फर – २ : लाक्षणिक अर्थाने सस्तन प्राण्यांच्या अंगावरील मऊ, दाट, तजेलदार केसांना ‘फर’ म्हणतात. तथापि व्यापारी जगतामध्ये फर देणाऱ्या प्राण्यांच्या केसाळ आवरणासह असलेल्या कातड्यांचा वस्त्रासाठी वापर केल्यास त्या कातड्यांना ‘फर’ म्हणतात. प्रस्तुत नोंदीमध्ये या अर्थानेच हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मात्र अशा कातड्यांबाबत पुढील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते : (१) अशी कातडी सस्तन प्राण्यांचीच असावीत व त्यांवरील केस पूर्णतः वा अंशतः तसेच ठेवलेले असावेत. उदा., खोकडांवरील केस तसेच ठेवतात, तर बीव्हरचे संरक्षक केस उपटतात. (२) अशा कातड्यांचा उपयोग वस्त्रांसाठीच झाला पाहिजे. फर्निचरसाठी वा भिंतींवर लावण्यासाठी वापरल्यास त्यांना फर म्हणत नाहीत. (३) फर उद्योगाने अशा कातड्यांच्या वस्त्रांना व्यापारी वस्तू म्हणून मान्यता दिलेली असली पाहिजे. उदा., लहान घोड्यांच्या (शिंगरांच्या) कातड्यांचे कपडे केल्यास त्यांना फरची वस्त्रे म्हणतात पण त्याच कातड्यांपासून जाकिटे तयार केल्यास त्यांना मात्र फरची वस्त्रे म्हणत नाहीत.

सुरुवातीला फरचा उपयोग थंड प्रदेशांत ऊब आणण्यासाठी करीत असत. पुढे पुढे तिचा वापर तीव्र हवामानापासून शरीराचे संरक्षण करणारी, शरीराला ऊब आणणारी व सुशोभित करणारी वस्तू म्हणून करण्यात येऊ लागला. थंड हवामानाच्या प्रदेशांतील देशांत स्थानिक स्वरूपाची फर तयार करण्यात येते. तथापि सु. २४ देशच फरचा व्यापार करतात अर्जेंटिना, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, ग्रीस, जर्मनी, हाँगकाँग, इझ्राएल, इटली, जपान, लक्सेंबर्ग, मेक्सिको, द. आफ्रिका, रशिया, स्पेन, स्वित्झर्लंड, यूरग्वाय, ग्रेट ब्रिटन, अमेरिका इ. देश फरची निर्मिती, आयात व निर्यात करतात.

विविध नैसर्गिक व कृत्रिम तंतूंपासून फरसदृश (बनावट फरचे) कपडे तयार करतात. अशा फरना विविध रंगांच्या  छटा आणता येतात. कापसाच्या वा कापूसमिश्रित तंतूंचा वापर मागील अस्तरांसाठी करतात.

फर देणारे प्राणी : तीन प्रकारच्या प्राण्यांपासून फर मिळवितात. (१) रानटी प्राणी, (२) क्षेत्र पैदासीने वाढविलेले प्राणी व (३) पाळीव प्राणी. (१) रानटी प्राणी : या प्रकारच्या प्राण्यांच्या सर्वांगावर दोन प्रकारांचे केस असतात. अधःस्थ केस व संरक्षक केस. संरक्षक केस लांब, ठिसूळ व राठ असून त्यांना चकाकी असते. या केसांवरून पाणी व पाऊस सहज निथळतो. अधःस्थ केस संरक्षक केसांपेक्षा कमी लांबीचे, रेशमासारखे व लवदार असून त्यांना चकाकी नसते किंवा असल्यास थोडीशीच असते. ह्या केसांमुळेच प्राण्याच्या शरीराचे तापमान सु. ३३° से. इतके कायम राखले जाते. अधःस्थ केसांनाच फर म्हणतात. तिला अंडरफर, अंडरहेअर, डाऊनहेअर फर, ग्राउंड हेअर इ. नावांनीही संबोधिण्यात येते. (२) क्षेत्र पैदासीने वाढविलेले प्राणी : मिंक, खोकडाच्या विविध जाती (सिल्व्हर, प्लॅटिनम, ब्ल्यू, पांढरा, लाल इ. ), चिंचिल्ला, मस्करॅट (कस्तुरी घूस), ससा  इ. प्राण्यांची फरसाठी पैदास करण्यात येते. यांना अधःस्थ केस व संरक्षक केस असतात. (३) पाळीव प्राणी : या प्राण्यांना लोकर व संरक्षक केस असतात. लोकरयुक्त प्राण्यांपैकी मेंढी व ग्वानाको यांच्या पिलांचा तर केसयुक्त प्राण्यांपैकी शेळी, घोडा व गाई यांच्या नवजातांचा उपयोग फरसाठी करतात. फर उद्योगात एकूण ८४ निरनिराळ्या जातींच्या व २५ उपजातींच्या प्राण्यांचा उपयोग करतात.

भौगोलिक दृष्ट्या पुढील प्राणी फरसाठी उपयोगात आणले जातात. (१) उत्तर अमेरिका : मस्करॅट, बीव्हर, स्कंक, रॅकून, ऑपॉस्सम, मिंक यांचा मोठ्या प्रमाणात तर लिंक्स, अमेरिकन बिजू, लिंक्स मांजर, मार्टेन, फिशर, विविध प्रकारचे खोकड (निळे, पांढरे, संकरित, तपकिरी, सिल्व्हर, प्लॅटिनम, लाल), बासारिस्कस, फर व हेअर सील, खार, विझल, लांडगा, वुव्हरीन यांचा अल्प प्रमाणात उपयोग करतात. नियंत्रित परिस्थितीत उत्परिवर्तनाने (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणाऱ्या आकस्मिक बदलांनी) निर्माण झालेल्या खोकडाच्या प्लॅटिनम, सिल्व्हर इ. प्रकारांची, तसेच मिंकची पैदास करतात. सशांची पैदास प्रामुख्याने मांसासाठी करतात व फर हे सशांबाबात उपउत्पादन ठरते. (२) यूरोप : उत्तरेकडील भागात पांढरा व लाल खोकड, लांडगा, वीझल, मस्करॅट तर दक्षिणेकडील भागात लाल खोकड, बाऊम मार्टेन, स्टोन मार्टेन व मार्मोट यांची पैदास करण्यात येते. बेल्जियम, लक्सेंबर्ग आणि नेदर्लंड्स येथे मोठ्या प्रमाणावर सशांची पैदास करण्यात येते. (३) आशिया : लाल खोकड, पांढरा खोकड, निळा खोकड, खार, बाऊम व टॅप मार्टेन, फिच मार्मोट, पर्शियन व काराकुल मेंढी, काराकुल करडू कमी प्रमाणात ऊद मांजर, आशियाई रॅकून, सेबल, उडणारी खार, एरमाईन, लिंक्स, लेपर्ड, चित्ता, वाघ, कोल्हा, हरीण, भारतीय शेळी, फर सील, लांडगा. (४) ऑस्ट्रेलिया : मोठ्या प्रमाणावर रानटी ससे, कमी प्रमाणात वॉलबी, ऑस्ट्रेलियन ऑपॉस्सम व त्याच्या उपजाती. (५) आफ्रिका : लाल खोकडाचे प्रकार, लेपर्ड, लिंक्स, माकडे, फर सील. (६) दक्षिण अमेरिका : अमेरिकन ऑपॉस्सम, करडा खोकड, ठिपकेदार मांजर, ऑसेलॉट, ग्वानक्विटो, कुरळ्या केसाचे संकरित कोकरू, चिंचिल्ला व त्याच्या उपजाती.

फर केसांची संरचना : प्राण्यांच्या अंगावरील केसांमध्ये त्यांचे कुल व उपकुल यांनुसार विविधता आढळून येते. या केसांच्या सखोल अभ्यासावरून निरनिराळ्या गटांमधील केसांतील फरक निश्चितपणे जाणणे शक्य झाले आहे. इतकेच काय पण कातड्यापासून अलग केलेले केस कोणत्या प्राण्याचे असावेत, हे सांगणे शक्य आहे आणि याचा उपयोग गुन्हा शोधण्याच्या कामी न्यायवैद्यकामध्ये करतात. स्तनी प्राण्यांच्या जातीनुसार केसांचे अनेक प्रकार आढळून येतात. डॅनफोर्थ यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार त्यांचे दोन प्रमुख वर्ग मानले जातात. पहिल्या वर्गामध्ये मोठ्या, ताठर, अतिशय संवेदनक्षम केसांचा अंतर्भाव करतात. या केसांच्या पुटक-कंदामध्ये [⟶ केस] उत्थानक्षम ऊतक (समान कार्य आणि रचना असलेला पेशींचा समूह) असते. स्पर्श रोम, दृढ रोम यांसारखे कार्य करणारे केस या वर्गात मोडतात. यातील काही स्पर्शग्राही केसांमध्ये ऐच्छिक स्नायू, तर काहींमध्ये अनैच्छिक स्नायू असतात. तसेच काहींच्या मुळाशी गोलाकार कोटरे असतात, तर काहींमध्ये ती असत नाहीत. मनुष्याशिवाय इतर स्तनी प्राण्यांमध्ये या वर्गातील केस आढळतात. असे केस बहुधा प्राण्यांच्या ओठाभोवती (मिशा ) असतात.

दुसऱ्या वर्गांमध्ये उरलेल्या सर्व केसांच्या प्रकारांचा समावेश आहे. या वर्गातील केसांच्या पुटक-कंदामध्ये उत्थानक्षम ऊतक असत नाही. यांचे कार्य संरक्षण व प्रतिरक्षणात्मक आहे. यांतील काही प्रकारच्या केसांना तंत्रिका तंतूंचा (मज्जातंतूंचा) भरपूर पुरवठा असतो. शरीरावरणातील लांब, जाड, राठ केसांचा तसेच त्वचेलगत असणाऱ्या मऊ बारीक लव केसांचा यांत समावेश होतो. यांचे आकार व दृढता यांनुसार : (अ) जाड, ताठर, टोकदार साळीच्या अंगावरील शलली (साळीची पिसे), डुकराच्या पाठीवरील ताठर जाड केस, आयाळीचे केस व (आ) त्वचेलगत उगवणारे दाट आखूड अथवा लांब, बारीक, मऊ, लोकर, फर इ. असे दोन उपवर्ग पडतात.

वरील वर्गीकरणानुसार फर उद्योगात उपयोगात आणल्या जाणाऱ्या प्राण्यांचे केस दुसऱ्या वर्गात मोडतात. सर्वसाधारणपणे या प्राण्यांना संरक्षक, लांब, जाड, वरून दिसणारे केस (गार्ड हेअर) व त्वचेलगत मऊ, दाट, लवसदृश तांत्रिक दृष्ट्या अधःस्थ केस (फर तंतू) असे दोन प्रकारचे केस असतात. या दोन्ही प्रकारचे केस तर्कूच्या आकाराचे (दोन्ही बाजूंना निमुळते) असतात. मुळाकडील आणि टोकाकडील तृतीयांश भागापेक्षा मधला भाग जाडसर असतो आणि यावरूनच केसांच्या प्रकारातील फरक ओळखता येतो.


