फ्लॉरेन्स : मध्य इटलीतील इतिहासप्रसिद्ध शहर व तस्कनी प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,६४,०२० (१९७७). हे रोमच्या वायव्येस सु. २३२ किमी. अंतरावर, ॲपेनाइन्‌स पर्वताच्या पायथ्याशी व आर्नो नदीच्या दोन्ही काठांवर वसले आहे. अनेक उद्याने व उपवने भव्य, कलात्मक चर्चवास्तू व राजवाडे यांनी नटलेली ही इंद्रपुरी म्हणजे इटालियन प्रबोधनाच्या रत्नमणी समजली जाते. आधुनिक फ्लॉरेन्स हे फॅशनचे केंद्र त्याचप्रमाणे पर्यटकांचेदेखील फार मोठे आकर्षण आहे.

ॲपेनाइन्‌स पर्वतरांगेतील एका टेकडीवर इट्रुस्कन लोकांचे नगर होते. त्या टेकडीच्या पायथ्याशी फ्लॉरेन्स वसले असून रोमनकाळात फ्लॉरेन्स व रोम यांमधील मार्गावर (कॅसियन वे) या शहराची वसाहत होती. इ. स. पाचव्या व सहाव्या शतकांत गाँथ, बायझंटिन आणि लोंबार्ड यांच्या ताब्यात आळीपाळीने हे शहर होते. मध्ययुगात (बाराव्या शतकात) त्याला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला. तेराव्या शतकात पोपचे समर्थक (ग्वेल्फ) व सम्राटाचे पक्षपाती (गिबलीन) यांच्यात या शहरासाठी संघर्ष सुरू होता. या संदर्भात शेवटी पोपच्या समर्थकांना यश मिळाले. पुढे त्यांच्यातही काळे व गोरे असे तट पडून यादवी माजली. प्रसिद्ध इटालियन महाकवी दान्ते यास याच काळात (१३०२) फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यात आले कारण तो गोरा पोपसमर्थक होता.

या काळात फ्लॉरेन्सचे पीसा व इतर शहरांशी अनेकवार झगडे झाले. त्यांत फ्लॉरेन्सला अनेकदा विजय मिळाला. रेशीम, लोकर, जर व जरतारी काम, मूल्यवान रत्ने व रत्नालंकार, चित्रजवनिका इत्यादींच्या व्यापारामुळे फ्लॉरेन्सकडे संपत्तीचा ओघ वळला व त्याची भरभराट झाली. याच काळात आरेत्सो, पीस्तॉया, व्हॉल्टेर्रा इ. आसपासची नगरे फ्लॉरेन्समध्ये विलीन होऊन त्याचा विस्तारही झाला.

कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक, फ्लॉरेन्स.इ. स. १३४८ मधील प्लेगच्या (काळा मृत्यू) साथीने फ्लॉरेन्समधील सु. ६०% लोक मृत्यूमुखी पडले. पंधराव्या शतकात येथे नगरराज्य होऊन मेदीची या श्रीमान व्यापारी व लोकप्रिय घराण्याकडे सत्ता गेली. या काळात येथील शासनाचे स्वरूप बाह्यतः प्रजासत्ताकासारखे असले, तरी खरी सत्ता मेदीची घराण्याकडेच होती. मेदीचीच्या दीड-दोन शतकांच्या अंमलात व विशेषतः लोरेन्झो दे मेदीचीच्या कारकीर्दीत (१४६९-९२) विद्याकलादी क्षेत्रांत फ्लॉरेन्सचा कीर्तिसुगंध सर्वत्र पसरला. मायकेलअँजेलो, लिओनार्दो दा व्हींची, रॅफेएल, दोनातेलो, दान्ते, पीत्रार्क, बोकाचीओ, गॅलिलीओ इ. साहित्यकलाविज्ञानादी क्षेत्रांतील प्रतिभावंतांचे वास्तव्य येथे असून कित्येक विद्धत्सभा व कलासंस्था येथे कार्य करीत होत्या. त्यामुळे सर्व यूरोपवर या शहराची छाप होती. राजकीय क्षेत्रात मात्र येथे सदैव अशांतता होती. मेदीचीनंतर काही काळ (१४९४-९९) सावोनारोला ह्या धर्मसुधारकाच्या हाती सत्ता होती. सम्राटाचा प्रतिनिधी म्हणून मॅकिआव्हेली हा याच काळात फ्लॉरेन्समध्ये होता. १५३० च्या सुमारास फ्लॉरेन्ससह

फ्लॉरेन्स : एक दृश्यइटलीचा बराच भाग सम्राट पाचवा चार्ल्स याच्याकडे गेला व त्याचे मांडलिक म्हणून मेदीची घराण्याचा कारभार पुन्हा सुरू झाला. १५६९ मध्ये फ्लॉरेन्स हे टस्कनीच्या ग्रँड डचीची राजधानी बनले. मेदीचींचा निर्वश झाल्यावर (१७३७) हॅप्स-बर्ग-लॉरेन घराण्याकडे फ्लॉरेन्स गेले व ते सार्डिनियास जोडण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या उततरार्धात (१८६५-७१) नवनिर्मित इटलीची राजधानीही फ्लॉरेन्स येथेच होती.

