फील्डिंग, हेन्री : (२२ एप्रिल १७०७ – ८ ऑक्टोबर १७५४). इंग्रज कादंबरीकार, नाटककार आणि पत्रकार. त्याचा जन्म समरसेटमधील शार्पॅम पार्क येथे झाला असावा. शिक्षण ईटन कॉलेज (ईटन), लेडन विद्यापीठ (हॉलंड) आणि ‘मिड्ल टेंपल’ (लंडन) ह्या शिक्षणसंस्थांत झाले. १७४० मध्ये तो वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाला. अभिजात ग्रीक-लॅटिन साहित्याचे उत्तम अध्ययन त्याने केले होते.
फील्डिंगची ख्याती आज मुख्यतः त्याच्या कादंबऱ्यांवरच अधिष्ठित असली, तरी आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ त्याने नाट्यलेखकाने केला होता. लव्ह इन सेव्हरल मास्क्स ही त्याची पहिली नाट्यकृती १७२८ रंगभूमीवर आली. त्यानंतर टॉम थंब (१७३०), पास्क्विन : ए ड्रमॅटिक सटायर ऑन टाइम्स (१७३६), द हिस्टॉरिकल रजिस्टर फॉर द यीयर १७३६ (१७३७), द मायझर (१७३३, विख्यात फ्रेंच नाटककार मोल्येर ह्याच्या नाटकावरून केलेले रूपांतर) आदी जवळजवळ सोळा नाटके त्याने लिहिली आणि रंगभूमीवर ती अत्यंत लोकप्रिय झाली. ⇨ विल्यम काँग्रीव्ह आणि ⇨ विल्यम विचर्ली ह्या प्रसिद्ध इंग्रज सुखात्मिकाकारांना प्रभाव फील्डिंगच्या नाट्यकृतींवर काहीसा असला, तरी नाटककार म्हणून त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांतून ठळकपणे नजरेत भरते. फील्डिंगची नाटके उपरोधप्रचूर आहेत. टॉम थंब ह्या नाटकात त्याने इंग्रजीतील ‘हिरोइक ट्रॅजिडी’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृत्रिम आणि भडक शोकात्मिकांची टिंगल केली. पास्क्विन… आणि द हिस्टॉरिकल रजिस्टर.. .. .. ह्या नाटकांतील उपरोध राजकीय स्वरूपाचा होता. ह्या नाटकांमुळे अस्वस्थ होऊन इंग्लंडचा तत्कालीन पंतप्रधान सर रॉबर्ट वॉल्पोल ह्याने ‘थीएट्रिकल लायसेन्सिंग ॲक्ट’ ह्या नाट्यकृतींच्या प्रयोगपूर्व अभ्यवेक्षणाचा कडक कायदा जारी केला (१७३७). परिणामतः फील्डिंगमधल्या अस्सल उपरोधकाराला नाट्यलेखनाचे दालन बंद झाले आणि १७३९ मध्ये चँपिअन ह्या एका राजकीय जर्नलचा तो संपादक झाला. त्यातून राजकीय उपरोधपर असे अनेक लेख त्याने लिहिले.
विडंबन- उपरोधास अनुकूल अशा फील्डिंगच्या वृत्तीला १७४० मध्ये ⇨ सॅम्युएल रिचर्ड्सनची पामेला ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर एक नवे लक्ष्य मिळाले. ह्या कादंबरीत स्क्वायर बी हा एक श्रीमंत माणूस पामेला नावाच्या आपल्या तरूण नोकराणीला वश करून घेण्याचा प्रयत्न करतो तथापि तिचे शील भ्रष्ट होऊ देत नाही. तिच्या ह्या सद्गुणाने भारावून जाऊन स्क्वायर बी तिच्याशी विवाह करून तिला पत्नीची प्रतिष्ठा देण्याची इच्छा व्यक्त करतो आणि पामेला त्याच्याशी विवाहबद्ध होते. उद्बोधनाच्या हेतूने लिहिल्या गेलेल्या ह्या कादंबरीला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी विवाहाची संधी मिळेपर्यंत स्वतःच्या शीलाला जपणारी नायिका फील्डिंगला दांभिक वाटत होती. ह्या कादंबरीने फील्डिंगमधला उपरोधकार चेतावला. रिचर्ड्सन घडवू पाहत असलेल्या नीतिबोधातील विसंगती दाखवून देण्याच्या उद्देशाने फील्डिंगने जोसेफ अँड्रूज (१७४२) ही आपली पहिली कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीचा नायक जोसेफ अँड्रूज हा पामेलाचा भाऊ म्हणून दाखविला आहे. स्क्कायर बीची आत्या लेडी बूबी हिच्याकडे तो नोकर असतो. लेडी बूबी त्याला वश करू पाहते परंतु तिला प्रतिसाद न दिल्यामुळे अँड्रूजचे भले होत नाही तो आपल्या नोकरीला मुकतो! परंतु पामेलाच्या उपरोध-विडंबनाचा फील्डिंगचा मूळ हेतू कादंबरी लिहिताना हळूहळू मागे पडला आणि