फॉर्तालेझा: दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशाच्या सीआरा राज्याची राजधानी व अटलांटिक महासागरावरील बंदर. लोकसंख्या ११,०९,८३७ (१९७५ अंदाज). हे पाहेयू नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून येथील किनारा दंतुर व चंद्रकोरीच्या आकाराचा आहे. फॉर्तालेझा नाताळच्या वायव्येस सु. ४४२ किमी. वर असून व्यापारी व औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

पोर्तुगीजांनी १६०९ मध्ये या छोट्याशा गावात वस्ती करून इंडियन टोळ्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण लाभावे म्हणून किल्ला बांधला. पोर्तुगीज भाषेत ‘फॉर्तालेझा’ म्हणजे किल्ला. वसाहतकाळात ईशान्य ब्राझीलमधील ऊसमळा उद्योगाचे हे महत्त्वाचे केंद्र होते. १८०८ मध्ये ईशान्य ब्राझीलमधील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली केल्यानंतरच या शहराचा विकास घडून आला. १८५४ साली येथे बिशपचे प्रधान कार्यालय उघडण्यात आले. रुंद व प्रशस्त रस्ते तसेच आधुनिक इमारती यांनी हे शहर संपन्न असून येथे एक विद्यापीठही (स्था. १९५४) आहे.

शहरात कापडगिरण्या, वनस्पतितेल-प्रक्रिया, साखरनिर्मिती इ. प्रमुख उद्योगधंदे असून साखर, कॉफी, कापूस, फळफळावळ, तांदूळ, कातडी, कॉर्नाबा मेण, ऑइडासीका तेल, रूटाइल खनिज वगैरेंची प्रामुख्याने निर्यात होते. यांशिवाय लेस तयार करणे, किंतान विणणे यांसारख्या पारंपारिक हस्तव्यवसायांबद्दल फॉर्तालेझा प्रसिद्ध आहे.

कापडी, सुलभा