प्रेव्हो, आंत्वान–फ्रांस्वा, लाबे : (१ एप्रिल १६९७ – २५ नोव्हेंबर १७६३). फ्रेंच कादंबरीकार. उत्तर फ्रान्समधील एदी ह्या गावी जन्मला. धर्मोपदेशक होणाच्या दृष्टीने जेझुइटांकडून त्याने शिक्षण घेतले. तथापि ते सोडून काही काळ सैन्यात नोकरी केली पुढे ती सोडून त्याने बेनेदिक्तिन पंथात प्रवेश केला परंतु मठातील कडक शिस्तीचे वातावरण न मानवल्यामुळे तेथून त्याने पलायन केले (१७२८). ह्या कृत्यामुळे होऊ शकणाऱ्या कडक कारवाईला भिऊन काही काळ त्याने हॉलंड आणि इंग्लंड ह्या देशांत काढला. १७३४ मध्ये तो मायदेशी परतला. लेखनालाच त्याने वाहून घेतले. मेम्वार दलोम द कालिते (७ खंड, १७२८ – ३१, इं. भा. मेम्वार्स ऑफ अ मॅन ऑफ क्वालिटी, २ खंड, १७४२) ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर ल फिलोझोप आंग्लॅ उ ले मेम्वार द क्लीव्हलॅंड (१७३२ – ३९, इं. शी. इंग्लिश फिलॉसॉफर ऑर द मेम्वार्स ऑफ क्लीव्हलँड), ल दॉय्यां द किलरीन (१७३५-४०, इं. भा. द डीन ऑफ किलरीन, १७४२) ह्यांसारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. तथापि कादंबरीकार म्हणून प्रेव्होची कीर्ती मुख्यतः त्याच्या लिस्त्वार द्यु शव्हालिए दे ग्रिय ए द मानाँ लेस्को (इं. भा. मानाँ लेस्को, १९४९) ह्या कादंबरीवर अधिष्ठित आहे. मुळात ही कादंबरी म्हणजे मेम्वार्स दलोम द कालिते ह्या कादंबरीचा ७ वा खंड होय. तथापि १७५३ पासून एक स्वतंत्र कादंबरी म्हणून तो प्रकाशित होत आहे. शव्हालिए द ग्रिय हा सरदारघराण्यातील एक सच्छील, नीतिमान तरुण स्वैराचाराकडे कल असलेल्या एका तरुण मुलीच्या प्रेमात पडतो. तिचा स्वैराचार आणि प्रतारणा सहन करून आपल्या प्रेमाशी तो कसा एकनिष्ठ राहतो, हे ह्या कादंबरीत दाखविले आहे. तीत मनोविश्लेषणाबरोबरच तत्कालीन समाजातील अनीती आणि भोगप्रियता ह्यांचे वास्तववादी चित्रण आढळते. स्वच्छंदतावादी आणि वास्तववादी अशा दोन्ही प्रवृत्ती ह्या कादंबरीत दिसून येतात. प्रेव्होची शैली अकृत्रिम आणि सुबोध अशी असून भावनाविवश न होता उत्कट प्रेमभावनेचे प्रभावी चित्रण त्याने केले आहे.
इग्रंज कादंबरीकार सॅम्युएल रिचर्डसन ह्याच्या काही कादंबऱ्यांचे फ्रेंच अनुवाद प्रेव्होने केले आहेत. इस्त्वार जेनेराल द व्हॉय्याज (१७४६) हा प्रवासग्रंथही त्याने लिहिला आहे. शेतीयी या गावी तो निधन पावला.
सरदेसाय, मनोहरराय