गणितीयसंस्था व नियतकालिके : गणितीय संशोधन व प्रश्न यांची देवघेव करण्याच्या जरूरीतूनच गणितीय संस्था उदयास आल्या. सतराव्या शतकापर्यंत अशा माहितीची देवघेव व्यक्तिगत संपर्क व ग्रंथ प्रकाशन यांच्याद्वारे होत असे. त्यानंतर मात्र अनेक गणितीय संस्था स्थापन झाल्या व गणितविषयक समकालीन संशोधनाची माहिती देणारी अनेक नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली. यामुळे गणिताच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळाली व गणितज्ञांना आपापल्या विषयांतील संशोधनासंबंधीची अद्ययावत माहिती मिळू लागली. पूर्वीच्या बहुतेक संस्था शहर अथवा एखादे विद्यापीठ यांच्या पुरत्याच मर्यादित असलेल्या स्थानिक स्वरूपाच्या होत्या. आता बऱ्याचशा संस्थांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर होत असून काही आंतरराष्ट्रीय संस्थाही स्थापन झालेल्या आहेत.

सर्वांत जुनी व अद्यापिही कार्यान्वित असलेली गणितीय संस्था म्हणजे हँबर्ग येथे १६९० मध्ये स्थापन झालेली Mathematische Gesellschaft ही संस्था होय. १८८१ मध्ये या संस्थेने Mitteilungen नावाचे छापील नियतकालिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ॲम्स्टरडॅम येथे १७७८ मध्ये स्थापन झालेल्या Wiskundig Genootschap या संस्थेने बरीच नियतकालिके प्रसिद्ध केलेली असून त्यांपैकी १८७५ मध्ये सुरू झालेले Nieuw Archief voor Wiskunde हे नियतकालिक अद्यापिही प्रसिद्ध होते.

आउगुस्ट क्रेले (१७८०–१८५५) या जर्मन अभियंत्यांनी १८२६ मध्ये स्थापन केलेल्या Journal fur die reine und angewandte Mathematik या नियतकालिकाच्या सुरुवातीच्या काही अंकांत आबेल, याकोबी, श्टाइनर, डीरिक्ले, प्ल्यूकर इ. प्रसिद्ध गणितज्ञांचे लेख होते. हेच नियतकालिक पुढे क्रेलेज जर्नल या नावाने ओळखण्यात येऊ लागले. एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील अनेक प्रसिद्ध गणितज्ञांचे लेख यात प्रसिद्ध झालेले आहेत.

महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांपैकी सर्वांत जुनी म्हणजे मॉस्को येथे १८६७ मध्ये स्थापन झालेली Moskovskoe Mathematichesko Obshchestvo ही संस्था होय. या संस्थेतर्फे Matematicheskij Sbornik (१८६६) आणि Trudy Moskovskoe Matematicheskogo Obshchestvo (१९५२) ही दोन महत्त्वाची नियतकालिके प्रसिद्ध होतात. लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी १८६५ मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला स्थानिक स्वरूपाची असलेली ही संस्था लवकरच इंग्‍लंडची राष्ट्रीय गणितीय संस्था झाली. या संस्थेतर्फे प्रोसिडिंग्ज (१८६५), जर्नल (१९२६) ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. एडिंबरो मॅथेमॅटिकल सोसायटीची स्थापना १८८३ मध्ये झाली असून तिच्यातर्फे प्रोसिडिंग्ज (१८८३) व मॅथेमॅटिकल नोट्स (१९०९) ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. फ्रान्सची राष्ट्रीय संस्था Societe Mathematique de France ही १८७२ मध्ये स्थापन झाली व ती बुलेटिन (१८७२) हे नियतकालिक प्रसिद्ध करते. १८८८ मध्ये स्थापन झालेल्या न्यूयॉर्क मॅथेमॅटिकल सोसायटीचेच पुढे १८९४ मध्ये अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीत रूपांतर झाले. ही संस्था जगातील एक अत्यंत महत्त्वाची गणितीय संस्था मानण्यात येते. या संस्थेचे सध्या ५,७०० सभासद आहेत. तिच्यामार्फत बुलेटिन (१८९१), ट्रॅन्झॅक्शन्स (१९००), मेम्वार्स (१९५०), प्रोसिडिंग्ज (१९५०) अशी विविध नियतकालिके प्रसिद्ध होतात. जर्मनीची राष्ट्रीय संस्था Deutsche Mathematiker Vereinigung ही १८९० मध्ये स्थापन झालेली असून Jahresbericht (१८९२) या तिच्यामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकात गणितातील प्रगतीसंबंधी महत्त्वाची विवरणात्मक माहिती असते. इटलीमध्ये १८८४ साली स्थापन झालेली Circolo Matematico di Palermo ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची मानण्यात येते. Rendiconti (१८८७) हे या संस्थेतर्फे प्रसिद्ध होणारे नियतकालिक अनेक वर्षे जगातील एक महत्त्वाचे गणितीय नियतकालिक गणले जात होते. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये स्थापन झालेली मॅथेमॅटिकल सोसायटी ऑफ जपान ही संस्थासुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. अर्जेटिना, ऑस्ट्रिया, ब्राझील, चीन, हंगेरी, इझ्राएल, मेक्सिको, नॉर्वे, पोलंड, स्पेन इ. देशांत राष्ट्रीय दर्जाच्या गणितीय संस्था असून त्यांच्यामार्फत नियतकालिकेही प्रसिद्ध होतात.

