फार्सी साहित्य : फार्सी साहित्याची परंपरा प्राचीन असून इराणच्या परिसरात ह्या परंपरेचा विकास घडून आला. भारतातील दीर्घकालीन मुस्लिम अंमलाच्या काळात भारतीय फार्सी साहित्याचीही एक परंपरा निर्माण झाल्याचे दिसते. फार्सी साहित्येतिहासाचे कालखंड स्थूल मानाने असे : (१) प्रारंभापासून दहाव्या शतकापर्यत, (२) सेल्जुक कालखंड (अकरावे व बारावे शतक), (३) मुघल व तैमुरी कालखंड (तेरावे ते पंधरावे शतक), (४) सफवी व काचारी कालखंड (सोळावे शतक ते विसाव्या शतकाचे पहिले दशक), (५) आधुनिक कालखंड (विसावे शतक) आणि (६) भारतातील फार्सी साहित्याचा स्थूल आढावा. हा ह्या लेखाच्या शेवटी घेतलेला आहे.

(१) प्रारंभापासून दहाव्या शतकापर्यंत : सातव्या शतकाच्या मध्यावर अरबांनी सासानींचे पारिपत्य करून इराणवर आपली सत्ता प्रस्थापित केली व इराणमध्ये इस्लामी राजवट सुरू झाली. सुरुवातीच्या काळात अरबीचे विशेष काव्यप्रकार आणि छंद फार्सीत प्रविष्ट झाले तथापि इराणी बुद्धिवंतांनी आणि साहित्यिकांनी फार्सी साहित्याला हळुहळू स्वतंत्र, पृथगात्म स्वरूप प्राप्त करून दिले.

फार्सी काव्याचा प्रारंभ ताहिरी (८२० – ७२) व सफ्‌फारी (८६७ – ९०८) यांच्या कारकीर्दींत झाला. नवव्या शतकाच्या शेवटी बुखारा येथे प्रस्थापित झालेल्या सामानी राजवटीत (८७५ – ९९९) फार्सी वाङ्‍मयाला अधिक महत्त्व मिळाले. याचे प्रमुख कारण अरबी संस्कृतीचे प्रमुख केंद्र बगदाद हे बुखारापासून दूर होते. या काळात समरकंद व बुखारा ही केवळ राजकीय केंद्रे नसून विद्येची व वाङ्‍मयाचीही प्रमुख केंद्रे होती. बुखारा येथील शाही ग्रंथालयाएवढे प्रचंड ग्रंथालय जगात अन्यत्र कुठेही नसल्याचे विख्यात अरबी तत्त्वज्ञ ⇨ इब्न सीना (९८० – १०३७) ह्याने नमूद केले आहे. सामानी राज्यकर्ते विद्याकलांचे आश्रयदाते होते. सामानी काळात नस्त्र-इब्न अहमद (कार. ९१३ – ४३) याच्या कारकीर्दीतील ⇨रूदकी (मृ. ९४०) हा इस्लामोत्तर काळातील पहिला मोठा कवी होय. ‘गझल’ या काव्यप्रकारात त्याने प्रेम, सौंदर्य व मदिरा या त्रयीचा काहीशा वेगळ्या व कौशल्यपूर्ण ढंगाने समावेश केला. त्याची शैली अरबी प्रभावापासून बऱ्याच प्रमाणात मुक्त आहे. खुरासानी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैलीचा हा आद्य प्रवर्तक होय. सब्फ-ए-खुरासानी किंवा खुरासानी शैली ही फार्सी साहित्यात विकसित झालेली सर्वप्राचीन वाङ्‌मयीन शैली होय. परिमितता, प्रासादिकपणा आणि आर्ष शब्दकळा ही ह्या शैलीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. याच काळातील दुसरा मोठा कवी म्हणजे दकीकी (मृ. सु. ९८०) हा शाहनामा रचणारा पहिला महत्त्वपूर्ण कवी. त्याने केलेल्या शाहनामा या रचनेचाच (१,००० पद्ये) पुढे ⇨ फिर्‌दौसीने (सु. ९४० – सु.१०२०) आपल्या शाहनामा या ग्रंथात समावेश केला आहे.

सामानी काळापासूनच अर्वाचीन फार्सी गद्याचे नमुने उपलब्ध आहेत. रूदकी याने संस्कृत पंचतंत्राचे, कलीला दिम्‌ना ना या शीर्षकाखाली भाषांतर केले, तथापि त्यातील फारच थोडा भाग आज उपलब्ध आहे. याच काळात बल्‌अमीने तारीख-ए-तबरी ह्या तबरीकृत इतिहासग्रंथाचा फार्सी अनुवाद केला. फार्सीतील आद्य सरल गद्याचा तो उत्कृष्ट नमुना होय.

दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात गझनवी राजवटीच्या उदयाबरोबर फार्सी भाषा-साहित्याला नवजीवन प्राप्त झाले. याचे एकप्रमुख कारण म्हणजे गझनवी घराण्याची इराणवरील दोन शतकांची दीर्घकालीन सत्ता. राजधानी गझना ही विद्याकलांचे केंद्र बनले. किताब-अल्-हिन्दचा कर्ता ⇨ अल् बीरूनी (मृ. १०४८) हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ याच काळातील होय. विशेषतः महंमूद गझनवीच्या (कार. ९९८ – १०३०) काळात झालेल्या अनेक लष्करी कारवायांमुळे इराणी साम्राज्याचा विस्तार झाला. पराक्रम, साहस, महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि वैभव यांचे सुस्पष्ट दर्शन त्या काळातील उन्सुरी (मृ. सु. १०५०), फर्रूखी (मृ.१०३८) आणि मिनुचेहरी (मृ. सु. १०५०) यांच्या अभिजात कसिदा-काव्यात (स्तुतिपर काव्य) आढळून येते.

उन्‌सुरीने आपल्या कसिदाकाव्यातून शैलीदार काव्याचा उत्कृष्ट नमुना सादर केला. मिनुचेहरीच्या काव्यात अरबी काव्यपरंपरा मोठ्या प्रमाणात आढळते. फर्रूखीला अरबी शब्दांचे फार आकर्षण होते, त्यामुळे त्याला फार्सी भाषेचा ⇨ अल् मुतनब्बी (मृ.९६५) म्हणतात (मुतनब्बी हा ख्यातनाम अरबी कवी). वरील कवींना राजाश्रय लाभला होता. राजाश्रय न लाभलेला या काळातील एकमेव कवी म्हणजे फिर्‌दौसी. शाहनामा हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ. सु. ३० वर्षे सतत परिश्रम करून सु. १०१० मध्ये त्याने हा ग्रंथ पूर्ण केला. फिर्‌दौसीचा शाहनामा बहुतांशी अबू मन्सूरच्या गद्य शाहनाम्यावर आधारलेला असून त्यास अवेस्ताप्रमाणेच काही इंडो-इराणी दंतकथाही आधारभूत आहेत. एका अर्थाने तो प्राचीन दंतकथांचा विश्वकोशच ठरेल. सासानी राजवंशाचे वर्णन करणारा अखेरचा ऐतिहासिक भाग सोडला, तर या ग्रंथाचा प्रारंभीचा भाग दंतकथावजाच आहे. शाहनाम्यातील अत्यंत उल्लेखनीय कथा म्हणून ‘सोहराब आणि रूस्तूम’ ह्या कथेकडे बोट दाखविता येईल. शाहनाम्यामध्ये इराणी प्राचीन संस्कृती आणि युद्धशास्त्र यांवर प्रकाश टाकलेला आढळतो. त्यामध्ये मानवी जीवनातील पावित्र्यासंबंधीच्या भावनांचे प्रतिबिंबही पडलेले आढळते. या काव्याला वैश्विक साहित्यात इलिअडमहाभारत यांसारख्या महाकाव्यांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झाले आहे. आपणाला एक राष्ट्रीय व सांस्कृतिक वारसा आहे, याची जाणीव त्याच्या ह्या ग्रंथाने इराणी लोकांत निर्माण केली व ह्या ग्रंथामुळेच अरबांच्या सांस्कृतीक वर्चस्वातून मुक्त होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. शाहनाम्याने प्राचीन फार्सी टिकवून ठेवली त्यामुळे प्राचीन फार्सी भाषेच्या दृष्टीने हा ग्रंथ फारच महत्त्वाचा आहे. 


शाहानाम्याच्या अनुकरणातूनच इराणमध्ये व भारतात अनेक ‘शाहनामे’ लिहिले गेले परंतु फिर्‍दौसीच्या शाहनाम्याची सर त्यांपैकी कोणासही नाही. फिर्‍दौसीच्या सहस्रसांवत्सरिक महोत्सवानिमित्त त्याच्या शाहनाम्याची नऊ खंडांची एक आवृती तेहरान येथे तयार करण्यात आली (१९३४ – ३९).

गझनवी काळात महत्त्वाचे इतिहासलेखनही झाले. बयहकी (मृ.१०७७) या इतिहासकाराने निःपक्षपाती दृष्टीकोणातून एकूण तीस खंडांत मिळून गझनवीचा इतिहास लिहिला तथापि त्यांपैकी सुलतान मसऊदच्या कारकीर्दीच्या काळासंबंधीचाच (१०३० – ४१)काही भाग आज उपलब्ध आहे. गर्डेझीने जैनुल अखबार नावाचा ग्रंथ सासानी व गझनवी घराण्यांच्या इतिहासावर लिहिला (लेखनकाल १०४९ – ५३).

