फाल्गुन : हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षाचा शेवटचा म्हणजे बारावा महिना. या महिन्याच्या पौर्णीमेच्या सुमारास (पूर्वी किंवा उत्तरा) फाल्गुनी नक्षत्रात चंद्र असतो म्हणून याला फाल्गुन हे नाव पडले आहे. याला तपस्य असेही नाव आहे. शिशिर ऋतूतील हा दुसरा महिना आहे. यातील पौर्णिमा व अमावास्या या तिथी १४ मन्वादि तिथींपैकी (मन्वंतरांच्या प्रारंभ-तिथींपैकी) आहेत. या महिन्याच्या पौर्णिमेस होळी, वद्य प्रतिपदेस धूलिवंदन आणि वद्य पंचमीला रंगपंचमी हे सण येतात. यांशिवाय श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती शुद्ध द्वितीया तुकारामबीज वद्य द्वितीया, नाथषष्ठी वद्य षष्ठी हे दोन निर्वाणदिन संभाजीवध अमावास्या हे फाल्गुनातील महत्त्वाचे दिवस आहेत. वद्य तृतीयेस शिवजयंती असल्याचे काहींचे मत आहे. दक्षिण भारतातील बहुतेक देवस्थानांचे उत्सव फाल्गुनात असतात. भारताच्या राष्ट्रीय पंचांगाचा फाल्गुन महिना ३० दिवसांचा असून तो लीप वर्षात १९ व एरवी २० फेब्रुवारीस सुरू होतो .
ठाकूर, अ. ना.