फीबोनात्ची , लेओनार्दो : (इ.स.सु. ११८० -इ.स.सु. १२५०). इटालियन गणितज्ञ. ‘लेओनार्दो ऑफ पीसा’ या नावानेही त्यांना ओळखण्यात येते. पाश्चिमात्यांना भारतीय व अरबी लोकांच्या गणितीय कार्याची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यांचा जन्म पीसा येथे झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांनी व्यापारी व्हावे या उद्देशाने हिशेब करण्याची कला शिकविण्याकरिता त्यांना आपल्याबरोबर बूझी (अल्जीरिया) येथे नेले. तेथेच त्यांनी अंक लेखनाची भारतीय पद्धत आत्मसात केली. व्यापारानिमित्त त्यांनी ईजिप्त, सिरिया, ग्रीस, सिसिली व प्रॉव्हांस (फ्रान्सचा एक प्रांत) या प्रदेशांत प्रवास केला. आणि तेथील विद्वानांशी चर्चा करून तेथे वापरात असलेल्या गणितीय पद्धतींची माहिती करू घेतली. इ.स.१२०० च्या सुमारास ते पीसाला परत आले आणि तेथे सु. २५ वर्षे निरनिराळ्या गणितीय विषयांवरील ग्रंथ त्यांनी लिहिले. या ग्रंथांत त्यांनी भारतीय पद्धतीची आकडेमोड व स्वतः अभ्यासिलेल्या बीजगणित व भूमिती या विषयांतील समस्यांची चर्चा केली आहे. अनिर्धार्य विश्लेषण व ⇨ संख्या सिद्धांत या शाखांमध्ये त्यांनी स्वतः मोलाची भर घातली. पीसा शहराच्या अधिकाऱ्यांना लेखापालनात व नागरिकांना अध्यापन व अन्य प्रकारे मदत केल्याबद्दल फीबोनात्ची यांना पीसा प्रजासत्ताकातर्फे विशेष वेतन दिले जात असे. ते पीसा येथे मृत्यू पावले.
फीबोनात्ची यांचे Liber abaci (१२०२ , सुधारित आवृत्ती १२२८), Practica geometriae (१२२०), Flos (१२२५) व Liber quadratorum (१२२५) हे ग्रंथ आणि त्यांनी त्या वेळेचे एक तत्ववेत्ते थीओडोरस यांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहेत. Liber abaci हा ग्रंथ सुमारे दोन शतके प्रमाणभूत मानण्यात येत होता. या ग्रंथाच्या पहिल्या भागात भारतीय अंकांचा परिचय करून दिलेला असून त्यांच्या साहाय्याने गणितीय कृत्ये करण्याच्या पद्धती दिलेल्या आहेत. दुसऱ्या भागात व्यापारामध्ये उपयुक्त असलेल्या प्रश्नांची (उदा., सोन्याची किंमत, नफा, वस्तुविनिमय, व्याजाचा हिशेब, मजूरी, भागिदारी, मिश्रधातू, मिश्रणांचे हिशेब वगैरे) चर्चा केलेली आहे. तिसऱ्या भागामध्ये बऱ्याच निरनिराळ्या प्रकारची उदाहरणे दिलेली असून ती बहुतेक कूट प्रश्नांच्या स्वरूपाची आहेत. त्यांची उत्तरे काही समीकरणे मांडून त्यांच्या निर्वाहांवरून (समीकरणे सोडवून मिळणाऱ्या उत्तरांवरून) मिळतात. याच भागात अनिर्धार्य समीकरणांची उदाहरणेही आहेत. चौथ्या भागामध्ये भारतीय व अरबी पद्धतींची वर्गमूळ व घनमूळ काढण्याची माहिती दिलेली आहे. याच ग्रंथात ‘फीबोनात्ची श्रेणी ’ या नावाने ओळखण्यात येणारी व अनेक महत्त्वाचे गुणधर्म असलेली श्रेणी दिलेली आहे. या श्रेणीतील पहिल्या दोन पदांखेरीज इतर प्रत्येक पद त्याच्या लगतच्या अगोदरच्या दोन पदांच्या बेरजेबरोबर असते. Practica geometriae या ग्रंथात विविध भूमितीय प्रश्नांची चर्चा केलेली असून तो लिहिण्यासाठी यूक्लिड, आर्किमिडीज, प्लेटो ऑफ टिव्होली इत्यादींच्या भूमितीविषयक कार्याचा आधार घेतलेला आहे. Flos या ग्रंथात त्यांनी त्रिघातीय समीकरणांची व तत्सम उदाहरणांची तसेच काही एकघाती अनिर्धार्य प्रश्नांची चर्चा केलेली आहे. Liber quadratorum या ग्रंथात संख्या सिद्धांतातील काही प्रश्नांचे विवरण केलेले आढळते. थीओडोरस यांना लिहिलेल्या पत्रात काही अंकगणितीय व भूमितीविषयक प्रश्नांसंबंधी चर्चा केलेली दिसून येते.
फीबोनात्ची यांचे सर्व लेखन बी. बोंगकोम्पान्यी यांनी दोन खंडांत Scritti di Leonardo Pisano (१८५७-६२) या शीर्षकाखाली संपादित केले.
ओक, स.ज. नायकवडी, म. का.