केस केराटिनाचा (तंतुमय प्रथिनाचा) बनलेला असतो. सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण केल्यास मध्यभागी मध्यक (गाभा), त्याबाहेरील बाह्यक व अगदी वरचे खवल्यासारखे उपत्वचेचे आवरण असे घटक गुणविशेष दिसून येतात. बाह्यकापासून विस्तारण झालेल्या कोशिका समूहांचे (पेशींच्या समूहांचे) मध्यक बनलेले असतात. यातील कोशिका समूहामधील पोकळ्यांमध्ये हवेचे बुडबुडे असतात. या पोकळ्यांचे आकार निरनिराळ्या प्राण्यांमध्ये निरनिराळे असतात. बाह्यक हे केसाचे आवरण आहे. या आवरणाची बाहेरच्या बाजूस खवल्यासारखी वाढ होऊन केसाची उपत्वचा बनते. उपत्वचेतील खवल्यांचे आकार मुकुटाप्रमाणे किंवा परिहित (घराच्या छपरावरील कौलांप्रमाणे एकमेकांवर आलेले) असतात. अधःस्थ केसांमधील खवले परिहित असतात व त्यांची टोके बाह्यकापासून बाजूस गेलेली उचलल्यासारखी असल्यामुळे दोन तंतू एकमेकांत अडकतात.

संरक्षक केस चमकदार असतात याचे कारण त्यांच्या उपत्वचेतील खवले बाह्यकालगत असतात त्यामुळे प्रकाशकिरण परावर्तित होण्याला सलग पृष्ठभाग उपलब्ध असतो. याउलट अधःस्थ केसांचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे त्यावरील प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे) झाल्यामुळे ते चकाकत नाहीत. काही प्राण्यांच्या केसांच्या मध्यकातील कोशिकांची रचना संलग्न असते, तर काहींमध्ये ती खंडित (तुटलेली) असते, तर आणखी काही प्राण्यांत ती विखंडित (तुकड्या तुकड्यांची) असते. लोकरीच्या तंतूमध्ये ही रचना खंडित व विखंडित असते. उपत्वचेतील खवल्यांच्या कडा प्राणिजातीनुसार तीक्ष्ण, गुळगुळीत किंवा दंतुर असतात. फर केसातील मध्यकाची रचना मोडल्यामुळे काही वेळा त्यांची टोके वाकतात व चपटी होतात.

जलवायुमानाचा परिणाम : फरची गुणवत्ता आणि पोत यांवर जलवायुमानाचा (दीर्घकालीन सरासरी हवामानाचा) परिणाम होतो. थंड जलवायुमानात अधःस्थ केस दाट उगवतात. थंड प्रदेशातील प्राण्यांच्या केसांची लांबी ही हिवाळा सौम्य व कमी काळ असलेल्या प्रदेशातील त्याच प्रकारच्या प्राण्यांच्या केसांच्या लांबीपेक्षा जास्त असते. सौम्य हिवाळा असलेल्या प्रदेशातील प्राण्यांच्या अधःस्थ केसांची वाढ मर्यादित असते पण संरक्षक केस लांब असतात. वर्षभर या प्रदेशात आर्द्रता जास्त असल्यास ते ठिसूळ होतात. पर्वतावरील व पठारावरील प्राण्यांच्या फरची गुणवत्ता ही अती उत्तरेकडील फरसारखी असते. कारण कमी तापमान, कोरडी व विरल हवा ह्या गोष्टी दोन्ही ठिकाणी सारख्याच असतात. उष्ण कटिबंधातील प्राण्यांना अधःस्थ केस कमी प्रमाणात असतात पण ही फर दिखाऊपणाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. उदा., लेपर्ड, ऑसेलॉट, ठिपकेदार मांजरे इत्यादी.

जलवायुमानाचा आणखी एक परिणाम फर व केस यांच्या रंगांवर होतो. केसाच्या बाह्यकात व मध्यकात असणाऱ्या रंगद्रव्य कणांच्या विविध संहतींमुळे (प्रमाणांमुळे) केसांना निरनिराळ्या रंगछटा येतात. हे रंगद्रव्य कण विविध आकारांचे व आकारमानांचे असून त्यांना फिकट पिवळा-तपकिरी-निळसर-करडा यांमधील कोणती तरी एक छटा असते. रंगद्रव्य कणांचे आकारमान व संहती तो प्राणी कोणते अन्न खातो यावर अवलंबून असते. यांशिवाय बऱ्याच स्थानिक भूभौतिकीय कारणांचाही केसाच्या रंगद्रव्य कणांवर परिणाम होतो. यामुळे केसाचा छेद घेऊन त्याची तपासणी करून फरतज्ञ तो केस कोणत्या भागातील कोणत्या प्राण्याचा आहे, हे सहज ओळखतो. उदा., उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागातील जमीन कार्बन-समृद्ध असल्याने प्राण्यांच्या केसांचा रंग निळसर-तपकिरी झाला, तर पश्चिम किनाऱ्यानजीकची जमीन लालसर असल्याने तेथील प्राण्यांचे केस नारिंगी वा फिकट पिवळे होतात तर चीन-जपानमध्ये जमीन पिवळ्या रंगाची असल्याने केसांचा रंग पिवळा वा पिवळट तपकिरी असतो. आर्द्र हवेमुळे रंगद्रव्य कणांची केसांतील संहती वाढते म्हणून केसांचे रंग गडद बनतात, तर कोरड्या हवेमुळे केसांतील रंगद्रव्य कणांची संहती कमी असल्याने तेथील प्राण्यांच्या केसांचा रंग फिकट वा पांढरा असतो.

मानवी शरीराच्या चेहऱ्याभोवतीच्या, तसेच हातांभोवतीच्या भागांवरील फरवस्त्रांमध्ये शरीरातील घाम शोषला जातो. हा घाम नीच तापमानाला (सु.- ६०° ते ७०° से.ला) बहुतेक सर्व प्राण्यांच्या फरमध्ये गोठला जाऊन फरचा तो भाग कठीण होतो. याला अपवाद फक्त वुल्व्हरीन फरचा आहे. या प्राण्याच्या फरमध्ये शोषलेले पाणी गोठत नाही. हा गुणधर्म एस्किमो लोकांना पूर्वीपासून माहीत आहे. हल्ली त्याचा उपयोग हवाई कर्मचाऱ्यांच्या वस्त्रांसाठी करण्यात येतो.

ऋतुबदलाचा परिणाम : ऋतुमानानुसार बदलणाऱ्या हवामानाचा फरच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. ऋतुबदलानुसार प्राण्यांच्या केसाळ आवरणात बदलत्या हवामानात प्राणी टिकू शकेल असा बदल होतो. ह्यामध्ये वसंत ऋतूत अधःस्थ केस गळतात व संरक्षक केसांची वाढ होते. वसंत ऋतूत पडणाऱ्या पावसापासून संरक्षक केसांमुळे प्राण्यांचे संरक्षण होते. समशीतोष्ण कटिबंधातील प्राण्यांच्या केसांत तेथील चार ऋतूंप्रमाणे बदल होत असतात. हे ऋतुमानाच्या बदलाच्या परिणामाचे चांगले उदाहरण होय. ध्रुवीय प्रदेशात हिवाळा फार काळ असल्याने प्राण्याच्या शरीरावरील अधःस्थ केस बराच काळ तसेच राहतात, तर अल्प काळ असणाऱ्या उन्हाळ्यात ते जलद गळतात. उपोष्ण कटिबंधातील तापमानात अल्प फरक पडत असल्याने अधःस्थ केस तुरळक वाढतात, तर संरक्षक केस जास्त वाढतात.

ऋतुमानानुसार बदलत्या हवामानाचा परिणाम फर कातड्यावरही होतो. हा परिणाम कातड्याच्या जाडीवर व पोतावर होतो. बदलत्या ऋतूप्रमाणे त्यांत फरक पडतो. शरद ऋतूत कातडी फार पातळ असते व तिच्यात तपकिरी-करडे रंगद्रव्य कणांचे आधिक्य असते. हिवाळ्याच्या मध्यापर्यंत रंगद्रव्य कण हळूहळू नाहीसे होऊन कातडी तपकिरी-करडी रंगविरहित होते. कच्च्या कातड्यावर प्रक्रिया करून फर कातडे तयार करताना कातड्यातून केस निघून जाऊ शकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. वसंत व ग्रीष्म ह्या ऋतूंत अधःस्थ केस गळून गेल्यानंतर लगेच त्यांची वाढ सुरू होते आणि शरद ऋतूत त्यांची वाढ अल्प झालेली असते व पोत कमी दर्जाचा असतो. उन्हाळ्यात बरेच संरक्षक केस गळतात व शरद ऋतूमध्ये वाढलेले संरक्षक केस अपुऱ्या वाढीचे असतात. अशा फरची गुणवत्ता दुसऱ्या व तिसऱ्या प्रतीची असते.

हिवाळ्याच्या शेवटी मिळविलेली फर ही उच्च प्रतीची असते. या फरमध्ये अधःस्थ केस व संरक्षक केस योग्य रीतीने व पूर्ण वाढलेले असतात कातडी योग्य व विकसित झालेली असतात. तिच्यात एक प्रकारचा आकर्षकपणा येतो. अशा फरला जास्त किंमत येते व तिला ‘प्राइम’ असे म्हणतात. हिवाळा संपल्यानंतर मिळालेल्या फरची कातडी जाड झालेली असते व तिच्यावर प्रक्रिया केल्यावर ती अधिक जाड व आकारहीन व बोजड होते. याच वेळी अधःस्थ केस गळण्यास सुरुवात होते व लांब संरक्षक केस कातडीवर सपाट बसतात. यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या प्रतींची फर मिळते. वसंत ऋतूच्या सुरुवातीनंतर प्राणी पकडण्यास कायद्याने बंदी घातल्याने चौथ्या प्रतीची फर बाजारात येत नाही. तथापि अमेरिकेशिवाय इतरत्र आजारी प्राण्यांची फर बाजारात येते ती मात्र चौथ्या प्रतीची असते. याला अपवाद म्हणजे वसंत ऋतूत पाणी अती थंड असल्याने बीव्हर, न्यूट्रिया, मस्करॅट या जलचर कृंतकांच्या (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) फरवर अधःस्थ केसांचा दाट थर असतो. मार्मोटासारख्या शीतनिष्क्रिय (हिवाळ्यात सुप्तावस्थेत जाणाऱ्या) प्राण्याची फर तो शीतनिष्क्रियतेत जाण्याआधी परिपूर्ण असते.


