प्लवक:(प्लॅक्टन). समुद्र, तलाव, नद्या, नाले, ओढे इ. अतिशय खारट ते गोड अशा सर्व प्रकारच्या जलाशयांतील प्राण्यांच्या भिन्न थरांत राहून प्रवाहाच्या गतीबरोबर वाहत जाणाऱ्या वनस्पती व प्राणी यांच्या समूहांना ‘प्लवक’ म्हणतात. याउलट कित्येक प्राणी व काही थोड्या वनस्पती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किंवा संथ पाण्यात पोहत जाऊ शकतात, त्यांना ⇨तरणक (नेक्टन) म्हणतात. काही सजीव मात्र तळाशीच स्थिर राहतात किंवा तळावर सरकू शकतात, त्यांना ‘नितलवासी’ म्हणतात [→नितल जीवसमूह]. प्लवकातील सजीव सर्वसाधारणपणे आकारमानाने सूक्ष्म असून त्यांनी स्वतःची अशी गती नसते. तथापि ⇨जेलीफिश व⇨ट्युनिकेटा उपसंघातील थॅलिॲसिया वर्गातील पायरोसोमा वंशाचे प्राणी यांसारख्या मोठ्या व शरीरापासून निघालेले प्रकेसल [चाबकाच्या दोरीसारख्या, लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय संरचना म्हणजे कशाभिका→ कशाभिका] असल्यामुळे मंद गती असलेल्या काही जलचरांचाही, प्लवकाच्या व्याख्येत ते बसत असल्याने, यात समावेश केला जातो. डोळ्यांना सहज दिसतील इतक्या मोठ्या प्लवक-जातींखेरीज त्यांचे फारसे प्रकार १८४५ पर्यंत माहीत नव्हते परंतु १९७२-७६ या काळात केलेल्या समुद्री अन्वेषणात (संशोधनात) त्यांच्या अनेक बारीक-सारीक जाती व प्रकार यांचा शोध लागला. १८८९ मध्ये व्हिक्टोर हेन्झेन यांनी एक प्लवक-मोहीम काढली व त्यानंतर प्लवकांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासास सुरुवात झाली. ‘प्लँक्टन’ ही शास्त्रीय संज्ञा त्यांनीच प्रथम उपयोगात आणली.

स्थलवासीप्रमाणेच जलवासींचेही जीवन सूर्यप्रकाशावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असते. कार्बन डाय-ऑक्साइड वा वायूबरोबरच काही लवणेही पाण्यात विरघळलेली असतात. त्यांचा उपयोग करून वनस्पति-प्लवकातील घटकांत असलेल्या ⇨हरितद्रव्यामुळे प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशात पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांच्यापासून हरितद्रव्याच्या मदतीने केली जाणारी अन्ननिर्मिती) घडून येते व त्याचा त्यांना स्वतःच्या वाढीसाठी उपयोग करून घेता येतो. त्याकरिता वनस्पति-प्लवक हे साधारणतः सूर्यकिरण पाण्यात जितके खोलवर पोहोचू शकतील तितक्या खोलीवर मोठ्या संख्यने तरंगत असतात. आवश्यक ती लवणे, वायू, प्रकाश व तापमान उपलब्ध असेल त्या वेळी तर वनस्पति-प्लवकांची इतकी बेसुमार वाढ होते की, त्यामुळे पाणी गढूळ किंवा हिरवट रंगाचे दिसते [→ शैवले]. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश जसजसा प्रखर होऊ लागतो तसतसे वरच्या प्रकाशित भागात असलेले वनस्पति-प्लवक विभाजनाने वाढून अधिक खोलवर जाऊ लागतात. ढोबळपणे हे वनस्पति-प्लवक प्राण्यांचे खाद्य असून प्राणि-प्लवक हे माशांचे खाद्य आहे. काही मासे त्यांच्या जीवनात प्रथम सागरी वनस्पती व वनस्पती-प्लवक आणि जसजसे ते वाढतात तसतसे प्राणि-प्लवक व इतर जलचर यांवर निर्वाह करतात. काही मासे मात्र सर्व आयुष्यभर वनस्पति-प्लवकावरच जगतात. पाण्यातील जीवन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या प्लवकांवरच अवलंबून असल्याने हा एक गट फार महत्त्वाचा मानला जातो.

