फ्रीमँटल : ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया राज्यातील प्रमुख बंदर. लोकसंख्या २३,४९७ (१९७६). हिंदी महासागरावर, स्वान नदीमुखापाशी पर्थच्या नैर्ॠत्येस १९ किमी. अंतरावर हे वसले असून क्विनाना-पर्थ या लोहमार्गावरील स्थानक आहे.
फ्रीमँटल प्रथम ब्रिटिश वसाहतकारांच्या आधिपत्याखाली होते. फ्रेंच आणि अमेरिकन वसाहतकारांना प्रतिकार करण्यासाठी ब्रिटीशांनी कॅ. सर चार्ल्स फ्रीमँटल याची नाविकदल प्रमुख म्हणून नेमणूक केली (१८२९). त्याच्या नावावरूनच या शहरास फ्रीमँटल हे नाव मिळाले.
यूरोपाकडून येणाऱ्या जहाजांचे हे विश्रांतीस्थान असल्यामुळे व याच्या आसमंतातील कूलगार्डी आणि कॅलगुर्ली भागांत सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यामुळे (१८९२-९३) एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याची झपाट्याने प्रगती झाली. शहरात रासायनिक खते, फर्निचर, साखर शुद्धीकरण, कातडी, मेंढपाळी, पोलाद, सिमेंट, खनिज तेल उत्पादन व ॲल्युमिनियम इ. विविध उद्योग चालतात. त्याचप्रमाणे गहू, लोकर, फळे, लाकूड, शुद्ध खनिज तेल इत्यादींची येथून निर्यात होते. मच्छीमारीसाठी फ्रीमँटल प्रसिद्ध आहे.
अनपट, रा. ल.
“