खुरी प्राण्यांच्या फरची प्रतवारी वर वर्णन केल्याप्रमाणे करीत नाहीत. या प्राण्यांच्या शरीरावर जातीनुसार लोकर वा केस असतात. फर उद्योगाच्या दृष्टीने त्यांच्या देखणेपणामुळेच त्यांच्य फरला किंमत येते. वसंत ऋतूच्या अखेरीस जन्मलेल्या प्राण्यांना जन्मानंतर आठ-दहा दिवसांत मारून फर मिळवितात. काराकुल कोकरू व करडू यांच्या फरची प्रत ही त्यांवर असणाऱ्या केसांच्या सपाट राहण्याच्या गुणावर अवलंबून असते. म्वारा प्रकारची फर ही उत्कृष्ट असते. शिंगरांच्या फरसाठीही हीच पद्धत वापरतात. पर्शियन कोकराचे केस आखूड, पन्हळीसारखे पण घट्ट कुरळे असल्यास ती फर उत्कृष्ट समजली जाते. याला अपवाद म्हणजे रुंद शेपटीचे पर्शियन कोकरू. याचे कुरळे केस सपाट असतात.

व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या फरच्या प्रकारांची माहिती पुढील कोष्टकात दिलेली आहे.

फरचे काही महत्त्वाचे प्रकार व त्यांचे गुणधर्म 

प्राणी 

गुणधर्म 

एरमाइन 

रंग बहुधा पांढरा काही जातींत उन्हाळ्यात केस काळवंडतात कमी वजनाची फर दाट व आखूड रंजनक्रियेने तपकिरी करतात वा विरंजन करतात वापरण्यास उत्तम मौल्यवान (चैनीची ) फर रशियन एरमाइनास दाट फर केस असल्याने जास्त किंमतवान.

खोकड 

अनेक प्रकार रंग नारिंगी करडा ते रुपेरी व शुभ्र मऊ, दाट व मुलायम असे अधःस्थ केस संरक्षक केस लांब वापरण्यास मध्यम रंजनक्रिया व विरंजनक्रिया करतात. 

चिंचिल्ला

तलम, मुलायम, चकचकीत, निळसर-करड्या रंगाची फर अधःस्थ केस आखूड ते मध्यम लांबीचे कमी वजनाची व नाजूक पण मौल्यवान फर वापरण्यास  मध्यम.

न्यूट्रिया

अधःस्थ केस आखूड, दाट, गडद निळसर तपकिरी, मऊ व चकचकीत संरक्षक केस कडक असून उपटता येतात वापरण्यास मध्यम रंजनक्रिया करतात.

पर्शियन कोकरू

नवजात कोकराची फर चमकदार व घट्ट कुरळी रंग तपकिरी, करडा वा काळा सर्वत्र सारखा रंग येण्यासाठी रंजनक्रिया करतात  वापरण्यास मध्यम.

बीव्हर

रंग चमकदार काळा ते गडद तपकिरी अधःस्थ केस दाट, रेशमासारखे व मध्यम लांबीचे संरक्षक केस खडबडीत असून ते काढून टाकतात वजनास मध्यम वापरण्यास उत्तम रंजनक्रिया करून विविध छटा आणतात विरंजनही करतात.

भारतीय कोकरू

कुरळे व चमकदार पांढरे, करडे वा काळे केस क्वचित रंजनक्रिया करून फिकट तपकिरी ते तपकिरी छटा आणतात वजनाला हलकी.

मस्करॅट

अधःस्थ केस मऊ, दाट व करडे संरक्षक केस लांब, चमकदार, कडक व  गडद तपकिरी वापरण्यास उत्तम  वजनाला मध्यम विरंजन, रंजन, केस उपटणे वा कापणे या क्रिया करतात.

मार्टेन (बाऊम)

रंग पिवळट तपकिरी रंजनक्रियेने क्वचित गडद तपकिरी छटा आणतात फर दाट  वापरण्यास उत्तम.

मिंक

रंग  गडद ते लालसर तपकिरी बऱ्याच उत्परिवर्ती छटा आढळतात अधःस्थ केस दाट, आखूड व उत्कृष्ट संरक्षक केस चमकदार वापरण्यास उत्तम वजनाला हलकी मौल्यवान फर  रंजनक्रिया  व विरंजनक्रिया करतात.

मूटॉन कोकरू

करडसर पांढरा, तपकिरी वा काळा रंग लहान ते मध्यम लांबीचे केस  वापरण्यास उत्तम केस कापतात व रंजनक्रिया करतात पावसाने केस कुरळे होऊ न देण्याची विशिष्ट प्रक्रिया करतात.

रॅकून

रंग करडा ते काळा, क्वचित लाल निळी छटा लांब फर वापरण्यास उत्तम केस कापतात रंजनक्रिया करतात.

लेपर्ड

संरक्षक केस आखूड सपाट व रेशमी गडद पिवळा वा पिवळट तपकिरी रंग व त्यावर काळे वा गडद तपकिरी ठिपके वापरण्यास उत्तम.

ससा

पांढरी, करडी, तपकिरी, फिकट पिवळट, तपकिरी काळी वा ठिपकेदार फर केस उपटतात व कापतात व रंजनक्रियेने इतर फरसारखी दिसेल अशी करतात वा नवीन रंगछटा आणतात केस आखूड ते मध्यम वापरण्यास उत्तम.

सील (अलास्कन फर)

केस आखूड, मऊ असून उपटता येतात रंजनक्रियेने काळी वा तपकिरी छटा आणता येते, केसांची टोके काळी करतात वापरण्यास उत्तम.  

सेबल

रंग निळसर काळा वा तपकिरी अधःस्थ केस दाट संरक्षक केस लांब रेशमी व चमकदार वापरण्यास उत्तम वजनास मध्यम  केस उपटता येतात  रंजनक्रिया करतात मौल्यवान फर अत्युत्कृष्ट फरला ‘क्राउन सेबल’ असे म्हणतात.

पैदास : फर देणारे वन्य प्राणी पकडून लहान प्रमाणावर त्यांच्यापासून प्रजोत्पत्ती करून त्यांची केसाळ कातडी मिळविणे हा धंदा पुरातन काळापासून केला जात असे. चीनमध्ये कुत्री व शेळ्या फरसाठी कित्येक शतकांपासून पाळली जात असत. त्यांचे मांस खाण्यासाठी वापरले जाई व केसाळ कातडी फर म्हणून उपयोगात आणीत. मेंढी या प्राण्याची गणना जर फर देणाऱ्या प्राण्यांमध्ये केली, तर इतिहासपूर्व काळापासून फर देणारे प्राणी पाळून त्यांचे प्रजनन चालू होते असे म्हटले पाहिजे. असे असले, तरी हे प्राणी व्यापारी प्रमाणावर पाळून त्यांचे संगोपन व प्रजनन करणे ही अगदी अलीकडील घटना आहे, असे दिसून येते. 


चार्लस् डाल्टन व रॉबर्ट टी. ओल्टन यांनी कॅनडामध्ये १८८७ मध्ये खोकड पाळून त्यांचे प्रजनन प्रथम सुरू केले. या दोघांना फर देणाऱ्या प्राण्यांचे आद्य प्रजननकार समजतात. इतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच त्यांनी हे प्राणी पाळावयास सुरुवात केली परंतु या प्राण्यांच्या जीवनपद्धतीविषयी, त्यांचे खाणे-पिणे, व्यवस्थापन, प्रजनन इत्यादींविषयी फारशी माहिती नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. अशी माहिती मिळविण्याच्या दृष्टीने कॅनडामधील सिल्व्हर फॉक्स ब्रीडर्स ॲसोसिएशनच्या सहकार्याने कॅनडाच्या शासनाने १९२० मध्ये प्रिन्स एडवर्ड बेटावर समरसाइड येथे पहिले संशोधन केंद्र स्थापन केले. अमेरिकेमध्ये सॅराटोगा स्प्रिंग्ज येथे १९२३ मध्ये असेच एक  केंद्र स्थापन झाले. हे केंद्र पुढे इथाका येथे हालविण्यात आले व त्यात कॉर्नेल विद्यापीठाला सहभागी करून घेण्यात आले. तद्वतच विस्कॉन्सिन, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, वॉशिंग्टन इ. काही विद्यापीठांनीही १९४० पासून या केंद्राशी सहकार्य केले. तसेच पुलमन बॉश येथील संशोधन केंद्रात या प्राण्यांच्या रोगराईबद्दल संशोधन सुरू झाले.

स्वीडन, नॉर्वे व डेन्मार्क या देशांच्या अर्थशास्त्रामध्ये फर देणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व जाणून तेथेही या प्राण्यांच्या प्रजननाबाबत संशोधन सुरू झाले व तेथे निळ्या खोकडांचे पालन व प्रजनन यशस्वीपणे करण्यात आले. अमेरिकेच्या मेरीलँड या राज्यामध्ये बेल्टस्‌व्हिल येथील प्रयोगशाळेत फर तंतूंची उत्पत्ती, वाढ व त्यातील इष्ट सुधारणा यांबाबत संशोधन होऊ लागले. चंदेरी खोकडाच्या (सिल्व्हर फॉक्सच्या) व्यतिरिक्त मार्टेन, फिशर, स्कंक, रॅकून, बीव्हर इ. प्राणी पाळून त्यांचे प्रजनन करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते पण आनुवंशिक गुणधर्म, व्यवस्थापन व प्रजनन यांबाबतच्या अपुऱ्या माहितीमुळे ते निष्फळ ठरले. मात्र वर उल्लेखिलेल्या सर्व संशोधन कार्यांमुळे खोकड, मिंक, चिंचिल्ला या प्राण्यांविषयी बरीच शास्त्रीय माहिती उपलब्ध झाली व त्यांचे प्रजनन यशस्वीपणे करण्यात येऊ लागले. सुरुवातीला अशा प्रजनन केंद्रांमध्ये वाढविण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या फरचा दर्जा त्याच जातीच्या वन्य प्राण्यापासून मिळणाऱ्या फरपेक्षा निकृष्ट असे परंतु त्यांचे खाणे-पिणे, व्यवस्थापन इ. बाबतींत इष्ट ते बदल घडवून आणल्यामुळे त्यांच्यापासून उत्कृष्ट दर्जाची फर मिळू लागली. या प्रजनन केंद्रांचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वन्य अवस्थेमध्ये क्वचितच घडून येणारे उत्परिवर्तन अशा केंद्रांमध्ये करण्यात येणाऱ्या नियंत्रित संयोगामुळे घडवून आणल्याने निरनिराळ्या रंगांचे खोकड, मिंक इ. प्राण्यांचे वाण उपलब्ध झाले.

