प्रतिविष : दैनंदिन भाषेत विषाला निकामी करणाऱ्या पदार्थाला प्रतिविष म्हणतात. वैद्यकीय भाषेत ही संज्ञा सूक्ष्मजंतुनिर्मित बहिर्विषांना (सुक्ष्मजंतूने निर्माण केलेल्या पण त्याच्या कोशिकेच्या-पेशीच्या-बाहेर आढळणाऱ्या विषांना) निकामी करणाऱ्या पदार्थाला देतात. मानवाच्या किंवा घोडा, मेंढी, गुरे वगैरे प्राण्यांच्या रक्तद्रवात तयार होणारे हे पदार्थ ग्लोब्युलीन प्रथिनांच्या गटातील [⟶ प्रथिने] असतात. सूक्ष्मजंतूंच्या बहिर्विषाविरुद्ध क्रियाशील असणाऱ्या ⇨ प्रतिपिंडाना प्रतिविष ही संज्ञा लावतात. शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिविष उपलब्ध असेल, तर ते बहिर्विषास निष्क्रिय करू शकते.

सूक्ष्मजंतू दोन प्रकारची विषे तयार करतात : (१) बहिर्विष : सूक्ष्मजंतूपासून बाह्य परिसरात सहज पसरणाऱ्या विषांना बहिर्विष म्हणतात. गाळणक्रियेने मिळणाऱ्या सूक्ष्मजंतुविरहित द्रवापासून ते मिळवता येते. ते उष्णता-परिवर्ती (उष्णतेने सहज बदलणारे किंवा घटक द्रव्ये अलग होणारे) असते व फॉर्माल्डिहाइडाने निष्क्रिय बनविता येते. (२) अंतर्विष : सूक्ष्मजंतूंच्या कोशिका कायेत असणारे विष सूक्ष्मजंतू जिवंत असेतोपर्यंत हे बाह्य परिसरात फारसे स्त्रवत नाही परंतु सूक्ष्मजंतू मेल्यानंतर किंवा त्याच्या आत्मविलयनानंतर (स्वतःच्याच शरीरात निर्माण झालेल्या एंझाइमांच्या-जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थांच्या-क्रियेमुळे आपोआप विघटन पावल्यानंतर) सहज मिळते. ते उष्णता-स्थायी असून फॉर्माल्डिहाइडाने निष्क्रिय बनत नाही. वर्णन सुलभतेकरिता विषांचे जरी हे दोन प्रकार केले असले, तरी नेहमी दोहोंची सरमिसळ कार्यान्वित असते.

प्रतिविष ही संज्ञा बहिर्विष निष्क्रिय करणाऱ्या पदार्थापुरतीच मर्यादित असून अंतर्विष निष्क्रिय करणाऱ्या पदार्थांना ती लावीत नाहीत. सूक्ष्मजंतुजन्य बहिर्विष बहुतांशी प्रथिने असून ती सर्व ⇨ प्रतिजनासारखी कार्यान्वित होतात.

प्रतिविषाची बहिर्विष निकामी करण्याची म्हणजेच त्याचे उदासिनीकरण करण्याची क्षमता, उदासिनीकरण परिक्षेद्वारे ठरविता येते. या परिक्षेत विष आणि प्रतिविष यांची वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रणे प्रयोगशालीय प्राण्यांच्या शरीरात टोचतात. फक्त विषच टोचले, तर प्राणी मरतो पण काही प्रमाणात प्रतिविष मिसळून टोचल्यास तो जिवंत राहू शकतो. किती प्रमाणात प्रतिविष मिसळले म्हणजे प्राणी मरत नाही याचेनिरीक्षण करून उदासिनीकरणक्षमता ठरवितात. घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूमुळे उत्पन्न होणाऱ्या बहिर्विषावरील प्रतिविषाची क्षमता त्यांचे मिश्रण फक्त त्वचेत अंतःक्षेपित करूनही ठरविता येते. प्रतिविषांचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रमाणित व अज्ञात प्रतिविषांच्या विष उदासिनीकरणक्षमतांची तुलना करतात.

