प्ल्यूकर, यूलिउस : (१६ जून १८०१–२२ मे १८६८). जर्मन गणितज्ञ व भौतिकीविज्ञ. भूमितीमधील त्यांचे कार्य विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म एल्बरफेल्ट येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ड्युसेलडॉर्फ येथे आणि पुढील शिक्षण बॉन, हायड्लबर्ग, बर्लिन व पॅरिस येथील विद्यापीठांत झाले. त्यांनी १८२४ साली मारबर्ग विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. १८२५ मध्ये बॉन विद्यापीठात त्यांनी अध्यापक म्हणून प्रवेश केला व तेथेच १८२८ मध्ये असाधारण प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे १८३३ मध्ये बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व त्याच वेळी ते फ्रीड्रिख व्हिल्हेल्म जिम्नॅशियममध्ये शिक्षक म्हणून काम करीत होते. १८३४ साली हॉल विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. नंतर १८३६–४७ या काळात त्यांनी बॉन विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक व १८४७–६७ या काळात त्याच विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

आउगुस्ट केले या जर्मन अभियंत्यांनी १८२६ मध्ये सुरू केलेल्या गणितीय नियतकालिकात प्ल्यूकर यांचे भूमितीविषयीचे बरेचसे संशोधन प्रसिद्ध झाले. त्यामध्ये त्यांनी ⇨ शंकुच्छेदांचा अभ्यास रेषांचे अन्वालोप म्हणून केला. १८२६ मध्ये त्यांनी त्रिकोणी सहनिर्देशक (एखाद्या बिंदूचे स्थान तींन दिलेल्या रेषांपासूनच्या अंतरांच्या प्रमाणात दर्शविणारी मूल्ये) वापरात आणले. १८३२ नंतर प्ल्यूकर यांनी दोनापेक्षा जास्त घात असणाऱ्या वक्रांचा विशेष अभ्यास केला व १८३९ मध्ये एका निबंधामध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली वक्रांसंबंधीची ‘प्ल्यूकर समीकरणे’ मांडली [⟶ वक्र]. ध्रुवीय रेषेची संकल्पना त्यांनी सर्वसाधारण बैजिक वक्रांकरिता विस्तारित केली. Neue Geometrie (१८६८–६९) या ग्रंथात त्यांनी ‘रेषा भूमिती’ या विषयातील मूलभूत संकल्पना मांडली. त्यांनी बिंदूऐवजी रेषा ही मूलघटक असलेल्या सामान्य अवकाशातील चतुर्मितीय भूमितीची संकल्पना विशद केली. त्यांनी एक, दोन व तीन मितींतील रेषांच्या उपसंचांकरिता रेखांकित पृष्ठ, एकरूपता व जटिल पृष्ठ या कल्पना मांडल्या व त्या अद्यापही वापरल्या जातात. त्यांनी एकघाती (रैखिक) जटिल पृष्ठांचे व एकरूपतांचे वर्गीकरण केले आणि द्विघाती जटिल पृष्ठांच्या अभ्यासाला चालना दिली. यासंबंधीचे त्यांचे कार्य अर्धवट राहिले, तथापि त्यांचे शिष्य फेलिक्स क्लाइन यांनी ते पूर्ण करून प्रसिद्ध केले. यासंबंधी नंतरही अनेक गणितज्ञांनी संशोधन केले.

प्ल्यूकर हे मूलतः भूमितीचे अभ्यासक असले, तरी त्यांनी बरीच वर्षे (१८४६–६४ या काळात) भौतिकीमध्येही महत्त्वपूर्ण काम केले. भौतिकीमध्ये त्यांचे लक्ष सैद्धांतिक संशोधनाऐवजी प्रायोगिक संशोधनावर विशेष केंद्रित झाले होते. मायकेल फॅराडे यांच्याबरोबर त्यांनी यासंबंधी पत्रव्यवहारही केलेला होता. प्ल्यूकर यांचे भौतिकीतील कार्य प्रामुख्याने Annalen der Physik and Chemie आणि फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स ऑफ द रॉयल सोसायटी या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. त्यांनी वायूंच्या व स्फटिकांच्या चुंबकीय गुणधर्मासंबंधी व नंतर जिच्यातील हवा काढून टाकलेली आहे, पण जिच्यात अत्यल्प दाब असलेला वायू आहे अशा नळीतील विद्युत् विसर्जनासंबधी (विद्युत् प्रवाहाच्या मार्गक्रमणासंबंधी) संशोधन केले. त्यांनी विद्युत् विसर्जनाचे चुंबकामुळे होणारे विचलन आणि नळीतील ऋण प्रभेवर [⟶ विद्युत् संवहन] चुंबकीय क्षेत्राचा होणारा परिणाम यासंबंधी अभ्यास केला. तोरमल्लीच्या (टुर्मलिनाच्या) स्फटिकातील चुंबकीय आविष्काराचा १८४७ मध्ये त्यांनी शोध लावला. जे. एच्. डब्ल्यू. गाइसलर यांच्या समवेत त्यांनी एक प्रमाणित तापमापक तयार केला. वायूंच्या वर्णपटांसंबंधी त्यांनी केलेल्या अभ्यासावरून रासायनिक विश्लेषणातील वर्णपटांच्या महत्त्वाविषयी त्यांना जाणीव झालेली होती, असे दिसून येते. जे. डब्ल्यू. हिटोर्फ यांच्या मते आर्. डब्ल्यू. बन्सल व जी. आर्. किरखोफ यांच्या सुप्रसिद्ध प्रयोगांच्याही अगोदर प्ल्यूकर यांनी हायड्रोजनाच्या पहिल्या तीन वर्णरेषांचा शोध लावला होता.

प्ल्यूकर यांनी लावलेल्या शोधांचे जर्मनीमध्ये गुणग्रहण झाले नाही, तथापि इंग्लंडमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव झाला व त्यांना रॉयल सोसायटीच्या कॉप्ली पदकाचा १८६८ मध्ये सन्मानही देण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी Analytische-geometrische Entwicklungen (२ खंड, १८२८–३१), System der analytischen Geometrie (१८३५) Theorie der algebraischen Kurven (१८३९) हे महत्त्वाचे मानले जातात. ते बॉन येथे मृत्यू पावले.

ओक, स. ज. मिठारी, भू. चिं.