प्रेलॉग, व्ह्लाडिमीर : (२३ जुलै १९०६ – ). स्विस रसायनसास्त्रज्ञ. १९७५ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक यांना आणि ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन कॉर्नफोर्थ यांना विभागून मिळाले.
प्रेलॉग यांचा जन्म यूगोस्लाव्हियातील सारायेव्हो येथे झाला. त्यांचे शिक्षण प्राग येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व स्कूल ऑफ केमिस्ट्री येथे झाले. १९२९ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविल्यावर १९३५ पर्यंत त्यांनी औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ म्हणून नोकरी केली. त्यानंतर १९३५ ते १९४१ या कालखंडात त्यांनी झाग्रेब विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. नाझींनी यूगोस्लाव्हिया पादाक्रांत केल्यावर त्यांनी १९४२ मध्ये स्वित्झर्लंडमधील झुरिक येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. तेथे १९५१ पासून रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि १९५७ ते १९६६ मध्ये रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले. सिबा-गायगी रसायन-उद्योगाचे ते संचालक आहेत.
त्यांनी कित्येक ⇨ अल्कलॉइडे नैसर्गिक पदार्थांपासून वेगळी केली आणि त्यांच्या संरचना (रेणूतील अणू एकमेकांस जोडण्याची पद्धत व त्रिमितीय विन्यास [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र] निश्चित केले. या त्यांच्या कार्यामुळे संशोधनासाठी एक व्यापक क्षेत्र निर्माण झाले. रानडुकराच्या वृषणांपासून (पुं-प्रजोत्पादक ग्रंथीपासून) आणि गाभण घोडीच्या मूत्रापासून मिळणाऱ्या अभिनव संयुगांच्या संरचना त्यांनी ठरविल्या व संश्लेषणाने (घटक द्रव्यांपासून किंवा साध्या व ज्ञात संयुगांपासून रासायनिक विक्रियांनी ते संयुग बनवून) त्या सिद्ध केल्या. सूक्ष्मजीवांच्या चयापचयात (शरीरात सतत घडून येणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) निर्माण होणाऱ्या व जैव गुण असलेल्या काही संयुगांच्या संरचना कार्बन अणूंच्या मोठ्या वलयापासून बनलेल्या व जटिल (गुंतागुंतीच्या) असतात. अशी कित्येक संयुगे प्रेलॉग यांनी वेगळी केली आणि त्यांच्या संरचना व त्रिमितीय विन्यास निश्चित करण्यात यश मिळविले आणि काहींचे संश्लेषणही केले. ज्या संयुगांच्या संरचनांमध्ये ८ ते ११ कार्बन अणूंची वलये आहेत, अशा संयुगांचे काही गुणधर्म नेहमीच्या गुणधर्माहून वेगळे असतात. हे वेगळेपण त्यांमधील एकबंधाने जोडल्या गेलेल्या कार्बन अणूंच्या घूर्णनावर (अक्षीय भ्रमणावर) मर्यादा पडल्यामुळे आलेले असते, हे त्यांनी दाखविले. काही वलयांतर्गत विक्रियाही या संशोधनातून प्रथमच ज्ञात झाल्या. त्यांनी केलेल्या असममित संश्लेषणाविषयक [⟶ त्रिमितीय रसायनशास्त्र] कार्याने अनेक संयुगांचे निरपेक्ष विन्यास (त्रिमितीय मांडणीत अणूंच्या अथवा अणुगटांच्या प्रत्यक्ष असलेल्या स्थिती) ठरविता आले. रासायनिक विक्रियांच्या यंत्रणा जाणण्यासाठीही असममित संश्लेषण वापरता येऊ लागले. एंझाइमे व को-एंझाएमे [⟶ एंझाएमे] यांच्या पदार्थांवर होणाऱ्या विक्रिया त्रिमितीय विन्यासाशी कशा निगडित असतात, यासंबंधी महत्त्वाचे निष्कर्ष त्यांच्या संशोधनकार्यामुळे काढता आले. अनेक असममित कार्बन अणू ज्यांच्या संरचनांत आहेत अशा संयुगांच्या त्रिमितीय विन्यासाचे नामकरण करण्याची एक पद्धतही त्यांनी बसविली. क्ष-किरण तंत्रे वापरून कित्येक प्रतिजैव पदार्थांच्या (सूक्ष्मजंतूंची वाढ थोपविणाऱ्या द्रव्यांच्या, अँटिबायॉटिक्सच्या) संरचना त्यांनी निश्चित केल्या.
अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, केमिकल सोसायटी (लंडन), अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (वॉशिंग्टन), फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (स्वित्झर्लंड) व रॉयल आयरिश ॲकॅडेमी या संस्थांचे ते सन्माननीय सदस्य आणि ग्रेट ब्रिटनची रॉयल सोसायटी, सोव्हिएट ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, ॲकॅडेमी डी लिन्सी (रोम), इन्स्टिट्यूटो लोंबार्डो (मिलान) व रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्स यांचे ते परदेशी सदस्य आहेत.
त्यांना झाग्रेब, लिव्हरपूल, पॅरिस व ब्रुसेल्स या विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि केंब्रिज विद्यापीठाने सन्माननीय डी.एस्सी. पदवी बहाल केली आहे. यांशिवाय व्हर्नर पदक, स्तास पदक, राइस विद्यापीठाचे सन्मान पदक, डेव्ही पदक व होफमान पदक आणि मार्से बेनॉइस्ट व रॉजर ॲडम्स पारितोषिक हे बहुमान त्यांना मिळाले आहेत.
त्यांचे संशोधनविषयक लेख Helvetica Chimica Acta व इतर शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.
ठाकूर, अ. ना.