प्रीश्विन, मिखाइल मिखाइलोविच : (५ फेब्रुवारी १८७३-१७ जानेवारी १९५४). रशियन साहित्यिक. ऑर्लाव्ह प्रांतातील खुश्चॉव्हो येथे जन्म. शालेय शिक्षण तूमन आणि यिलाबूग येथे. त्यानंतर ‘रीगा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट’ मधील रासायनिक कृषिविभागात प्रवेश (१८९३). १८९७ मध्ये राजकीय कारणांसाठी त्याला अटक झाल्यामुळे त्याच्या शिक्षणात व्यत्यय आला. तथापि बंदीवासातून सुटका झाल्यानंतर, १९०० मध्ये, तो जर्मनीस गेला आणि तेथील लाइपसिक विद्यापीठातून त्याने कृषिविद्येतील पदवी मिळवली (१९०२). तिसांहून अधिक वर्षे कृषितज्ञ म्हणून त्याने काम केले. रशियन क्रांतीनंतरच्या काळात अध्यापन आणि पत्रकारिता ह्या व्यवसायांतही तो होता.

मानवतावाद आणि उत्कट निसर्गप्रेम ह्या प्रीश्विनच्या लेखनामागील प्रेरणा. त्याने सशब्द केलेल्या सुंदर आणि वैविध्यपूर्ण निसर्गचित्रांसाठी तो मुख्यतः ओळखला जातो. ही चित्रे रेखाटित असताना श्रमजीवनाच्या व्यापक संदर्भाचे भान प्रीश्विनने सतत राखलेले आहे आणि एक सतेज आशावादही सदैव जोपासलेला आहे. लेस्नाया कापेल (१९४३, इं. शी. फॉरेस्ट ड्रॉप) ह्या नावाने प्रसिद्ध झालेला त्याच्या शब्दचित्रांचा संग्रह ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. प्रीश्विनच्या कथात्मक साहित्यात काश्च्येवा त्सेप (१९२४, इं. शी. काश्चेव चेन) ही आत्मचरित्रात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. एका दुष्ट शक्तीच्या शृंखलांत बद्ध झालेल्या जगाची मुक्तता करावयास निघालेला नायक प्रीश्विनने ह्या कादंबरीत रंगविला आहे. ‘क्रेन-शेन’ (१९३२, इं. भा. जेन शेंग: द रूट ऑफ लाइफ, १९३६) ही सुखाच्या शोधाची काव्यात्म कथा आहे. लहान मुलांसाठीही त्याने कथा लिहिल्या. ‘शिप्टिंबर ग्रोव्ह’ सारखी त्याची कथा ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. रानावनांतून आपल्या पित्याचा शोध घेणाऱ्या दोन मुलांची ही कहाणी आहे. प्रीश्विनच्या अन्य उल्लेखनीय लेखनात व्ह क्रायु निपुगान्निख प्तीत्स (१९०७, इं. भा. इन द रीजन ऑफ अन्ट्रवल्ड बर्डस) आणि रढनिकी बिरेंदेया (१९२०, इं. शी. द सोअर्सिस ऑफ बिरेंदेया) ह्यांचा समावेश होतो. व्ह क्रायु… मध्ये त्याचे निबंध आणि शब्दचित्रे संगृहित आहेत. कारेलियाच्या उत्तेरकडील प्रदेशात प्रवास करून आल्यानंतर प्रीश्विनने ही शब्दचित्रे लिहिली. ह्या प्रदेशातील लोकजीवन हा ह्या शब्दचित्रांचा मुख्य विषय होय. मानवी सर्जनशीलतेचा विकास घडवून आणण्याच्या कामी इतिहासाचे ज्ञान आणि भूतकाळाचा सांस्कृतिक आशय किती महत्त्वाचा आहे रढनिकी बिरेंदेयात सांगितले आहे. मॉस्को येथे तो मरण पावला.

पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)