प्रोटोकार्डेटा : कॉर्डेटा (रज्जुमान) संघातील एक प्राणिसमूह [⟶ कॉर्डेटा]. कॉर्डेटा संघातील प्राण्यांची क्लोमदरणे (कल्ल्यांच्या खाचा), पृष्ठीय (वरच्या बाजूचे) नलिकाकार तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), पृष्ठरज्जू (शरीराच्या वरच्या भागात असणारा, पेशींचा बनलेला, लवचिक आधार-अक्ष किंवा कणा), आंत्रगुहाजन्य देहगुहा (आतड्याच्या पोकळीतून निर्माण झालेली शरीरातील पोकळी) व पश्चगुद पुच्छ (गुदद्वाराच्या मागे असणारी शेपटी) ही प्रधान लक्षणे या प्राणिसमूहातही आढळतात. तथापि अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांप्रमाणे ह्यातही पाठीचा कणा नसतो. यांना सर्वसाधारणपणे कॉर्डेटा संघातील निम्न प्रकारचे प्राणी समजले जाते.

पृष्ठरज्जूच्या वाढीनुसार प्रोटोकॉर्डेटा समूहाचे ⇨हेमिकॉर्डेटा, ⇨ट्युनिकेटा (युरोकॉर्डेटा) व ⇨ सेफॅलोकॉर्डेटा असे तीन उपसंघ सामान्यतः केले जातात. तथापि एकूण शरीररचना, भ्रूणविज्ञानविषयक माहिती, काही लक्षणांवरून अपृष्ठवंशी प्राण्यांशी असलेले त्यांचे साम्य इ. कारणांमुळे आजकाल बहुतेक प्राणिशास्त्रज्ञ वरील प्रचलित वर्गीकरणाशी सहमत होत नाहीत. त्यामुळे वरील उपसंघापैकी हेमिकॉर्डेटा समूह कॉर्डेटा संघातून काढून अपृष्ठवंशी प्राणिसंघांतील ⇨एकायनोडर्माटा संघानंतर स्वतंत्र संघ म्हणून गणण्याची प्रथा पडली आहे. [⟶ प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग].

परांजपे, स. य.