फुलकिडे : हे कीटक थायसॅनॉप्टेरा गणातील असून हे बारीक सडपातळ, चपळ व सु. ०·५ ते ५ मिमी. लांबीचे असतात. ते फुलांमध्ये व वनस्पतींच्या इतर कोणत्याही भागात असतात. तथापि सूक्ष्म आकारमानामुळे ते सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. विशिष्ट फुलकिड्यांना भुरडा, फराड्या, बोकड्या इ. नावे आहेत. यांच्या काही जाती फळे, भाजीपाला, फुले, पिके इत्यादींना उपद्रवकारक आहेत.

कांद्यावरील

फुलकिड्यांचे नर थोडेच असतात किंवा नसतातही. मादी अंडनिक्षेपकाच्या (अंडी घालण्याच्या अवयवाच्या) साहाय्याने पानांच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांत) विशेषतः पानांच्या मागील बाजूंवर सु. ५० अंडी घालते. अंडनिक्षेपक नसणारी मादी सालीतील फटीत अंडी घालते. अंडी ४ ते ५ दिवसांत उबतात व डिंभ (अळ्या) बाहेर पडतात. डिंभ चार वेळा कात टाकतो व २ ते ५ दिवसांत पूर्ण वाढलेला कीटक बनतो. काही फुलकिड्यांचे प्रजोत्पादन अनिषेकजननाने (फलनाविना युग्मकांची- ज्यांच्या युग्मांच्या संयोगामुळे प्रजोत्पत्ती होते अशा जनन पेशींची-वाढ होऊन) होते. पूर्ण वाढलेले फुलकिडे १० ते १५ दिवस जगतात. यांची शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिय) ६ ते ९ खंडांची असते. यांचे डोळे संयुक्त असतात. काहींना पंख नसतात. ज्यांना पंख असतात त्यांना सामान्यतः पंखांच्या दोन जोड्या असतात. पंख अरुंद व आखूड असून त्यांच्या कडांशी सूक्ष्म केसांची झालर असते. त्यांना स्पर्शकांच्या ( डोक्यावरील लांब, सडपातळ व लवचिक ज्ञानेंद्रियांच्या) २ जोड्या असतात. यांचे पाय बळकट असतात व गुल्फाचे (पायाच्या शेवटच्या भागाचे) टोक बोथट असून त्याच्या टोकाशी आतबाहेर होऊ शकणारा कपाच्या आकाराचा पसरट असा उशीसारखा भाग असतो. त्याची कीटकाला चढण्याच्या कामी मदत होते. फुलकिड्याचे मुखांग विशिष्ट प्रकारचे असते. मुखांग चूषी (शोषण करण्यास योग्य) व बळकट शुंडा असलेले असते. ही शुंडा वनस्पतीच्या अवयवांतील (उदा., पाने, फुले) ऊतकांत घुसवून कीटक तेथील रस शोषून घेतो व त्यावर त्याची उपजीविका चालते. बहुतेक कीटक अशा तऱ्हेने वनस्पतींशी निगडित असले, तरी काही कुजणाऱ्या लाकडात वा कवकांवरही (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींवरही) आढळतात.

