फातिमी खिलाफत : उत्तर आफ्रिकेत मुहंमद पैगंबरांच्या फातिमा या मुलीच्या नावाने स्थापन झालेली शिया पंथीय एक खिलाफत. सुन्नी पंथीय अब्बासी खिलाफतीला शह देण्यासाठी इ. स. च्या ९ व्या शतकाच्या मध्यात इस्माइली चळवळ फैलावली. या चळवळीचे नेतृत्व फातिमाची मुले हसन व हुसेन या इमामांच्या वारसांकडे गेले. इस्माइली पंथाची सुरुवातीची शाखा म्हणजे करामिता अथवा कर्मेथियन. तिचे धर्मप्रसार-प्रचार कार्य उत्तर आफ्रिकेत अबू-अब्दुल्लाह अल्-शायी याच्या मार्गदर्शनाखाली ८९३ पासून गुप्तपणे चालू होते. त्याने बर्बर टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापिले. त्याला हुसेनचा खापर पणतू सय्यद इब्न हुसेन मदत करीत असे. सुरुवातीस तो सेलेमिया (सिरीया) येथे प्रचारकार्यात गुंतला होता. त्याने ९०३ मध्ये अल्जीरिया जिंकून अबू-अब्दुल्लाहला मदत केली पण अब्बासींच्या आक्रमणाच्या भीतीने तो येमेनमध्ये व पुढे ईजिप्तमध्ये गेला. तिथे त्याला अमीराने काही काळ नजरकैदेत ठेवला. दरम्यान अबू-अब्दुल्लाहने ॲग्लाबाइटांची चळवळ नष्ट करून केर्वानच्या अरब राजपुत्राचा पराभव केला आणि आपल्या जागी सय्यद इब्न हुसेनला नेमले. सय्यद इब्न हुसेनने अल्-महदी हा किताब व उबैदुल्ला हे नाव धारण करून केर्वान येथे फातिमी खिलाफतीची ९०८ मध्ये स्थापना केली. फातिमी परंपरेतील उबैदुल्ला हा पहिला इमाम व खलीफा इफ्रिकियात (ट्युनिशिया) सत्ताधीश झाला आणि त्याने स्वतःला पैगंबरांचा अधिकृत वंशज-वारस म्हणून जाहीर केले. ट्यूनिशिया, सिसिली, ईशान्य अल्जीरिया, वायव्य लिबिया वगैरे प्रदेश आपल्या ताब्यात आणले आणि अल्-महदिया (बगदाद) येथे राजधानी स्थापन केली. ही खिलाफत इ. स. ९०९ ते १०५१ पर्यंत ट्यूनिशियात व इ. स. ९६९ ते ११७१ पर्यत ईजिप्तमध्ये टिकून होती. या खिलाफतीतील चौदा खलीफा प्रसिद्धीस आले तथापि त्यांच्या एकूण अधिकृत संख्येबाबत मतभेद आहेत.

उबैदुल्ला (कार. ९०९-९३४), अल्-खइम (कार.९३४-४६), अल्-मन्सूर (कार. ९४६-५३) व अल्-मुइझ्झ (कार. ९५३-९७५) या पहिल्या चार खलीफांनी उत्तर आफ्रिकेत राज्य केले. उबैदुल्लाचे सुरुवातीस कर्मेथियन शाखेशी वितुष्ट आले. या पक्षांतर्गत वितुष्टात त्याने अबू-अब्दुल्लाहचा खून केला. या शिवाय त्यास अब्बासींबरोबर सतत झगडावे लागले. पहिल्या तीन खलीफांनी सत्ता-विस्ताराचा प्रयत्न केला पण ईजिप्त त्यांना जिंकता आले नाही. अल्-मुइझ्झ सोडता उरलेले खलिफा विशेष कर्तबगार नव्हते. अल्-मुइझ्झने आक्रमक पवित्रा घेऊन राज्यविस्तार केला आणि बायझंटिनवर वर्चस्व प्रस्थापिले ईजिप्त पादाक्रांत करून कैरो येथे आपली राजधानी हलविली (९७३). या स्वारीत त्याचा सेनापती अल्-जवाहिर याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या कारकीर्दीत फातिमी सत्ता ईजिप्तपासून पूर्वेकडे मक्का व मदीना येथपर्यंत पसरली होती. पुढे पॅलेस्टाइन व सिरिया हे प्रदेशही त्याच्या अंमलाखाली आले.