वनस्पति-प्लवक:प्लवकामध्ये प्राणि-कोटीतील माशांपेक्षा खालच्या दर्जातील बऱ्याच प्रकारचे जलचर येत असले, तरी वनस्पतींपैकी मुख्यतः शैवलेच प्रामुख्याने दिसून येतात. हिरवट तपकिरी रंगाच्या करंडक वनस्पती [→ डायाटम ] हा वनस्पति-प्लवकांचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा एककोशिक (सर्व शरीर एकाच पेशीचे बनलेल्या) वनस्पतींचा गट असून त्यांना सिलिकायुक्त पारदर्शक कवच असते. डोळ्यांना सहज दिसतील (उदा., ऱ्हायझोसोलेनिया) इतक्या मोठ्या आकारमानापासून तो अतिशय सूक्ष्म (उदा., निट्‌शिया) अशा सर्व आकारमानांत ते सापडतात. हे साधारणतः स्वतंत्रपणे जगत असले, तरी काही (उदा., कीटोसेरॉस, थॅलँसिओसिरा) एकमेंकाना जोडून साखळी करून सामूहिक जीवन घालवितात. ह्या करंडक वनस्पती मेल्यावर त्यांची सिलिकायुक्त कवचे पाण्याच्या तळाशी साठूनमोठाले थर निर्माण झालेले काही ठिकाणी दिसून आले आहेत [→ डायाटमी माती].

आ. १. काही सूक्ष्म वनस्पति-प्लवक : (१) निट्‌शिया, (२) कीटोसेरॉस, (३ ते ७) सिरेशियमच्या पाच जाती, (८) पेरिडिनियम, (९) प्रोरोसॅट्रम, (१०) पाँटोस्फीरा, (११) डिस्टेफॅनस.

बराच काळ करंडक वनस्पती हाच गट प्रामुख्याने जलचरांचे खाद्य आहे, असा गैरसमज होता परंतु आता याहीपेक्षा संख्यने अधिक असलेल्या इतर काही शैवलांचे सूक्ष्म प्रकारसुद्धा (डायनोफ्लॅजेलेटा, क्रिसोफायटा इ.) जलचरांचे एक खाद्य असल्याचे दिसून आले आहे. ह्या प्लवकातील वनस्पती एककोशिक असून त्यांत सिरेशियम, पेरिडिनियमप्रोरोसेंट्रम वगैरे तपकिरी रंगाचे, स्वयंप्रकाशित व दोन प्रकेसले असलेल्या प्रकारांचाही समावेश होतो. या प्रकेसलांद्वारे त्यांना स्वतःची अशी गती मिळविता येते. अतिसूक्ष्म असे अन्नाचे कण खाऊन पाण्याचे तापमान कमीजास्त होईल त्याप्रमाणे ते आपल्या आकारमानात बदल करू शकतात. प्लवकांतील हिरव्या वनस्पतींनाही दोन प्रकेसले असून त्यांच्या साहाय्याने त्यांना गती मिळू शकते. यांशिवाय बाकीच्यांच्या बाबतीत जमिनीवरील वनस्पतिप्रमाणेच त्यांचे जीवनकार्य चालू असते. हिरवे वनस्पति-प्लवक [फायटोफ्लॅजेलेटा → प्रोटोझोआ] हे बहुशः स्वतंत्रपणे विहार करीत असले, तरी काही (उदा., फिओसिस्टिस) प्रकार सामूहिक रीत्या बुळबुळीत पदार्थांच्या पुंजक्यात राहतात. नील हरित शैवलांपैकी एक लाल प्रकार (ट्रायकोडेस्मियम एरिथ्रियम) तांबड्या समुद्रात सापडतो. पाँटोस्फीराडिस्टेफॅनसयांचाही अंतर्भाव वनस्पति-प्लवकांत होतो, ते क्रिसोफायटा शैवलांपैकी आहेत. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या प्लवक वनस्पतीत ॲनाबीना, नॉस्टॉक, मायक्रोसिस्टिस इ. नील हरित शैवले आणि व्हॉल्व्हॉक्स, पेडिॲस्टम व क्लॅमिडोमोनस इ. हरित शैवले यांचा समावेश करतात[→ शैवले].