(२) सेल्‌जुक कालखंड (अकरावे व बारावे शतक) : अकराव्या शतकाच्या आरंभी गझनवीचा पराभव करून सेल्‌जुक सत्तेवर आले. ह्या काळात फार्सी वाङ्‍मयाची खूप भरभराट झाली. ⇨ अनवरी (११२० ? – ९० ?), ⇨ उमर खय्याम (सु. १०४८ – सु.११२३), ⇨ निजामी -ए-गंजवी (११४० – १२०२-३) ह्यांसारखे कवी ह्याच कालखंडातले. ‘कसीदा’ ह्या काव्यप्रकाराचा अनवरी हा ‘पैगंबर’ समजला जातो. संजारनामक सेल्जुक तुर्की सुलतानाने त्याला राजकवी म्हणून आपल्या दरबारी ठेविले होते. अनवरीच्या उत्तम कसीदांपैकी अनेक ह्या सुलतानाला उद्देशून रचिलेल्या आहेत. ११५३ मध्ये गज जमातीच्या टोळ्यांनी खोरासानवर स्वारी करून संजारला कैद केले. ह्या घटनेमुळे त्याला आणि खोरासानच्या जनतेला जे दुःख झाले ते त्यांने एका करुण काव्यात व्यक्तविले आहे. टीअर्स ऑफ खुरासान ह्या नावाने ह्या काव्याचे इंग्रजी भांषातर झालेले आहे. अनवरीच्या फार्सी काव्यावर अरबीची दाट छाया असून पांडित्यप्रर्दशनाची त्याला अनावर हौस होती. त्यामुळे काही ठिकाणी त्याची शैली शब्दजड झालेली दिसते. जगद्‍विख्यात कवी उमर खय्याम याच काळात होऊन गेला. त्याचा जन्म नीशापूर (नैशापूर) येथे झाला. ⇨ अल् गझाली (१०५८  – ११११) सारख्या विद्वानांशी तसेच निजामुल्मुल्कसारख्या वजीराशी त्यांचे संबंध होते. खगोलशास्त्र तसेच वैद्यकशास्त्र यांचा तो जाणकर होता. नौराज नामा (नवरोजनामा) हा त्याचा फार्सी गद्यग्रंथ. तो यूनानी वैद्यकासंबंधी आहे परंतु त्याची विशेष ख्याती त्याच्या ‘रुबाईयात’मुळेच झाली. मानवाची अगतिकता, अज्ञान, सुखी जीवनाकडे आसलेली त्याची ओढ ह्यांचे उत्कृष्ट आणि प्रत्ययकारी दर्शन त्याने रुबाईयातमधून घडविले आहे. रुबाईयातचे जगातील जवळजवळ सर्वच भांषामधून भाषांतर झालेले आहे. ⇨ एडवर्ड फिट्सजेरल्डने इंग्रजीमध्ये केलेले भाषांतर (१८५९) विख्यात आहे. १९२९ मध्ये माधव जुलियन यांनी त्यांचे मराठी भाषांतर केले (उमरखय्यामकृत रुबाया).

नासीर-इ खुसरौ (१००३ – १०६०-६१) हा इस्माइली पंथाचा असून, नैतिक उद्‍बोधनात्मक व तत्त्वचिंतनात्मक कवितेबद्दल तो प्रसिद्ध आहे. ज्या काळात कसीदालेखनाला उपजीविकेचे साधन मानणारे कवी झाले, त्या काळात मानवाने सद्‍गुणी व्हावे या हेतूने त्याने कसीदे लिहिले.

सद्‍गुणाची प्रशंसा गाणारे आणि परमेश्वरी भक्तीमध्ये धुंद असणारे आरंभीचे सूफी कवीदेखील याच कालखंडात होऊन गेले. बाबा ताहेर (मृ १०१०), अब्दुल्ला अन्सारी, (१००५ – ८९), अबू सईद अबुल-खैर (मृ.१०४९), सनाई (मृ. बहुधा ११४१) व ⇨ फरिदुद्दीन अत्तार (बारावे- तेरावे- शतक ) हे सूफी पंथातील प्रारंभीचे कवी होते. बाबा ताहेरने पेहलवीशी सदृश असणाऱ्या भाषेत आपल्या रुबाईयात लिहिल्या. अब्दुल्ला अन्सारी हा आपल्या काव्यरचनेपेक्षा मुनाजात या गद्यरचनेकरिता प्रसिद्ध आहे. हा एक प्रार्थनासंग्रह आहे. ह्या प्रार्थना गद्यात असल्या, तरी ओघात काही छोट्या कविताही आलेल्या आहेत. अबू सईद अबुल-खैर हा बहुधा पहिला सूफी कवी. त्याच्या रुबाईयात सईद नफीसी ह्यांना संपादिल्या आहेत (१९५५). इस्लामी सुफी साहित्यातील महान कवी मौलाना रूमी याने सनाई व अत्तार यांच्या काव्याचे ऋण मान्य केले आहे.

सनाईच्या एकून रचनेपैकी हदीका हे काव्य, तर अत्तार यांच्या रचनेपैकी मन्तेकुत्तैर हे काव्य प्रसिद्ध आहे. इलाहीनामा, मुसीबतनामा, अस्रारनामा आणि मुख्तारनामा हे अत्तारचे आणखी काही काव्यग्रंथ विशेष मान्यता पावलेले आहेत. हेल्मूत रीतर यांनी इलाहीनामाचे संपादन केले आहे (१९४०). मन्तेकुत्तैर ही फार्सी सूफी साहीत्यातील पहिली रूपकात्मक रचना असून तिचे संपादन जव्वाद मश्कूर यांनी केले आहे. ‘सीमुर्ग’ (फीनिक्स) च्या शोधात सात सागर पार करून जाणाऱ्या तीस पक्ष्यांना अखेरीस आपणच सीमुर्ग आहोत आसा साक्षात्कार झाला. या कल्पनेवर आधारलेले मन्तेकुत्तैर हे काव्य म्हणजे सूफी तत्त्वज्ञानातील ‘वहदतुल वुजूद’ (आस्तित्वाची एकता) या विचारप्रणालीचा अत्यंत समर्थ आविष्कार ठरले आहे. प्रियकर, प्रियतमा यांच्या प्रतिमांमधून परमेश्वरी भक्तीचे स्वरूप अत्तार ह्यानेच प्रथम आपल्या गझलांमधून मांडले. पुढे त्या प्रतिमा सूफी काव्यात रूढ झाल्या.

निजामी-ए-गंजवी, खाकानी (मृ.सु.११८५) इत्यादींसारखे श्रेष्ठ कवी या काळात आझरबैजानमध्ये होऊन गेले. निजामी हा कवी मुख्यतः त्यांच्या मसनवी-पंचकामुळे फार्सी साहित्यात अमर झाला. या काव्यप्रकाराचे फार्सीप्रमाणे अन्य काही भाषांणमध्येही अनुकरण झाले. कल्पनाशक्तीचे अपूर्व देणे निजामीला लाभले होते. खाकानी या कवीने जटिल शैलीत आपले कसीदे लिहिले.

याच कालखंडातील उल्लेखनीय ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे रावंदीचा राहतुस्सुदूर हा होय. यात आलेल्या विद्वानांच्या व कवींच्या उल्लखांमुळे या ग्रंथाला केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. अल्प अरसलान (मृ. १०७३) व मलिक शाह सेल्जुकी (मृ. १०९२) ह्यांचा प्रसिद्ध वझीर निजामुल्मुल्क तूसी (मृ.१०९२) याने लिहिलेला सियासतनामा हा ग्रंथ तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकतो. नासिर-इ खुसरौ याच्या सफर-नाम्यात त्याने ईजिप्त व इतर देशांत केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. अमीर कैकाउस याने १०८२ मध्ये लिहिलेला काबूस-नामा हा उपदेशपर ग्रंथही मनोरंजक आहे. 


याच काळात फार्सी गद्यात सूफी ग्रंथांनी मोठीच भर घातली. सु.१०५० मध्ये हुज्वीरीचा कशफुल महजूब हा सूफी पंथाचा आद्य ग्रंथ लिहिला गेला. मुहंमद-इब्न अल् मुनव्वर याने अबू सईद अबुल-खैरच्या अदभुत जीवनावर ग्रंथलेखन केले. अत्तारच्या तझकिरतुल-औलीया हा ग्रंथ प्रसिद्ध सूफी संतांची चरित्रे आणि त्यांची शिकवण ह्यांसंबंधीचा आहे. निझामी अरूदीच्या चहार मकाला (११५६) या ग्रंथातील, काव्याचे स्वरूप विशद करणारे व काही प्राचीन साहित्यिकांच्या कृतीवर व जीवनांवर प्रकाश टाकणारे लेखही महत्त्वाचे आहेत.

रादूयानी याचा तरजुमानुल बलागा (१११४ ) हा अलंकारशास्त्रावरील फार्सीतील आद्य ग्रंथ होय. वतवाताचा हदाएकुस्सेहेर हा त्याच विषयावरील दुसरा ग्रंथ. कथासाहित्यातील दोन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे कलीला व दिम्‌नामर्जबान नामा हे होते. कलीलादिम्‌ना ह्या ग्रंथाचा इतिहास असा : संस्कृतातील पंचतंत्र ह्या ग्रंथाचा अनुवाद सासानी काळात, प्रथम पेहलवी भाषेत झाला. त्यावरून अब्दुल्ला इब्‌नुल् मुकफ्फअ (मृ. ७५९) ह्याने कलीलादिम्‌ना ह्या नावाने त्याचे अरबीत रूपांतर केले. अब्दुल्ला इब्‌नुल मुकफ्फअचे रूपांतर आज उपलब्ध नाही तर ह्या रूपांतरावरून रूदकी ह्याने दहाव्या शतकात केलेल्या कलीलादिम्‌ना या फार्सी पद्यानुवादाच्या काही पंक्ती मात्र उपलब्ध आहेत. बहराम शाहा गझनवीच्या कारकीर्दीत अबुल-मआली नस्रुल्लाह याने इब्‍नुल मुकफ्फअच्या कलीलादिम्‌नाच्या अरबी रूपांतरावरून ११४४ च्या सुमारास फार्सी रुपांतर केले. नस्रुल्लाइची भाषा अत्यंत साधी व प्रवाही आहे. तथापि या रूपांतरात पुढे अनेक प्रक्षिप्ते समाविष्ट झाल्यामुळे नस्रुल्लाहच्या मूळ शैलीबद्दल कोणतेही मत व्यक्त करणे अवघड आहे, असे अब्दुल अझीम गुगोनी व बहार यांच्यासारख्या इराणी पंडितांना वाटते.

