फाइनमन, रिचर्ड फिलिप्स : (११ मे १९१८- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९६५ सालचे भौतिकी या विषयातील नोबेल पारितोषिक फाइनमन यांना अमेरिकन भौतिकीविज्ञ ⇨ज्यूल्यॅन सीमॉर श्विंगर व जपानी भौतिकीविज्ञ ⇨ शिन–इचिरो टॉमॉनागा यांच्याबरोबर पुंज (क्वांटम) विद्युत् गतिकीतील [ विद्युत् चुंबकीय प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-आणि विद्युत् भारित द्रव्य, विशेषतः अणू व त्यांतील इलेक्ट्रॉन, यांतील परस्परक्रियांचे स्पष्टीकरण देणाऱ्या पुंज सिद्धांतातील, → पुंजयामिकी] त्यांच्या महत्वाच्या संशोधनाबद्दल विभागून देण्यात आले.
फाइनमन यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी बी. एस्. ही पदवी १९३९ मध्ये आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून १९४२ मध्ये पीएच्.डी. ही पदवी मिळवली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी लॉस ॲलॅमॉस येथे अणुबाँबविषयी महत्त्वाचे संशोधन केले. १९४५ मध्ये ते कॉर्नेल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे सहयोगी प्राध्यापक झाले. १९५० मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांची सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
पी.ए.एम्. डिरॅक, व्हेर्नर हायझेनबेर्क, व्होल्फगांग पाउली, एन्रीको फेर्मी इ. शास्त्रज्ञांनी १९२० नंतरच्या १०-१२ वर्षांत पुंज विद्युत् गतिकी या भौतिकीच्या शाखेची स्थापना केली. या शाखेत ⇨ सापेक्षता सिद्धांत व ⇨ पुंज सिद्धांत यांच्या आधारे विद्युत् भारित मूलकण व विद्युत् चुंबकीय क्षेत्रे यांच्यामधील परस्पक्रियांचा अभ्यास करण्यात येतो. गुणात्मक दृष्ट्या हे सिद्धांत या परस्परक्रियांची बरोबर वर्णने देऊ शकतात असे दिसून आले परंतु त्यावरून कोणतेही संख्यात्मक निष्कर्ष काढणे अशक्य होते. याचे कारण म्हणजे संबंधित समीकरणांतील काही पदे अनंत श्रेणीच्या स्वरूपात असतात आणि त्यामुळे या समीकरणांचे निर्वाह (उत्तरे) काढणे एक तर अशक्य होते किंवा काही निर्वाह काढता आलाच, तर त्यावरून काढलेले निष्कर्ष विसंगत येतात.
या अडचणीचे निराकरण करता आले नाही, पण ती टाळण्याची एक युक्ती फाइनमन यांनी काढली. त्यांनी असे दाखविले की, इलेक्ट्रॉन (व प्रोटॉनही) आपल्या स्वतःच्याच विद्युत् चुंबकीय क्षेत्राशी परस्परक्रिया करतो. त्यामुळे त्याचे वस्तुमान व विद्युत् भार यांसारख्या राशींत काहीसा फरक पडतो. हा फरक लक्षात घेऊन समीकरणे मांडली असता त्यांतील अनंताप्रत जाणाऱ्या पदांचे गणन न करताही समीकरणांचे आसन्न (अंदाजी) निर्वाह काढता येतात. हे निर्वाह प्रायोगिक मूल्यांशी चांगले जुळतात, असे दिसून आले आहे.
या पद्धतीतील साहाय्यक म्हणून त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘फाइनमन आकृती’ची त्यांनी कल्पना मांडली [→ पुंज क्षेत्र सिद्धांत ]. श्विंगर व टॉमॉनागा यांच्या पद्धतीपेक्षा फाइनमन यांची समीकरणे सोडविण्याची पद्धत जास्त सोपी व संक्षिप्त आहे.
फाइनमन यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य ⇨नीच तापमान भौतिकीच्या क्षेत्रातील आहे. अतिप्रवाही हीलियम (II) या द्रवाची गती फक्त अघूर्णनीच (भोवऱ्यासारखी नसलेलीच) असली पाहिजे असा सैद्धांतिक निष्कर्ष एल्. डी. लँडा या रशियन शास्त्रज्ञांनी काढला होता परंतु प्रत्यक्ष प्रयोगात असे दिसून आले की, या द्रवात घूर्णनी गती निर्माण करता येते. या विसंगतीची समाधानकारक सोडवणूक फाइनमन यांनी पुंजयामिकीच्या साहाय्याने केली. ‘बीटा कणांच्या उत्सर्जना’ बद्दलच्या [→ किरणोत्सर्ग] महत्वाच्या व प्रभावी सिद्धांताच्या संशोधनाबद्दल मरी गेल-मान यांच्या इतकेच श्रेय फाइनमन यांना दिले जाते.
नोबेल पारितोषिकाखेरीज १९५४ मध्ये ॲल्बर्ट आइन्स्टाइन पारितोषिकाचा बहुमान फाइनमन यांना मिळाला. त्याच वर्षी अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर त्यांची निवड झाली. अमेरिकेच्या अणुबाँब प्रकल्पाचे सदस्य म्हणून त्यांनी प्रिन्स्टन (१९४२-४३) व लॉस ॲलॅमॉस (१९४३-४५) येथे काम केले. अमेरिकन फिजिकल सोसायटी व अमेरिकन असोशिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थांचे सदस्य म्हणून तसेच लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशीय सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.
क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स (१९६१). थिअरी ऑफ फंडामेंटल प्रोसेसेस (१९६१), फाइनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स (तीन खंड, १९६३-६४) व ए. आर्. हिब्ज यांच्याबरोबर क्वांटम मेकॅनिक्स अँड पाथ इंटिग्रल्स (१९६६) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत.
पुरोहित, वा. ल. फाळके, धै. शं.
“