अल्-हाकीम (कार. ९९६-१०२१) या खलीफाची कारकीर्द वगळता उरलेल्या खलीफांच्या राजवटीत वजीर व भाडोत्री सैन्य यांनी धुमाकूळ घातला. वजीर मध्यवर्ती सत्तेस जुमानीनासे झाले आणि भाडोत्री सैन्यातील शिस्त व लढाऊ वृत्ती कमी झाली. त्यामुळे अल्-हाकीमने मिळविलेले प्रदेश हळूहळू स्वतंत्र होऊ लागले व वजीरांची सत्ता दृढमूल झाली. शिवाय प्लेग, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे उर्वरित काळात खलीफांची सत्ता खिळखिळी झाली. अल्-हाकीमने मोसूल व आलेप्पो प्रदेशांवर आधिपत्य मिळविले पण तो क्रूर व लहरी होता. त्याने ज्यू व ख्रिस्ती लोकांची कत्तल करून जेरूसलेम येथील चर्च उद्ध्वस्त केले (१०१०). यामुळे त्याचा खून झाला.

अल्-जहीर (कार. १०२१-३६), अल्-मुस्तानसिर (कार. १०४६-९४) वगैरे खलिफा नामधारी होते. अस्थिर परिस्थितीला आळा घालण्यासाठी अल्-मुस्तानसिर या खलिफाने बद्र अल्-जमाली या वजीर-सेनापतीच्या हाती सर्व सूत्रे दिली. त्याने लष्करी अंमल जारी करून आपल्या घराण्यात वंशपरंपरागत सत्ता रहावी, अशी योजना आखली आणि खलीफाची निवड सर्वस्वी त्या घराण्यावर अवलंबून राहिली. या सुमारास फातिमी खिलाफतीचे वायव्य आफ्रिकेतील वर्चस्व संपुष्टात आले होते.

अल्-मुस्तानसिरनंतर इमामचा वैध वारस कोण, या मुद्यावर इस्माइली पंथात फूट पडली. ईजिप्तमध्ये अल्-मुस्ताली याने गादी बळकावली परंतु इराण आणि सिरिया येथील इस्माइलींनी अल्-मुस्तालीचा थोरला भाऊ अल्-निझार याचाच गादीवर खरा हक्क असल्याचे प्रतिपादिले. त्यामुळे अल्-मुस्ताली व अल्-निझार असे दोन गट पडले. यांतूनच ॲसॅसिन्सची नवीन इस्माइली चळवळ जन्मास आली [→ इस्माइली पंथ]. अंतर्गत बंडाळी व यादवी युद्ध यांमुळे फातिमी सत्ता दुर्बल झाली. ईजिप्तमध्ये सलाद्दीन याने ११७१ मध्ये फातिमी परंपरेतील अखेरच्या इमामाचा शेवट केला आणि आयुबी वंशाची स्थापना केली. तेव्हा या पंथाचा ईजिप्तमध्येही अंत झाला. पुढे येमेनमध्ये अल्-मुस्ताली पंथाची शाखा काही वर्षे टिकून होती. पुढे ती भारतात आली. भारतातील या शाखेचे अनुयायी बोहरा म्हणून ओळखले जातात.