(३) मुघल व तैमुरी कालखंड (तेरावे ते पंधरावे शतक) : तेराव्या शतकाच्या प्रारंभी चंगीझखान याने इराणवर स्वारी करून हजारो शहरांची व तेथील विद्याकेंद्रांची धुळदाण केली आणि संपूर्ण इस्लामी जगातच एक जबरदस्त दहशतीचे वातावरण निर्माण केले. १२०८ मध्ये खिलाफतचे केंद्र असलेले बगदाद शहर उद्ध्वस्त करण्यात आले आणि तेराव्या शतकाच्या अखेरीस चीनपासून आशिया मायनरपर्यंत मुघल सत्तेची सर्वकष पकड प्रस्थापित झाली. चंगीझखानाच्या वारसांनी (अबाकाखान, गाजानखान, ऊल्जाईतू) चौदाव्या शतकापर्यंत आपली सत्ता आबाधित राखली. पंधराव्या शतकात तैमूरी सत्तेचा उदय होउन ती सत्ता सोळाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत चालू राहिली. तथापि या सर्व राजकीय उलथापालथीच्या व विध्वंसाच्या काळातही फार्सी साहित्याची, विशेषतः इतिहास व सूफी वाङ्‍मय यांची, प्रगती होतच राहिली.

तैमूरींच्या काळात इतर कलांचा लक्षणीय विकास झाला. काही तैमूरी राजे व सरदार कलेचे रसिक आश्रयदाते होते. तैमूरचा नातू उलुघ-बेग याने झीजे-उलुघ-बेग नावाचा जोतिषशास्त्रावरील ग्रंथ लिहिला (१४३७). उलुघ-बेगाचा भाऊ बायसुनगुरू याने आपल्या दरबारात इतिहासकार, कवी आणि चित्रकार यांना आश्रय दिला. त्याने फिर्‍दौसीच्या शाहनामा या ग्रंथाची एक आकर्षक प्रत तयार करून घेतली. अबुलगाजी सुलतान हुसैन व त्याचा वजीर अली शेर नवाई यांनी बहजाह व मुजफ्फर शाह यांच्यासारखे चित्रकार आणि सुलतान अली-मशहदी याच्यासारखे सुंदर हस्ताक्षर असलेले कलाकार पदरी बाळगले होते.

याच काळात बरेच मुघली शब्द फार्सीत घुसले आणि गद्यसाहित्यात एक प्रकारच्या कृत्रिम आणि आलंकारीक शैलीचा सोस वाढला. तथापि ⇨ सादी (सु. ११८४ – १२९२), ⇨ रुमी (१२०७ – ७३), ⇨ हाफीज (सु. १३२६ – सु. १३९०) व ⇨ जामी (१४१४ – ९२)या श्रेष्ठ कवींनी फार्सी काव्याला विलोभनीय स्वरूप प्राप्त करून दिले.

सादी या कवीने इरान व मध्य आशियाभर प्रवास करून आपल्या सूक्ष्म अवलोकनाचे व अनुभवाचे सार अशा काही कलापूर्ण शैलीत मांडले की, ते संपूर्ण इराणात व इराणबाहेरही सर्वतोमुखी झाले. १२५७ मध्ये त्याने बोस्ताँ हा ख्यातनाम काव्यग्रंथ लिहून तो अबू बक्र इब्‌न साद याला अर्पण केला. साध्या पण मोहक शैलीत लिहिलेल्या त्यातील कवितांतून न्याय, नम्रता, प्रेम आणि तृप्ती ह्या सद्‍गुणांची शिकवण सादीने दिली आहे. पुढील वर्षी गुलिस्ताँ हा गद्यग्रंथ त्याने लिहिला. गुलिस्ताँची साधी पण लयबध्द आणि अर्थवाही आहे. या ग्रंथाच्या दोन प्रकरणांचा आनुवाद बेगर्स अँड किंग्ज या नावाने अरबेरीने प्रसिद्ध केला (१९४५). गझल या पद्यप्रकारालाही सादीने असे एक नवे व आगळे स्वरूप दिले, की हाफीज या गझलसम्राटालाही ते मार्गदर्शक वाटले. प्रेमाचे विविध पैलू त्याने उत्कट भावगेयतेने आपल्या गझलांतून दाखविले आहेत. साधी, अकृत्रिम पण अत्यंत परिणामकारक अशी भाषा त्यांने गझलांसाठी वापरली. कसीदा या प्रकारात राजे लोकांची केवळ स्तुती करण्याचा संकेत होत पण तो मोडून राजाने न्यायाने व दयाबुद्धीने राज्य केले पाहिजे, असे आपल्या कसीदांतून सांगण्याचा निर्भीडपणाही सादीने दाखविला. रुमी हा सर्वात मोठा सूफी कवी होय. प्रारंभी कोन्या या शहरी हा आपल्या पित्याप्रमाणे, एक कर्मठ धर्मोपदेशक होता पण १२४४ मध्ये शम्स नावाचा एका दरवेशाची व त्याची गाठ पडली. शम्सच्या व्यक्तीमत्त्वाचा रुमीवर विलक्षण प्रभाव पडून बाह्य कर्मकांडाकडून तो परमेश्वराच्या खऱ्याखुऱ्या भक्तिमार्गाकडे वळला. त्याची रचना पुढीलप्रमाणे आहे. पद्य : मस्नवि-ए मानवी आणि दीवाने शम्सतवरेझ. गद्य : फीहि-मा-फीह्, मजालिस-ए-सवा व मक्तूबात. मस्नवि-ए मानवीचे संपादन आणि इंग्रजी भाषांतर आर.ए. निकल्सन ह्याने केले असून (८ खंड, १९२४ – ४०) दिवाने शम्सतबरेझचे संपादन फ्रुजानफर ह्याने केलेले आहे. (८ खंड १९५७ – ६१). फ्रुजानफर ह्याने रूमीच्या फीहि-मा-फीह् ह्या उपर्युक्त गद्यग्रंथाचे संपादनही केलेले आहे (१९५१). ह्याच ग्रंथाचा अरबेरीने केलेला इंग्रजी अनुवाद डिसकोर्सेस ऑफ रुमी ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे (१९६१). परमेश्वराच्या उत्कट व उत्स्फूर्त भक्तीतून रूमीचे दिवाने.…. मधील काव्य निर्माण झाले आहे, तर त्याच्या मस्नवीची संथ रचना शांत रसाचा आविष्कार करणारी आहे. भैतिक सुखांतून बाहेर पडून मानवाने परमेश्वरसन्निध जावे हत्ती जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी त्याला ज्याप्रमाने आपल्या मूळ स्थानाची, म्हणजे हिंदची आठवण होते, त्याप्रमाणे मानवाला सदैव परमेश्वराचे स्मरण असावे, हे त्याच्या एकूण शिकवणुकीचे सार आहे. परमेश्वरी भक्तीचा हा आशय त्याने अनेक मनोरंजक रूपककथांमधून व्यक्त केला आसून या कथा त्याने कुराणातून तसेच पंचतंत्रादी प्राचीन साहीत्यातून मुक्त हस्ताने वेचल्या आहेत.

चौदाव्या शतकात सल्मान-इ सावजी व ख्‌वाजू किरमानी यांसारखे प्रसिद्ध कवी होउन गेले, तरी या कालखंडाला खरे वैभव प्राप्त झाले ते हाफीजमुळे. हा गझलसम्राट इराणमधील शिराझचा रहिवासी. शिराझचा राजा शाह शुजाउद्दीन मन्सूर याने हाफीजला आश्रय दिला होत. अबू इसाक आणि शाहशुजा यांसारखे राजेदेखील हफीजचे चाहते होते. भारतातील बहामणी वंशातील एका राजाने हाफीजला आपल्या दरबारी येण्यासाठी पाचारण केल्याची दंतकथाही प्रसिद्धच आहे. हाजीफच्या सर्वदूर लोकप्रियतेची व कीर्तीची नोंद त्याचा मित्र गुलअंदाम याने आपल्या लेखात करून ठेवली आहे. 


हाफीजच्या नावावर प्रसिद्ध असलेल्या काव्यात कमालीची प्रक्षिप्तता आढळते तथापि मुहम्मद कझवीनी व कासीम गनी यांनी अत्यंत संशोधनपूर्वक हजीफची विश्वसनीय रचना प्रथम प्रकाशात आणली (१९४१). हाजीफच्या काव्याची इंग्रजी भाषेत अनेक भाषांतरे झाली आहेत. फिफ्टी पोएम्स (इं.मा. १९४७) हे अरबेरीने केलेले एक उल्लेखनीय भाषांतर होय. फार्सी, तुर्की व उर्दु साहित्यात हाफीजच्या काव्यावर विपुल विवेचनात्मक लेखन झाले असून, या तिन्ही भाषांतील गझलकारांनी बऱ्याच प्रमाणात हाफीजचेच अनुकरण केलेले दिसून येते.

हाफीजच्या अनन्यसाधारन रचनेमुळे गझल या प्रकाराला काव्यात अत्युच्च स्थान प्राप्त झाले. हाफीजची गझल ही उत्कट भावनांचा उत्स्फूर्त अविष्कार तर आहेच पण त्याशिवाय त्याच्या शैलीत जे सहजमाधुर्य व जी नादमयता आहे, तिला तोंड नाही.

