प्रॉचोरॉव्ह, अल्यिक्सांदर म्यिखायलव्ह्यिच : (११ जुलै १९१६- ). रशियन भौतिकीविज्ञ. ⇨पुंज इलेक्ट्रॉनिकीमधील मूलभूत संशोधनासंबंधीच्या महत्त्वाच्या कार्याबद्दल १९६४ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक प्रॉचोरॉव्ह व एन्. जी. बासव्ह यांना मिळून अर्धे व चार्ल्‌स एच्. टाउन्स या अमेरिकन भोतिकीविज्ञांना अर्धे असे विभागून देण्यात आले. या कार्यातूनच ⇨मेसर व ⇨लेसर यांचा व त्या तत्त्वावर चालणाऱ्या आंदोलक व विवर्धक या साधनांचा विकास झाला. त्यांचा उपयोग ज्योतिषशास्त्र, अवकाशप्रवास, संदेशवहन, वैद्यक इ. विविध क्षेत्रांमध्ये होत आहे.

झारच्या अमदानीत क्रांतिकारक चळवळींशी संबंध आल्यामुळे प्रॉचोरॉव्ह कुटुंब रशियातून परागंदा होऊन ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतातील अथेर्टन येथे स्थायिक झाले. तेथेच अल्यिक्सांदर यांचा जन्म झाला. रशियन राज्यक्रांतीनंतर हे कुटुंब परत रशियामध्ये आले. अल्यिक्सांदर यांचे सर्व शिक्षण लेनिनग्राड विद्यापीठात झाले व १९३९ साली त्यांनी त्या विद्यापीठाची पदवी संपादन केली. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर १९४१ मध्ये ते लाल सैन्यात दाखल झाले परंतु जखमी झाल्यामुळे १९४४ मध्ये त्यांना लष्करी सेवेतून मुक्त करण्यात आले. ते १९४६ मध्ये मॉस्को येथील पी. एन्. ल्येब्येड्येव्ह फिजिकल इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ साहाय्यक म्हणून रुजू झाले. तेथेच १९५१ मध्ये त्यांनी भौतिकी विषयातील पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. १९५४ मध्ये ल्येब्येड्येव्ह इन्स्टिट्यूटमधील ऑसिलेशन लॅबोरेटरीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मॉस्को येथील लमनॉसॉव्ह विद्यापीठात ते भौतिकीचे प्राध्यापक झाले.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांच्या कार्याबद्दल त्यांना इतर अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे : लेनिन पदक (१९५९), रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या शुद्ध व अनुप्रयुक्त भौतिकी विभागाचे सदस्यत्व (१९६०-६६), रशियन विश्वकोशाचे प्रमुख संपादक (१९६९), पी. एन्. ल्येब्येड्येव्ह फिजिकल इन्स्टिट्यूटचे उपसंचालक (१९७२), भौतिकी आणि ज्योतिषशास्त्र या विभागांचे ॲकॅडेमीशियन-सचिव (१९७३), सोव्हिएट रशियामधील मजूर वर्गात काम केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले व ऑर्डर ऑफ लेनिन हा बहुमान दोनदा देण्यात आला.

मेसर व संलग्न विषयांखेरीज ‘चुंबकीय अनुस्पंदन’ [⟶ अनुस्पंदन] यासंबंधीही त्यांचे अनेक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ब्रिटन, अमेरिका वगैरे देशांतून होणाऱ्या वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, मनमिळाऊ वृत्ती आणि अभिनव कल्पनांबद्दल चर्चा करण्याची तयारी या त्यांच्या गुणांमुळे विदेशातही त्यांना अनेक मित्र व चहाते जोडता आले.

फाळके, धै. शं.