फरीगदगा : फरी व गदगा या ढालतलवारीसारख्या साधनांनी खेळावयाचा द्वंद्वात्मक खेळ. फरी म्हणजे कातड्याची केलेली ढाल. ती. सु. २३ सेंमी. (९ इंच) व्यासाची असून तिच्यात कापूस, बुरणूस, लोकर, काथ्या इ. भरणद्रव्य वापरलेले असते. हे बचावाचे साधन असते. गदगा किंवा दगका ही ९० सेंमी. (३ फूट) लांबीची चामड्याने मढवलेली वेताची वा वेळूची काठी असते. त्यास कातडी मूठ असते. या खेळास ‘वेत्र-चर्म’ असेही म्हणतात. खेळात जादा हालचालींना अनुकूल ठरणारा सुटसुटीत पेहराव, विशेषतः जाड जाकीट व कानशिले पूर्णपणे झाकली जातील अशी कानटोपी वापरण्याचा प्रघात आहे. हा खेळ सामान्यपणे ६X६ मी. (२०X२० फूट) चौरस किंवा गोल जागेत खेळला जातो. खेळाडूने एका हातात ढालीप्रमाणे फरी व दुसऱ्या हातात तलवारीप्रमाणे गदगा धरावयाचा गदग्याने प्रतिस्पर्ध्यावर वार करावयाचे व फरीने प्रतिस्पर्ध्याचे वार झेलावयाचे, अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो. घाई व छूट (सूट) हे या खेळाचे दोन प्रकार आहेत. खेळातील वेगवेगळे पवित्रे, मार, बचाव वगैरेंचा चांगला सराव व्हावा म्हणून एका पाठोपाठ एक येणारे साखळी अथवा ‘मिल्लत’ पद्धतीने बसविलेले ठराविक मार व बचाव यांच्या हालचालींचा एकेक धडा असतो आणि क्रमाक्रमाने कौशल्य वाढावे म्हणून असे प्रगतिपर धडे खेळाडूकडून घटवून घेतले जातात. ह्यास ‘घाई’ असे म्हणतात. ‘छूट’ हा प्रकार म्हणजे त्या पुढची अधिक कौशल्यपूर्ण अवस्था होय. त्यामध्ये पूर्वसंकेताने ठरलेल्या हालचाली-मार वा बचाव-नसतात. दोघेही खेळाडू एकमेकांवर संधी सापडेल त्याप्रमाणे अनिर्बंध, पण काही मूलभूत नियमांस धरून, मार व बचाव करीत असतात. घाईचे चांगले पूर्वशिक्षण व सराव झाल्यानंतरच छूटचा प्रकार खेळावयाचा असतो. खेळाचे सामने ह्याच पद्धतीने खेळले जातात. द्वंद्वांमध्ये वार करावयाच्या शरीरांच्या जागांवरून त्यांचे वेगवेगळे प्रकार मानले जातात. हे वार व त्यांच्याशी संबद्ध अवयव पुढीलप्रमाणे : ‘शिर’ (डोके), ‘तमाचा’ (डावे कानशील), ‘बाहेरा’ (उजवे कानशील), ‘मोढे’ (खांदे), ‘भंडारा’ (डावी बरगडी), ‘पोखर’ (उजवी बरगडी), ‘कडक’ (गुडघा) इत्यादी. खेळाडूने हे वार केल्यावर प्रतिस्पर्ध्याने बरोबर त्याच जागी फरी नेऊन ते अडवायचे असतात व त्याच वेळी योग्य त्या पवित्र्यात चढाईही करावयाची असते. यासाठी नजरेचेही विशिष्ट शिक्षण घ्यावे लागते. लढतीत हातकटीचे हात (वार) असाही एक प्रकार आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अमुक एक वार करण्याचे भासवून प्रत्यक्षात मात्र दुसराच वार करावयाचा. वार करणाऱ्याच्या नजरेवरून तो कोणता वार मारणार, हे कळून येते. म्हणून या प्रकारात नजरेवरही एक प्रकारे ताबा मिळवावा लागतो. या खेळाच्या अनेक पंरपरा आहेत. त्या हिंदू व मुसलमान वस्तादांच्या नावाने ओळखल्या जातात. उदा., रामसिंग वस्ताद यांची हनुमंती घाई किंवा बजरंगी लकडी मियाँ जानमियाँ यांची सुलतानी इत्यादी. प्रत्येक परंपरेत मूलतत्त्वे सारखीच तथापि शिकवणे व हालचाली यांत थोडाफार फरक आहे. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने १९३६ मध्ये या खेळाच्या सामन्यांचे नियम प्रथम केले आणि पुढे १९३८ पासून १९५० पर्यंत त्यांत सुधारणा करून, त्याच्या नवनव्या आवृत्त्या काढल्या. महाराष्ट्रातील जुन्या परंपरेच्या काही व्यायामशाळांतून हा खेळ अद्यापही शिकवला जातो तथापि त्याची आवड दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
संदर्भ : मुजुमदार, द. चिं. फरीगदका (लकडी), बडोदे, १९३२.
नातू, मो. ना.
“