भारतात मद्रास येथे १९०७ मध्ये स्थानिक स्वरूपात स्थापन झालेली इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी आता आंतरराष्ट्रीय कीर्तीची झालेली आहे.तिचे कार्यालय सध्या दिल्ली येथे असून तिच्यातर्फे जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी  आणि मॅथेमॅटिक्स स्टुडंट  ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. या संस्थेत ८०० सभासद आहेत. या संस्थेशिवाय भारतातील अलहाबाद मॅथेमॅटिकल सोसायटी (स्थापना १९५८ नियतकालिक – इंडियन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स ), भारत गणित परिषद (पूर्वीची बनारस मॅथेमॅटिकल सोसायटी स्थापना १९५० नियतकालिके – गणित  आणि प्रोसिडिंग्ज ऑफ बनारस मॅथेमॅटिकल सोसायटी ) आणि कलकत्ता मॅथेमॅटिकल सोसायटी (स्थापना १९०८ नियतकालिक – बुलेटिन ऑफ द कलकत्ता मॅथेमॅटिकल सोसायटी) या संस्था महत्त्वाच्या गणल्या जातात. दिल्ली येथील इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीतर्फे प्रसिद्ध होणारे इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स, तसेच बंगलोर येथील इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसची प्रोसिडिंग्ज (सेक्शन ए) आणि शिवनी (बिहार) येथे प्रसिद्ध होणारे द मॅथेमॅटिकल एज्युकेशन  या नियतकालिकांतून गणितविषयक संशोधनाची माहिती प्रसिद्ध होते.

एकोणिसाव्या शतकात गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय बैठकी काही प्रसंगी भरल्या होत्या परंतु खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बैठक १८९७ मध्ये स्वित्झर्लंडमधील झुरिक येथे भरली. त्यावेळी २०४ प्रतिनिधी हजर होते. १९०० सालानंतर पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांचा खंड सोडल्यास या बैठकी दर चार वर्षांनी भरविण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक बैठकीची माहिती व तीत वाचण्यात आलेले निबंध प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. १९६६ मध्ये मॉस्को येथे भरलेल्या बैठकीस ५,००० प्रतिनिधी हजर होते. या बैठकांत परिभाषा व चिन्हे यांबाबत एकसूत्रता आणणे यांसारख्या आंतरराष्ट्रीय एकवाक्यता असण्याची जरूर असलेल्या विषयांवर विशेष चर्चा करण्यात येते.

पहिल्या महायुद्धानंतर एक कायम स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. तथापि तो यशस्वी झाला नाही. १९५२ मध्ये इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन ही संस्था झुरिक येथे स्थापन झाली व ती इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स या युनेस्को प्रणीत संस्थेत समाविष्ट करण्यात आली. ४१ राष्ट्रे या युनियनचे सभासद असून शुद्ध, अनुप्रयुक्त व शैक्षणिक या तिन्ही गणितीय क्षेत्रांत तिचे कार्य चालू आहे. गणिताच्या अध्यापनासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय समितीने जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, फ्रान्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान इ. राष्ट्रांतील गणितीय अध्यापन पद्धतींसंबंधी विस्तृत अहवाल प्रसिद्ध केलेले आहेत. या समितीचे L’ Enseignment Mathematique  हे नियतकालिक १८९९ पासून प्रसिद्ध होत असून त्यात गणिताचे अध्यापन, इतिहास व तत्वज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. वरील आंतरराष्ट्रीय संस्थांखेरीज द बायोमेट्रिक सोसायटी. द इकॉनॉमेट्रिक सोसायटी आणि द टेन्सॉर सोसायटी या संस्थाही आपापल्या मर्यादित कार्यक्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहेत.


गणित व तत्सम शाखांतील विशिष्ट विषयांकरिता स्थापन केलेल्या काही संस्थाही आहेत. उदा., अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, द ॲसोसिएशन फॉर सिंबॉलिक लॉजिक, द ॲसोसिएशन फॉर काँप्यूटिंग मशिनरी, द इंडस्ट्रियल मॅथेमॅटिक्स सोसायटी इत्यादी.

