फ्राय, रॉजर एलिअट : (१४ डिसेंबर १८६६–९ सप्टेंबर १९३४). ब्रिटीश चित्रकार व कलासमीक्षक. जन्म लंडन येथे. शिक्षण केंब्रिज विद्यापीठात. विज्ञानातील पदवी घेतल्यावर ते चित्रकलेकडे आणि नंतर कलासमीक्षेकडे वळले. न्यूयॉर्क येथील ‘मेट्रपॉलिटन’ कलासंग्रहालयाचे संचालक (१९०५–१०) अथेनियम ह्या नियतकालिकाचे कलासमीक्षक (१९०१) तसचे बर्लिंग्टन मॅगझीनचे संपादक अशी विविध स्वरूपाची कामगिरी त्यांनी या काळात केली. १९१० मध्ये ते इंग्लंडला आले.
फ्राय यांनी १८९९ मध्ये जोव्हान्नी बेल्लीनी हा इटालियन चित्रकारावरील समीक्षाग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांची कलासमीक्षा १९०५ पर्यंत तरी पारंपारिक स्वरूपाचीच होती, याचे प्रत्यंतर १९०५ मध्ये त्यांनी संपादित केलेल्या सर जॉश्युआ रेनल्ड्झ डिस्कोर्सिस ह्या ग्रंथामध्ये मिळते. १९०६ मध्ये प्रख्यात आधुनिक फ्रेंच चित्रकार ⇨ पॉल सेझान (१८३९–१९०६) याच्याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले आणि ते आधुनिक फ्रेंच चित्रकलेचे समर्थन बनले. त्यांनी १९१० व १९१२ मध्ये लंडन येथील ‘ग्राफ्टन गॅलरीज’ मध्ये दोन चित्रप्रदर्शने आयोजित करून त्यांद्वारे ब्रिटनला उत्तर–दृक्प्रत्ययवादी चित्रकलेचा परिचय करून दिला. यानंतरच्या त्यांच्या कलासमीक्षेस सौंदर्यवादी वृत्तीची जोड मिळालेली दिसते. कलेतील आकारिक घटकांच्या स्वायत्त मूल्यावर भर देणारी भूमिका त्यांनी मांडली. चित्रातील रंग व अप्रतिरूप आकारांच्या परस्परसंबंधातून सौंदर्यात्मक प्रतिसाद उत्पन्न होतात चित्राचा वर्ण्य विषय वा त्यातून प्रकट होणारा सांस्कृतिक आशय हा दुय्यम स्वरूपाचाच असतो, हे त्यांच्या विचारसरणीचे प्रमुख सूत्र होते.
त्यांनी १९०३ मध्ये ‘ओमेगा वर्कशॉप्स’ची स्थापना केली. त्याद्वांरा नित्याच्या घरगुती वापरातील वस्तूंना–फर्निचर, वस्त्रप्रावरणे, मृत्पात्री इ. – तत्कालीन चित्रकलेतील नवप्रवाहांना अनुसरून विविध कलात्मक घाट देण्यात आले. समाजात आधुनिक कलेची संवेदनक्षमता प्रसृत व्हावी व सर्वसामान्य अभिरुची विकसित व्हावी, असा उद्देश त्यामागे होता. १९१९ मध्ये ही वर्कशॉप्स बंद पडली.
‘लंडन ग्रुप’ या चित्रकार संघाचे १९१९ मध्ये त्यांनी सदस्यत्व स्वीकारले व त्यास मानमान्यता मिळवून दिली ‘ब्लूम्सबरी ग्रुप’ या बुद्धिवाद्यांच्या संघटनेचेही ते सदस्य होते. तेथे त्यांनी सर्वसाधारण शैलीस अनुसरून आपली काटेकोर पण साचेबंद अशी निसर्गवादी चित्रनिर्मिती केली.
प्रख्यात ब्रिटीश कलातज्ञ सर केनेथ क्लार्क (१९०३– ) यांनी त्यांच्याविषयी ‘एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नाने जर संपूर्ण कलाभिरुचीच बदलू शकत असेल, तर अशी व्यक्ती म्हणजे रॉजर फ्राय होय,’ असे गौरवोद्गार काढले. केंब्रिज विद्यापीठात ललित कलांच्या ‘स्लेड प्राध्यापक’पदी त्यांची निवड झाली (१९३३). त्यांनी दिलेली स्लेड व्याख्याने त्यांच्या मरणोत्तर लास्ट लेक्चर्स (१९३९) या नावाने प्रसिद्ध झाली. विसाव्या शतकातील कलासमीक्षेवरील एक श्रेष्ठ ग्रंथ म्हणून त्याची गणना होते. त्यांचे अन्य कलाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : व्हिजन अँड डिझाइन (१९२०) व ट्रान्स्फॉर्मेशन्स (१९२६) सेझान (१९२७) आणि मातीस (१९३०) हे दोन चित्रकारांवरील व्याप्तिलेख फ्लेमिश आर्ट (१९२७), कॅरेक्टरेस्टिक्स ऑफ फ्रेंच आर्ट (१९३२). रिफ्लेक्शन्स ऑन ब्रिटिश पेंटिंग (१९३४) इत्यादी. लंडन येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Woolf, Verginia, Roger Fry : A Biography, London, 1940
रेगे, मे. पुं. इनामदार, श्री. दे.