फादेयेव्ह, अलिक्सांद्र अलिक्सांद्रोविच : (२४ डिसेंबर १९०१-१३ मे १९५६). सोव्हिएट कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार. ट्वेर (आधुनिक कालीनिन) प्रांतातील कीमरी येथे जन्म. त्याचे वडील शिक्षक होते. त्यांच्या निधनानंतर त्याच्या आईने दुसरा विवाह केला. हे कुटुंब पुढे सायबीरियात आले. ब्ह्लॅडिव्हस्टॉक येथे फादेयेव्हने शिक्षण घेतले. पदवी घेण्यापूर्वी, वयाच्या सतराव्या वर्षीच, कम्युनिस्ट पक्षाचा तो सक्रिय सदस्य झाला. १९१८-२० मध्ये झालेल्या यादवी युद्धात तो कम्युनिस्टांच्या बाजूने लढला. राजग्रोम (१९२७,इं. शी. द. राउट इं. भा. द नाइंटीन यीअर्स, १९२९) ही त्याची पहिली कादंबरी, ह्या यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. प्रागतिक विचारांचे शत्रू कोण, हे क्रांती ढळढळीतपणे दाखवून देत असल्यामुळे पुरोगामी माणसांपासून प्रतिगाम्यांना वेगळी काढण्याची एक अत्यंत नैसर्गिक अशी प्रक्रियाही तिच्या रूपाने घडून येते, हा विचार ह्या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. क्रांतिकाळात सोव्हिएट जनतेत जी आंतरिक परिवर्तने घडून येत गेली, त्यांचेही चित्रण फायदेव्हने ह्या कादंबरीत केलेले आहे. मलदाया-ग्व्हार्दिया (१९४६, सुधारित आवृ. १९५१, इं. शी. द यंग गार्ड्स) ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कादंबरी. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशियन प्रदेश व्यापणाऱ्या जर्मनांशी भूमिगत राहून लढा देणाऱ्या व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या सोव्हिएट तरुण-तरुणींच्या एका संघटित गटाभोवती ह्या कादंबरीचे कथानक विणण्यात आले आहे. ह्या कादंबरीस १९४६ चे शासकीय पारितोषिक देण्यात आले. आणखी दोन कादंबऱ्याही त्याने लिहावयास घेतल्या होत्या परंतु तो त्या पूर्ण करू शकला नाही. त्याने काही कथाही लिहिल्या आहेत.
फादेयेव्हच्या कथात्मक साहित्यात वास्तववाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांचे प्रत्ययकारी मिश्रण दिसून येते. अवघड परिस्थितीचे आव्हान स्वीकारणाऱ्या व्यक्तिरेखा त्याने विशेष प्रभावीपणे रंगविल्या आहेत. आपल्या कादंबऱ्यांतील नायकांचे बाहेरून दिसणारे स्वरूप व त्यांचे अंतरंग ह्यांतील विरोध त्याने अत्यंत प्रभावीपणे दाखविलेला आहे. त्याचे अनेक नायक दैनंदिन जीवनात इतके साधे असतात, की त्यांच्या अंतर्यामी असलेली पिळदार इच्छाशक्ती आणि अस्सल कार्यप्रवणता एरव्ही जाणवतच नाही. संघर्षाच्या वेळी मात्र त्यांचे हे गुण एकदम प्रकटतात. कुरूपता आणि सौंदर्य, शिव आणि अशिव ह्यांच्यातील संघर्ष तो परिणामकारकपणे उभा करतो, त्यासाठी विडंबन-विरूपणांचाही आश्रय घेतो.
मॅक्झिम गॉर्कीने प्रतिपादिलेल्या समाजवादी मानवतावादाचे विवरण-विकसन करून फादेयेव्हने तरुण सोव्हिएट साहित्यिकांना मार्गदर्शन केले. निरनिराळ्या जर्नलांचा संपादक म्हणूनही त्याने काम केले. लितरातूर्नाया गाजिता (इं. शी. लिटररी गॅझिटीअर) ह्या विख्यात नियतकालिकाचाही तो संपादक होता. आपले वाङ्मयीन कार्य करीत असताना कॉकेशस, मॉस्को आदी ठिकाणी त्याचे पक्षकार्यही चालूच होते. १९३९ मध्ये बोल्शेव्हिक पक्षाच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य निवडला गेला, ‘सूप्रिम सोव्हिएट’चा डेप्यूटी म्हणूनही तो अनेकदा निवडला गेला होता. ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ हा बहुमानही त्याला प्राप्त झाला होता.
पेरिड्येल्कीन येथे विषण्णावस्थेत त्याने आत्महत्या केली. त्याच्या प्रकृतीचे गंभीर अस्वास्थ्य, स्वतःच्या सर्जनशक्तीच्या त्याला जाणवलेल्या मर्यादा आणि सोव्हिएट रशियात १९५० नंतर घडून आलेली काही सामाजिक परिवर्तने ह्यांचा एकत्रित परिणाम होऊन ही विषण्णता त्याला आली होती, असे दिसते.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)
“