चंदेरी खोकड : वन्य अवस्थेमधील खोकड बऱ्याच अंशी काळे असतात. आनुवंशिकी शास्त्राप्रमाणे त्यांचा काळा रंग हा एका अप्रभावी जीनावर (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे गुणसूत्रांच्या एककावर) अवलंबून आहे. वन्य खोकडांना पकडून त्यांचे निवड पद्धतीने प्रजनन करून चंदेरी खोकडांची जात तयार करण्यात आली. वस्तुतः चंदेरी खोकड हा प्राणी तांबड्या रंगाच्या खोकडांच्या प्रजोत्पत्तीमधील एका उत्परिवर्तनाने निपजलेला प्राणी आहे. या प्राण्याच्या संरक्षक केसांवर असलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे त्याला चंदेरी छटा दिसते. निवड पद्धत अंतःप्रजनन (निकट संबंध अथवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या लैंगिक संबंधापासून होणारे प्रजनन), बाह्यवर्ती संयोग इ. प्रजनन पद्धतींचा सतत २० वर्षे अवलंब करून हे पांढरे पट्टे चांगलेच रुंद होत गेले व चमकदार चंदेरी रंगाच्या खोकडांची पैदास झाली. कॅनडामधील प्रिन्स एडवर्ड बेटावर १८९४ मध्ये प्रथमतः चंदेरी खोकडांचे प्रजनन सुरू झाले व यासंबंधात प्रथमतः बरीच गुप्तता पाळण्यात येत असे. लंडनच्या बाजारात चंदेरी खोकडाच्या एका कातड्याची ५८० पौंड किंमत आली आणी लोकांचे व प्रजननकारांचे या प्राण्याकडे लक्ष गेले. या खोकडांच्या एका प्रजननक्षम जोडीला १९१० मध्ये ३,००० डॉलर पडत. हीच किंमत १९१३ मध्ये ३५,००० डॉलर इतकी वाढली. अमेरिकेमध्ये १९३९ साली चंदेरी खोकडांच्या साडेतीन लाख कातड्यांचे उत्पादन झाले. याच वर्षी कॅनडामध्ये २,३०,००० कातड्यांचे उत्पादन झाले. १९४० नंतर खोकडाच्या कातड्यांच्या उत्पादनात घट होत गेली याचे कारण लोकांना मिंक प्राण्याची फर अधिक आवडू लागली. तरीसुद्धा मानेभोवती काळा रंग किंवा गळ्याभोवती, मानेभोवती, चेहऱ्यावर पांढरे मोठे ठिपके असलेल्या चंदेरी खोकडांच्या कातड्यांना वेळोवेळी मागणी येत असे. या खोकडांची निवड पद्धतीने पैदास करीत असताना उत्परिवर्तनाने फिकट निळसर करड्या रंगाचे खोकड निपजत. यांना प्लॅटिनम किंवा प्लॅटिना खोकड म्हणतात. या खोकडांची फर मऊ, तेजस्वी निळसर चमकदार रंगाची व नाजूक असल्यामुळे अतिशय लोकप्रिय झाली. सुरुवातीला एका प्लॅटिनम खोकडाच्या फरची किंमत १३,००० डॉलर एवढी आली. १९४० च्या सुमारास प्लॅटिनम खोकडांची पैदास बरीच वाढली होती.

सुरुवातीस खोकडाच्या एका नराचा एकाच मादीशी संयोग करीत पण अलीकडे दोन माद्यांशी त्याचा संयोग करतात. गर्भावधी काल ४९ ते ५५ दिवसांचा असतो. वर्षामध्ये एकच पिलावळ मिळते व पिलावळीत सरासरीने ४ पिले असतात. पिले आठ आठवड्यांची झाल्यावर त्यांना तोडतात (आईचे दूध बंद करतात). घोड्याचे व इतर जनावरांचे मांस २० ते ५०% व बाकी धान्य, भाजीपाला असे खाद्य खोकडांना देतात. सामान्यतः एका खोकडाला रोज अर्धा किग्रॅ. खाद्य लागते.

निळा खोकड : (ब्ल्यू फॉक्स). नॉर्वे या देशात या जातीच्या खोकडांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. या जातीच्या खोकडांची पैदास करण्यासाठी अलास्का प्रदेश भाड्याने देण्यात आला होता. तेथे या रंगाचे खोकड सोडून देण्यात आले परंतु यांचे व्यवस्थापन नीट नसल्यामुळे सबंध प्रदेशात ते इतस्तः विखुरले गेले व रोगराईने त्यांचा नाश झाला. तथापि अन्यत्र त्यांची पैदास चालू राहिली. [⟶ खोकड].

मिंक : हा प्राणी ११ महिन्यांचा झाल्यावर प्रजननक्षम होतो. एका नराचा दोन माद्यांशी संयोग करतात. फलदायी संयोग झाल्यावर ४० ते ७६ दिवसांनी मादी विते व सर्वसाधारणपणे तिला ४ पिले होतात. पिले आठ आठवड्यांची झाल्यावर त्यांना तोडतात. संपूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन २ किग्रॅ. तर मादीचे १ किग्रॅ.च्या आसपास असते. खोकडांच्या खाद्यापेक्षा मिंक प्राण्यांच्या खाद्यामध्ये मांसाचे प्रमाण अधिक असावे लागते व हे सर्व मांस माशांचे असले तरी चालते. मिंक प्राण्याचा रोजचा आहार १२५ ग्रॅ. असतो. मात्र कातडी काढण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्राण्यांना ते खातील तितके खाऊ देतात. कोंबडी सोलण्याच्या कारखान्यातील मनुष्यास अखाद्य असलेले कोंबडीचे डोके, पाय व आतडी यांपासून मिंक प्राण्यांचे खाद्य बनवितात.

केसाळ कातड्यासाठी मिंक हे प्राणी १८६६ पासून पाळले जात असले, तरी १९३० च्या सुमारास या प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर पैदास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अंतःप्रजनन, बाह्यवर्ती संयोग, संकर प्रजनन इ. प्रजनन पद्धतींचा अवलंब करून गडद निळा, काळा, निळसर छटा असलेला गडद करडा, थोडीशी निळसर छटा असलेला फिकट करडा, निळा, फिकट तपकिरी, मोतिया, फिकट निळसर तांबूस अशा अनेक रंगांच्या छटा असलेल्या मिंक प्राण्यांची निर्मिती करण्यात आली. १९४४ मध्ये प्रथमतः उत्परिवर्तनाने प्लॅटिनम मिंक उपलब्ध झाला. त्यानंतर १९५८ पर्यंत वर उल्लेखिलेल्या अनेक रंगांच्या छटा असलेल्या मिंक प्राण्यांची फर बाजारामध्ये उपलब्ध झाली. अमेरिकेमध्ये १९६० मध्ये ५७ लाख मिंक प्राण्यांच्या कातड्यांचे उत्पादन झाले. याच वर्षी फर उद्योगातील ७५% कातडी मिंक या प्राण्याची होती. प्रामुख्याने ही कातडी अमेरिका, कॅनडा व स्कँडिनेव्हियन देश येथून आलेली होती आणि ती ५० पेक्षा अधिक रंगछटांची होती. पोलंड व रशियामध्येही मिंक प्राण्यांची पैदास होते. [⟶ मिंक].


चिंचिल्ला : हे सशासारखे दिसणारे प्राणी १९०० सालापासून फरकरिता पाळण्यात येऊ लागले परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर या प्राण्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. पेरू, बोलिव्हिया व चिली येथील अँडीज पर्वतावर मूळचा राहणारा हा प्राणी आहे. चॅपमन यांनी १९२३ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये चार माद्या व सात नर आणून त्यांची पैदास सुरू केली. याचे तात्कालिक कारण म्हणजे आत्यंतिक शिकारीमुळे निसर्गातील या प्राण्यांची संख्याच कमी होऊ लागली होती. हा प्राणी वृत्तीने गरीब असल्यामुळे पाळण्यास सोईस्कर आहे. चॅपमन यांनी यांची पैदास सुरू केल्यानंतर ५० वर्षांनी अमेरिकेतील पैदास केंद्रांवरील चिंचिल्लांची संख्या ५ लाखाच्या आसपास, तर कॅनडामध्ये ती सव्वा लाख झाली. चिंचिल्लांच्या पैदासकारांचे उद्दिष्ट उत्परिवर्तनाद्वारा निरनिराळे रंग असलेले प्राणी तयार करणे हे आहे. सध्या मात्र निसर्गात असलेल्या रंगांच्या गडद छटा असलेले प्राणी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत (उदा., गर्द काळा व शुभ्र पांढरा). १९५४ मध्ये प्रथमतःच चिंचिल्लांची फर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली. त्या आधीचा व्यापार बहुधा चिंचिल्लांच्या जोड्या प्रजननसाठी विकणे इतकाच मर्यादित होता. [⟶ चिंचिल्ला].

मार्टेन : हा जंगलात राहणारा प्राणी असून त्याचा आकार मुंगसाएवढा आहे. पूर्ण वाढ झालेल्या प्राण्याचे वजन ०·०७ ते १·५ किग्रॅ. इतके असते. माद्यांपैकी १५ ते २०% माद्याच प्रजोत्पादन करू शकत असल्यामुळे यांच्या पैदाशीचे पुष्कळसे प्रयत्न फसले आहेत. मिंक प्राण्याप्रमाणेच यांचे खाद्य असते व दररोज एका मार्टेनला २०० ते २५० ग्रॅ. खाद्य लागते. बोरासारखी लहान लहान फळे यांना अधिक आवडतात. [⟶ मार्टेन].

न्यूट्रिया : अर्जेंटिना, ब्राझील, चिली व यूरग्वाय या देशांतील मूळचा असलेला हा प्राणी १९२० च्या सुमारास न्यूयॉर्क संस्थानामध्ये आयात करून त्याच्या पैदाशीचे प्रयत्न करण्यात आले पण ते फारसे यशस्वी झाले नाहीत. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर हे प्राणी पाळण्यात आले व त्यांच्या पैदाशीचे विशेष प्रयत्न करण्यात आले. टेक्सस व लूइझिॲना या राज्यांमधील काही भागांत हे प्राणी सोडून देऊन त्यांचे वन्य अवस्थेमध्ये प्रजनन होऊ दिले गेले. योग्य मोसमामध्ये त्यांना पकडून त्यांची केसाळ कातडी विकण्यात येई. १९६० च्या सुमारास ह्या प्राण्यांची पैदास करण्याचे नव्याने प्रयत्न करण्यात आले.

वर उल्लेखिलेल्या प्राण्यांशिवाय आणखी बऱ्याच प्राण्यांची केसाळ कातडी फर म्हणून वापरात आहेत. मध्य आशियातील काराकुल जातीच्या मेंढ्यांच्या कोकरांपासून उत्कृष्ट तजेलदार मऊ फर मिळते. ही फर पर्शियन लँबस्किन म्हणून प्रसिद्ध आहे [⟶ मेंढी]. ससा या प्राण्यापासून मिळणारी फर चांगल्या प्रतीची नसली, तरी त्यातील काही निवडक कातड्याचा फर म्हणून उपयोग करतात. ससे प्रामुख्याने त्यांच्या मांसासाठी पाळण्यात येतात. फारच थोड्या ठिकाणी ते फरकरिता वाढविले जातात. यूरोपमध्ये वयस्क सशांची फर कपडे बनविण्यासाठी वापरतात.

बहुसंख्य फर प्राणी वन्य अवस्थेत वाढतात व फरसाठी सापळे लावून अगर अन्य मार्गाने जिवंत पकडण्यात येतात.

