फक्रुद्दीन अली अहमद : (१३ मे १९०५–११ फेब्रुवारी १९७७). भारताचे पाचवे राष्ट्रपती. जन्म दिल्ली येथे. त्यांच्या वडिलांचे नाव कर्नल झेड्. ए. अहमद व आईचे रुकय्या सुलताना. अहमद घराणे मूळचे आसामचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच पार पडले. पुढे पंजाब विद्यापीठातून ते मॅट्रिक झाले (१९२१). त्यानंतर दिल्लीच्या स्टीफन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर वडिलांनी त्यांना आय्. सी. एस्. परीक्षेसाठी इंग्लंडला धाडले. तेथे कॅथरिन महाविद्यालयातून (केंब्रिज) ते बी. ए. झाले. आय्. सी. एस्. परीक्षेला मात्र गालफुगीचा विकार उद्भवल्याने ते बसू शकले नाहीत. म्हणून ते बार ॲट लॉ झाले (१९२८). गोल्फ, टेनिस, हॉकी यांसारख्या खेळांचे त्यांना लहानपणापासूनच आकर्षण होते. ते अखिल भारतीय लॉन टेनिस ॲसोसिएशनचे अध्यक्ष होते (१९७२). इंग्लंडला असतानाच ते हॉकी संघाचे सचिव होते. खेळाच्या निमित्ताने त्यांना यूरोपभर प्रवास घडला. भारतात परतल्यानंतर सर मुहम्मद शफी या ज्येष्ठ वकिलाच्या हाताखाली त्यांनी पंजाब उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला पण लवकरच ते गौहत्तीस स्वतःच्या जमिनीसंबंधीचे दावे चालविण्याच्या निमित्ताने गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
वयाच्या २६ व्या वर्षी ते कांग्रेस पक्षाचे सदस्य झाले (१९३१). पुढे १९३५ मध्ये आसामच्या विधिमंडळावर ते निवडून आले आणि अर्थ व महसूल मंत्री झाले (१९३८-३९). ‘छोडो भारत आंदोलना’त (१९४२) त्यांनी सक्रिय भाग घेतला व ते स्वातंत्र्य चळवळीत पडले. त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. १९४५-४६ या काळात काँग्रेस कार्यकारिणीचे ते सदस्य होते. १९४६ ते १९५२ या काळात त्यांनी आसाम सरकारचा महाधिवक्ता म्हणून केले. पुढे ते राज्यसभेवर निवडून आले (१९५४–५७). या काळात त्यांनी सोव्हिएट रशियास गेलेल्या भारतीय कायदेतज्ञांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले (१९५५). १९५७ मध्ये संयुक्त राष्ट्रांतील भारतीय शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. त्याच वर्षी आसाम विधानसभेवर ते निवडून आले. १९६६ पर्यंत त्यांनी अर्थ, कायदा व समाजकल्याण या खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा पुन्हा प्रवेश झाला. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी केंद्रीय मंत्री या नात्याने वीज व पाटबंधारे, शिक्षण, औद्योगिक विकास, कृषी इ. अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. तत्पूर्वी काँग्रेसमध्ये बंगलोर येथे १९६९ च्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी नियुक्त करावयाच्या उमेदवारावरून फूट पडली. त्यांपैकी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसशी फक्रुद्दीन अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले. १९६९ मध्ये राबात (मोरोक्को) येथील इस्लामी परिषदेस ते भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले तथापि या परिषदेत भारताचा जो अवमान झाला, त्याबद्दल जनक्षोभ होऊन मोरोक्को येथील भारतीय राजदूतास परत बोलविले.
राष्ट्रपतिपदाच्या १९७४ सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसतर्फे फक्रुद्दीन बहुमताने निवडून आले. २४ ऑगस्ट १९७४ रोजी त्यांनी राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली. ते राष्ट्रपती असताना त्यांनी इंग्लंड, जर्मनी, बल्गेरिया, हंगेरी, फ्रान्स, इटली, ईजिप्त, सोव्हिएट रशिया, श्रीलंका, इराण इ. देशांना भेटी दिल्या. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांच्या कारकीर्दीतच २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची जाहीर घोषणा करण्यात आली. ते मलेशियाच्या दौऱ्यावर असताना राबात येथे त्यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्यामुळे ते तातडीने दिल्लीस परतले पण यातच हृदयविकाराने त्यांचे दिल्ली येथे निधन झाले.
वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांचा विवाह अबिदा बेगम या उत्तर प्रदेशातील सुलतान हैदर ‘जोष’ या उर्दू साहित्यिकाच्या सुशिक्षित मुलीशी झाला (१९४५). अबिदा बेगम (जन्म १९२५ – ) पदवीधर असून उत्तम बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांना चित्रकलेचाही छंद आहे. त्यांनी काढलेली निसर्गचित्रे उल्लेखनीय आहेत. त्यांना समिना, पर्वेझ व बदर ही तीन मुले आहेत. अबिदा बेगम दिल्ली येथे महिला संघटनांमध्ये काम करतात. समाजसेवेबरोबरच त्या राजकारणातही सक्रिय भाग घेतात.
संदर्भ : Rehmaney, F. A. A. My Eleven Years with Fakhruddin Ali Ahmed, New Delhi, 1979.
शेख, रुक्साना वाळिंबे, वि. स.
“