घटसर्प, धनुर्वात, वायुकोथ (विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे जखमेभोवतालच्या ऊतकात-कोशिकासमूहात-वायू तयार होणारा रोग) कुपीजंतुविषबाधा (क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होणारी एक प्रकारची अन्नविषबाधा) आणि सर्पविषबाधा यांवर प्रभावी प्रतिविषे उपलब्ध आहेत. प्रतिविषे ठराविक मात्रेत अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने) देऊन परार्जित प्रतिरक्षा [⟶ रोगप्रतिकारक्षमता] उत्पन्न करता येते. काही प्रतिविषांचा मोठ्या मात्रेत व आवश्यक वाटल्यास अंतःनीला (नीलेतून द्यावयाचे) अंतःक्षेपण म्हणून चिकित्सात्मक उपयोग करतात. उदा., घटसर्पाच्या गंभीर रोग्याला १०,००० ते ३०,००० एका घटसर्प प्रतिविष अंतःक्षेपणाने देतात.

मानवी रक्तद्रव्यात जशी प्रतिविषे तयार होतात तशीच प्रतिविषे घोडा किंवा इतर प्राण्यांना सूक्ष्मजंतूजन्य बहिर्विषे वाढत्या मात्रेने टोचून त्यांच्या रक्तद्रवात उत्पन्न करता येतात. घोड्याचा रक्तद्रव शुद्ध करून वापरला, तरी त्यात काही ‘परकीय’ प्रथिने शिल्लक राहिल्यामुळे तीही प्रतिजनासारखी क्रिया करतात. याशिवाय काही व्यक्तींमध्ये ती अधिहृषताजनक [ अलर्जी उत्पन्न करणारी ⟶ अ‌ॅलर्जी ] असल्यामुळे अधिहृषतेची गंभीर लक्षणे उद्‍भवण्याचा धोका असतो. याकरिता प्रतिविष असलेल्या घोड्याचा रक्तद्रव वापरण्यापूर्वी अधिहृषतादर्शक परीक्षा करावी लागते. अधिहृषता असलेल्या एखाद्या रोग्यास प्रतिविष असलेला रक्तद्रव देणे आवश्यकच असल्यास, प्रथम तो विरल करुन अल्प मात्रेत दर पंधरा मिनिटांनी टोचून बघतात. नंतर मूळ रक्तद्रवाच्या मात्रा हळूहळू वाढवून टोचतात. याला ‘संवेदनाशीलताहरण’ म्हणतात.

कधीकधी इतर प्राण्यांऐवजी मानवी रक्तद्रवात तयार झालेली प्रतिविषे वापरतात. ह्यामध्ये ॲलर्जीचा धोका नसतो.

ग्रॅम-रंजक-अव्यक्त [एच्. सी. जे. ग्रॅम या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली रंजनक्रिया केली असता तयार होणारा जांभळटसर रंग त्यांच्यात टिकून राहत नाही असे ⟶ रंजक, जीवविज्ञानीय] सूक्ष्मजंतू (उदा., आंत्रज्वर व आमांशाचे सूक्ष्मजंतू) प्रामुख्याने अंतर्विष तयार करतात. या अंतर्विषाच्या गुणधर्मांमुळे त्यांच्याविरुद्ध प्रतिविष तयार करता येत नाही.

विष आणि प्रतिविष यांच्या संयोगाने विष नाश पावत नाही. काही प्रयोगशालेय प्रकियानंतर या संयोगातून ती वेगळी करता येतात परंतु असे विष पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे क्रियाशील असते. या कारणांमुळे विष-प्रतिविष मिश्रणे प्रतिरक्षा उत्पादनाकरिता संपूर्ण निरुपयोगी असतात.

पहा: प्रतिजन प्रतिपिंड रोगप्रतिकारक्षमता.

संदर्भ : 1. Raffel, S. Immunity, New York, 1961.

            2. Stewart, F. S Beswick, T. S. L. Bacteriology, Virology and Immunity for Student of Medicine, London, 1977.

परांडेकर, आ. शं. कुलकर्णी, श्यामकांत