पैदास क्षेत्राचे व्यवस्थापन : अलीकडे बाजारात येणाऱ्या फरपैकी ९०% फर ही पैदास क्षेत्रामध्ये वाढविलेल्या प्राण्यांपासून मिळविलेली असते. पैदास क्षेत्रामध्ये हे प्राणी लहान लहान गाळ्यांमध्ये पूर्वी ठेवण्यात येत असत. अलीकडे हे प्राणी तारेच्या पिंजऱ्यात ठेवण्यात येतात. पिंजऱ्याचा आकार प्राण्याला सुलभपणे हिंडताफिरता येईल एवढा असतो. पिंजऱ्याचा तळही तारेचाच असतो. यामुळे प्राण्यांची विष्टा व उरलेले अन्न पिंजऱ्यात न कुजता खाली पडते. यामुळे ते प्राण्यांच्या अंगाला लागून त्यांची फर खराब होत नाही व कृमिजन्य रोगांपासूनही त्यांचे संरक्षण होते. हल्ली बहुतेक ठिकाणी प्राण्यांचे अन्न-पाणी ठरलेल्या वेळी पिंजऱ्यामध्ये येईल अशी व्यवस्था यांत्रिक प्रयुक्त्यांचा उपयोग करून केलेली असते. जनन-ऋतूच्या आधी काही दिवस संयोगासाठी निवड केलेल्या नराचा व मादीचा पिंजरा जवळजवळ ठेवतात. यामुळे एकमेकांची ओळख होऊन प्रत्यक्ष संयोग सुलभतेने होऊ शकतो. पूर्वी एका नराचा एकाच मादीशी संयोग करीत पण अलीकडे दोन माद्यांशी केला जातो. फर देणारे बहुतेक प्राणी (माद्या) वर्षातून एकदाच विशिष्ट मोसमांत माजावर येतात. नरमादीचा संयोग झाल्यानंतर गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे जाणण्यासाठी मादीच्या योनिमार्गातील ऊतकाची (पेशी समूहाची) व स्त्रावाची सूक्ष्मदर्शकाने तपासणी करतात. गर्भधारणा झाली नसल्यास सबंध वर्ष वाया जाऊ नये म्हणून तिचा दुसऱ्या नराशी संयोग करतात. संयोगानंतर नर व मादी अलग ठेवतात. सर्वसाधारणपणे हिवाळ्यात संयोग करतात व नंतर दोन महिन्यांनी माद्या वितात. विताना मादी पिंजऱ्याच्या कोपऱ्यात बसते. अशा वेळी गोंगाट करून तिला त्रास देणे योग्य नव्हे. क्वचित असे झाल्यास माद्या आपली पिले खाऊन टाकण्याचा संभव असतो. पिले १२ ते १४ आठवडे वयाची झाल्यावर त्यांना स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते कारण या वेळी ती  मारामारी करण्याइतपत मोठी झालेली  असतात व त्यामुळे त्यांची फर खराब होण्याचा संभव असतो.

काही पैदासकार पैदास क्षेत्रावरील खोकडांना उन्हाळ्यामध्ये राखीव कुरणामध्ये मोकळे सोडतात. या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात खेळण्याबागडण्यास मिळाल्यामुळे त्यांच्या फरची प्रत सुधारते. फर मिळविण्यासाठी त्यांना लहान आवारात गोळा केले जाते व त्यांतील काहींची प्रजननासाठी निवड करून त्यांना पिंजऱ्यात घालून पैदास क्षेत्रावर पाठविण्यात येते. बाकीच्यांना मारून त्यांची कातडी बाजारात पाठविण्यात येतात.

फर प्राणी पकडण्याची व मारण्याची पद्धत : बहुतेक सर्व फरयुक्त प्राणी सापळे लावून पकडतात. सापळ्यात प्राण्यास आवडणारे आमिष ठेवलेले असते. सापळे लावून प्राणी पकडण्यास हल्ली सरकारी परवानगी आवश्यक असते. फरचा जोमदार वाढ होत असलेल्या काळातच प्राणी पकडण्यास परवानगी देतात. पकडावयाचा प्राणी, त्याचे वसतिस्थान व हवामान परिस्थिती यांनुसार सापळ्याचा प्रकार व त्याचे आकारमान ठरवितात. प्राण्यांच्या चटकन लक्षात येणार नाही असे रंग सापळ्यास देतात व कोठेही ग्रीज राहणार नाही अशी दक्षता घेतात. सापळ्याच्या दोऱ्यासही माणसांचा वास राहू नये म्हणून धुरी देतात. प्राण्यांच्या आवडीनुसार आमिष ठेवतात. उदा., खोकडाला पकडण्यासाठी त्याचे मूत्र आमिष म्हणून वापरतात. सापळ्यावर धूळ टाकून कृत्रिमपणा झाकतात. सापळा लावताना व आमिष ठेवताना हातमोजे वापरतात. पावलांच्या खुणा पुसून टाकतात. जेथे प्राणी वारंवार येतात तेथे सापळा एखाद्या खुंटाला, झाडाला वा मोठ्या दगडाला साखळ्यांनी बांधून ठेवतात. या सर्व गोष्टी खोकडाच्या बाबातीत कराव्या लागतात. मस्करॅट वा मिंकसाठी सापळा पाण्यात असा लावतात की, त्यात सापडलेला प्राणी चटकन पाण्यात बुडावा. पकडलेले प्राणी विषारी अंतःक्षेपण (इंजेक्शन) देऊन, मान मुरगाळून, विषारी वायूने, पाण्यात गुदमरवून वा विजेचा झटका देऊन ठार करतात व त्यांची कातडी काढून घेऊन केसांसकट नीट टिकविण्यासाठी त्यांवर प्रक्रिया करतात.


फर कातड्यावरील संरक्षण प्रक्रिया : प्राणी मारून त्यांची कातडी काढल्यावर कातड्यांच्या आतल्या बाजूकडील चरबीचा थर काळजीपूर्वक खरवडून काढतात. नंतर लाकडाच्या वा तारेच्या चौकटीवर कातडी ताणून ओढून सपाट करतात व वाळवितात. वाळविण्याची क्रिया नैसर्गिक रीत्या करतात. कृत्रिम उष्णतेचा वापर करीत नाहीत. कारण त्यामुळे केसांची टोके जळतात आणि कातडे जळते व आकसते. यानंतर कातडी शीतकोठीत सु. ४·४° से. तापमानात ठेवतात.

नंतर ही वाळलेली ताठ कातडी मिठाच्या पाण्यात भिजवितात. यामुळे ती मऊ होतात व तीवर सूक्ष्मजंतूंचा परिणाम होत नाही.

धारदार सुरीने कातड्याच्या आतील बाजूचा पातळ अवकाशी उतकांचा (ज्यातील घटक दूरदूर असल्यामुळे ज्यांत पोकळपणा आलेला असतो अशा पेशी समूहांचा) थर काढून टाकतात. यानंतर ती खारवण्यासाठी एका कुंडात टाकतात. यात सल्फ्यूरिक वा हायड्रोक्लोरिक यासारखे अकार्बनी अम्ल आणि मीठ यांचा विद्राव असतो. तथापि सामान्यतः त्यात पोटॅश तुरटी वा अमोनिया तुरटी व मीठ आणि अल्प प्रमाणात कार्बनी वा अकार्बनी अम्ल असते. अम्लामुळे लवणाचे जलीय विच्छेदन होण्यास (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे पडण्यास) व कातडी कमावण्यासाठी उपयुक्त होण्यास मदत होते.

कातडी चांगली अपारदर्शक झाल्याबरोबर तिला खनिज, प्राणिज व वनस्पतिज तेलांचे व चरब्यांचे मिश्रण चोळतात. यामुळे त्वचेतील कोलॅजेन या तंतुमय प्रथिनाचे कातड्यात रूपांतर होते. नंतर कातडी  ‘किकिंग’ यंत्राकडे नेतात. या यंत्रातील मागे-पुढे होणाऱ्या लाकडी पायांसारख्या रचनेमुळे कातड्यांच्या तंतूंत तेल शिरते व कातडी थोडी गरम होतात आणि त्यामुळे सौम्य ऑक्सिडीभवन (ऑक्सिजनाशी संयोग होण्याची क्रिया) घडून येते. नंतर एका मोठ्या व फिरत्या पिपात भरपूर प्रमाणात असलेल्या कठीण लाकडाच्या अगदी बारीक भुशाने कातडी स्वच्छ करतात.

रंजनक्रिया : बायबल काळी व त्यापूर्वीही फरवर रंजनक्रिया करण्यात येत असे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत वनस्पतींपासून मिळणाऱ्या रंजकद्रव्यांचा त्यासाठी वापर करीत असत. पर्शियन आणि काराकुल कोकरांच्या कातड्यांवर रंजनक्रिया करण्यासाठी अद्यापिही काही वनस्पतिजन्य रंजकद्रव्यांचा उपयोग करण्यात येतो. डांबर व खनिज तेल यांपासून मिळणाऱ्या ॲनिलीन रंजकद्रव्यांमुळे फरला विविध रंगछटा आणता येऊ लागल्या आणि श्रम व वेळेची बचत होऊ लागली. पहिल्या महायुद्धापर्यंत रंजनक्रियेचे काम जर्मनीतील लाइपसिक येथे करण्यात येत असे. कारण अशी रंजकद्रव्ये त्या काळी फक्त जर्मनीत तयार होत असत. नंतर ही रंजकद्रव्ये इतर देशांत तयार करण्यात येऊ लागल्याने रंजनक्रिया इतरत्रही करण्यात येऊ लागली. फरसाठी वापरण्यात येणारी रंजकद्रव्ये ही सामान्यतः ॲनिलीन मध्यस्थ या नावाने ओळखण्यात येतात आणि ती खनिज तेलाच्या फिनिलीन व टोल्यूइन भागापासून मिळवितात.

दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रँकफुर्ट, लंडन व न्यूयॉर्क येथे फरची रंजनक्रिया करण्यात येऊ लागली आहे.

फर केसांतून तेल जास्तीत जास्त काढून टाकणे हा रंजनक्रियेतील पहिला टप्पा आहे. यासाठी क्षारयुक्त (अल्कलीयुक्त) विद्रावाने भरलेल्या कुंडाचा वापर करतात. यामुळे फरयुक्त कातड्यांचे उदासिनीकरण [⟶उदासिनीकरण] होते आणि नंतर ती रंगबंधक (रंजकद्रव्य तंतूंवर योग्य प्रकारे बसण्यास मदत करणारे) धातवीय लवण व उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती बदलणारा पदार्थ) असलेल्या कुंडात टाकतात. आयर्न सल्फेट व पोटॅशियम वा सोडियम बायक्रोमेट आणि क्वचित मोरचूद ही धातवीय लवणे रंगबंधक द्रव्ये म्हणून सामान्यतः वापरतात. यानंतर रंजकद्रव्ययुक्त कुंडात कातडी टाकतात. येथे केसांच्या कोशिकांत रंजकद्रव्य अवक्षेपित होते (न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात शिरते). रंजकद्रव्याचे प्रमाण, कुंडातील विद्रावाचे तापमान व कातडी कुंडात ठेवण्याचा कालावधी यांनी रंगछटा नियंत्रित केली जाते. नंतर कातडी पाण्याने धुतात. कातडी ओलसर राहतील इतपत पाणी ठेवून अतिरिक्त पाणी काढून टाकतात. नंतर एका मोठ्या फिरत्या पिपात लाकडी भुशाच्या साहाय्याने कातडी साफ करतात. एका गोलाकार फिरणाऱ्या तारेच्या जाळीदार पिपात कातडी टाकून केसातील भुसा काढून टाकल्यानंतर रॅटॅन पामच्या काठ्यांनी बडवितात व शेवटी संपीडित (दाबाखाली) हवेने साफ करतात.