हाफीजच्या काव्याचा मोठा चाहता असलेला जामी हा या कालखंडातील अखेरचा श्रेष्ठ कवी होय. बाबर आणि सुलतान हुसैन बायकरा या राजांनी जमीची प्रशंसा केलेली आढळते. त्याच्या सात मस्नवीपैकी सिल्सिलतुझजहब (लेखनकाळ १४६८ – ७२) ही बायकरा याला अर्पण केली आहे. त्याची विशेष प्रसिद्ध रचना म्हणजे युसुफजुलैखा (१४८३) ही होय. ह्या रचनेतून तसेच त्यांच्या गझलांतून जामीने ईश्वरी प्रेम, सत्‌ची एकात्मता असे गूढ विषय अत्यंत काव्यात्म पद्धतीने हाताळले आहेत. त्याच्या मस्नवींतून तसेच त्याच्या गझलातून उदात्त नैतिक तत्वांच्या उद्‍घोष त्याने केला.

या कालखंडातील फार्सी साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गद्यलेखनाचा झालेला विकास. सूफी साहित्य, इतिहास, नीतीशास्त्र, चरित्र व कथात्मक साहित्य इ. प्रकारचे विपुल लेखन ह्या काळात झाले. अल्लाउद्दीन अता मलिक जुवैनी (१२२५ – ८३) याने चंगीझखान आणि त्याचे वारस तसेच ख्‌वारझम शाह आणि इस्माइली यांच्या कारकीर्दीवर तारीख-इ-जहाँगुशाय (१२६०) हा त्रिखंडात्मक इतिहासग्रंथ लिहिला. मोगलांच्या कारकीर्दीवर सर्वात महत्त्वाचा इतिहासग्रंथ म्हणजे रशीदुद्दीन फजलुल्ला (१२७४ – १३१८) याचा जामेउत्तवारीख (१३०६ – ११) हा होय. हा गाजानखान (कार. १२९५ – १३०४) व ऊल्‌जाईतू (कार. १३०४ – १६) या दोन्ही राजांचा तवारीखकार होता. या ग्रंथात भारतासंबधीची माहिती त्याने एका भिक्षुकाकडून मिळवून लिहिली. हम्‌दुल्ला मुस्तौफी (सु. १२८२ – १३६६) याने तारीखे गुझीदा या नावाचा इतिहास १३३० मध्ये लिहिला असून त्यात त्याने विश्वाच्या प्रारंभापासून १३२९ पर्यतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांची नोंद केली आहे. वस्साफ याचा इतिहासग्रंथ तज्‌जियतुल अम्‌सार अलंकारप्रचुर असला, तरी त्यातील मजकूर घटनांशी इमान राखणारा आहे. ह्या इतिहासग्रंथात पर्शियाच्या इतिहासातील १२५७ ते १३२८ ह्या कालखंडातील घटना नमूद केलेल्या आहेत. तैमूरी कालखंडात होऊन होउन गेलेल्या इतिहासकारांत निजामुद्दीन शामी (चवदावे व पंधरावे शतक), शरफुद्दीन अली यज्दी (मृ. १४५४), हाफीज-ए अब्रू (मृ. १४३०), मीरा ख्वाँद (१४३३ – ९८) हे विशेष प्रसिद्ध होत. निजामुद्दीन शामीने लिहिलेल्या जफर- नामा (१४०४ )या ग्रंथात तैमुरचे समग्र चरित्र आले आहे. तथापि याच शीर्षकाने लिहिला गेलेला शरफुद्दीन अली यज्दी याचा तैमूरसंबंधीचा चरित्रग्रंथ (१४२४) अधिक प्रसिद्ध आहे. त्यात भाषेचा फुलोरा कमी असून आशय नेमक्या शब्दांत मांडण्याची प्रवृती दिसते. हाफीज-ए अब्रू याने आपल्या जुब्दतुत्तवारीख (अपूर्ण, १४३०) या ग्रंथात शामीच्या जफर- नाम्यातील काही उणिवा भरून काढून त्या ग्रंथाचा अधिक विस्तार केलेला दिसतो. मीर ख्वाँद याचा रौजतुस्सफा हा ग्रंथ अत्यंत शब्दबंबाळ आहे. शाहरूखच्या दरबारातील अब्दुर्-रझाक (१४१३ – ८२) याला भारतातील विजयानगरच्या राज्यात वकील म्हणून १४४१ मध्ये पाठविण्यात आले होते. आपल्या मत्लउस्सौदन या ग्रंथात त्याने विजयानगरच्या दरबारात त्याचे जे स्वागत झाले, त्याचे अत्यंत चित्तवेधक वर्णन केले आहे.

या कालखंडातील सूफी साहित्यात जामीचा लवाएह हा ग्रंथ सुप्रसिद्ध असून याच ग्रंथकाराने, नफहातूल उन्समध्ये सूफी संतांची चरित्रे रेखाटली आहेत. नसीरूद्दीन तूसी (१२०१ – ७४) याचा अख्‍लाके-नासिरी (१२३३) हा ग्रंथ केवळ सर्वसामान्य नीतितत्त्वांचा प्रसार करणारा नसून नीतिशास्त्राचे उच्च तात्त्विक भूमिकेवरून विवेचन करणारा आहे. या ग्रंथाचे संपादन जलालुद्दीन हुमाइने केले आहे (१९५६). अख्‍लाके-जलाली (१४७०) हा जलालुद्दीन दव्वानी (१४२७ – १५०१) याचा ग्रंथ अंशतः अख्‍लाके–नासिरीवरच आधारलेला असला, तरी त्यातील स्वतंत्र विवेचनही महत्त्वाचे आहे. 

साहित्यचर्चाविषयक लेखनात औफीचा (सु. ११७५ – ? ) लुबाबुल्अल्‌बाब, दौलतशाहचा तझ्‌केर्‍तुश्शुरा आणि शम्स-ए कैस याचा अल्-मोजम हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. अल्-मोजम या ग्रंथात काव्यशास्त्राच्या विवेचनाबरोबरच तत्कालीन इराणी कवींची चरित्रे एकत्र करण्यात आली आहेत. कथात्मक लेखनाची परंपरा याही काळात चालू राहिली. जवामे- उल् हिकायात या औफीकृत ग्रंथात दोन हाजाराहून अधिक कथांचा अंतर्भाव होतो. प्राचीन इराणी राजवंशांशी संबंधित अशा ह्या कथा आहेत. त्या लिहिताना काही दुर्मिळ ग्रंथांचा आधार घेतलेला असून ऐतिहासिक आणि वाङ्‍मयीन अशा दोन्ही दृष्टींनी ह्या कथा महत्त्वाच्या मानल्या जातात. मर्जबाननामा हा ग्रंथ मुळात तिबिस्थानी भाषेत लिहिलेला. सादुद्दिन वरावींनी (तेरावे शतक) ह्याने त्याचा फार्सी अनुवाद केला. आलंकारिक शैलीत लिहिलेल्या ह्या ग्रंथात एकूण ९ प्रकरणे असून त्यांपैकी ४ ते ९ ही प्रकरणे कलिलादिम्‍नाच्या धर्तीवर वर रचिलेली आहेत. या सहा प्रकरणातील बोधकथा विशेष मनोरंजक आहेत.

(४) सफवी व काचारी कालखंड (सोळावे शतक ते विसाव्या शतकाचे पहिले शतक) : सोळाव्या शतकात सफवीचा उदय झाला. सफवी हे इरानचे खरेखुरे भूमिपुत्र होते. त्यांच्या राजवटी इराणी लोकांना आपल्या राष्ट्रीयत्त्वाची जाणीव झाली. शाह अब्बास या राजाच्या (१५८७ ते १६२८) कारकीर्दीत इराणची सर्व क्षेत्रांत भरभराट झाली. सुप्रसिद्ध इराणी गालिच्याच्या धंद्याला उर्जितावस्था प्राप्त झाली. रजा अब्बासी आणि मीर इमाद हे या काळातील विख्यात कलावंत होते. तथापि सफवी राज्यकर्ते हे कट्टर धार्मिक मनोवृतीचे असल्यामुळे त्यांनी केवळ धर्मविषयक काव्यालाच उत्तेजन दिले. अशा कवींपैकी मोहतशम काशानीचे (मृ. १५८८) काव्य विशेष रव्याती पावले. काव्याच्या दृष्टीने हा पडता काळ होता त्यामुळे उरफी, नझीरी ह्यांच्यासारख्या प्रतिभावंतांना आश्रयासाठी भारतात यावे लागले.

काचारींची कारर्कीद (१७९४ – १९०६) हीसुद्धा काव्याच्या दृष्टीने फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. तथापि त्या काळातील कविता शैलीच्या दृष्टीने आलकांरिकतेच्या पकडीतून सुटलेली व सुबोध झालेली होती, हे निश्चित. काआनी (१८०८ – ५४) हा केवळ या कालखंडामधलाच नव्हे, तर एकूण फार्शी साहित्याच्या इतिहासातील सुमधुर रचना करणारा कवी म्हणून ओळखला जातो. 