ईजिप्तमध्ये सु. दोनशे वर्षे फातिमींचे राज्य होते. या कालखंडात इस्माइली पंथाची एक मजबूत संघटना निर्माण झाली. तिच्यातर्फे कुराणाचा रूपकात्मक अर्थ स्पष्ट करणे व शियांच्या धार्मिक आचार-विचारांचा सांकेतिक अर्थ इमामांना आणि कार्यकर्त्यांना विशद करणे, हे कार्य पार पडले. या काळात अनेक सुंदर वास्तू बांधल्या गेल्या. तसेच अलंकारिक कलेत विलक्षण प्रगती झाली. शब्र, कैरो यांसारख्या मोठ्या शहरांत खलीफांनी मशिदी, रस्ते, राजवाडे बांधून अनेक सुधारणा केल्या त्यांपैकी बगदाद येथील अल्-खइमच्या राजवाड्याचे अवशेष अजून अवशिष्ट आहेत कैरोत ⇨ अल्अझार हे इस्लामी संस्कृतीचे विद्यापीठ स्थापन झाले. अल्-जवाहिर ए-कातिब अल्-शिकील्ली या सेनापतीने येथे बांधलेली मशीद जगप्रसिद्ध आहे. याशिवाय अल्-हाकीम, अल्-जाफरी, सय्यिदा आतिक, अल्-हशवाती, शेख यूनुस वगैरे दर्गे प्रसिद्ध आहेत. बद्र अल्-जमाली या वजीराने आर्मेनियातून वास्तुविशारद आणून कैरोच्या सभोवती भिंत बांधली. तीवरील शिल्पांकनात ग्रेको-रोमन ज्ञापकांची छाप आढळते.

आर्थिक स्थैर्य व व्यापारवृद्धी या दृष्टीने हा काळ समृद्धीचा गेला. अल्-मुइझ्झने बगदाद येथे नौदलाची स्थापना केली. त्यामुळे साहजिकच ट्रिपोली, ॲलेक्झांड्रिया इ. बंदरांचे महत्त्व वाढले आणि राज्यविस्तार झाला. ईजिप्तचा व्यापार इटलीतील व्हेनिस, आमाल्फी इ. शहरांशी तसेच चीन, भारत इ. देशांशी तांबड्या समुद्रामार्गे सुरू झाला. त्यात प्रामुख्याने जडजवाहीर व कापड यांचा समावेश होता.

विद्वानांना खलीफांचा आश्रय होता. काही खलीफा कवी म्हणूनही प्रसिद्धी पावले. इस्माइली पंथातील तसेच इतर धर्मपंथांतील विद्वानांनाही राजाश्रय लाभला. इब्न झूलास, अल्-मुसब्बिही, अल्-कदाई, अल्-अझिझ यांसारखे ग्रंथकार व इतिहासकार इब्न हानी, अल्-इयादी, उमरा अल्-यमनी यांसारखे कवी अबू हातिम अल्-राजी, हमिद अल्-दीन-अल्-किर्मानी, इब्राहीम अल्-नीसाबूरी इ. तत्त्वज्ञ इब्न हयथम अल्-बश्री हे गणितज्ञ यूनुस अल्-शदफी यांसारखे शास्त्रज्ञ याच कालखंडात होऊन गेले. इराणी प्रवासी नासिर-इ-खुसरौ याने कैरो व अल्-फुस्टॅट येथील आर्थिक सुबत्तेचे वर्णन सफरनामा या आपल्या प्रवासवृत्तात केले आहे.

पहा : खिलाफत.

संदर्भ : 1. Hamdani. Abbas, The Fatimids, Karachi, 1962.

2. Holf P. M. &amp Others Ed. Cambridge History of Islam, Vol. I, Cambridge, 1971.

3. Lewis, B. Pellat, Ch. Schacht. J. Ed. The Encyclopaedia of Islam Vol. II, London, 1965.

4. Spuler, Bertold, The Muslim World, part I. Leiden, 1960.

शेख, रूक्साना