कादंबरीलेखनाचा एक नवाच प्रकार-गद्य माथ्यामातून लिहिलेले विनोदी महाकाव्य (कॉमिक एपिक पोएम इन प्रोज)-निर्माण करण्याच्या कल्पनेवर त्याचे लक्ष केंद्रित झाले. कादंबरीला गद्य महाकाव्याचे रूप देण्याची ही कल्पना फील्डिंगला ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यकृतींच्या त्याच्यावर असलेल्या प्रभावातून स्फुरली आणि सुखात्मिका लिहिण्याचा त्याचा पूर्वानुभव अशा महाकाव्याचे विनोदी रूप घडविण्यासाठी त्याला उपयोगी पडला. स्पॅनिशमधून इंग्रजीत आलेल्या पिकरेस्क रोमान्सलेखनाचा परंपरेचाही त्याने काही उपयोग करून घेतलेला आहे. अशा रोमान्यमधील व्यक्तिरेखा सतत भ्रमंती करताना दिसतात. फील्डिंगच्या कादंबऱ्यांतील पात्रांनाही निरनिराळ्या कारणांस्तव घराबाहेर पडून भटकावे लागले आहे. इंग्लंडमधील विविध प्रदेश आणि तेथील जीवन ह्यांचे जिवंत चित्रण त्या निमित्ताने फील्डिंगने केलेले आहे. कादंबरीलेखनामागे फील्डिंगचाही एक नैतिक दृष्टिकोण होता. तांत्रिक दृष्ट्या सद्गुणी असण्यापेक्षा अंतःकरणातील अस्सल चांगुलपणाच महत्त्वाचा, हे त्याने आपल्या कादंबऱ्यांतून आग्रहपूर्वक दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
फील्डिंगच्या अन्य कादंबऱ्यांत जॉनाथन वाइल्ड (१७४३), टॉम जोन्स (१७४९) आणि अमेलिआ (१७५१) ह्यांचा समावेश होतो. जॉनाथन वाइल्डमध्ये एका वाटमाऱ्याची कहाणी सांगितलेली असून एखादा गुन्हेगार आणि उच्चपदस्थ राजकारणी ह्यांच्या जीवनात किती साम्य असते, हे फील्डिंगने दाखवून दिले आहे. टॉम जोन्समध्ये फील्डिंगने त्याला अभिप्रेत असलेली विनोदी गद्यकाव्याची कल्पना अधिक भव्य प्रमाणावर साकार केली आहे. ज्याचे आईवडील कोण हे अज्ञात आहे, अशा एका अनाथ मुलाची ही कथा अत्यंत गुंतागुंतीची असूनही फील्डिंगने कादंबरीत तिची मांडणी अतिशय कौशल्याने केलेली दिसते. तिच्यातील सारी उपकथानके मूळ कथानकाशी एकात्म झालेली आहेत. व्यक्तिरेखनाचे त्याचे सामर्थ्य ह्या कादंबरीत विशेषत्वाने प्रत्ययास येते. अमेलिआ ही त्याची कादंबरी मात्र वेगळ्या प्रकाराची. तिची संरचनाही काही प्रमाणात महाकाव्याच्या धर्तींवर केलेली असली, तरी हे विनोदी गद्यमहाकाव्य नव्हे. आपल्या स्खलनशील पतीला सहनशीलतेने सावरू पाहणारी एक आदर्श पत्नी ह्या कादंबरीत त्याने रंगविली आहे.
वेस्टमिन्स्टरचा ‘जस्टिस ऑफ पीस’ म्हणून १७४८ मध्ये फील्डिंगची नेमणूक झाली. ह्या पदावर असताना गुन्हेगारी कमी करण्याचे कठोर, निःपक्षपाती प्रयत्न त्याने केले भ्रष्टाचारापासून तो कटाक्षाने दूर राहिला गुन्हेशास्त्राचा त्याने अभ्यास केला. इंक्वायरी इंटू द कॉझीस ऑफ द लेट इन्क्रीझ ऑफ रॉबरीज एट्सेट्रा (१७५१) ह्या त्याच्या ग्रंथाकडे सरकारचे लक्ष गेल्यावर गुन्हेगारीविरूद्धच्या त्याच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारतर्फे त्याला पुरेसा निधी देण्यास आला. फील्डिंगने त्यानंतर उभारलेले खास पोलीसपथक हा जागतिक कीर्तीच्या ‘स्कॉटलंड यार्ड’च्या इतिहासातील एक आरंभीचा टप्पा मानला जातो.
प्रकृतिस्वास्थ्यासाठी तो पोर्तुगालमध्ये गेला असताना लिस्बन येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Alter, Robert, Fielding and the Nature of the Novel, Cambridge, Mass., 1968.
2. Battestin, M. C. The Moral Basis of Fielding’s Art, Middletown, Conn., 1959.
3. Dudden, F. Homes, Henry Fielding, Oxford, 1952.
4. Henley, W. E. Ed. The Complete Works of Henry Fielding, 16 Vols., London, 1903, 2nd ed., New York, 1967.
कुलकर्णी, अ. र.