फ्रॅंक्लिनाइट : खनिज, स्फटिक घनीय अष्टफलकी [⟶ स्फटिकविज्ञान] पुष्कळदा स्फटिकांच्या कडा गोलसर झालेल्या असतात. संपुंजित व कणमय राशींच्या रूपांतही हे आढळते ⇨ पाटण : अष्टफलकी अष्टफलकाला समांतर विभाजनतले. भंजन खडबडीत. ठिसूळ. कठिनता ५·५–६·५. वि. गु. ५·१–५·२. चमक धातूसारखी वा मंद. अपारदर्शक. रंग लोखंडासारखा काळा. कस लालसर उदी ते काळा [⟶ खजिनविज्ञान]. हे मॅग्नेटाइटासारखे दिसत असले, तरी हे किंचितच चुंबकीय असते मात्र तापविल्यास हे तीव्र चुंबकीय होते. रा. सं. (Zn, Fe, Mn) (Fe, Mn)2 O4. यातील धातूंचे प्रमाण पुष्कळच बदलू शकते. हे हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये सावकाश विरघळते. विरळाच आढळणारे हे खनिज मुख्यतः फ्रँकलिन आणि स्टर्लिंग टेकड्यांतील (न्यू जर्सी, अमेरिका) भरडकणी संगमरवरात आढळते. येथील या निक्षेपात (साठ्यात) फ्रॅक्लिनाइट, विलेमाइट, टेफ्रॉइट व झिंकाइट या खनिजांच्या कणांचे चांगले मिश्रण झालेले आहे. ऐबाख (जर्मनी) येथील खडकांतही फ्रँक्लिनाइटाचे स्फटिक आढळले आहेत. हे जस्ताचे गौण धातुक (कच्च्या रूपातील धातू) म्हणून वापरले जाते. जस्त काढून घेतल्यानंतर उरलेला भाग स्पिगेलझेन या लोह-मँगॅनीज मिश्रधातूसाठी वापरतात व ही मिश्रधातू पोलादनिर्मितीत वापरली जाते. कधीकधी फ्रॅंक्लिनाइटाची भुकटी रंग म्हणून वापरतात. फ्रॅंकलिन येथे आढळल्यामुळे याचे फ्रॅंक्लिनाइट हे नाव पडले आहे.
ठाकूर, अ. ना.