प्राणि-प्लवक:वनस्पतींप्रमाणे पोषण व प्राण्यांप्रमाणे हालचाल करणारे काही फ्लॅजेलेटा [कशाभिकायुक्त सुक्ष्मजीव→ प्रोटोझोआ] वर्गातील रंगीत सजीव वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञानात वर्णिलेले आढळतात. ह्याशिवाय त्या गटातील कित्येक रंगहीन असून त्यांचाही समावेश प्लवमान (तरंगणाऱ्या) प्राण्यांतच होतो यांमध्ये नॉक्टिल्यूका उन्हाळ्यात रात्री चमकणाऱ्या सापेक्षतः मोठ्या प्राण्यांचा समावेश होतो. याशिवाय ⇨ रेडिओलॅरिया व फोरॅमिनीफेरा ह्या ⇨ अमीबासारख्या फार साध्या एककोशिक प्राण्यांशी संबंधित असलेले प्राणीही प्लवकात आढळतात, त्यांच्या सांगाड्यांनी समुद्रतळावर मोठे थर साचून राहतात. काही ⇨ऊझांतील अनेक फोरॅमिनीफेरांच्या अवशेषांमुळे खनिज तेल व इतर निक्षेप (खनिज साठे) यांसंबधीची उपयुक्त भूवैज्ञानिक माहिती मिळते. सागरी प्राणि-प्लवकात समुद्रातील अनेक प्राण्यांचे ⇨डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असणाऱ्या पूर्व अवस्था) व अंडी यांचाही समावेश काही वेळेपुरता आढळतो. प्लवकांत ज्यांचा निदान एक पूर्ण प्रतिनिधी नाही असे प्राणि-गट फार थोडे आहेत. प्राण्यांमध्ये अतिशय मनोहर म्हणता येतील असे ⇨टिनोफोरा, सायफनोफोरा व ⇨जेलीफिश व शिवाय समुद्रतळात राहणाऱ्या⇨सीलेंटेरेटा प्राण्यांचे छत्रकी डिंभ प्लवकांत आढळतात. तसेच शरकृमीही [सॅजिट्‌टा  →कीटोग्नॅथा] असतात व त्यांचा उपयोग प्लवक-संशोधनात निर्देशकाप्रमाणे होतो. टेरोपॉड (लिमॅसिना) व हेटेरोपॉड (कॅरिनॅरिया, टेरोट्रॅकिया इ.) हे ⇨मॉलस्का (मृदुकाय) संघातील प्राणी प्लवकांत असून शिवाय तळाशीच वस्ती करणाऱ्या त्याच संघातील प्राण्यांचे डिंभही (व्हेलिजर) असतात. एकायनोडर्माटा संघातील प्राण्यांपैकी काहींचे डिंभ (प्लूटियस) प्लवकांत ठळकपणे दिसतात. त्यांतील एक गट (पेलॅगोथुरियन) संपूर्णपणे प्लवकीय आहे. सी-स्क्वर्ट (समुद्रोद्‌गारी) या प्राण्याशी संबंधित असे बहिर्गोल, पिच्छिल (चिकट) व निवह (वसाहतीच्या रूपाने राहणाऱ्या) शरीराचे साल्पा व डोलिओलम आणि फक्त कोमट सागरी पाण्यात चमकणारा पायरोसोमा यांचाही प्लवकांत समावेश आहे [→ ट्यूनिकेटा]. ⇨क्रस्टेशिया (कवचधारी) संघातील कित्येक प्राणी व त्यांचे डिंभ (झोइया) प्लवकांत महत्त्वाचे मानले आहेत, त्यांच्यापैकी कोपेपोडा या एका विशिष्ट उपवर्गातील प्राण्याची तुलना कार्याच्या संदर्भातजमिनीवरच्या प्राण्यांपैकी कीटकांशी करतात. त्यांची संख्या समुद्रात फार मोठी असून ते वनस्पति – प्लवकांवर जगतात आणि ते स्वतः मात्र माशांचे भक्ष्य असतात. कॅलॅनस फिनमार्किकस हा उत्तर अटलांटिक महासागरात विपुलतेने आढळतो. कवचधारींपैकी यूफॉसियन नावाचे चमकणारे प्राणीही प्लवकांत अंतर्भूत असून समुद्रातील निळा व फिनबॅक देवमासा यासारख्या फार मोठ्या प्राण्यांचे ते मुख्य भक्ष्य आहेत. त्यांच्यावर पोसलेल्या या मोठ्या माशांचे वजन दोन वर्षांत सु. ६०-७० टन होते आणि त्यांना लैंगिक प्रौढावस्था येते. जी. ओ. सार्स यांनी असे दाखवून दिले आहे की, बहुतेक सर्व मोठ्या माशांची अंडी व त्यांचे डिंभ प्लवकांत समाविष्ट होतात. हेरिंग माशांनी अंडी समुद्रतळाशी घातली, तरी त्यांतून आलेले डिंभ त्वरित वरच्या प्रवाहात येतात.