थायसॅनॉप्टेरा गणात यांच्या सु. ५,००० जाती असून थ्रिपिडी हे यांचे कुल सर्वांत मोठे आहे. फ्रँक्लिनिएल्ला ट्रिटिकी या जातीचे फुलकिडे मोठ्या प्रमाणात फुलांवर आढळतात. त्यांच्यापैकी काही परभक्षी (इतर जीवांवर जगणारे) असून तांबडे कोळी, लहान कीटक, इतर फुलकिडे, अंडी, जैव द्रव्य, कवक, पान ऊ, माइट इत्यादींवर त्यांची उपजीविका चालते. थ्रिपिडी कुलातील थ्रिप्स टॅबॅकी या जातीचे फुलकिडे पिवळसर-गडद पिंगट रंगाचे असून ते विशेषतः कांदा, तंबाखू तसेच कोबी इ. पिकांना उपद्रवकारक आहेत. हेलिओथ्रिप्स हीमोऱ्होइडॅलिस या जातीचे फुलकिडे गडद रंगाचे असून ते समशीतोष्ण कटिबंधीय वनस्पतींना व विशेषतः पादपगृहातील ( नियंत्रित तापमानात वनस्पती वाढविण्याच्या बंदिस्त जागेतील) वनस्पतींना उपद्रवी आहेत. टीनिओथ्रिप्स इन्कॉन्सिक्वेन्स या जातीच्या फुलकिड्यांपासून नासपती, अलुबुखार वगैरे वनस्पतींना उपद्रव पोहोचतो. हेर्कोथ्रिप्स फॅसिएटस ही जाती घेवड्याला, स्किर्टोथ्रिप्स सिट्री ही लिंबू वर्गीय वनस्पतींना तर लिमोथ्रिप्स सेरिलियम ही ओटाला उपद्रवकारक आहे. महाराष्ट्रात बहुतेक सर्व भागांत कपाशीवरील फुलकिडे आढळतात. मिरचीवरील नफोर्थिप्स डॉर्सेलीझ, द्राक्षवेली व गुलाब यांवरील ऱ्हायपिफोरोथिप्स क्रुएंटेटस आणि हळदीवरील पाँचिटोथ्रिप्स इंडिकस या जातीही महाराष्ट्रात आढळतात.

फुलकिड्यांमुळे वनस्पतींच्या विविध भागांना, विशेषतः पाने, फुले यांना इजा पोहोचतात व रस शोषला गेल्याने वनस्पतींचे नुकसान होते. शिवाय फुलकिड्यांमुळे काही कवकजन्य व व्हायरसजन्य वनस्पतिरोगांचा प्रसार होतो. उदा., कांद्यावरील फुलकिड्यांमुळे टोमॅटो व शोभिवंत वनस्पतींना व्हायरसजन्य रोगाची बाधा होऊ शकते. फुलकिडे माणसाला उपद्रवकारक नसले, तरी त्यांच्या चाव्याने माणसाला त्रास होतो व कधीकधी त्यामुळे त्वचाशोथ (त्वचेची दाहयुक्त सूज) होतो. मात्र काही फुलकिडे परागणास मदत करतात. उदा., कांद्यावरील फुलकिड्यांद्वारे गाजराचे परागण होते. तसेच फुलकिड्यांच्या काही जाती ह्या परभक्षी म्हणजे इतर जीवांवर जगणाऱ्या आहेत. त्यामुळे आपोआपच अशा उपद्रवी जीवांचे नियंत्रण होत असते.

फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारची कीटकनाशके वापरली जातात (उदा., कपाशीवरील फुलकिड्यांचे नियंत्रण डीडीटी, बीएचसी वा निकोटीन सल्फेट या कीटकनाशकाने होते). निकोटीन सल्फेट व साबण यांचा विद्राव फवारणे हा फुलकिड्यांच्या नियंत्रणाचा सर्वसाधारण उपाय आहे. याशिवाय लेथेने, थानाइट, डायमेथोरम, डिल्ड्रीन, मिथिलडिमेटॉन व फॉस्फोमिडॉन या कीटकनाशकांचे फवारेही मारतात. तसेच सबदिल्ला (व्हेराट्रीन अल्कलॉइडे) याचा फुलकिड्यांच्या बाबतीत प्रलोभक (आकर्षून घेणारे द्रव्य) म्हणून उपयोग केला जातो. पादपगृहातील फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी धुरी देणे हा उपाय जास्त उपयुक्त ठरतो. मात्र कीटकनाशकांची फवारणी झाल्यावर काही काळानंतरच भाजीपाला, फळे वगैरे वापरणे इष्ट असते.

तलगेरी, ग. मं. ठाकूर, अ. ना.