सफवी आणि काचारी काळात महत्त्वाचे गद्यग्रंथ लिहिले गेले. सफवी घराण्याचा संस्थापक शाह इस्माईल याच्या कारर्कीर्दीवरचा खोन्दमीरचा हबीबु-स्सियर आणि शाह अब्बाससंबंधीचा इस्कंदर मुन्शीचा आल्‌म-आरा-ए अब्बासी हे इतिहासग्रंथ मान्यता पावलेले आहेत. आल्‌म-आरा… मध्ये इराणप्रमाणेच अनेक शेजारी देशांतील घडामोडींचा विश्वसनीय उल्लेख असल्यामुळे तो विशेष महत्त्वाचा ठरला. सफवी आणि काचारी काळातील इतर इतिहासग्रंथ म्हणजे अहसनुत्तवारीख, जुब्दतुत्तवारीख आणि नासिरवुत्तवारीख हे होत. यांखेरीज नादीरशाह, जंद घराणे आणि बाबी पंथ यांवरही इतिहास लिहिले गेले. तोहफा-ए- सामी, खुलासतुल्-अश्-आर, माजालेसुल मोमिनिन, इफ्त इक्लीम आणि मज्म-उल-फुसहा हे या काळातील कविचरित्रपर ग्रंथ असून त्यांपैकी शेवटच्या दोन ग्रंथांचा लेखक हिदयात याने फरहंगे अंजुमन-आरा-ए नासेरी या शब्दकोशाची रचना केली.

सफवी काळातच बाकिर-मजलिशी (१६२८ – ९९) व अमिली (१५४६ – १६२२) यांनी धर्मविषयक आणि लाहिजी याने तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिले. या काळातील सर्वात थोर तत्त्ववेत्ता मुल्ला सद्रा (मृ. १६४०) हा होय. त्याने आपले सर्व लेखन मात्र अरबी भाषेत केले आहे. काचारी काळात हादी सब्जवारी (१७९७ – १८७८) याने अस्ररुल-हिकम हा धार्मिक तत्त्वज्ञानासंबंधीचा ग्रंथ रचला.

काचारी काळातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात फार्शी साहित्याचा पाश्चात्त्य वाङ्‍मयाशी संबंध आला. इराणमध्ये याच काळात मुद्रनकलेचाही उदय झाला (१८१६). शाह नासीरुद्दीन काचारच्या काळात–१८३७ मध्ये–पहिले इराणी नियतकालिक सुरू झाले. त्यानंतर रूझनाम-ए वकाईये इत्तेफाकिया हे आणखी एक नियतकालिक १८५१ पासून निघू लागले. या व यानंतरच्या कावा, सुरे-इस्रफिल्, हब्लुल-मतीन यांसारख्या वृत्तपत्रांनी इराणी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. हब्लुल-मतीन हे साप्ताहिक कलकत्त्याहून प्रकाशित होई (१८९३).

(५) आधुनिक कालखंड (विसावे शतक) : वृत्तपत्रामुळे जागृत झालेल्या इराणी जनतेने क्रमाक्रमाने एकतंत्री राजसत्तेवर दडपण आणण्यास प्रारंभ केला आणि परिणामी १९०६ मध्ये लोकाभिमुख राज्यघटना मिळविली. १९२५ मध्ये काचारी घराण्यातील अखेरचा राजा अहमदशाह पदच्युत झाला आणि रेझाशाह पेहलवी गादीवर आला. तेथपासून इराणमध्ये नव्या युगाला प्रारंभ झाला. देशप्रेम आणि सामाजिक सुधारणा यांचे वारे फार्सी साहित्यातून वाहू लागले. इंग्‍लंड व रशिया ह्या परकीय सत्तांनी इराणच्या अंतर्गत राजकारणात जो धक्कादायक हस्तक्षेप केला, त्याबद्दल तीव्र खंत व्यक्त करणाऱ्या कविता १९०४ ते १९०७ च्या दरम्यान फर्रूखी यज्दी (१८८८ किंवा १८८९ – १९३९) आणि ईरज मिर्झा (१८७४ – १९२५) ह्यांनी लिहिल्या. ह्या दोन कवींखेरीज, अश्रफ रिश्ती, आरिफ कजवीनी (मृ. १९३४) आणि परवीन एतेसामी (मृ. १९४१) ह्यांची काव्यरचना उल्लेखनीय आहे. देशाच्या दुःस्थितीमुळे व्यथित झालेल्या मनांची ती अभिव्यक्ती आहे. पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे सांकेतिक होऊन बसलेल्या अनेक प्रतिमांना बदलत्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भाचे भान ठेवून ह्या कवींनी नवा गुणार्थ प्राप्त करून दिला, ही बाब विशेष महत्त्वाची.

लाहुती (मृ. १९५७) हा इराणचा पहिला साम्यवादी कवी. पददलितांची दुःखे त्याने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडलेली आहेत. विख्यात रशियन साहित्यिक अलेक्सांद्र पुश्किन ह्याचे काही साहित्यही त्याने फार्सीत अनुवादिले आहे. नीमा युशिज (मृ. १९५९) हा मुक्तच्छंदाचा पुरस्कार करणारा पहिला फार्सी कवी. त्याच्या तीव्र सामाजिक जाणिवेचा प्रत्यय त्याच्या कवितेतून येतो. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील अनेक फार्सी कवींवर युशिजचा प्रभाव दिसून येतो. त्यांपैकी अहमद शामलू बाम्दाद (१९२६ – ) ह्याने तर छंदांच्या बंधनांना पूर्णतः झुगारून दिलेले दिसते. बाम्दादच्या काही कवितांवर पॉल एल्यूआर आणि अर्त्यूर रँबो ह्यांच्यासारख्या फ्रेंच कवींचाही प्रभाव दिसतो. फुरोग ह्या अल्पायुषी कवयित्रिची कविताही लक्षणीय आहे. जीवनातील आनंदाचा मुक्तपणे आस्वाद घेणारे मन तिच्या काव्यात दिसते तसेच स्वतःकडे अलिप्तपणे पाहून आपल्या सर्व दुष्कृत्यांचा आणि पापांचा कबुलीजबाब देणारा निर्भयपणाही आढळतो. इस्माइल शाहरूदी (१९२६ –) आणि सोहराब सिपेहरी (१९२५ – ) ह्यांच्या कवितेतून भारतविषयीची आस्था आणि आदर ह्यांचे दर्शन घडते. इस्माइल शाहरूद्दीने पंडित नेहरूंवर लिहिलेले काव्य ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. मन्सुर आणि शंकराचार्य ह्यांच्या तत्त्वज्ञानाचा समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्‍न सोहराब सिपेहरीच्या कवितेत दिसतो. आपल्या कवितेची प्रेरणा त्याने वेदान्तामधून घेतली आहे. नादिर नादिरपूरी (१९३० – ) ह्याने आपली कविता मुख्यतः प्रेम आणि मरण ह्या विषयांवर रचिलेली आहे. तवल्‍लली (१९१८ –), गुल्वीन (१९१८ –) ह्यांसारख्या कवींनी पॉल व्हालेरी ह्या फ्रेंच प्रतीकवादी कवीच्या प्रभावातून आपली कविता लिहिली आहे. १९६२ नंतरच्या फार्सी काव्यात ‘मौजे नव’ (नवी लाट) ह्या नावाने ओळखली जाणारी एक प्रवृत्ती दिसून येते. संदिग्धता आणि तीव्र सूचकता ही ह्या प्रवृत्तीची लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

फार्सीतील नाट्यवाङ्‍मय मात्र फारसे समृद्ध नाही. इराणमध्ये ‘ताजिया’ हा अगदी प्राथमिक अवस्थेमधील नाट्यप्रकार रूढ असला, तरी मिर्झा जाफरच्या तुर्की नाटकांच्या फार्सी अनुवादांमुळे फार्सीत नाटक हा साहित्यप्रकार खऱ्या अर्थाने अवतीर्ण झाला. प्रारंभीच्या नाटकांत अली नवरूज (हसन मुकाद्दम) याच्या ‘जाफरखान युरोपातून परत येतो’ अशा मराठी शीर्षकार्थाच्या एका अत्यंत मनोरंजक नाट्यकृतीचा उल्लेख करता येईल. अहमद बहार-मस्त याने लिहिलेल्या ‘इराणचा आत्मा’ (मराठी शीर्षकार्थ) ह्या नाटकाचा प्रयोग १९४७ मध्ये इराणच्या शहासमोर करण्यात आला. जेम्स मॉरिएकृत द अडव्हेंचर्स ऑफ हाजीबाबा ऑफ इस्फहान (१९२४) ह्या कादंबरीच्या मिर्झा हबीब इस्फहानी (मृ. १८९७ किंवा ९८) ह्याने केलेल्या फार्सी रूपांतरामुळे आधुनिक फार्सी कादंबरी अवतरली. झैनुल आबिदिन (मृ. १९१०) ह्याची सियाहत-नामा-ए-इत्राहिमबेग ही आणखी एक उल्लेखनीय कादंबरी. समकालीन सामाजिक जीवनातील अपप्रवृत्तींचे वेधक चित्रण तीत करण्यात आले आहे. मुहम्मद अली जमालझादा (१८९१ वा १८९२) ह्याच्या यके बूद व यके नबूद (१९२२, इं. शी. द ट्रू अँड द फॉल्स) हा कथासंग्रह उल्‍लेखनीय आहे. ह्या कथा वास्तववादी असून त्यांच्यावरून फार्सी साहित्यातील नव्या वळणाची कल्पना येते. मुहम्मद हिजाझी (१९०० – ) ह्याच्या हुमा (१९२८) ह्या कादंबरीलाही कीर्ती लाभली. फार्सीतील आधुनिक कथात्मक साहित्यात सादिक हिदायत (मृ. १९५१) ह्याचे स्थान महत्त्वाचे आहे. भाषेवरील-विशेषतः बोलभाषेवरील-त्याचे विलक्षण प्रभुत्व त्याच्या साहित्यातून दिसून येते. बूफे कूर ह्या त्याच्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद बी. पी. कोस्टेल्‍ली ह्याने द ब्‍लाइंड आउल ह्या नावाने केला आहे (१९५८). 