आ. २. काही सूक्ष्म वनस्पति-प्लवक : (१) नॉक्टिल्यूका, (२) पायरोसोमा, (३) कॅरिनॅरिया, (४) टेरोट्रॅकिया, (५) व्हेलिजर डिंभ, (६) प्लूटियस डिंंभ. (७) झोइया डिंभ, (८)साल्पा, (९) डोलिओलम.


प्लवकांचा प्रसार व त्यांच्या हालचाली : प्लवकविहीन पाण्याचे साठे फारच क्वचित आढळतात ह्या साठ्यांतील प्रकाशयुक्त थरांतच वनस्पति-प्लवक राहतात. त्याउलट प्राणि-प्लवक संख्येने कमी परंतु आकारमानाने मोठे असून अधिक खोलीवर असतात. १८६८-७० सालाच्या पूर्वी, ५०० मी. पेक्षा अधिक खोल पाण्यात जीवसृष्टी अभावाने, अशी समजूत होती परंतु नंतर विशेषतः १९५०-५२ सालाच्या सुमारास, समुद्रातील भिन्न खोलीवरच्या सजीवांचे प्रकार भिन्न असले, तरी केवळ खोलपणामुळे जीवन अशक्य होत नाही, असे आढळून आले. खोल पाण्यात एकंदरीने सजीवांची संख्या बरीच कमी असते, मग ते नितलवासी, तरणक किंवा प्लवक यांपैकी कोणतेही असोत, याचे कारण त्यांपैकी अनेक प्राण्यांचे जीवन (निर्वाह) पृष्ठभागाजवळ असलेल्या वनस्पति-प्लवकांवर अवलंबून असते. काही अपवाद वगळल्यास फिकट निळे किंवा पारदर्शक प्राणी बहुधा पृष्ठभागाजवळ व त्याउलट लाल व जांभळ्या रंगाचे प्राणी अधिक खोल पाण्यात राहतात. गर्द शेंदरी व काळे प्राणी फार खोल पाण्यातच आढळतात. डोळ्याच्या बाबतीतील अनित्यता व प्रकाशमान (प्रदीप्त) अवयवांची जटिलता खोल पाण्यात राहणाऱ्या काही प्राण्यांतच दिसते. ज्ञानेंद्रियांचे इतर काही प्रकारही त्यांमध्ये असल्याचे अलीकडे (सु. १९६० मध्ये) आढळले आहे. प्लवकांत आढळणाऱ्या सजीवांत तरंगण्यास उपयुक्त अशी संरचना किंवा अशा अन्य योजना आढळतात.  

उदा., शरीरघटकांत तैल बिंदू, शरीरवरणावर टोकदार उंचवटे इत्यादी.