केस उपटणे व कापणे : सील, बीव्हर यांसारख्या प्राण्यांच्या फरसाठी केस एकसारखे दिसण्यासाठी आणखी काही प्रक्रिया करण्यात येतात. संरक्षक केस यंत्राच्या साहाय्याने उपटून टाकतात व उरलेले केस एकसारखी उंची ठेवण्यासाठी कापतात. एकदा केस कापलेल्या वा मध्यम वयाच्या मेंढीपासून मिळणाऱ्या रंजनक्रिया केलेल्या मूटॉन फरसाठी प्लॅस्टिक केसयुक्त आवरण वापरतात. यामुळे ही फर आर्द्रतारोधी होते व आर्द्र हवेत ती मळकट होत नाही.

विरंजन : काही वेळा फर केसांचा मूळचा रंग घालविणे आवश्यक असते. केसांच्या टोकाकडचा रंग घालवून दुसऱ्या रंगछटांचे पट्टे निर्माण करणे आणि मूळचा पिवळसर रंग घालवून पांढरा शुभ्र रंग करणे यांसाठी विरंजनक्रिया करतात. यासाठी स्टॅनस क्लोराइडासारखी लवणे, पेरॉक्साइडे वा पोटॅशियम परमँगॅनेट यांचा वापर करतात पण या विरंजनक्रियेचा कातड्यावर परिणाम होऊन फरच्या इतर गुणधर्मांतही फरक पडतो.

इतिहास : फरचा वस्त्र म्हणून उपयोग करण्यास इतिहास-पूर्व काळात सुरुवात झाली. अती थंड भागात राहणाऱ्या मानवाला अन्नाची व उबेची गरज होती. मानवाने प्राण्याचे मांस खाण्यास सुरुवात केल्यावर मारलेल्या प्राण्याच्या कातड्याचा वापर करण्यास लगेचच सुरुवात झाली असावी. उत्तरेकडील थंड भागात फर-वस्त्र ही एक आवश्यक वस्तू मानली गेली असली, तरी प्रत्येक संस्कृतीत फरला मौल्यवान वस्तू म्हणूनच मानण्यात येत असे. भारतात प्राचीन वैदिक संस्कृतीमध्ये हरणाचे कातडे (मृगाजिन) म्हणूनच पवित्र मानले जात असे. यज्ञकर्माच्या वेळी त्याचा उपयोग करण्यात येत असे. व्याघ्रचर्म वापरणे हे शौर्याचे व युयुत्सु प्रवृत्तीचे द्योतक मानले जाई. सिंह मारून त्याचे कातडे आसनासाठी वापरणारा शूर पुरुष नेता मानला जाई. मृगचर्माचा उपयोग उपनयनासारख्या विधींमधून अजूनही केला जातो. ईजिप्शियन संस्कृतीमध्ये राजाला सिंहाची शेपटी कमरपट्ट्यात अडकवून लोंबती सोडण्याचा खास मान असे, तर पुजारी नेहमीच चित्त्याचे कातडे पांघरीत असत. अरेबिया व पॅलेस्टाइनमधील लोक मेंढीचे कातडे कमरेभोवती गुंडाळीत असत. प्राचीन मेसोपोटेमिया आणि आजूबाजूच्या भागांतील खाल्डिया, बॅबिलन, मीडिया व पर्शिया येथील राजांच्या खास महालांच्या भिंती, जमिनी आणि तेथील खुर्च्या, कोच वगैरे फरने मढविलेले असत. चीन-जपानमध्ये सु. ३,५०० वर्षांपूर्वीपासून फरचा उपयोग सर्रास करीत असत. तेथे जास्त करून सेबल फर लोकप्रिय होती. सेमिरामिस या ॲसिरियन राणीने भारतातून ८,००० वाघांची कातडी स्वारीवरून परत जाताना नेली होती. सामान्यतः पौर्वात्य देशांत फरचा वस्त्र म्हणून उपयोग करण्यापेक्षा सजावटी सामानात वापर करण्याकडे जास्त प्रवृत्ती होती. अमेरिकेतील रेड इंडियन लोक अजूनही फरचा वस्त्र म्हणून बराच उपयोग करतात. ध्रुव प्रदेशांत राहणारे एस्किमो लोक थंडीपासून बचाव व्हावा म्हणून डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण फरच्या वस्त्रांचा वापर सर्रास करतात.


ग्रीक लोककथांतही फरच्या वापराचे उल्लेख आढळतात. फरचा उपयोग मौल्यवान वस्तू म्हणून करण्याची सवय रोमनांनी ग्रीकांकडून घेतली असावी. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांनी सेबल व एरमाइन या प्राण्यांच्या फरसाठी पूर्वेकडील देशांशी तर बीव्हर, ऊद मांजर, अस्वल यांच्या फरसाठी यूरोपच्या उत्तरेकडील रानटी टोळ्यांशी संबंध ठेवले होते. रोमन योद्धे शत्रूला घाबरविण्यासाठी वाघ, सिंह, चित्ता वा अस्वल यांचे पंजे, नख्या, शेपटी, चेहरा यांसह असलेले कातडे युद्धाच्या वेळी मुद्दाम वापरीत असत.

मध्यकालीन यूरोपात फर ही व्यापारी महत्त्वाची एक वस्तू म्हणून गणली जात होती. बाल्टिक समुद्रकाठच्या शहरांमधील ‘हॅन्सिटिक लीग’ ही व्यापारी संस्था प्रामुख्याने फरचा व्यापार करीत होती. ही संस्था रशियातील नॉव्हगोरॉड येथून विविध प्रकारांची फर आणून पश्चिम यूरोपमध्ये पुरवीत असे. या काळात फरचा उपयोग सरदार, राजेलोक आणि काही विशेष मान्यवर व महत्त्वाच्या व्यक्तींपुरताच मर्यादित होता. फरचे कपडे वापरणे ही चैनीची बाब समजली जाई. त्यामुळे धर्मगुरूंना, मठाधिकाऱ्यांना व मठवासीयांना फर वापरण्यास चर्चकडून मनाई केली गेली होती. काही वेळा न्यायमूर्तींच्या टोपाप्रमाणे फरचा उपयोग केला जाई. या काळात फक्त पुरुषच फरचा वापर करीत. एरमाइन, रशियन सेबल, खार यांसारख्या प्राण्याची फर फक्त राजघराण्यांतील व्यक्तींच्याच वापरात असावी, असा दंडक होता. मार्टेन, ऊद मांजर, मस्करॅट यांची फर सामान्य माणसांसाठी तर कोकरू, ससा, कुत्रा, मेंढी यांची फर खालच्या दर्जाच्या व खेडवळ माणसांसाठी असे. एखादी व्यक्ती वापरीत असलेल्या फरवरून त्या काळी त्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा निश्चित करता येत असे.

उत्तरेकडील थंड प्रदेशांमध्ये फर वापरणे ही तेथील एक गरज ठरली. पूर्वेकडील देशांमधून फरची आयात वाढल्यावर तिचा वापरही वाढला. यानंतरच जास्त मोल्यवान फर सामान्य माणसांनी वापरू नये असा कायदा यूरोपातील काही देशांत करण्यात आला. फरच्या अतिरिक्त वापराने यूरोपमध्ये फर असणाऱ्या प्राण्यांची भरमसाट हत्त्या झाली म्हणून फर व्यापारी रशिया व स्कँडिनेव्हियाकडे वळले. १९५५ मध्ये इंग्लंडमध्ये मस्कोव्ही कंपनी सुरू झाली. ही कंपनी रशियाशी व्यापार करीत असे. अठराव्या शतकात फ्रान्स-इंग्लंडमध्ये कापड उद्योगाची सुरुवात झाल्यावर फरची मागणी कमी झाली मात्र श्रीमंत वर्गाकडून फरला मागणी होतच राहिली.

अमेरिकेची शोध लागण्यास व तेथे वसाहती करण्यास फरचा व्यापार काही प्रमाणात कारणीभूत झाला. फरमुळेच फ्रेंच व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या मध्यभागामध्ये पसरलेल्या जंगलामध्ये प्रवेश करून वसाहती केल्या. सतराव्या शतकाच्या मध्यास हडसन बे कंपनी ही संस्था फर व्यापारात उतरली. प्रारंभी तिची  कक्षा व्हँकूव्हर, प्रिन्स एडवर्ड बेट व आर्क्टिक समुद्राचा उत्तर भाग यांपुरती मर्यादित होती. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील अमेरिकेतील फर व्यवसाय म्हणजे रेड इंडियन लोकांबरोबरचा वस्तुविनिमय होता. हा व्यापार फायदेशीर होता. फरचा पुरवठा अमर्याद होता आणि इंग्लंड व पश्चिम यूरोप येथील औद्योगिक क्रांतीमुळे फरला मागणी वाढली होती.

रशियात फर प्राणी पकडणे वा मारणे हा व्यवसाय अतिपूर्वेकडे चाले. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पूर्व सायबीरियाच्या कॅमचॅटका भागात फर व्यापार जोरात सुरू होता. रशियन क्रांतिपूर्व काळात फर व्यवसाय हा रशियन सरकारचा (झारशाहीचा) एकाधिकार होता. सेबल, एरमाइन व सागरी ऊद मांजर यांची फर कमी किंमतीला लोकांकडून घेऊन यूरोपात जास्त किंमतीला विकत. सागरी ऊद मांजरांचे ज्या बेटावर प्रजनन होत असे त्या बेटाचा शोध लागल्यावर त्यांची मोठ्या प्रमाणावर हत्त्या करण्यात आली. अशीच हत्या अलास्कातील फर सीलची झाली. क्रांतीनंतर रशियात हा व्यवसाय शासनातर्फे सहकारी संस्थांमार्फत चालविण्यात येऊ लागला.

फर धंद्यांची प्रमुख उद्योग व विक्री केंद्रे लाइपसिक व लंडन ही होत. दोन महायुद्धांमुळे हा व्यवसाय न्यूयॉर्क येथे स्थिर झाला. त्या खालोखाल सेंट लूइस, माँट्रिऑल, सिॲटल, मिनिॲपोलिस, एडमंटन, व्हँकूव्हर, विनिपेग येथे फरचा व्यापार चालतो.

विसाव्या शतकामध्ये फर व्यापाराला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तथापि वेळोवेळी त्यात अनेक स्थित्यंतरे घडत गेली. राहणीमानातील बदल, फरची वस्त्रे बनविण्याच्या शैलीतील बदल व त्याबाबतच्या आवडीनिवडी, आर्थिक तेजी-मंदी यांमुळे फर मागणीत चढ-उतार झाले. फरचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये रशिया, अमेरिका व कॅनडा हे देश अग्रेसर आहेत, तर तिच्या वापराबाबत अमेरिका आघाडीवर आहे. १९६५ च्या सुमारास अमेरिकेत उत्पादित झालेल्या फरची (फरकातडी व फरवस्त्रे) किंमत १० कोटी डॉलर होती.