(६) भारतातील फार्सी साहित्य : मुसलमानांचे भारतात आगमन झाल्यानंतर, दहाव्या-अकराव्या शतकांत, गझनवी व घोरी यांच्या राजसत्तेबरोबर, फार्सी भाषेचा प्रभावही सुरू झाला. हे राज्यकर्ते स्वतः तुर्की-इराणी वंशाचे असल्यामुळे भाषा, संस्कृती इ. बाबतीत त्यांच्यावरील अरबीचा प्रभाव कमी कमी होत गेला व ते फार्सीचाच अधिकाधिक उपयोग करू लागले. मुस्लिम अंमलात राज्यकारभाराची भाषा ही प्रामुख्याने फार्सीच होती. गुलाम घराण्यातील राजांनी स्थापन केलेल्या मदरशांमधून अरबी भाषेबरोबरच फार्सीचेही शिक्षण दिले जात असे. सूफी संतांच्या मठांतून ज्या धर्मविषयक ग्रंथांचे अध्ययन-अध्यापन चाले, त्यांपैकी बरेच ग्रंथ फार्सी भाषेतील होते त्यामुळे भारतातील सूफी मठांना पर्यायाने फार्सीच्या अभ्यासकेंद्रांचे स्वरूप आले. अशा केंद्रांत दिल्‍ली, हैदराबाद, औरंगाबाद, विजापूर इ. ठिकाणच्या केंद्रांचा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. काश्मीरचा सुलतान झैनुल आबिदिन (पंधरावे शतक) आणि मोगल सम्राट अकबर अशा उदारमतवादी राजांनी हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांची आणि संस्कृतातील अभिजात कलाकृतींची फार्सी भाषांतरे करण्यास उत्तेजन दिले. परिणामतःकाश्मीरातील काही हिंदूंनीही फार्सी भाषा आत्मसात केली. उर्दूने फार्सीमधील शब्द, वाक्‌प्रचार इत्यादींचा तर अगीकार केलाच पण फार्सी काव्यातील संकेत, पद्यप्रकार, छंदप्रकार इ. बाबींचाही स्वीकार केला. गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत उर्दू कविता ही फार्सीच्या छायेतच प्रगत होत राहिली. मराठी भाषेत अनेक फार्सी शब्द दृढमूल झाले. गझल हा फार्सीतला काव्यप्रकारही काही मराठी कवींनी हाताळलेला आहे. आजसुद्धा सुरेश भटांसारखे कवी मराठीत गझला लिहीत आहेत. इराणी व भारतीय या संस्कृतींच्या भाषिक संयोगाबरोबरच संगीत, ललितकला, शिल्पकला व अध्यात्म यांसारख्या अन्य क्षेत्रांतही त्यांचा एक अपूर्व असा संगम झालेला आढळून येतो. पंधराव्या शतकात सिकंदर लोदी आणि काश्मीरचा सुलतान झैनुल आबिदिन, सोळाव्या शकतात सम्राट अकबर, सोळाव्या-सतराव्या शतकांत इब्राहीम आदिलशाह (दुसरा) आणि जहांगीर यांनी संगीतादी ललितकलांना उदार राजाश्रय दिला. फार्सी भाषेतील संगीतावरील पहिला ग्रंथ लहेजते सिकंदरशाही हा सिकंदर लोदीच्या प्रेरणेने तयार झाला. महाकवी ⇨ अमीर खुसरौ (१२५३ – १३२५) या थोर कवीने संगीताच्या क्षेत्रात केलेली कामगिरी प्रसिद्धच आहे. सतराव्या शतकात राजा मानसिंग याने लिहवून घेतलेली मानकौतूहल या संगीतावरील हिंदी ग्रंथाचा फार्सीत अनुवाद झाला. त्याचप्रमाणे अठराव्या शतकात संगीत-पारिजात या संस्कृत ग्रंथाचेही फार्सीत भाषांतर झाले. गौस गवलियारी याने अमृतकुंड या संस्कृत ग्रंथाचे बहम्‍रूल-हयात हे फार्सी भाषांतर केले. दारा शुकोह या उदारमतवादी राजपुत्राने उपनिषदाचे केलेले सिर्रेअकबर हे भाषांतर सुप्रसिद्धच आहे (संपा. डॉ. ताराचंद व जलालनाईनी, १९५७). हिंदू व मुसलमान धर्मांतील मूलभूत साम्यावर प्रकाश टाकून दोन्ही धर्मीयांना जवळ आणण्याचा प्रयत्‍न करणारा मज्‍मउल्-बहरैन हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ दारा शुकोह याने लिहिला आहे. अठराव्या शतकातील थोर सूफी कवी मजहर जान जानान याच्या कलिमाते-तैयिबात या ग्रंथातही हिंदू धर्माबद्दल अनुकूल उद्‌गार काढलेले आढळतात.

अशा या संस्कृतिसंगमाची पार्श्वभूमी भारतीय फार्सी साहित्याला लाभलेले आहे. इराण आणि मध्य आशियातील फार्सी साहित्यपरंपरेचा प्रभाव भारतीय फार्सी साहित्यावरही आहे. भारतातील फार्सी साहित्यनिर्मितीच्या कालखंडाला यूरोपीय समीक्षक ‘इंडियन समर’ असे यथार्थपणे संबोधतात. भारतीय फार्सी साहित्याच्या शैलीला इराणी पंडित ‘ सबके हिन्दी’ असे नाव देतात. सूक्ष्म कल्पनाशक्तीचा प्रत्यय देणारी रूपके, विलक्षण शब्दकळा ही ह्या आलंकारिक शैलीची काही महत्त्वाचा वैशिष्ट्ये होत. सबके हिन्दी म्हणजे भारतीस शैली. तथापि ही खुरासानमध्ये, पंधराव्या शतकात विकसित झाल्याचे दिसते. उरफी (मृ. १५९१), नझीरी (मृ. १६१४) ह्यांसारख्या इराणी कवींनी, तसेच फैझी (मृ. १५९६) सारख्या भारतीय कवींनी ह्या शैलीचा वापर केला. सोळाव्या शतकापासून एकोणीसाव्या शतकापर्यंत ह्या शैलीचा प्रभाव इराणी आणि भारतीय फार्सी साहित्यावर विशेषत्वाने दिसून येतो. अकराव्या शतकाच्या मध्यापासून भारतात फार्सी साहित्यनिर्मितीला प्रारंभ झालेला दिसून येतो. भारतीय उपखंडातील पहिला सुप्रसिद्ध कवी मसउदी सादी सल्मान (मृ. ११२१) हा लाहोर येथे जन्मला. अबुल फरज रूनी (१०९१) हा उत्कृष्ट कसीदा लिहिणारा कवी होय. चौदाव्या शतकात मसऊद बेग (१३९७) हा सूफी संत कवी प्रसिद्धीस आला. तेराव्या-चौदाव्या शतकांत अमीर खुसरौ हा थोर कवी होऊन गेला.

खुसरौची प्रतिभा बहुप्रसवा होती. त्याने पाच दिवान, पाच ऐतिहासिक खंडकाव्ये (तारीखी मस्‍नवियाँ) इ. विपुल रचना केली आहे. निजामी-ए-गंजवीच्या मस्‍नवि पंचकाचा आदर्श समोर ठेवूनच अमीर खुसरौ ह्याने आपल्या मस्‍नवींची रचना केली आहे. मस्‍नवीलेखनात निजामीची उंची कोणीही गाठली नाही, असे इराणी पंडितांचे मत असले, तरी खुसरौंचे मस्‍नवीलेखन निजामीच्या मस्‍नवींतील गुणवत्तेशी तुल्यबळ आहे, असेही मानणारे आहेत. खुसरौंच्या ऐतिहासिक खंडकाव्यांपैकी पहिल्या किरानुस-सअदेन (१२८९) ह्या खंडकाव्यात नसीरूद्दीन बुग्राखान व मोइजुद्दीन कैकुबाद या पिता-पुत्रांच्या भेटीचे वर्णन आले आहे. मिफताहुल-फुतूह (१२९१) ही जलालुद्दीन फिरोज खल्‌जी याच्या पराक्रमाची व विजयाची गाथा आहे. खिजर खाँ दवलरानी (१३१६) ही एक प्रेमकथा आहे. नुह सिपिहर (१३१८) हे सुलतान कुतुबुद्दीन मुबारकशाह खल्‌जी याच्या काळातील वैभवाचे वर्णन करणारे खंडकाव्य असून त्यातच अमीर खुसरौ याने त्याला हिंदुस्थानाबद्दल वाटणारे अपार प्रेम व्यक्त केले आहे. जगात कुठेही आढळणार नाही अशी विविधता, समृद्धी आणि सौंदर्य आपल्या भूमीत म्हणजेच हिंदुस्थानात आढळते, असे तो अभिमानाने सांगतो. अमीर खुसरौच्या नावावर हिंदी भाषेतील काही काव्यरचनाही नमूद करण्यात आली आहे. खुसरौने गझलाही लिहिल्या. संगीताचा व्यासंग असल्यामुळेच त्याच्या गझलांना एक लक्षणीय लय आणि गेयता प्राप्त झाली आहे.