प्लवकांतील अनेक प्राण्यांत प्रकाशाच्या प्रभावामुळे दर दिवशी नियमाने वर-खाली (पृष्ठभागाकडे व तळाकडे) जाण्या-येण्याची प्रवृत्ती आढळते. प्रकाशाच्या मंदपणाबरोबर ते वरवर येतात व सकाळपासून नंतर प्रकाश-तीव्रतेच्या वाढीबरोबर ते अधिकाधिक खाली जातात. कधीकधी मोठे प्राणि-प्लवक आणि त्यांच्याबरोबर खोलीवरचे काही मासे यांचा एक मिश्र थर नियमितपणे रात्री खालून वर व दिवसा वरून खाली जातो व त्याचे कारण प्रकाश-प्रभाव व गुरूत्वाकर्षण यांच्याशी झालेली प्रतिक्रिया असावी, तसेच वरच्या पृष्ठभागातील वसस्पतिज अन्नाशी संपर्क राखण्यातील दैनिक लयबद्धता ही असावी असे मानतात. प्लवकातील प्राण्यांच्या वर-खाली होण्याच्या हालचालीत अन्नाची गरज, संरक्षण, पाण्याचा वेग व दिशा यांचा प्रभाव विशेषकरून कारणीभूत होतो, असे आढळले आहे. यामुळेच त्यांच्या हालचालीच्या उभ्या कक्षा मिन्नभिन्न मर्यादा दर्शवितात. प्रकाशाशिवाय प्लवकांच्या पाण्यातील वाटणीवर तापमानाचा परिणाम मुख्यत्वेकरून होत असावा असे मानतात. कित्येक प्राणी उन्हाळ्यात अधिक खोलीवर आणि हिवाळ्यात अधिक पृष्ठाजवळ आढळतात तसेच कित्येक प्राणि-प्लवक ध्रुवीय क्षेत्रात पृष्ठाभागाजवळ आणि उष्ण कटिबंधात अधिक खोल पाण्यात आढळतात कारण तेथे सतत कमी तापमान असते. उष्ण कटिबंधामार्गे उत्तरेकडून दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करताना पृष्ठाभागाजवळच्या पाण्यात लक्षणीय फरक आढळतात. कोणत्याही एका वेळी उच्च अक्षांशांतील प्रदेशांत भरपूर प्लवक आढळतात. त्याच वेळी उष्ण कटिबंधातील पाण्यात त्यांची संख्या बरीच कमी असते. तथापि एकंदरीने उष्ण कटिबंधी प्लवकांतील सजीवांत विविधता अधिक असल्याने सागरी जीवविज्ञानच्या अभ्यासकांना ते सतत आकर्षक ठरले आहेत. तसेच तेथील गरम पाण्यातील जीवांत चयापचयाची (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींची) गती (द्रुत) असल्याने त्यांच्यापासून उत्पादनही अधिक होते परिणामी काही जलाशयांत माशांची विपुलता आढळते.

प्लवकांतील काही सजीवांचा प्रसार सार्वत्रिक आहे, तथापि परिस्थितीप्रमाणे त्यांपैकी कित्येकांच्या प्रसाराला मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक समुद्राच्या प्लवकांतील सजीवांची संख्या व जाती यांचे प्रमाण (संघटना) भिन्नभिन्न असते. यामुळेच अनेक भिन्न ठिकाणांहून जमा केलेल्या नमुन्यांतील जातींचे मूळ ठिकाण व तेथील खोली यांचा बरोबर अंदाज करता येतो. पाण्याच्या कमीजास्त खारटपणामुळेही भिन्न ठिकाणी असलेल्या प्लवकांत फरक पडतात परिणामी तटीय पाण्यातील प्राणी व वनस्पती (तरणक) व अधिक दूरचे महासागरी प्लवक यांमध्ये संघटनात्मक फरक पडतात. समशीतोष्ण प्रदेशातील व ध्रुवीय समुद्रातील तटीय व सागरी पाण्याच्या संगम (मिश्र) क्षेत्रात जगप्रसिद्ध अतिसंपन्न प्लवक आढळतात, याचे कारण त्या त्या मिश्रक्षेत्रात पोषक लवणे भरपूर मिळाल्याने वनस्पति-प्लवकांची वाढ उत्तम होते व प्राणिसंख्या विपुल होते. परिणामी ही क्षेत्रे मासेमारीस फार उपयुक्त ठरतात आणि मत्स्योद्योगीची भरभराटही तेथेच होते. जगातील पहिल्या क्रमांकाचा मत्स्योद्योग (उदा., पेरूजवळची अँकोव्हेटा मासेमारी) व मुख्यतः काही सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून बनणाऱ्या ⇨ ग्वानो या खतपदार्थाचा पेरूच्या आसपास असलेला उद्योग हे अतिसंपन्न वनस्पति-प्लवक क्षेत्राजवळ भरभराटीस आले आहेत. तटीय व महासागरी पाणी उथळ व खोल पाणी यांच्या-प्रतिक्रिया प्लवकांच्या संपन्नतेवर व संघटनेवर परिणामकारक होत असल्याने त्यांच्या सखोल अभ्यासाला चालना मिळाली असून त्यातील प्रगतीचा एक टप्पा शरकृमीचे उदाहरण दिले जाते. ह्यासारख्या मोठ्या निर्देशक प्राण्याच्या जातींच्या शोधाने मिन्न वर्षात दरवेळी विशिष्ट ठिकाणी आढळणाऱ्या पाण्यातील प्लवकांची सापेक्ष संपन्नता व वितरण निश्चित करणे सुलभ झाले आहे.

