फूको, झां बेर्नार लेआँ: (१८ सप्टेंबर १८१९-११ फेब्रुवारी १८६८). फ्रेंच भौतिकीविज्ञ. प्रकाशवेगाचे अचूक मापन व पृथ्वीच्या दैनंदिन अक्षीय गतीचा पहिला दृश्य प्रायोगिक पुरावा यांकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. प्रथमतः त्यांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले पण नंतर प्रायोगिक भौतिकीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले.

सुरुवातीला त्यांनी ए. एच्‌. एल्. फीझो यांच्याबरोबर उष्णता व प्रकाश या विषयांत प्रायोगिक संशोधन केले. १८४५ मध्ये त्यांनी फीझो यांच्याबरोबर सूर्याचे पहिले दागेअरोटाइप पद्धतीचे [⟶ छायाचित्रण] छायाचित्र मिळवून खगोलीय छायाचित्रणात महत्त्वाची कामगिरी केली. १८५० च्या सुमारास त्यांनी फिरत्या आरशाच्या पद्धतीचा उपयोग करून प्रकाशाचा पाण्यातील वेग त्याच्या हवेतील वेगापेक्षा कमी असतो, असे सिद्ध केले [⟶ प्रकाशवेग]. यामुळे प्रकाशाच्या तरंग सिद्धांताला एक महत्त्वाचा आधार मिळाला [⟶  प्रकाश]. त्याच वर्षी त्यांनी फिरत्या आरशाच्या पद्धतीनेच प्रकाशाचा हवेतील वेग मोजला. प्रकाशवेगाच्या खऱ्या मूल्याशी तुलना करता त्यांनी मिळविलेल्या वेगाच्या मूल्यातील (२·९८ X १०मी./से.) त्रुटी १  टक्क्यापेक्षाही कमी होती.

फूको यांनी १८५१ मध्ये एक जड लोखंडी गोळा सु. ७० मी. लांबीच्या तारेला जोडून तयार केलेल्या लंबकाच्या (नंतर ‘फूको लंबक’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या) आंदोलन प्रतलाच्या परिभ्रमणाच्या साहाय्याने पृथ्वीच्या दैनंदिन अक्षीय गतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले [⟶ पृथ्वी]. जर पृथ्वी स्थिर असती, तर असा लंबक नेहमी एकाच ऊर्ध्व (उभ्या) प्रतलात आंदोलने करीत राहिला असता परंतु अक्षीय गती असलेल्या पृथ्वीवर हे आंदोलन प्रतल हळूहळू बदलते. फूको यांनी लंबकाच्या प्रतलाच्या भासमान कोनीय परिभ्रमणाचा दर व दिशा पृथ्वीच्या कोनीय वेगावर व प्रयोगस्थानाच्या भौगोलिक अक्षांशावर अवलंबून असतात असे दाखविले आणि हा संबंध दर्शविणारे गणितीय समीकरणही मांडले. पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाचे अधिक स्पष्टपणे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी त्यांनी ⇨ घूर्णी या उपकरणाचा १८५२ मध्ये शोध लावला. हे उपकरण गतिनियंत्रणासाठी व दिशा स्थिर ठेवण्याकरता अतिशय उपयुक्त आहे.

तीव्र चुंबकीय क्षेत्रात तांब्याची तबकडी फिरती ठेवली असता तीमध्ये आवर्त प्रवाह (‘फूको प्रवाह’) निर्माण होतात, असा त्यांनी शोध लावला.

फूको यांनी अनेक उपकरणे व प्रयुक्ती स्वतः व इतरांच्या मदतीने तयार केल्या आणि त्यामुळे त्या काळातील कित्येक वैज्ञानिक व तांत्रिक प्रश्न सुटण्यास मदत झाली. दूरदर्शक एकाच दिशेत रोखून धरण्यासाठी, तसेच नंतर वाफेच्या एंजिनात गतिनियंत्रणासाठी वापरण्यात आलेले यांत्रिक गतिनियंते, ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशकिरणांचे विश्लेषण करण्यासाठी तयार केलेला लोलक (‘फूको  लोलक’), विद्युत् प्रज्योत दिव्यासाठी त्यांनी तयार केलेला नियंत्रक इ. उदाहरणे त्यांच्या तांत्रिक शोधकबुद्धीची द्योतक आहेत. परावर्तनी दूरदर्शकांसाठी वापरावयाच्या आरशांवर पारा वगैरे पदार्थांचा लेप देण्याची आधुनिक पद्धती त्यांनीच १८५७ मध्ये प्रचारात आणली. दूरदर्शकाकरिता वापरावयाच्या आरशांच्या व भिंगांच्या आकारातील दोषांची चाचणी करण्यासाठी व ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी साध्या पण अचूक पद्धती शोधून काढल्या.

पॅरिसच्या वेधशाळेत भौतिकीय साहाय्यक म्हणून १८५५ मध्ये त्यांची नेमणूक झाली. १८६२ मध्ये ते ब्यूरो ऑफ लाँजिट्यूड्स या संस्थेचे सदस्य झाले. १८४५ पासून ते Journal des debats या नियतकालिकाच्या वैज्ञानिक विभागाचे संपादक होते. १८६४ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य व १८६५ मध्ये फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीने १८५५ मध्ये त्यांना  कॉप्ली पदकाचा बहुमान दिला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.