बहुसंख्य कच्ची फरकातडी लिलावाने विकली जातात. लहान प्राण्यांची (मिंक, मस्करॅट, सेबल, ससे इ.) कातडी सोलून काढली जातात व त्याला ‘केस हॅण्डल्ड’ म्हणतात तर सील, बीव्हर, कोकरे यांची पोटावर काप देऊन कोट काढल्यासारखी काढतात व त्याला ‘ओपन हॅण्डल्ड’ म्हणतात. दुसरीमध्ये फर व आतील कातडे उघडे होते, तर पहिल्या प्रकारात फर आतील बाजूस झाकलेली राहते.

न्यूयॉर्क, माँट्रिऑल, लंडन व लेनिनग्राड ही फरच्या लिलावाची जागतिक कीर्तीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी प्रत्येक ऋतूत एकदाच फरचे मोठे लिलाव होतात. हडसन बे कंपनी ही अमेरिकन व्यापारी संस्था फरच्या व्यापारात जगामध्ये अग्रेसर आहे. लंडन, न्यूयॉर्क व माँट्रिऑल या ठिकाणी कंपनीची लिलावगृहे आहेत व त्या ठिकाणी डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांत फरचे लिलाव होतात व ते आठवडाभर चालतात. सर्व जगातील व्यापारी येथे फर खरेदी करतात.

इ. स. १९६०-७० या काळात फर देणारे काही प्राणी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. द वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड व इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थांतर्फे याबाबत बरेच प्रयत्न करण्यात आले. अमेरिकेमध्ये १९६९ साली ‘एन्डेंजर्ड स्पीशीज ॲक्ट’ संमत करण्यात आला. या कायद्यानुसार वाघ, हिम लेपर्ड, ध्रुवीय अस्वल व जॅगुआर या प्राण्यांच्या फरच्या आयातीस व विक्रीस बंदी घालण्यात आली. न्यूयॉर्क राज्याने १९७० मध्ये ‘हॅरिस ॲक्ट व मेसन ॲक्ट’ असे दोन कायदे करून लेपर्ड, वाघ, चित्ता, व्हॅकुना, ॲलिगेटर, लाल लांडगा, ध्रुवीय अस्वल, कूगर इ. प्राण्यांच्या फरकातड्यांची आयात, वाहतूक, विक्री व ती जवळ बाळगणे यांवर बंदी घातली. ऑसेलॉट, जॅगुआर व मारगेज या प्राण्यांचा अंतर्भाव या कायद्यात १ सप्टेंबर १९७१ रोजी करण्यात आला. मेसन ॲक्टचा भंग केल्यास माल जप्त करण्याची तरतूदही यात केली आहे.


पहिल्या महायुद्धानंतर फरच्या धंद्याला बरीच चलती आली. या वेळी हलक्या प्रतीची फर तिच्यावर रासायनिक प्रक्रिया करून भारी फर म्हणून विकण्यात येऊ लागली. फरवस्त्रांची किरकोळ विक्री या वेळी तीन ठिकाणांहून होत असे : खुद्द फरची वस्त्रे बनविणारे व्यावसायिक, फक्त स्त्रियांच्या कपड्यांची विक्री करणारी विशेष केंद्रे व एकच्छत्री भांडारे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स फेडरल ट्रेड कमिशनने फर कपड्यांच्या विक्रीसंबंधाने नियम करून या धंद्यावर काही बंधने घातली. या नियमाप्रमाणे हलक्या प्रतीच्या फरला महाग फरचे नाव देऊन विकणे हा गुन्हा मानण्यात आला. हलक्या प्रतीच्या फरवर प्रक्रिया करून भारी प्रतीच्या फरचा आभास निर्माण केल्यास त्या फरच्या नावामध्ये हे स्पष्ट व्हावे असा नियम करण्यात आला. उदा., मस्करॅटच्या फरवर रंजनक्रिया करून सील फरचा आभास निर्माण केल्यास त्या फरवर ‘सील-डाइड मस्करॅट फर’ असे नाव घालणे आवश्यक ठरविण्यात आले. तसेच संकरज प्राण्याची फर असल्यास फरच्या नावात तसा स्पष्ट उल्लेख असलाच पाहिजे. पुढे १९५२ मध्ये ‘फर प्रॉडक्ट्स लेबलिंग ॲक्ट’ हा अधिनियम अमेरिकेच्या काँग्रेसने संमत करून वर उल्लेखिलेले नियम अधिक काटेकोर बनविले. या अधिनियमाप्रमाणे एका प्राण्याची फर दुसऱ्या प्राण्याच्या नावाने विकण्यावरही बंदी घातली गेली. म्हणजे वर दिलेल्या उदाहरणातील फरची विक्री फक्त ‘डाइड मस्करॅट फर’ अशीच करणे भाग पडले. याशिवाय ज्या देशामधून ही फर मिळाली असेल त्या देशाचे नावही लेबलावर असले पाहिजे, असा दंडक घालण्यात आला.

फर मिळविणे व तीवर संस्कार करून तीपासून वस्त्रे बनविणे यांसाठी वेळ व मेहनत बरीच लागत असल्याने, तसेच कपडे बेतणे व शिवणे यांसाठी कौशल्य आवश्यक असल्याने फरच्या किंमती भरमसाठ असतात. एका मिंक कोटासाठी सु. ८० मिंक प्राण्यांची फर लागते. एका मिंक फरची किंमत सु. ४,५०० रु. (५०० डॉलर) असते व ह्यामुळे मिंक कोटाची किंमत सु. ४,५०,००० रु. (५०,००० डॉलर) इतकी होते. या भरमसाट किंमतीमुळे फरमध्ये भेसळीचे प्रकार घडून येतात. सामान्यतः यामुळे फरवस्त्रे वापरणे ही एक चैनीची व श्रीमंतीचीच बाब मानली जाते.

फरची वस्त्रे तयार करणे : आवश्यक ते सर्व संस्कार झालेली फर लाकडी तक्त्यांवर ठेवून योग्य त्या दिशांनी व योग्य त्या आकारांत टाचण्यांच्या साहाय्याने ताणतात. निरनिराळे ब्रश वापरून फरचे केस जास्त गुळगुळीत, चमकदार व एकसारखे दिसतील असे करतात. काही वेळा फर केसांची लांबी समान करून घेतात.

फरवस्त्रे तयार करणाऱ्या अभिकल्पाला फरचे वैशिष्ट्य, वस्त्राची फॅशन व विक्रीच्या दृष्टीने वस्त्राची संभाव्य गुणवत्ता यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. या माहितीच्या आधारे अभिकल्पक वस्त्राचा आराखडा तयार करतो व आराखड्यानुसार जाड कागदाचे नमुने तयार करतो. फॅशननुसार फरचे तुकडे कोणते व किती कोठे कोठे बसवावयाचे हे अभिकल्पक ठरवितो. यामुळे कर्तकाला व शिलाई करणाऱ्याला मार्गदर्शन होते. रंग, पोत, कातड्याची जाडी, आकारमान, संरक्षक केसांची लांबी, फरवरील विशिष्ट खुणा यांनुसार वस्त्राच्या आराखड्याला शोभेल अशी फर निवडतात. योग्य फर वापरल्यास वस्त्र चांगले होते. सर्वसामान्यतः कमी प्रतीच्या फरचा वापर वस्त्राच्या न दिसणाऱ्या भागांसाठी करतात उदा., बाहीच्या काखेसाठी. कर्तकाकडे निवडलेली फर व वस्त्राचा नमुना असतो आणि त्यानुसार तो फर कापतो.

बहुतेक फरकातडी आकारमानाने लहान असल्यामुळे त्यांच्यापासून वस्त्रे बनविताना तीन पद्धतींनी त्यांचा उपयोग करतात.

एका पद्धतीमध्ये फरकातडे कातड्याची बाजू वर करून मध्यभागी (ज्या ठिकाणी प्राण्याच्या पाठीचा मध्य येतो) लांबीशी समांतर कापून त्याचे दोन तुकडे करतात. त्यांतील प्रत्येक तुकडा तिरकस कापून त्याच्या ३ किंवा ६ मिमी. रुंदीच्या पट्ट्या कापतात. अशा पट्ट्या एकमेकींना जोडल्यावर लांबलचक पट्ट्या तयार होतात. अशा पट्ट्या एकमेकींना शिवून बनविलेल्या वस्त्रामध्ये नियमित रेषा दिसून येतात. दोन पट्ट्या शिवताना शिवणीच्या रेषेवर किंचित उठावदार उंचवटा तयार होतो व त्यामुळे वस्त्राला आकर्षक नीटनेटकेपणा येतो. याशिवाय दोन पट्ट्या जोडल्याची शिवणही फरच्या बाजूला दिसत नाही. या तिरकस पट्ट्या कापण्याच्या पद्धतीला ‘लेट आऊट पद्धत’ म्हणतात. ही पद्धत पूर्वी मिंक फरची वस्त्रे बनविताना वापरत असत पण अलीकडे न्यूट्रिया, बीव्हर, सील इ. प्राण्यांच्या फरचे कपडे बनवितानाही ही पद्धत वापरतात. दुसऱ्या पद्धतीमध्ये फरच्या पट्ट्या न कापता एक संपूर्ण कातडे दुसऱ्या संपूर्ण कातड्याला फर केसांची वळण मिळतीजुळती करून शिवतात. या पद्धतीने शिवलेले वस्त्र थोडे स्वस्त पडते. तिसऱ्या पद्धतीमध्ये वरील दोन्ही पद्धतींचा वापर करतात. खार, चिंचिल्ला यांसारख्या प्राण्यांच्या फरचे ३८ मिमी. रुंदीच्या (म्हणजे लेट आऊट पद्धतीतील पट्ट्यांपेक्षा अधिक रुंद असलेल्या) पट्ट्या काढून त्या शिवतात. याला ‘सेमीलेट आऊट पद्धत’ म्हणतात.