आ. ३. प्लवक-संकलनाची उपकरणे : (अ) जाळे (लांबी सु.२.४ मी. व व्यास सु. ०.९ मी.): (१) धातूची बादलीसारखी नळी, (२) गळचेपी दोरी (आ) सतत प्लवक नोंद करणारा अभिलेखक : (१) प्लवक प्रवेश, (२) रेशमी पट्टी, (३) प्लवक साठविण्याची टाकी, (४) दंतचक्र पेटी.

अनेक ठिकाणी व भिन्न खोलींवर आढळणाऱ्या भिन्न प्लवकांच्या अभ्यासाकरिता त्यांचे नमुने जमवून त्यांचे तपशीलवार निरीक्षण करण्यास योग्य साधनसामग्री आवश्यक असते. संकलनाकरिता प्रथम योहानेस म्यूलर (१८०१-५८) यांनी विशिष्ट प्रकारचे साधे शंकूसारखे जाळे उपयोगात आणले होते. समुद्राच्या पृष्ठभागावरून याच्या साहाय्याने त्यांनी प्लवक जमा केले होते. त्यात व हल्ली वापरात असलेल्या विविध प्रकारच्या साधनांत तत्त्वतः फारच थोडा फरक आहे. मूळच्या जाळ्याच्या निमुळत्या टोकास एक काचेची नळी असून तीत प्लवक गाळून जमा होतात व सुरक्षित राहतात. ही जाळी पूर्वी रेशमी दोऱ्यांची बनवीत परंतु १९६० च्या मध्यापासून रेशमीऐवजी मुख्यत्वे नायलॉन, रेयॉन यांसारखे मानवनिर्मित धागे उपयोगात आणले गेले आहेत. हल्ली काचेच्या नळीऐवजी धातूची रूंदट ‘बादली’ सारखी नळी वापरतात [आ. ३ (अ)]. जाळ्याला गळचेपी दोरी असते व तिच्या साहाय्याने जाळीचे रूंद तोंड बंद करता व उघडता येते. ह्याशिवाय अधिक जटिल (गुंतागुंतीची) उपकरणे (‘प्लवक निर्देशक’ सतत प्लवक नोंद करणारा ‘अभिलेखक’ इ.) भिन्न प्रकारच्या माहितीच्या संदर्भात उपयोगात आहेत. अभिलेखकात [आ. ३ (आ)] प्लवकाचे नमुने सतत घेण्याकरिता एका फिरत्या रेशमी पट्टीचा उपयोग करतात. या उपकरणांच्या साहाय्याने भिन्नभिन्न क्षेत्रांतील प्लवक-समुदायांचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास तर बिनचूक केला जातोच, शिवाय मत्स्यसंकलन व परिस्थितीचे निरीक्षण यांची तुलना करण्यास प्रमाणित माहिती उपलब्ध होते.