बहुतेक संस्थांची स्वत:ची ग्रंथालये असून त्यांत त्या त्या संस्थांची स्वत:ची प्रकाशने तसेच इतर संस्थांची प्रकाशने संदर्भाकरिता संग्रहित करण्यात येतात. विविध विद्यापीठांतील ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे या संस्थांच्या ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथ फारसे ठेवण्यात येत नाहीत.

नियतकालिके व त्यांचे स्वरूप :बहुतेक नियतकालिके इटालियन, फ्रेंच, जर्मन व इंग्‍लिश या भाषांत प्रसिद्ध होतात. अलीकडे रशियन भाषेतही काही नियतकालिके प्रसिद्ध होतात. अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने रशियन भाषेतील महत्त्वाच्या निबंधांचे इंग्रजीत सातत्याने भाषांतर करण्याचे कार्य चालू केले आहे.

ज्या नियतकालिकांत मूळच्या संशोधनावर आधारलेले निबंध प्रसिद्ध होतात त्यांना आद्य स्वरूपाचे  प्रकाशन म्हणतात. अशा प्रकाशनातील लेख बहुधा प्रगत स्वरूपाचे व मागील संदर्भ साहित्य फारसे न देता लिहिलेले असतात. प्रोसिडिंग ऑफ अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी, अमेरिकन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स, ॲनल्स ऑफ मॅथेमॅटिक्स, द जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी  इ. नियतकालिके आद्य स्वरूपाची आहेत. यांशिवाय जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स अँड फिजिक्स, बायोमेट्रिका, द ॲनल्स ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमेट्रिका  इ. नियतकालिकांतील बराचसा भाग गणित अथवा त्याच्याशी संबंधित विषयांवरील मूळ संशोधनाबाबत असतो.

  

जगात जवळजवळ १,२०० गणितीय नियतकालिके प्रसिद्ध होत असून त्यांतील महत्त्वाच्या माहितीचा सारांश व परीक्षण देणारी नियतकालिकेही उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे पहिले नियतकालिक Revue Semestrielle des Publications Mathematiques हे १८९२ ते १९३५ पर्यंत प्रसिद्ध झाले. बर्लिनमध्ये १९३१ साली स्थापन झालेले Zentralblatt  Fur Mathematik und ihre Grenzebiete हे नियतकालिक दुसऱ्या महायुद्धात बंद पडले परंतु नंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. फ्रान्समध्ये Bulletin Analitique हे अशाच प्रकारचे नियतकालिक १९४० पासून प्रसिद्ध करण्यात येत आहे. १९४० साली अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने मॅथेमॅटिकल रिव्ह्यूज  हे नियतकालिक सुरू केले. हे नियतकालिक अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी, मॅथेमॅटिकल ॲसोसिएशन ऑफ अमेरिका, इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी, लंडन मॅथेमॅटिकल सोसायटी इ. तेरा राष्ट्रीय दर्जाच्या गणितीय संस्थांनी पुरस्कृत केलेले आहे. या नियतकालिकाकरिता विविध शाखांतील ७५० गणितज्ञ काम करीत असून त्यात सु. १,२०० नियतकालिकांतील लेखांचे परीक्षण तसेच लेखक व विषयांची सूची दर वर्षी प्रसिद्ध होते.

गणिताच्या अध्यापनासंबंधीसुद्धा अनेक महत्वाची नियतकालिके प्रसिद्ध होतात. त्यांपैकी मॅथेमॅटिकल ॲसोसिएशन ऑफ अमेरिकाचे द अमेरिकन मॅथेमॅटिकल मंथली, ब्रिटिश मॅथेमॅटिकल ॲसोसिएशनचे मॅथेमॅटिकल गॅझेट, इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे द मॅथेमॅटिक्स स्टुडंट, वॉशिंग्टन येथील नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स ऑफ मॅथेमॅटिक्सचे मॅथेमॅटिक्स टिचर  इ. नियतकालिके महत्त्वाची असून त्यांत विवरणात्मक लेख तसेच गणिताच्या अध्यापनातील समस्यांसंबंधी लेख प्रसिद्ध होतात.

प्रशिक्षित गणितज्ञाला त्याच्या स्वत:च्या शाखेखेरीज इतर गणितीय शाखांतील माहिती मिळविण्यास मदत व्हावी या दृष्टीने अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीतर्फे कलोक्वियम पब्‍लिकेशन्स, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे प्रिन्स्टन मॅथेमॅटिकल सेरीजॲनल्स ऑफ मॅथेमॅटिक्स आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे द केंब्रिज ट्रॅक्ट्स इन मॅथेमॅटिक्स अँड मॅथेमॅटिकल फिजिक्स ही नियतकालिके प्रसिद्ध होतात. अशाच स्वरूपाची नियतकालिके फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि पोलंड या देशांतही प्रसिद्ध होतात. 

भदे, व. ग.