फरवस्त्रावर इस्त्री फिरवीत नाहीत पण वस्त्र तयार झाल्यावर अभिकल्पकाने दिलेल्या जाड कागदाच्या नमुन्यावर मांडून योग्य तो तणाव देऊन टाचण्यांनी टोचून त्या अवस्थेत ठेवतात. हे करताना फरची बाजू ओलसर केली जाते. प्रत्येक पट्टीला टाचण्या जवळजवळ टोचतात व त्यामुळे लेट आऊट पद्धतीने शिवलेल्या वस्त्राला हजारो टाचण्या वापरल्या जातात. याला ‘नेलिंग’ म्हणतात. चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या अवस्थेत ठेवल्यावर फरकातडी कोरडी होते. या वेळी टाचण्या काढून नमुन्यानुसार वस्त्र बनले की नाही यांची तपासणी करतात. याला ‘स्क्वेअरिंग’ म्हणतात. एखादा लांबलेला भाग कापून अगर आकसलेला असल्यास तुकडा जोडून नमुन्याबरहुकूम आकार आणतात. याला ‘टेपिंग’ म्हणतात. नंतर गुंड्या आदि आवश्यक भाग जोडले जातात. अशी वस्त्रे तयार करताना राहिलेले लहान लहान तुकडे (पंज्याच्या जवळचा, तसेच बगल, मान, डोके, कल्ले ) उपयोगात आणून आयताकृती तुकडे तयार करण्यात येतात. या धंद्यातील काही व्यावसायिक संस्था अशा तुकड्यांपासून वस्त्रे बनविण्यामध्ये तरबेज आहेत. हे काम करणारे कामगार चांगलेच वाकबगार असावे लागतात. सामान्यतः हे तुकडे जोडून टेबलावर मांडून आवश्यक त्या आकाराचे वस्त्र बनविण्यात येते. ग्रीस देशामध्ये हे काम विशेष कौशल्याने केले जाते. असे वस्त्र तयार करतानाही उरलेले तुकडे पुन्हा तिसऱ्यांदा वापरले जातात. हीच क्रिया इतक्या वेळा करतात की, शेवटी अगदीच बारीक तुकडे राहतात व त्यांचे वस्त्र बनविल्यास त्यात फरपेक्षा शिलाईच जास्त उठून दिसते. अशा वस्त्रांची किंमत बरीच कमी असते. मूटॉन कोकरू, मोठे सील व इतर काही मोठे प्राणी यांच्या एकाच फरकातडीचा वापर करून त्यापासून एक पूर्ण वस्त्र तयार होते. कातडे फारच मोठे असल्यास नमुन्याप्रमाणे कापून त्याचे वस्त्र शिवतात.

फरपासून पुढील वस्त्रे वा त्यांचे भाग तयार करतात. कोट, जाकीट, मफलर, स्त्रियांचे खांद्यावरचे मफलर, केप्स (गळ्याशी बंद करता येणारे पण बिनबाह्याचे, कोटाच्या आत घातले जाणारे सैलसर वस्त्र), कॉलर, काठ, कफ इत्यादींसाठी, तसेच अस्तर म्हणूनही फरचा वापर करतात. यांशिवाय स्त्रियांचे ड्रेसिंग गाऊन व पादत्राणे (स्लीपर, ओव्हरशूज इ.) यांनाही फरचे तुकडे लावण्यात येतात. टोप्यांसाठीही फरचा वापर करतात.

फरवस्त्रे व फर टोप्या तयार करणे हे दोन वेगवेगळे धंदे आहेत. जी फर वस्त्रांसाठी वापरीत नाहीत ती विशेषतः टोप्यांसाठी वापरली जाते. विशेषतः बीव्हर, न्यूट्रिया, ससा, मस्करॅट इत्यादींची फर टोप्यांसाठी वापरतात. 


फरवस्त्राचे किरकोळ विक्रेते उन्हाळ्यात फरवस्त्रे शीतकोठीत ठेवणे, स्वच्छ करणे, दुरुस्त करणे व पुनर्रचना करणे ही कामे करतात. फरनुसार शीतकोठीचे तापमान सु.— २° से. ते सु. ४° से. इतके असते. फर स्वच्छ करणे हे अनुभवी माणसाचेच काम असते. हे काम एका मोठ्या फिरत्या पिपात फरवस्त्रे व निरनिराळ्या प्रकारचे कठीण लाकूड, फळांची कठीण कवचे व मक्याच्या कणसांची बुरकुंडे यांचा भुस्सा आणि स्वच्छक द्रव्ये ठेवून करतात. भुश्शाचे निरनिराळ्या आकारमानाचे कण व प्रत्येक वेळी त्यांची योग्य राशीच वापरतात. शेवटी वस्त्राला योग्य अशी चकाकी आणण्याची प्रक्रिया करतात.

फर व्यापार : हिवाळ्यातील तापमान कमीत कमी असलेल्या भूभागामधील वन्य प्राण्यांपासून उत्तम प्रतींची फर उपलब्ध होते, कारण येथील प्राण्यांच्या अंगावर दाट व तजेलदार केस वाढतात. कॅनडा, उत्तर अमेरिका, उत्तर यूरोप व सायबीरिया या प्रदेशांतून चांगली फर मिळते. असे असले, तरी समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांतील देशांमध्येही वन्य प्राण्यांपासून फरकातडी उपलब्ध होतात. ८० देशांमधून ८४ जाती व २५ उपजातींतील प्राण्यांची फर मिळते. व्यापारी दृष्ट्या महत्वाची फर ज्या प्राण्यांपासून मिळते त्यांची माहिती कोष्टकात मागे आलेली आहे. फर सील या एकाच सागरी प्राण्यापासून फरकातडी मिळू शकतात. १८६७ मध्ये अमेरिकेने अलास्का विकत घेतले त्या वेळी अलास्काच्या पश्चिमेकडे ४८० किमी.वर असलेल्या प्रिबिलॉफ बेटावर फर सील प्राण्यांची संख्या ३० लाख होती. फरसाठी या प्राण्यांची अनिर्बंध हत्त्या झाल्यामुळे १९११ च्या सुमारास ही संख्या १ लाखापर्यंत घसरली. याच वेळी झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार ही हत्त्या थांबविण्यात आल्यामुळे पुन्हा १९५४ च्या सुमारास ही संख्या १५ लाखापर्यंत वाढली. दरवर्षी सु. ६०,००० फर सील फरकातड्यांसाठी मारले जातात.

फरकातडी मिळविण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फर देणाऱ्या प्राण्यांच्या पैदाशीचे प्रयत्न प्रथम सुरू झाले. त्यानंतर ग्रेट ब्रिटन, नॉर्वे, फिनलंड इ. देशांमध्ये या प्राण्यांचे प्रजनन सुरू करण्यात आले. तथापि फर व्यापारामध्ये रशिया, अमेरिका, व कॅनडा हे देशच आघाडीवर आहेत. अमेरिकेमध्ये १९७१ मध्ये ५ कोटी ३० लक्ष डॉलर किंमतीची फरकातडी आयात केली गेली, तर याच वर्षी रशियाने ५ कोटी १० लक्ष डॉलरच्या व कॅनडाने ३ कोटी डॉलरच्या फरकातड्यांची निर्यात केली.

रशिया, अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये काराकुल जातीच्या मेंढ्यांच्या कोकरांपासून फरकातडी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. रशियामध्ये प्रतिवर्षी १ कोटी तर द. आफ्रिकेमध्ये ५५ लाख कोकरांच्या फरकातड्यांचे उत्पादन होते. अफगाणिस्तानाचा तिसरा क्रमांक लागतो. जन्मानंतर २४ ते ४८ तासांमध्ये कोकरे मारली जातात. १३० ते १४० दिवसांच्या गाभण मेंढ्यांचा गर्भपात करून मिळविलेल्या कोकरांच्या फरकातड्यांना दुप्पट किंमत येते.

सर्वसाधारणपणे एका कातड्याची किंमत १५ ते २० डॉलर इतकी मिळते. या कातड्यांची प्रत जॅकेट, रिब्ड, फ्लॅट व कोकेशियन अशी केसांचा कुरळेपणा, त्यातील तरंग व चमकदारपणा आणि वजन यांनुसार लावतात. भारतामध्ये लोकरीच्या उत्पादनासाठी पैदास करण्याच्या दृष्टीने नुकतीच काराकुल जातीच्या मेंढ्यांची आयात करण्यात आली आहे पण त्यांची फरकातडी मिळविण्याकडे अद्याप लक्ष देण्यात आलेले नाही.

भारतामध्ये इतके विविध प्राणी असूनही फर देणारे प्राणी सामान्यतः कमीच आहेत. यांतील बहुसंख्य हिमालयाच्या आसपासच्या भागांत व खुद्द पर्वतराजींवर आढळतात. इतरत्र आढळणाऱ्या प्राण्यांवर राठ केसांचे प्रमाण अधिक आहे. ससा, हरिण, वाघ, बिबळ्या, चित्ता व सिंह या प्राण्यांपासून फर मिळविली जात असली, तरी कोकरांच्या व करडांच्या फरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कोकराच्या फरची प्रत कोकराची जात, वय, मऊ केसांची रचना पद्धती व लांबी, रंग इत्यादींवर अवलंबून आहे. गाभण मेंढ्यांना मारून किंवा गर्भ टाकायला भाग पाडून जवळजवळ मेंढीच्या गर्भाशयातूनच कोकरांना बाहेर काढून मारतात व त्यांची कातडी फर म्हणून विकली जातात. मोएरे, नाझुकचा, गुलदार व प्लेन अशा फरच्या प्रती लावण्यात येतात. लोकरीमधील कुरळेपणा व दाट असणाऱ्या लोकरीवरील तरंग यांवरून ह्या प्रती लावण्यात येतात. काराकुल जातीच्या मेंढीला मुद्दाम गाभाडून मिळालेल्या कोकरापासून मिळणारी मोएरे, जन्मानंतर २४ तासांमध्ये कोकरू मारून मिळणारी नाझुकचा आणि ६ ते १२ दिवस वयांच्या कोकरांपासून मिळणाऱ्या फरला गुलदार व प्लेन असे म्हणतात. दक्षिण भारतामध्ये मिळणारी कोकरांची केसाळ कातडी फारशा चांगल्या प्रतीची असत नाहीत म्हणून त्यांची निर्यात केली जात नाही. त्यांच्यापासून अस्त्राखानी टोप्या बनविल्या जातात.

राजस्थान व तत्सम कोरड्या हवामानाच्या भारतामधील भागामध्ये करडांच्या फरचे उत्पादन होते. रंग, एकसारखेपणा, केसाची प्रत व आकार यांवर पहिल्या प्रतीची मोएरे, दुसऱ्या प्रतीची सरफेस पॅटर्न आणि तिसऱ्या प्रतीची प्लेन अशा प्रती ठरवितात. जन्मानंतर दोन दिवसांच्या आत मारलेल्या करडाची पहिल्या प्रतीची व सात दिवसांच्या आत मारलेल्या करडाची दुसऱ्या प्रतीची अशी सर्वसाधारण प्रत समजतात. फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका या देशांमध्ये करडांच्या फरची निर्यात होते.

यांशिवाय हिमालयातील मार्टेन इ. काही प्राण्यांची फरकातडी मिळतात. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली व सौराष्ट्र येथून फरकातडी मिळतात. ऑगस्ट ते एप्रिल दरम्यान ही दिल्ली, आग्रा व जयपूर येथे गोळा केली जाऊन दिल्लीमधूनच त्यांची निर्यात केली जाते. भारतामधून प्रतिवर्षी सु. ३२ लक्ष रुपये किंमतीची निरनिराळ्या प्रकारांची फर निर्यात केली जाते.

संदर्भ :1. Bachrach, M. Fur: A Practical Treatise, New York, 1953.

   2. Fuchs, V. R. The Economics of the Fur Industry, New York, 1957.

   3. Hafen, LeRoy R. Mountain Men and the Fur Trade of the Far West, 8 Vols., Glendale (California), 1965-70.

   4. Phillips, P. C. Smurr, J. W. The Fur Trade, 2 Vols., Norman (Oklahoma), 1961.

   5. Samet, A. Pictorial Encyclopaedia of Furs, New York, 1950.

दीक्षित, श्री. गं. मिठारी, भू. चिं. जोशी लीना