प्लवक व अन्नपुरवठा : सागरी जीवनातील प्लवकांचे महत्त्व समजू लागून बराच काळ लोटला असला, तरी १९३० सालानंतरच्या दशकापर्यंत त्याच्या व्यावहारिक उपयोगात फारशी प्रगती झाली नव्हती. अनेक प्रकारच्या प्लवकांची भरपूर माहिती उपलब्ध होईपर्यंत त्यांचे व्यापारी महत्त्व पटवून देणे शास्त्रज्ञांना कठीण गेले. उदा., हेरिंग माशांचे प्लवकांशी असलेले साहचर्य लक्षात येऊन बरीच वर्षे झाली, तरी त्यांच्या जीवनात ते सतत प्लवकांवर उपजीविका करतात, ही गोष्ट अनेक माशांच्या पोटातील अन्न तपासल्यावरच कळून आली. हे मासे प्रथम लहान प्राण्यांवर व नंतर मोठ्यांवर उपजीविका करतात. ह्या माशांनी प्लवकांतून मिळविलेल्या तेलामुळेच त्यांचे मांस उत्तम मानवी अन्न म्हणून गणण्यात आले आहे इतकेच नव्हे, तर हे तेल त्यांच्या (माशांच्या) प्रजोत्पादनाशी निगडित असावे असे दिसते. पावसाळा ते उन्हाळा या काळात हे मासे कोपेपोडांवर (विशेषतः कॅलॅनस) निर्वाह करतात आणि त्यावरच त्यांची वाढ अवलंबून असते. मत्स्योद्योगातील यशापयशावर बव्हंशी या कोपेपोडांचा प्रसार व विपुलता आणि तसेच प्रत्यक्षात वनस्पति-प्लवल यांचा प्रभाव पडतो, असे आढळले आहे.

