फ्रॅंकलंड, सर एडवर्ड : (१८ जाने. १८२५ – ९ ऑगस्ट १८९९). इंग्रज रसायनशास्त्रज्ञ. संयुजेची [अणूंची परस्परांशी पावण्याची क्षमता दरर्शवि‌णाऱ्या अंकाची → संयुजा ] उपपत्ती, सुर्याभोवतीच्या आवरणातील हीलियमाचा शोध, पाण्याचे शुद्धीकरण यांविषयी त्यांनी महत्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म कॅटेरॉल (लॅंकाशर, इंग्लंड) येथे झाला. शालेय शिक्षणानंतर १८४५ साली ते लाइअन प्लेफेअर यांच्या प्रयोगशाळेत दाखल झाले. १८४७ साली हॅंपशर येथील कीनवुड शाळेत शास्त्राचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. आर. डब्ल्यू बन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली मारबुर्ख येथे संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८४९). १८५१ साली मॅंचेस्टर येथील ओवेन्स महाविद्यालयात व १८५७ साली सेंट बार्‌थॉलोम्यू हॉस्पिटल येथे ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १८६३ साली ते रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये मायकेल फॅराडे यांच्यानंतर त्यांच्या जागी प्राध्यापक म्हणून दाखल झाले. १८६५ साली त्यांची स्कूल ऑफ माइन्सचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली व २० वर्षे त्यांनी या पदाची धुरा वाहिली.

नायट्रोजन व फॉस्फरस या मूलद्रव्यांचा इतर मूलद्रव्यांशी कसा संयोग होतो, याविषयी फ्रँकलंड यांनी संशोधन केले व त्यावरून संयुजेची उपपत्ती पुढीलप्रमाणे मांडली : प्रत्येक मुलद्रव्याचा दुसऱ्या मूलद्रव्याच्या ठराविक अणूंशी संयोग होत असतो म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग होण्याची क्षमता निश्चित असते. त्यांच्या या संशाधनामुळे आधुनिक संरचनात्मक रसायनशास्त्राचा पाया घातला गेला. मिथिल गटासारखे (CH3) मूलक (स्वतंत्र अस्तित्व नसलेला परंतु विक्रियेत कायम राहणारा अणुगट) वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातूनच १८४९ साली पहिल्या कार्बनी-धातू संयुगाचा ) [→ कार्बनी-धातु संयुगे] शोध लागला नंतर त्यांनी अशी अनेक संयुगे बनविली (उदा., झिंक डायएथिल, झिंक डायमिथिल इ.)

पाण्याच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनेही त्यांनी संशोधन केले. नद्यांच्या प्रदूषणाविषयीचा अभयास करणाऱ्या आयोगावर त्यांची नेमणूक झाली (१८६८). त्यातूनच त्यांनी पाण्याचे विश्लेषण करण्याच्या पद्धती शोधून काढल्या. वाहितमल व कारखान्यांतील सांडपाणी यांमुळे नद्यांचे पाणी दूषित होते हे लक्षात आणून देऊन त्यांनी त्यावरील उपायही सुचविले. तसेच दूषित पाणी पिण्यायोग्य करण्याचे मार्गही दाखविले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘नाइट’ हा किताब मिळाला (१८९७).

फ्रॅंकलंड यांचे ज्योतीविषयीचे संशोधनही महत्वाचे आहे. ज्योतीची दीप्ती केवळ तिच्यातील धन कणांवर अवलंबून नसते, तर ती जळणाऱ्या वायूवरील (वा बाष्पावरील) दाबावरही अवलंबून असते, असे त्यांना ज्योतीसंबंधी प्रयोगावरून दिसून आले. ज्योतीतील वायूवरील दाब हळूहळू वाढवून मिळणाऱ्या वर्णपटांचा अभ्यास त्यांनी केला. नंतर त्यांनी या माहितीचा वापर सूर्याच्या अध्ययनात केला तेव्हा १८६८ साली त्यांनी व सर जोसेफ नॉर्मन लॉक्यर यांनी सूयार्भावतीचा दीप्तिगोल (चकाकणारा व दृश्य बाह्य थर) द्रवरूप वा घनरूप असणे शक्य नाही, तर तो वायुरूप द्रव्याचाच असला पाहिजे, असे प्रतिपादिले. तसेच त्या थराच्या वर्णपटाच्या अभ्यासावरून या दोघांना त्यात हीलियम हे मूलद्रव्य असल्याचे प्रथमच आढळले. हे नवीन मूलद्रव्य आढळले असल्याचे लॉक्यर यांचे मत मात्र फ्रॅंकलंड यांना मान्य नव्हते.

फ्रॅंकलंड यांनी सु. १३० संशोधनपर लेख व अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची पुढील पुस्तके महत्वाची आहेत : पॉटर ॲनॅलिसि‌स फॉर सॅनिटरी पर्पजेस (१८६८), एक्सपिरिमेंटल रिसर्चेस इन प्युअर, अप्लाइड अँड फिजिकल केमिस्ट्री (१८७७), इनऑर्‌गॅनिक केमिस्ट्री (१८४४). ते केमिकल सोसायटीचे अध्यक्ष (१८७१-७३) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (१८७७-८०) होते. १८९४ साली त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक मिळाले हाते. ते गोला (नॉर्वे) येथे मृत्यू पावले.

एडवर्ड फ्रॅंकलंड यांचे पुत्र पर्सी फॅराडे फ्रॅंकलंड (३ ऑक्टोबर १८५८-२८ ऑक्टोबर १९४६) हेही रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी किण्वन (आंबविण्याची क्रिया), ⇨ ‌त्रिमितिरसायनशास्त्र, पाण्याचे शुद्धीकरण, वाहितमलावरील सूक्ष्मजंतूंचे संस्करण, कोल गॅस इ. विषयांवर संशोधन केले होते. १९१९ मध्ये त्यांना डेव्ही पदक मिळाले.

जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.

]