फ्युनेरिया : शेवाळी वनस्पतींपैकी (ब्रायोफायटापैकी) ⇨ हरिता वर्गातील व युब्रिया ह्या उपवर्गातील एका वंशाचे शास्‍त्रीय नाव. ‘कॉर्ड मॉस’ हे या वनस्पतींचे इंग्रजी नाव असून इतर कित्येक शेवाळ्यांप्रमाणे त्या ओलसर जागी वाढतात पावसाळ्यात त्यांचे मखमलीसारखे खडकांवर व वृक्षांच्या सालीवर आवरण बनते. काही ठिकाणी सतत ओलावा मिळाल्याने तेथे या वनस्पतींच्या जाती नेहमी आढळतात. क्षारीय [ pH मूल्य ७ पेक्षा जास्त असलेल्या ⟶ पीएच मूल्य ] व उदासीन (पीएच मूल्य ७ असलेल्या) जमिनीवर त्या वाढतात. त्यांचा प्रसार जगभर आहे. फ्युनेरिया हायग्रोमेट्रिका ही भारतीय जाती सामान्यपणे इतरत्रही आढळते. हिच्या जीवनचक्रात गंतुकधारी (लैंगिक प्रजोत्पादक कोशिका-पेशी-निर्मिणारी) व बीजुकधारी (बीजुके म्हणजे अलैंगिक प्रजोत्पादक कोशिका निर्मिणारी) ह्या अनुक्रमे एकगुणित (रंगसूत्रांचा एकच संच असलेली रंगसूत्रे म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) व द्विगुणित (रंगसूत्रांचा दुप्पट संच असलेली) अवस्था आलटून पालटून आढळतात [ ⟶ एकांतरण, पिढ्यांचे]. गंतुकधारी ही प्रमुख व ठळकपणे दिसणारी पिढी असून तिच्यावरच बीजुकधारी पिढी आधारलेली असते. गंतुकधारी अवस्था प्रथम (बीजुक रुजून त्यातून वाढत आलेली) तंतुयुक्त, सपाट व अल्पजीवी असते व तिला ‘शंवालक’ म्हणतात, तिच्यापासून नंतर उभी, पर्णयुक्त, उंच (सु. २·५ सेंमी.) व बराच काळ जगणारी तिचीच दुसरी अवस्था (गंतुकदंड) बनते. तिच्या बारीक साध्या खोडापासून निघालेले अनेक मूलकल्प (मुळाची केसासारखी उपांगे) तळाशी जमिनीत जातात व वनस्पतीला आधार, पाणी व खनिजे पुरवितात खोडावर अनेक साधी, पातळ, लहान, एकाआड एक हिरवी पाने असतात व पानांस एक मध्यशीर असते. खोडात ‌अपित्वचा (बाहेरील कोशिकांचा थर), मध्यत्वचा (मध्यवर्ती कोशिकांचा थर) व केंद्रवर्ती, पातळ आवरणाच्या लांबट वाहक कोशिकांचा संच, असे प्रभेदन (भेद पडलेले) आढळते अपित्वचेच्या कोशिकांची आवरणे जाड असून त्यांत हरितकणू (हरितद्रव्ययुक्त कण) असतात. मध्यत्वचेचा गाभा मोठा असून तिच्या सर्व कोशिकांत हरितकणू असतात. पानातील मध्यशिरेचा भाग अनेक कोशिकायुक्त असून मध्यशिरेतील वाहक कोशिकांचा संच खोडातल्याप्रमाणे असतो. पानाच्या सपाट भागात कोशिकांचा एकच थर असून त्या सर्वांत हरितकणू असतात व अन्ननिर्मिती तेथेच होते.

प्रजोत्पादन : (१) शाकीय प्रकाराने व (२) लैंगिक प्रकाराने घडून येते. (१) शाकीय प्रकारात शंवालकापासून काही शाखा स्वतंत्र झाल्यामुळे, त्यांच्या तंतूंच्या टोकांपासून सुटून निघालेल्या सूक्ष्म कळ्यांनी (मुकुलिकांनी) आणि मूलकल्प, पाने व खोड यांपासून निर्माण झालेल्या नवीन शंवालकामुळे नवीन पर्णयुक्त गंतुकधारी वनस्पतींची निर्मिती होते. (२) लैंगिक प्रकारात रेतुकाशये (पुं-कोशिका अगर ‘रेतुके’ निर्मिणारी पिशवी) व अंदुककलश (अंदुक अगर स्‍त्री-कोशिका निर्मिणारी पिशवी) यांचे साहाय्य आवश्यक असते. ही दोन्ही गंतुकाशये भिन्न व पर्णयुक्त शाखांवर परंतु एकाच गंतुकदंडावर (प्रमुख उभ्या गंतुकाशयधारी अक्षावर) असतात. प्रमुख अक्षाच्या टोकावर अनेक रेतुकाशये व बाजूच्या फांदीवर अनेक अंदुककलश झुबक्यांनी येतात. रेतुकाशय काहीसे गदेसारखे असून त्यांच्या झुबक्यात अनेक सूक्ष्म