अमीर खुसरौ आणि त्याच्या पूर्वीचे कवी यांनी भारतीय फार्सी साहित्याची जी परंपरा सुरू केली, त्या परंपरेचा विलोभनीय विकास झाला तो मुघल सम्राटांच्या काळात. भारतीय फार्सी साहित्याचे हे सुवर्णयुगच होय. मुघल घराण्याचा आद्य संस्थापक बाबर हा तर स्वतःच कवी होता. त्याच्या नंतर मुघल घराण्यातील अकबर, जहांगीर, शाहजहान इ. सम्राट आणि खानखानानसारखे अनेक मुघल सरदार हे वाङ्‌मयाचे रसिक चाहते आणि उदार आश्रयदाते होते. त्यांनी कवींना व लेखकांना दिलेल्या राजाश्रयाची कीर्ती भारताबाहेरही पसरली आणि उरफी, नझीरी यांसारखे कित्येक इराणी ग्रंथकार इराण सोडून राजाश्रयासाठी भारतात आले. यांपैकी उरफी या तत्वज्ञ कवीचा विशेष असा की, दरबारी कवी असूनही त्याने आपला स्वाभिमान कधीही सोडला नाही. उरफीचा समकालीन असणारा नझीरी हा कवी आपल्या गझलांमुळे प्रसिद्धीस आला. अकबराच्या नवरत्‍नांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा फैझी हा कवी भारतीय असूनही फार्सी साहित्यात त्याने असे अद्वितीय स्थान मिळविले, की त्याची कीर्ती भारताच्या सीमा ओलांडून तुर्कस्तानच्या कानाकोपऱ्यापर्यंत दुमदुमत राहिली. सतराव्या शतकातील सुप्रसिद्ध तुर्की कवी नेफी (मृ. १६३६) याने तर, फैझीची मुक्त कंठाने तारीफ केली. फैझीच्या कसीदा विलक्षण प्रभावी असून त्याच्या गझला अत्यंत भावोत्कट आहेत. यांखेरीज महाभारतातील नल-दमयंतीच्या आख्यानावर त्याने त्याच नावाची एक भावमधुर मस्‍नवी रचलेली आहे. 


फैझी हा ज्याप्रमाणे अकबराचा दरबारी कवी होता, त्याचप्रमाणे तालिब-अमूली (मृ. १६२६ – २७) हा जहांगीर बादशहाचा व अबू-तालिब कलीम (मृ. १६५१) हा शाहजहान बादशहाचा दरबारी कवी होता. ह्या दोघांची गीतरचना सर्वसामान्य रसिकांतही लाकप्रिय ठरली आहे. अबू-तालिब कलीम याचे वैशिष्ट्य असे की, त्याने आपल्या रचनेत धोबी, नीम, मुलसरी अशा एतद्देशीय हिंदी शब्दांचा वापर केला आहे. सतराव्या शतकात इराणहून भारतात आलेल्या कवींपैकी साइब याला काश्मीरचा गव्हर्नर झफरखान याचा आश्रय लाभला. त्याच शतकात काश्मीरमध्ये गनी-काश्मीरी हा विख्यात फार्सी कवी होऊन गेला. या कालखंडात शाहजहानच्या दफ्तरखान्यातील चंद्रभान ब्राह्मण या लेखकाने रचलेल्या फार्सी काव्यात आपण ब्राह्मण असल्याचा उल्‍लेख त्याने अभिमानाने केला आहे.

दक्षिणेतील आदिलशाही (१४८९ – १६८६) राजवटीने फार्सी साहित्याच्या विकासाला फार मोठा हातभार लावला. जुहूरीसारखे विख्यात फार्सी कवी आदिलशाही राजांच्या प्रोत्साहनाने व आश्रयाने उदयास आले. स्वामी भोपटराय वेघम बैरागी या अध्यात्मवादी कवीने आदिलशाही दरबारापासून दूर राहून काव्यरचना केली. रूमीच्या मस्‍नवींची आठवण व्हावी, इतकी त्याच्या मस्‍नवींची योग्यता आहे. अदबीयात-ए-फार्सीमें हिंदूओंका हिस्सा (१९४२) या ग्रंथाच्या लेखकाने स्वामी भोपटरायच्या किस्सा-ए-फुकरा-ए-हिन्द या कलाकृतीचा मोठ्या गौरवाने उल्‍लेख केला आहे. स्वामींचाच समकालीन असणारा हजीन हा कवी जरी मूळचा इराणचा असला, तरी भारतात आल्यानंतर त्याने काशी क्षेत्रा वास्तव्य केले. त्याला काशीतील प्रत्येक ब्राह्मणकुमार रामलक्ष्मणाप्रमाणे मनोहर दिसत असल्याचा त्याने एके ठिकाणी उल्‍लेख केला आहे. अनेक उत्कृष्ट गझलांची रचना करून हजीन याने काशी येथेच देह ठेवला.

या कालखंडात होऊन गेलेल्या विशेष उल्‍लेखनीय भारतीय फार्सी कवींमध्ये बेदिल (मृ. १७२२) या कवीचा मुद्दाम उल्‍लेख करावा लागेल. त्याची शैलीही खास सबके हिन्दी या प्रकारात मोडते. अफगाणिस्तानातील रसिकांच्या मनावर त्याच्या काव्याची विलक्षण मोहिनी पडली असून तेथे ‘ दबिस्ताने बेदिल’ म्हणून एक काव्यपरंपारा रूढ झाली. सबके हिन्दीची वैशिष्ट्ये ह्या काव्यपरंपरेत होतीच परंतु बेदिलच्या काव्यातील नानार्थता हेही तिचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या कवीच्या काव्याने गालिब या थोर कवीलाही प्रभावित केलेले आहे. गालिब हा मुघल कालखंडातील अखेरचा महाकवी. गालिबची उर्दूमधील रचना प्रसिद्ध असली, तरी आपल्या फार्सी काव्यरचनेबद्दल आपल्याला विशेष अभिमान वाटतो, असे त्याने एके ठिकाणी म्हटले आहे. वस्तुस्थिति अशी आहे, की उर्दू आणि फार्सी या दोन्ही भाषांतील काव्यातून त्याचे व्यक्तिमत्त्व सारख्याच प्रभावीपणाने अभिव्यक्त झाले आहे.

भारतीय फार्सी साहित्यपरंपरेतील अखेरचा दुवा म्हणजे ‘सारे जहांसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ या सुप्रसिद्ध गीताचा कर्ता ⇨ इक्‌बाल (१८७७ – १९३८) हा होय. वस्तुतः विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात उर्दूचे वर्चस्व प्रस्तापित झाल्यापासून फार्सी भाषा या भूमितून जवळजवळ अस्तंगत झाली होती. अशा परिस्थितीत इक्‌बालने भारतामध्ये साहित्यनिर्मितीला पुन्हा एकदा चालना दिली. अर्थात त्याच्या काळापर्यंत इराणातील फार्सीचे स्वरूप बदलले होते पण इक्‌बालने जी फार्सी आत्मसात केली, ती रूमी, फैजी आदी ग्रंथकारांच्या साहित्यावरून. त्यामुळे इक्‌बालची फार्सीही इराणमधील तत्कालीन रूढ फार्सीहून काहीशी वेगळी वाटते सर्व-इस्लामवाद, साहस, मानवी निर्माणक्षमतेवर व कर्तृत्वावरील दृढ विश्वास हा त्याच्या काव्याचा प्रमुख संदेश होय. त्याने फार्सीमध्ये लिहिलेल्या ग्रंथांपैकी जावेदनामा (१९२०) हा सुप्रसिद्ध असून त्याचा इंग्रजीत अनुवाद झालेला आहे. विख्यात इटालियन कवी दान्ते ह्यांच्या डिव्हाइन कॉमेडी (इं. भा.) ह्या काव्याच्या धर्तीवर जावेदनामा लिहिलेला आहे.

काव्याप्रमाणेच गद्याच्या प्रांतातही-विशेषतः इतिहास, सूफी साहित्य, कोशवाङ्‌मय, ललित साहित्य ह्यांच्या संदर्भात-भारतीय फार्सी पंडितांनी मोलाची भर घातली आहे. अगदी प्रारंभीचे पण महत्त्वाचे इतिहासलेखन म्हणजे तबकाते नासिरी हा मिन्‌हाज सिराज याचा ग्रंथ होय. हा ग्रंथ १२६० मध्ये पूर्ण केला. भारतातील मुस्लिम राजवटीच्या प्रारंभीच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा असा हा ग्रंथ असून केवळ भारतातच नव्हे, तर इराण व तुर्कस्तान या देशांतही हा ग्रंथ इतिहासाचा एक आधारस्तंभ म्हणून मान्यता पावलेला आहे. या ग्रंथातील भारतासंबंधीच्या विभागाचे इंग्रजीत भाषांतर झालेले असून ते दि हिस्टरी ऑफ इण्डिया अज टोल्ड बाय इट्‌स ओन हिस्टोरियन्‌स या ग्रंथात अंतर्भूत करण्यात आले आहे. यानंतरच्या शताकात बर्नी याने लिहिलेला तारिखे फीरोझशाही हा ग्रंथ बोधवादी इतिहासलेखनाचा एक नमुना आहे (१९५७). तेराव्या शतकात सुरू झालेली ही इतिहासलेखनाची परंपरा पुढे मुघलकाळात तर खूपच भरभराटीला आली. ⇨ अबुल फज्ल (मृ. १६०२) याने लिहिलेल्या ⇨ अकबरनामा या ग्रंथाची एकूण तीन दफ्तरे असून त्याने अकबराच्या ४६ वर्षांच्या कारकीर्दीचा इतिहास दिला आहे. यांपैकी तिसरे दफ्तर ⇨ आईन- इ-अकबरी या नावाने प्रसिद्ध असून त्यात भारताच्या तत्कालीन भौगोलिक व प्रशासकीय व्यवहाराचे आकडेवारीने विवेचन केलेले आढळते. अकबराचा समकालीन निजामुद्दीन याने लिहिलेला तबकाते अकबरी हा ग्रंथही अकबराच्या राजवटीसंबंधी विश्वसनीय माहिती देणारा आहे. याच काळात होऊन गेलेल्या अब्दुल कादीर बदाऊनी याने मुन्तखबुत्तवारीख हा भारतातील मुस्लिम राजवटीचा सर्वसाधारण इतिहास सांगणारा ग्रंथ रचला. ग्रंथाच्या अखेरीस त्याने काही पंडितांची आणि कवींची चरित्रे दिलेली आहेत. अकबराच्या संदर्भात आलेला इतिहास हा त्याने बराचसा तबकाते अकबरीवरून घेतला असला, तरी अकबरांसंबंधीचे बदाऊनीचे खास अभिप्राय अकबराच्या व्यक्तिमत्वाच्या काही वेगळ्या अंगांवर प्रकाश टाकणारे आहेत. तंजुके जहांगिरी या ग्रंथाने जहांगिराच्या व्यक्तिगत जीवनाप्रमाणेच त्या काळाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकला आहे. तसेच ह्या ग्रंथात विविध स्थानांची सुंदर वर्णने आहेत. विशेषतः काश्मीरचे (इंग्रजी अनुवाद रॉजर्स बीवरिज १९०९ – १४). अब्दुल हमीद याने लिहिलेल्या पादशाहनामा या ग्रंथात शाहजहानाच्या राजवटीचे विवेचन आहे. त्याचप्रमाणे खाफीखान याचा मुन्तखवुल्‍लुबाब हा ग्रंथ औरंगजेबाच्या कारकीर्दीचा विश्वसनीय आलेख मानला जातो. दिल्‍लीच्या राजवटीप्रमाणे दक्षिणेतील बहामनी, कुतुबशाही, आदिलशाही इ. राजवटींच्या संबंधीचे इतिहासग्रंथही लिहिले गेले आहेत. त्यांपैकी इब्राहिम आदिलशाह म्हणजेच आदिलशाह दुसरा याच्या आश्रयाखाली असणाऱ्या फरिश्ता याने लिहिलेला गुलशने इब्राहीमी (तारिखे फरिश्ता) हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. 


