प्रदोष : प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रारंभ होण्याचा काल. अमरकोषानुसार प्रदोष म्हणजे रजनीमुख. ‘दोषा’ म्हणजे रात्र आणि प्रदोष म्हणजे ‘दोघे’ चा प्रारंभ. भिन्नभिन्न मतांनुसार सूर्यास्तानंतर दोन, तीन वा सहा घटिका (१ घटिका = २४ मिनिटे) हा प्रदोषाचा काल होय. एखादी तिथी दुसऱ्या तिथीने ‘विद्धा’ असेल, तर तिथिनिर्णय करताना प्रदोषकालाला महत्त्व असते. उदा., शिवरात्रीचा निर्णय करताना ज्या दिवशी प्रदोषकाली चतुर्दशी असेल त्या दिवशी शिवरात्र समजावी, या अर्थाचे वचन हेमाद्रीने उद्‌धृत केले आहे. नक्तव्रत (दिवसा न जेवता रात्री जेवणे) करताना प्रदोषकाली जी तिथी असेल, ती त्या दिवसाची तिथी मानावयाची असते.

शिवपूजेच्या दृष्टीने प्रदोषकालाचे (आणि विशेषत त्रयोदशीच्या प्रदोषकालाचे) महत्त्व अनन्यसाधारण असते. प्रदोषकाली कैलासावर सर्व देव शिवाची पूजा करतात, त्यावेळी नंदीच्या शरीरात पृथ्वीवरील सर्व तीर्थे उपस्थित असतात, त्यावेळच्या शिवपूजेने सर्व पापे नष्ट होतात व पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते इ. प्रकारे पुराणांनी व धर्मनिबंधांनी प्रदोषमाहात्म्य सांगितले आहे. प्रदोषव्रत नावाचे शिवाचे एक काम्यव्रतही आहे. या व्रतात त्रयोदशीला दिवसभर उपवास करुन प्रदोषकाली शिवपूजन करावयाचे असते. विशेषतः शनिवारी, सोमवारी व मंगळवारी येणाऱ्या त्रयोदशींचे अनुक्रमे शनिप्रदोष, सोमप्रदोष व भौमप्रदोष हे विशेष फलदायक मानले जातात. या व्रतामुळे राज्यप्राप्तीसारखी फले मिळाल्याच्या कथा आहेत. शांडिल्य ऋषींच्या सांगण्यावरुन हे व्रत केल्यामुळे एका ब्राह्मणविधवेला व तिच्या मुलांना मोठे फल मिळाले होते. प्रदोषकाली आहार, मैथुन, निद्रा व स्वाध्याय या क्रिया वर्ज्य असतात.

संदर्भ : Kane, P.V. History of Dharmashastra, Vol.5, Part I &amp II, Pune, 1962.

साळुंखे, आ. ह.