फिल्म वित्त महामंडळ : फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. भारतातील कल्पक व कुशल चित्रपटनिर्माते तसेच दिग्दर्शक यांना दर्जेदार चित्रपट काढण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि त्यांना भांडवलाची अडचण भासू नये, या उद्देशाने भारत सरकारने मार्च १९६० मध्ये ही संस्था स्थापन केली व १६ मे १९६० पासून तिचे प्रत्यक्ष कार्य सुरू झाले. या संस्थेच्या उभारणीमागे कोणतेही आर्थिक लाभाचे धोरण नाही. कलात्मक आणि दर्जेदार चित्रपटांना प्रोत्साहन देणे व चित्रपटविषयक लोकाभिरूचीचा दर्जा वाढविणे या दृष्टीनेच संस्थेचे कार्य चालते. या संस्थेने अनेक चित्रपटांना अर्थसाहाय्य देऊन नवीन धर्तीच्या चित्रपटांना चालना दिली. उदा., ⇨ मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला भुवन शोम हा हिंदी चित्रपट (१९६९). भुवन शोमप्रमाणेच सारा आकाश, दस्तक, अनुभव, गर्म हवा, मायादर्पण, उसकी रोटी इ. दर्जेदार चित्रपट या संस्थेच्या मदतीने तयार झाले. ह्या संस्थेने आतापर्यंत (१९७९) पूर्ण लांबीचे ११२ चित्रपट व ४१ लघुचित्रपट यांना आर्थिक साहाय्य दिले असून त्यांपैकी ४४ चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत. १९७७-७८ व १९७८-७९ या दोन वर्षांत संस्थेतर्फे पूर्ण लांबीच्या २० चित्रपटांना आर्थिक साहाय्य देण्यात आले होते.
लोकांमध्ये चांगल्या चित्रपटांची अभिरुची निर्माण करण्याकरिता व जगातील उत्कृष्ट निर्मितितंत्राची भारतीय निर्मात्यांना ओळख करून देण्यासाठी संस्थेने परदेशांतून दर्जेदार चित्रपट आयात करून त्यांचे वितरण केले. १९७८-७९ या वर्षात एकूण २२ परदेशी चित्रपट आयात करून प्रदर्शित करण्यात आले.
प्रादेशिक चित्रपटांना उत्तेजन देण्याकरिता कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या शहरांत पटकथा-मंडळे नेमली आहेत. त्यानुसार १९७९ मध्ये ओरिसात तयार केलेल्या शोध या हिंदी चित्रपटाला संस्थेतर्फे अर्थसाहाय्य देण्यात आले होते. प्रस्तुत चित्रपटाला १९७९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘सुवर्णकमल’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
चित्रपट सुलभपणे प्रदर्शित करण्याकरिता स्वस्त चित्रपटगृहाची योजना महामंडळाने आखलेली आहे. याच उद्देशाने महामंडळाने स्वस्त चित्रपटगृहाच्या सर्वोत्कृष्ट अभिकल्पासाठी १०,००० रूपयांचे पारितोषिक दिले. १९८१ अखेर देशांत २५० स्वस्त चित्रपटगृहे बांधण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात , महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांतून प्रत्येकी २५ चित्रपटगृहे बांधण्याकरिता ते ते राज्यशासन भांडवलाचा काही भाग पुरविणार आहे. या चित्रपटगृहांतून ५० टक्के महामंडळाचे चित्रपट दाखविण्यात येतील.
चित्रपटांना लागणारा कच्चा माल उपलब्ध करून देणारी महामंडळ ही एकमेव संस्था आहे. १६ मिमी. चित्रपटांना उत्तेजन मिळावे म्हणून अशा सु. दहा चित्रपटांची निर्मिती महामंडळाच्या मदतीने सुरू करण्यात आली. त्यांतील काही पूर्ण झाले असून काहींनी पुरस्कारही मिळविले आहेत.
भारतीय चित्रपट निर्यात महामंडळ : चित्रपट निर्यातीच्या खाजगी प्रयत्नांना जोड म्हणून आणि चित्रपट निर्यातीला स्थिरता प्राप्त करून देण्याकरिता निर्यात महामंडळाची स्थापना १९६३ मध्ये करण्यात आली. प्रथमत: फिल्म वित्त महामंडळाशी संलग्न असलेली ही संस्था १९७७ मध्ये स्वतंत्र करण्यात आली. १ एप्रिल १९८० पासून फिल्म वित्त महामंडळ आणि भारतीय चित्रपट निर्यात महामंडळ (इंडियन मोशन पिक्चर एक्सपोर्ट कॉर्पोरेशन) यांचे एकत्रीकरण झाले असून ही संयुक्त संस्था ⇨ राष्ट्रीय फिल्म विकास निगम या नावाने ओळखली जाते.
वाटवे, बापू शहाणे, नर्मदा