फ्युनेरिया : (अ) गंतुकदंड (वनस्पती) : (१) रेतुकाशयधारी शाखा, (२) अंदुककलशधारी शाखा, (३) पाने, (४) खोड, (५) मूलकल्प (आ) खोडाचा आडचा छेद : (१) अपित्वचा, (२) मध्यत्वचा, (३) केंद्रवर्ती वाहक संच (इ) गंतुकाशये : (१) रेतुकाशय, (२) वंध्यतंतू, (३) अंदुककलश (ई) बीजुकधर : (१) गंतुकधारी दंडाचा अग्रभाग, (२) दंड, (३) बीजुकाशय, (४) अपिधान (उ) बीजुकाशयाचा उभा छेद : (१) दंड, (२) आशयतल, (३) अपित्वचा, (४) वायुकोटर, (५) बीजुकांचा थर, (६) कील, (७) परितुंड, (८) अपिधान (ऊ) - (१) परितुंड व दंत (विस्तारित), (२) परितुंडाचे पृष्ठदृश्य, (३) ‌अपिधान (ए) रेतुक (ऐ) शंवालक : (१) तंतू, (२) मूलकल्प, (३) कळी, (४) गंतुकदंड (अविकसित),अनेककोशिक केस (‘वंध्य तंतू’) असतात. रेतुकाशयाला खाली लहान देठ असून वरच्या गोलसर भागाला कोशिकांच्या एका थराचे आवरण असते त्यात अनेक रेतुकजनक कोशिका असतात. पक्वावस्थेत ते फुटून त्यातून अनेक व दोन केसले (जीवद्रव्याचे धागे) असलेली रेतुके बाहेर पडून जवळच्या पाण्याच्या थरात पोहू लागतात. अंदुककलशाचा तळभाग (‘अंदुकस्थली’) गोलसर असून तिचे आवरण कोशिकांच्या दोन थरांचे असते तसेच ग्रीवा (मानेसारखा भाग) कोशिकांच्या सहा उभ्या रांगांनी बनलेली असते. अंदुक त्यावर एक ‘औदरमार्ग कोशिका’ व त्यानंतर अनेक ‘ग्रीवामार्ग कोशिका’ अशी मांडणी अंदुककलशात असते. पक्वावस्थेत अंदुकाखेरीज इतर सर्व कोशिकांचे विच्छेदन होते व त्यांतून बनलेला गोड द्रव रेतुकांना अंदुकाकडे ओढून घेतो. एक एकगुणित रेतुक व एक एकगुणित अंदुक यांचा संयोग होऊन रंदुक (द्विगुणित संयुक्त कोशिका) बनते. रंदुकापासून पुढील (नवी) द्विगुणित बीजुकधारी पिढी सुरू होते.

रंदुकाचा विकास समविभाजनाने [ ⟶ कोशिका ] होऊन तळभाग व अग्रस्थ भाग प्रथम निश्चित होतो. तळभागापासून ‘पद’ व ‘दंड’ असे दोन बीजुकधराचे भाग बनतात अग्रस्थ भागात अनेक कोशिकांचा समूह बनतो व त्यात बाह्यकोश व अंतःकोश असा फरक घडून येतो. बाह्यकोशापासून बीजुकाशयाचे (बीजुके असलेल्या पिशवीचे) आवरण व अंतःकोशापासून बीजुकाशयामधला भाग (‘कील’ व ‘बीजुकपूर्वज’ स्तर) बनतो. बीजुकपूर्वज कोशिकांच्या न्यूनीकरण (अर्धसूत्रण) विभाजनाने एकगुणित बीजुके निर्माण होतात. आवरणच्या टोकास एक टोपण (‘अपिधान’) व ते निघून पडण्याकरिता घन आवरणाच्या कोशिकांचे वलय (‘स्फोटकर वलय’) बनते त्याच्या आतील बाजूस अनेक दात असलेल्या दोन वर्तुळांचे ‘परितुंड’ असते. पक्व बीजुकधराचे पद, लांब दंड व त्यावर लांबट गोलसर बीजुकाशय असे भाग असून त्यावर प्रथम अंदुककलशाचे शुष्क आवरण (‘पिधानी’) असते परंतु ते लवकर गळून पडते. कोरड्या हवेत अपिधान सुटून जाते व परितुंडांवरील आर्द्रताशोषक दंत (दात) उभे राहतात. त्यामुळे आतील एकगुणित बीजुके वाऱ्याने विखुरली जातात. ती रुजून त्यातून प्रथम तंतुयुक्त शंवालक व नंतर त्यापासून पर्णयुक्त शाखा निर्माण होतात. क्वचित प्रत्यक्ष बीजुकाशयापासूनच नवीन शंवालक व त्यापासून पुढे नवीन वनस्पती निर्माण होतात याला ‘अबीजुकजनन’ म्हणतात. बीजुकाशयाच्या आवरणात आतील बाजूस ‘वायुकोटर’ व बाहेर प्रथम हरितद्रव्य असलेले ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) असल्याने बीजुकधर (बीजुकधारी पिढी) अंशतः स्वोपजीवी (साध्या पदार्थांपासून अन्न निर्माण करण्याची क्षमता असलेली) असते.

पहा : यकृतका रिक्सिया शेवाळी हरिता.

संदर्भ : Mukherji, H, Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

महाजन, मु. का.