प्रजोत्पादन :ज्या प्रक्रियेने वनस्पती किंवा प्राणी आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करतात त्या प्रक्रियेस प्रजोत्पादन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. हे कार्य जीवाचे एक अत्यंत मूलभूत लक्षण अथवा गुणधर्म आहे, असे जीववैज्ञानिक मानतात. निर्जीवात जननाचे सामर्थ्य नसते. सजीव व निर्जीव यांतील हा वैशिष्ट्यपूर्ण भेद आहे. अनेक वर्षांच्या निरीक्षणांवरून व शास्त्रज्ञांच्या प्रयोगांवरून आता असे सिद्ध झाले आहे की, प्रत्येक जीव -प्राणी किंवा वनस्पती – हा पूर्वी असलेल्या त्या जातीच्या जीवापासून निर्माण होतो व आपल्या पूर्वजांचे विशेष गुणधर्म आपल्यात सामावून घेतो. प्रजोत्पादनानंतर पूर्ण वाढ होईपर्यंत त्या प्राण्यात अगर वनस्पतीत वरवर कितीही फरक झाले, तरी शेवटी तो जीव आपल्या मातापित्यासारखाच दिसेल. प्रत्येक व्यक्तीचा (प्राणी वा वनस्पतीचा) मृत्यू अटळ असल्यामुळे तिच्या जातीचे [⟶ जाति] सातत्य राखण्यासाठी प्रजोत्पादनाची योजना निसर्गाने केलेली आहे.  

प्राण्यांचे प्रजोत्पादन

प्राणी आपली जाती पृथ्वीवर टिकविण्यासाठी प्रजोत्पादन करून आपल्यासारखी लक्षणे असणारी संतती निर्माण करतात. हे प्रजोत्पादन दोन प्रकारांनी होते : (१) अलैंगिक आणि (२) लैंगिक.

अलैंगिक प्रजोत्पादन :या प्रकारच्या प्रजोत्पादनात युग्मके (ज्यांच्या संयोगामुळे प्रजोत्पत्ती होते त्या जनन कोशिका) निर्माण होत नाहीत. याचे एकंदर सहा प्रकार आहेत : (१) द्विभाजन, (२) मुकुलन, (३) पुटीभवन, (४) आडवे विभाजन, (५) खंडीभवन, (६) अनिषेकजनन.

द्विभाजन :कित्येक एककोशिक (ज्यांचे शरीर फक्त एकाच कोशिकेचे-पेशीचे-बनलेले आहे अशा) प्राण्यांमध्ये कोशिकेचे दोन समान भाग होऊन एकाचे दोन प्राणी निर्माण होतात. हा प्रकार पॅरामिशियम या प्राण्यांत आढळतो. पॅरामिशियमाच्या कोशिकेतील केंद्रकाचे (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजाचे) प्रथम दोन समान भाग होऊन ते एकमेकांपासून दूर होतात. नंतर कोशिकाद्रव्याचे [कोशिकेतील केंद्रकाव्यतिरिक्त उरलेल्या जीवद्रव्याचे ⟶ कोशिका] दोन समान भाग होतात. यातील प्रत्येक भाग विभाजन होऊन दूर झालेल्या केंद्रकाभोवती गोळा होतो. नंतर पॅरामिशियमाच्या कोशिकेचे दोन आडवे समान भाग होतात व अशा रीतीने मूळच्या एका पॅरामिशियमापासून दोन पॅरामिशियम निर्माण होतात आणि ते एकमेकांपासून दूर होऊन स्वतंत्रपणे जीवन जगू लागतात. [⟶ पॅरामिशियम].

या विभाजनाच्या क्रियेवर भोवतालच्या परिस्थितीचाही परिणाम होत असतो. पाण्याचे तापमान हे पॅरामिशियमाची होणारी वाढ आणि विभाजनाचा काल यांचे नियंत्रण करते. पाण्याचे तापमान १५° ते १७° से. असेल, तर पॅरामिशियमाची वाढ आणि विभाजन सु. २५ तासानंतर होते पण जर हे तापमान २° ते ३° से. नी वाढविले, तर हा काल १२ तासांचा होतो. विभाजन होत असताना पॅरामिशियमाचे दोन भाग झाल्यावर तो काही वेळ अन्नग्रहण करीत नाही. या पद्धतीमुळे संततीचे जननिक (आनुवंशिक) गुणधर्म मूळ प्राण्याप्रमाणेच असतात.

यूग्लीना या एककोशिक प्राण्यातही वरीलप्रमाणेच, प्रथम केंद्रकाचे आणि नंतर कोशिकाद्रव्याचे विभाजन होते. या विभाजनात मूळ कोशिकेचे दोन उभे भाग पडतात व प्रत्येक भागापासून एक असे दोन प्राणी निर्माण होतात. [⟶ यूग्लीना].