सागरी जीवविज्ञानासंबंधीच्या माहितीचे संकलन करणाऱ्या संस्थांतून भिन्न प्रकारच्या प्लवकांच्या संरचना व प्लवकजीवनास आवश्यक असणारी परिस्थिती यांविषयी महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आलेले आहे. या संस्थांतून सागरी जीवनातील वार्षिक चक्रांचे स्वरूप अभ्यासण्यात आलेले आहे. अशा एका संस्थेतील प्रयोगशाळेत जे. ई. ॲलन यांनी वनस्पति-प्लवकांची संपूर्ण व मुक्त वाढ होण्याकरिता आवश्यक ती पोषक प्रथमतः उपयोगात आणली. त्यांना असे आढळले की, स्थलवासी वनस्पतींप्रमाणेच वनस्पति-प्लवक नायट्रेटे व फॉस्फेट या लवणांच्या पुरवठ्यास फार चांगला प्रतिसाद देतात. अलीकडील संशोधनांचा निष्कर्ष असा की, वनस्पति-प्लवकांतील काहींना कार्बनी पदार्थाचे सूक्ष्म प्रमाण अत्यावश्यक असून इतरांना ते फक्त हितकारक असते (उदा., ब१२ जीवनसत्व). हे सर्व कार्बनी पदार्थ समुद्रातील सूक्ष्मजंतूंनी व इतर सजीवांनी टाकलेले असतात. तसेच काही इतर उत्सर्जित पदार्थ काहींना हानिकारक व इतरांना हितकारक असल्याचे आढळले आहे. यावरून सागरी परिस्थितीची [→ परिस्थितिविज्ञान] जटिलता प्रत्ययास येते. पोषक लवणांचा (खतासारखा) उपयोग करून आजपावेतो काही शैवलांचे संवर्धन केले गेले आहे व त्यावरून मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम करण्यात यशःप्राप्तीची आशा उत्पन्न झाली आहे. क्लोरेला या एककोशिक शैवलाचे नैसर्गिक परिस्थितीपेक्षा अधिक दाटपणे संवर्धन केल्याने असे दिसून आले की, मरुस्थलातही (रुक्ष क्षेत्रातही) तेथील स्वच्छ व सहज उपलब्ध होणाऱ्या सूर्यप्रकाशात त्याचे संवर्धन केल्यास त्यापासून मोठ्या प्रमाणावर मेद (स्निग्ध पदार्थ) व प्रथिने यांची निर्मिती होऊ शकेल. ही बाब आर्थिक दृष्ट्या कितपत फायदेशीर होऊ शकेल यासंबंधी अधिक संशोधन व्हावे लागेल. याचप्रमाणे नैसर्गिक समुद्रजलाने भरलेल्या मोठ्या तळ्यात पोषक लवणे (खताप्रमाणे) घालून कालवांचे अधिक चांगले प्रजोत्पादन करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत, अशा तळ्यांतील विपुल वनस्पति-प्लवकांवर कालवांच्या डिंभांचे अधिक चांगले पोषण झाल्यावर त्यांचे स्थलांतर व्यापारी दृष्ट्या सोयीस्कर अशा कालव-क्षेत्रात करून त्यांची वाढ केली आहे. अशा रीतीने केलेल्या अनेक यशस्वी प्रयोगांनी कृत्रिम पोषणाचे अनेक फायदे प्लवकांतील प्राण्यांना व वनस्पतींना आणि नितलवासीयांनाही झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून मनुष्य समाजालाही कृत्रिम ’कृत्रिम मत्स्यकृषी’ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर झाल्याचे आढळले आहे. उष्ण-कटिबंधातील खाजणासारख्या निवडक क्षेत्रांत शाकाहारी माशांचा उपयोग करून विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धात प्लवकसंवर्धन व तदंतर्गत मत्स्यसंवर्धन या बाबतीत मोठी प्रगती केली गेली दर हेक्टरी पाच टनांपर्यंत मत्स्योत्पादन होत असल्याचे आढळले आहे. समशीतोष्ण कटिबंधात असे कृत्रिम खत घालून केलेले मत्स्योत्पादन आर्थिक दृष्ट्या कितपत फायदेशीर होईल व त्याची आवश्यकता किती हा संशोधनाचा एक विषय आहे, कारण तेथे नैसर्गिक परिस्थितीतच मत्स्योद्योग फायदेशीर झालेला आहे. जास्त प्लवक म्हणजे जास्त मासे, असे दिसून आल्यावरून प्लवक हा एक अत्यंत म्हत्त्वाचा औद्योगिक विषय बनला आहे, हे मात्र निर्विवाद आहे. जगातील सर्व महासागरांतील मिळून एकूण वनस्पती-प्लवकांचे १०११ ते १०१२ टन असावे, असा अंदाज केला गेला आहे. याचा अत्यल्पांश भाग खाद्य मत्स्यरूपाने मनुष्याला उपलब्ध होतो. प्राणि-प्लवकाचे काही प्रकार (विशेषतः कवचधारी प्राणी) कच्च्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात खाद्य असून त्यांचे उत्पादनही मोठे आहे. व्यापारी प्रमाणावर यांचे संवर्धन करण्याकरिता ज्या योजना आखण्यात येतात त्यांतील मुख्य अडचण म्हणजे प्लवकांतील सूक्ष्म वनस्पती व काही प्राणी गाळण्यासंबंधीची असल्याने समुद्रातील सर्वत्र पसरून असलेल्या अन्नाच्या या प्रचंड साधनसामग्रीच्या साठ्याचा हवा तितका उपयोग करून घेणे कठीण बनले आहे. हेरिंग व देवमासा यांना नैसर्गिक स्वयंचलित गाळण्या आहेत. कार्यक्षम व्यापारी गाळण्या (गालन योजना) बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

पहा : क्रस्टेशिया जीवविज्ञान, सागरी डायाटम प्रोटोझोआ शैवले.

संदर्भ : 1. Dawson, E. Y. Marine Botany : An Introduction, New York, 1966 .

           2. Hardy, A. C. The Open Sea : It’s Natural History : The World of Plankton, London, 1956.

           3. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, London, 1963.

           4. Storer, T. I. Usinger, R. L. General Zoology, New York, 1965.

सप्रे, अ. ब. परांडेकर, शं. आ.