गजनवी राजवटीत होऊन गेलेल्या हुज्वीरी या ग्रंथकाराने आपल्या कश्फूल महजूब ह्या ग्रंथाने भारतात सूफी विचारप्रणालीचा पाया घातला. हा ग्रंथ सूफी तत्त्वज्ञानाचे समग्र विवरण करणारा असून सर्वांत जुना ग्रंथ म्हणून तो सूफी पंथीयांत आदरणीय समजला जातो (इं. भा. १९११). यानंतरही सूफी संप्रदायासंबंधीचे विपुल लेखन वेळोवेळी होत गेले. त्यातील ख्‌वाजा मीर नासिर अंदलीब याचा नालए-अंद-लीब (प्रकाशन १८९३), मीर दर्द याचा इल्मुल् किताब (प्रकाशन १८९१) व शेख अहमद सरहिन्दी (मृ. १६२४) याचा मकतूबात (प्रकाशन १९१३) हे ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत. इस्लामी तत्त्वज्ञानातील अद्वैतवादाचा सिद्धांत इब्‍न-अल् अरबी याने प्रथम अरबी भाषेत मांडला व तेराव्या शतकात त्याचा हळूहळू सर्व भारतभर फार्सी भाषेतून प्रसार झाला. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध गूढवादी ग्रंथकार मसऊद बेग याने इब्‍न-अल् अरबीच्या विचाराने प्रभावित होऊन मिरअतउल् आरिफीन हा गद्य ग्रंथ लिहिला. शेख अहमद सरहिन्दी याने इब्‍न-अल् अरबीच्या विचारसरणीवर प्रखर टीका केली. या टीकेचा परिणाम नंतरच्या विचारवंतांवर इतका झाला, की या टीकेचे अरबी व तुर्की साहित्यातही प्रतिध्वनी उमटले. सूफी विचारवंतांच्या मालिकेतील शेवटचा भारतीय तत्वज्ञ म्हणजे शाह वलीयुल्‍लाह (मृ. १७६३) हा होय. याने इब्‍न-अल् अरबी आणि सरहिन्दी यांच्या परस्परविरोधी विचारप्रणालीला एकत्र आणण्याचा व त्यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला. कुर्आने शरीफचे फार्सीत भाषांतर करण्याचा पहिला मानही शाह वलीयुल्‍लाह याच्याकडेच जातो.

सूफी पंथाविषयीच्या सैद्धांतिक ग्रंथांखेरीज सूफी संतांची चरित्रे आणि वचने यांवरही बरेच लेखन भारतीय फार्सी साहित्यात झाले असून त्यांपैकी सिअर-उल्-अवलिया, सियर-उल्-आरिफीन, अखबार-उल्-अख्‌यार हे चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. अरबस्तानात उगम पावलेला सूफी तत्त्वज्ञानाचा प्रवाह इराणमार्गे हिंदुस्थानात आल्यावर काही सूफी ग्रंथकारांच्या विचारसरणीवर भारतीय वेदान्ताचा व तत्त्वज्ञानाचा परिणाम झाला. मुहंमद गौस याचा बहर-उल्-हयात हा ग्रंथ ह्याचे उदाहरण होय. त्याचप्रमाणे राजपुत्र दारा शुकोह याच्या मजन-उल्-बहरैन या ग्रंथातूनही वेदान्त आणि मूळ सूफी तत्त्वज्ञान यांतील समान तत्वांवर भर दिलेला आढळतो.

याच काळात फार्सी कोशकारांनी जे कोश रचले, त्यांना केवळ भारतातच नव्हे तर इराणांतही संदर्भग्रंथ म्हणून मान्यता मिळाली. चौदाव्या शतकापासून ते तहत एकोणिसाव्या शतकापर्यंत शंभर फार्सी शब्दकोश तयार झाल्याचे दिसून येते. सर्वप्रथम अल्‍लाउद्दीन खल्‌जी (१२९६ – १३१६) ह्याचा समकालीन फक्रुद्दीन कव्वास ह्याने लिहिलेला फरंगनामा व शब्दकोश उल्‍लेखनीय आहे त्यानंतर दिल्‍लीच्या बदर मुहंमद याने १४१९ मध्ये अदबुल फुझला हा शब्दकोश तयार केला. याखेरीज जमालुद्दीन-इंजू याचा फरहंगे जहांगीरी, अब्दुर्रशीद याचा फरहंगे रशीदी, मुहंमद हुसेन तब्रीजी याचा बुर्हाने कातिअ, अजीज जंग बहादुर याचा आसीफ-उल्-लुगात, टेकचंद बहार (मृ. १७६६) याचा बहारे अजम हे शब्दकोशही महत्त्वाचे मानले जातात. त्याचा शब्दकोश म्हणजे भारतातील एका हिंदूने फार्सी भाषेच्या संदर्भात केलेले सर्वात मोठे कार्य होय. कथासाहित्यात झियाउद्दीन नकशवी याच्या तूतीनामा या ग्रंथाचा प्रामुख्याने उल्‍लेख करावा लागेल. त्यात संस्कृतमधील शुकसप्तति या ग्रंथातील सत्तर कथांचे भाषांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अकबर बादशहाच्या विनंतीवरून फैजी, बदाऊनी आणि मुल्‍लाशेरी या तिघांनी मिळून महाभारताचे रइमनामा हे फार्सी रूपांतर तयार केले. त्याशिवाय बदाऊनी याने सिंहासनद्वात्रिंशिकाकथासरित्‌सागर या संस्कृत ग्रंथांची अनुक्रमे नामाए-इ-खिरद-अफझा (१५७४) व बहरूल-अस्मार (१५७५) या शीर्षकांनी फार्सी भाषांतरे केली. त्याने रामायणाचेही फार्सी रूपांतर केले असून अबुल फज्ल याने पंचतंत्राचे अरबीवरून फार्सीत भाषांतर केले आहे. औरंगजेबाच्या काळात संस्कृतातील नचिकेत-कथा रूपनारायण खत्री याने हिकायते नासिकीत या नावाने फार्सीत आणली (१७०५ – ०६) त्याचप्रमाणे वेतालपंचविंशतिका या ग्रंथांचाही एका अज्ञात लेखकाने फार्सीत अनुवाद केला. मिताक्षरा या संस्कृत विविधविषयक ग्रंथाचाही याच काळात फार्सीत अनुवाद झाला.

इब्राहिम आदिलशाह (दुसरा) याचा दरबारी कवी जुहूरी याच्या गद्य साहित्याने भारतात बरीच लोकप्रियता मिळविली. संस्कृत छंदशास्त्राचा तुहफ्तुल्-हिन्द हा फार्सी अवतार विशेष प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचा हा फार्सीमधला एकमेव ग्रंथ होय. पत्रात्मक साहित्यात अबुल फज्ल आणि औरंगजेब यांची पत्रे विशेष उल्‍लेखनीय आहेत. अबुल फज्ल याच्या पत्रांची भाषाही अत्यंत आलंकारिक असून त्याची शैली भारदस्त आहे. म्हणून अकबराच्या तलवारीपेक्षा अबुल फज्लची लेखणी अधिक भीतिदायक वाटते, असे मध्य आशियातील एका अमीराने म्हटल्याचे सांगतात.

याखेरीज सुप्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या लीलावती या गणितविषयक ग्रंथाचे अबुल फैजीने भाषांतर (प्रकाशन १८२८) केले असून अहोबलकृत पारिजातक या संगीतविषयक ग्रंथाचे रोशन जमीर याने केलेले भाषांतर उल्‍लेखनीय आहे. अर्वाचीन काळातही भारतातील विख्यात ग्रंथांचे फार्सीमध्ये रूपांतर होत आहे. अशा लेखनामध्ये अली आगर हिकमत याने केलेले शाकुंतलाचे भाषांतर आणि तफझ्झली याने केलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचे भाषांतर प्रसिद्ध आहे.

संदर्भ : 1. Arberry, A. J. Classical Persian Literature, London, 1958.

          2. Browne, E. G. A Literary History of Persia, 4. Vols., Cambridge, 1928.

          3. Devare, T. N. A Short History of Persian Literature, Poona, 1961.

          4. Shafaq, R. Z. Tarikh-e Adabiyali, Iran, Tehran, 1934.

          5. Shibli Numani, Sherui Ajam, 5 Vols., Lahore, 1924.

नईमुद्दीन, सैय्यद