दुसऱ्या महायुद्धात पॉन्ते व्हेक्क्यो वगळता आर्नो नदीवरील सर्व प्रसिद्ध पूल उद्ध्वस्त करण्यात आले, शहरातील अनेक इतिहासप्रसिद्ध इमारतींची पडझड झाली व शहराचा जुना मध्यभाग संपूर्णतः नष्ट झाला. मात्र शहरातील बहुतेक सर्व कलासंग्रह शाबूत राहिलें. युद्धोत्तर काळात शहराचा मध्यभाग नव्याने वसविण्यात येऊन आर्नो नदीवर नवे पूल बांधण्यात आले. नोव्हेंबर १९६६ मध्ये आलेल्या महापुराने फ्लॉरेन्समध्ये हाहाःकार उडाला. ६ ती. पाण्याच्या भिंतीमुळे शहराचे प्रचंड नुकसान झाले.


फ्लॉरेन्स शहर प्रचीन वास्तूंनी संपन्न आहे. शहराच्या कोणत्याही भागात गेले, तरी एखादी इतिहासप्रसिद्ध इमारत किंवा एखादे कलासंग्रहालय दृष्टीस पडते. फ्लॉरेन्सच्या विख्यात प्राचीन इमारतींपैकी कॅथीड्रल ऑफ सांता मारिया फ्योरे (तेरावे शतक) हे गॉथिक शैलीत असून त्यावरील घुमट ब्रुनेल्लेस्कीच्या हातचा आहे. या इमारतीजवळच जॉत्तोने बांधलेला घंटीघुमट व पिसानो आणि गीबेर्तींने तयार केलेले कलापूर्ण दरवाजे असलेले जलसंस्कार दालन आहे. सांता क्रोचे ह्या फ्रॅन्सिस्कन प्रार्थनामंदिरात जॉत्तोची कोरीव चित्रे तसेच रोस्सेल्लीनो आणि देल्ला रोब्ब्या कुटुंबियांच्या अन्य कलाकृती आहेत. सांता मारिया नोव्हेल्ला हे तेराव्या शतकातील कॅथीड्रल आल्बेर्तींच्या अनेक कलाकृतींनी अलंकृत आहे. सेंट मार्कच्या मठात फ्रा अँजेलिकोच्या कलाकृती व सांता मारिया देल कामाईन चर्चमध्ये फिलोप्पो लिप्पी या कलाकाराची भित्तिलेपचित्रे आहेत. सॅन लॉरेन्झो चर्चमध्ये दोनातेलोच्या कलाकृती व मायकेलअँजेलोने बांधलेली मेदीची घराण्याची कलापूर्ण थडगी आहेत. पॅलँझ्झो देल सिनोरा म्हणजे नगरभुवनात व्हाझारीची भित्तिलेपचित्रे आणि जवळच्याच उघड्या पडवीत चेल्लीनीचा पर्सियसचा प्रसिद्ध पुतळा (१५३३) आहे. ऊफीत्सी आणि पीत्ती राजवाड्यांत अखिल जगात अमोल ठरलेले चित्रसंग्रह आहेत. एकूण ४० वस्तुसंग्रहालयांनी हे शहर सजले आहे. पीत्ती हा शहरातील एकूण ५७ राजवाड्यांपैकी सर्वात भव्य राजवाडा आहे. पीत्ती राजवाड्याच्या पिछाडीस प्रसिद्ध बोबोली उद्यान आहे. बार्जेल्लो आणि इट्रुस्कन संग्रहालये, सॅन मिचेल, रिक्कार्डी, स्ट्रॉंट्सी या राजवाड्यांची गणना प्रबोधनकालीन उत्कृष्ट वास्तुशिल्पांत होते. शहराच्या परिसरातच असलेल्या टेकाडावर सॅन मिव्याटो कॅथीड्रल आहे. येथील ‘फ्लॉरेन्स विद्यापीठ’ जागतिक संस्कृतीचे केंद्रच समजले जाते. येथील नगरग्रंथालयात पन्नास लाखांवर ग्रंथ असून जगातील संपन्न ग्रंथालयांपैकी ते एक आहे. फ्लॉरेन्सच्या वैभवामुळे आजही दरवर्षी सु. १७ लाख प्रवासी या शहराकडे आकृष्ट होतात. पर्यटन हा येथील किफायतशीर उद्योग ठरला आहे. कलाकुसरीच्या सोनेरी, चंदेरी, हिरेजडीत वस्तूंचा व्यापार येथूनच चालतो.

फ्लॉरेन्समध्ये आर्नो नदीच्या काठी कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांचे (१८६६-७०) स्मारक (समाधी) आहे.

ओक, द. ह.