख्येपैकी हिंदु-मुस्लिम अनुक्रमे ४२% व ५४% होते तर बंगाली भाषिकांचे प्रमाण ९०% होते. १९४७ च्या फाळणीमुळे हिंदूंचे आधिक्य असलेला प.बंगाल भारतात आला व मुस्लिमांचे प्रमाण जास्त असलेला पूर्व बंगाल पूर्व पाकिस्तान या नावाने पाकिस्तानचा भाग राहिला. नंतर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान ‘बांगला देश’ या नावाने स्वतंत्र झाला. (चित्रपत्र).

पहा: पश्चिम बंगाल राज्य बांगला देश.

चौंडे, मा.ल.

बंगाल 

शिवपार्वती, ब्राँझशिल्प, १२वे/१३वे शतक बंगाली पटचित्र दुर्गापूजा:विसर्जनदृश्य पक्वमृदा शिल्पपट्टाचे अंशदृश्य, लक्ष्मीजनार्दन मंदिर, सिंगटी (जि. हुगळी), १७७७. पक्वमृदेतील वास्तुसजावट: चार बंगला मंदिर, बारानगर (जि. मुशिंदाबाद), १८ वे शतक. ‘वैष्णव फिगर्स’: जेमिनी रॉय (१८८७ –) यांची चित्रकृती. सुजनी कंथा: पारंपरिक बंगाली भरतकाम बंगालमधील चहामळ्याचे दृश्य उत्पल्ल दत्त निर्मित आधुनिक बंगाली जात्रा.