फॉर्ब्झ, अलेक्झांडर किन्लोक : (७ जुलै १८२१ – ३१ ऑगस्ट १८६५). भारताविषयी विशेषतः गुजरातविषयी लिहिणारे एक ब्रिटिश इतिहासकार. जन्म लंडन येथे. खाजगी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन येथेच त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. पुढे भारतीय वास्तुकलेचा अचुक अभ्यास करताना त्यांना या शिक्षणाचा बराच फायदा झाला. ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सेवा करण्यास त्यांना पाचारण केले (१८४०). भारतात येणाऱ्या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांसाठी ईस्ट इंडिया कंपनीने हेलिबरी (इंग्लंड) येथे एक अभ्यासक्रम तयार केला होता. फॉर्ब्झ यांनी तो अभ्यासक्रम पुरा केला. इ. स. १८४३ च्या नोव्हेंबरमध्ये फॉर्ब्झ यांची अहमदनगर येथे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. तेथून त्यांची अहमदाबादला बदली झाली (१८४६). तेव्हापासून गुजरातच्या प्राचीन लोककथांच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष वेधले. पुढे त्यांची महीकांठा संस्थानात पोलिटिकल एजंट म्हणून नेमणूक झाली (१८५२). तेथील वास्तव्यामुळे राजपूत संस्थानिक, स्थानिक लोककथा इत्यादींचा त्यांना जवळून परिचय घडला. गुजराती भाषाही त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केली. गुजरातमधील वास्तव्यात तेथील भाट व चारण यांना लोकसंगीतासाठी फॉर्ब्झ नेहमीच पाचारण करीत. फॉर्ब्झ यांनी गुजरातच्या चालुक्य घराण्याविषयी तसेच तेथील लोककला व वाङ्मय यांचे संशोधन करून रासमाला किंवा हिंदू ॲनल्स ऑफ गुजरात (१८५६) हे गुजरातच्या लोककथांचे दोन खंड स्वखर्चाने प्रसिद्ध केले. त्यातल्या चाळीस प्रतींचा खर्च तेव्हाच्या मुंबई सरकारने दिला होता. फॉर्ब्झ यांना भारतीयांबद्दल अतिशय प्रेम होते. १८५७ च्या उठावाबाबत त्यांची भूमिका सहानुभूतीची होती.
अहमदाबादला असताना फॉर्ब्झ यांनी ‘गुजरात व्हर्नॅक्युलर सोसायटी’ स्थापन केली (१८४८). या संस्थेद्वारे गुजराती भाषेतील भारतीय विषयांवरील निबंध आणि हस्तलिखिते प्रसिद्ध करण्यास त्यांनी विशेष चालना दिली. या संस्थेतर्फे इ. स. १८४९ मध्ये प्रसिद्ध गुजराती लेखक दलपतराम डाह्याभाई यांच्या ‘भुते’ या निबंधाला बक्षीस देण्यात आले. फॉर्ब्झ यांनी आपल्या रासमाला या ग्रंथात या निबंधाचा समावेश केला आहे.
फॉर्ब्झ हे मुंबई उच्च न्यायालयाचे इ. स. १८६२ मध्ये न्यायाधीश झाले. फॉर्ब्झ मुंबईस आल्यावर त्यांनी गुजरात व्हर्नॅक्युलर सोसायटीचे इ. स. १८६४ च्या मार्चमध्ये मुंबई गुजराती सभा असे पुनरुज्जीवन केले. फॉर्ब्झ हे तिचे पहिले अध्यक्ष झाले. हे भारतीय विद्येचे मुंबईतील केंद्रच ठरले. न्या. हेन्री न्यूटन, जॉर्ज विल्सन, भाऊ दाजी लाड इ. नामवंत मंडळी मुंबईस होती. फॉर्ब्झना रॉयल एशिॲटिक सोसायटी, मुंबई या संस्थेचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले (१८६४) परंतु त्यांनी ते स्विकारले नाही. त्यांच्या कार्याला मुंबईस अधिक चालना मिळाली. फॉर्ब्झ हे पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१८६४). यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. हवापालट करण्यासाठी ते पुण्यास आले असता मेंदूच्या विकारामुळे तेथेच मरण पावले. मुंबईच्या गुजराती सभेने त्यांच्या स्मरणार्थ तिचे नामकरण फॉर्ब्झ गुजराती सभा असे केले. रणछोडभाई उदयराम यांनी फॉर्ब्झ यांच्या रासमालेचे गुजरातीत भाषांतर केले. इ. स. १८६८ मध्ये गुजराती सभेने मुंबई विद्यापीठास फॉर्ब्झ गोल्ड मेड्ल देण्यासाठी पाच हजार रूपयांची देणगी दिली.
रासमाला हा गुजरातच्या पारंपारिक संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण साधनग्रंथ होय. त्यात गुजराती लोकसंगीत, चालीरीती, रूढी व श्रद्धा, धार्मिक तसेच कलावाङ्मयीन परंपरा यांसंबंधी मौलिक माहिती दिलेली आहे. राजस्थानचा इतिहास लिहून कर्नल जेम्स टॉड यांनी जी कामगिरी केली किंवा मराठ्यांच्या इतिहासलेखनात ग्रँट डफ यांना जे स्थान आहे, तीच कामगिरी व तेच स्थान फॉर्ब्झ यांना गुजरातच्या इतिहासात आहे.
गोखले, शोभना ल.