प्रोटोझोआ संघातील अनेक परजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे) प्राणी आपल्या केंद्रकाचे अनेक सारखे भाग पाडतात व या प्रत्येक भागाभोवती कोशिकाद्रव्य जमा होऊन नंतर हे भाग एकमेकांपासून अलग होतात व प्रत्येक भागापासून एक, असे अनेक प्राणी निर्माण होतात. या पद्धतीला बीजाणुजनन म्हणतात. 


मुकुलन :या पद्धतीत मोठ्या आकारमानाच्या बहुकोशिक प्राण्याच्या शरीरावर लहान आकारमानाचे प्राणी निर्माण होतात. अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राणिसमूहातील अनेक प्राण्यांच्या शरीरावर मुकुल (कलिका) उत्पन्न होतात. या मुकुलांचे काही कालानंतर लहान आकारमानाच्या प्राण्यांत रूपांतर होते.  यामुळे हे नव्याने निर्माण झालेले प्राणी मूळ प्राण्याच्या शरीराला चिकटलेले असतात. अशा प्रकारचे प्रजोत्पादन हायड्रा, प्रवाळ (पोवळे), पॉलिझोआ, गोड्या पाण्यातील ॲनेलिड (वलयी) प्राणी आणि ॲसिडियन या प्राण्यांत आढळते.

मुकुल अलैंगिक आणि लैंगिक या दोन प्रकारचे असतात. प्रवाळ आणि ॲसिडियन यांच्यासारख्या प्राण्यांच्या शरीरावर निर्माण होणारे अनेक अलैंगिक मुकुल शरीरापासून अलग होत नाहीत. त्यामुळे या मुकुलांपासून निर्माण होणारे प्राणी मूळ प्राण्याच्या शरीरावरच चिकटलेले असतात. अशा तऱ्हेने २५-३० प्राणी निर्माण होऊन एक वसाहत तयार झालेली आढळते. या वसाहतीचे नैसर्गिकपणे अगर मुद्दाम तुकडे केले, तरीही प्रत्येक तुकड्यातील प्राणी जिवंत राहू शकतात.

सिलिएटा वर्गातील सक्टोरिया या उपवर्गातील प्राण्यांत कोशिकेच्या बाह्य आवरणावर अनेक मुकुल निर्माण होतात. ते अलग होऊन त्यांच्यापासून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) तयार होतात व या डिंभाचे प्राण्यांत रूपांतर होते. स्पंज या प्राण्यात काही कोशिका एकत्र येऊन त्यांचा मुकुल तयार होतो. हा मुकुल मूळ प्राण्यापासून अलग होतो आणि नंतर त्याचा विकास होऊन स्पंज तयार होतो. गोड्या पाण्यातील काही जातींचे स्पंज आपल्या शरीरात कुड्‌मिका निर्माण करतात. मध्यस्तरातील कित्येक कोशिका एके ठिकाणी येऊन त्यांचा एक वाटोळा पुंज बनतो आणि त्याच्याभोवती स्पंजीन या प्रथिनाचे संरक्षक आवरण तयार होते. या कोशिका-पुंजाला कुड्‌मिका म्हणतात. कुड्‌मिका शरीराबाहेर पडून काही काळाने त्यांच्यापासून नवीन स्पंज तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत अशा प्रकारे नवीन स्पंजांची निर्मिती होते. [⟶ पोरिफेरा].

सीलेंटेरेटा संघातील ⇨ हायड्राव ओबेलिया या प्राण्यांच्या शरीरावर अलैंगिक व लैंगिक अशा दोन प्रकारचे मुकुल निर्माण होतात. ह्याला बहुरूपता असे म्हणतात. उन्हाळ्यात पाण्याचे तापमान वाढले म्हणजे हायड्रा आपल्या शरीरावर अलैंगिक मुकुल निर्माण करतात. या मुकुलांपासून थोड्या दिवसांनी छोटे हायड्रे तयार होतात. ते काही दिवस मूळ प्राण्याच्या शरीरालाच चिकटलेले असतात. नंतर ते या प्राण्याच्या शरीरापासून अलग होतात आणि स्वतंत्रपणे जगतात. प्रजोत्पादनाची हीच पद्धत ओबेलिया या प्राण्यात आढळते.

परजीवी पट्टकृमीमध्ये डोक्याच्या मागील भागातून मुकुलनामुळे नवीन मुकुल किंवा खंड तयार होत असतात. प्रत्येक खंडात नर आणि मादी याची जनन तंत्रे (संस्था) असतात. सर्वांत शेवटच्या खंडाची पूर्णपणे वाढ झालेली असते. हे खंड शरीरापासून अलग होतात. या खंडात निर्माण  झालेल्या अंड्याचे निषेचन (फलन) होऊन त्यापासून नवा पट्टकृमी तयार होतो. [⟶ पट्टकृमि].

पुटीभवन :प्रोटोझोआ संघातील प्लास्मोडियम आणि मोनोसिस्टीस हे एककोशिक प्राणी ठराविक वेळी स्वतःभोवती एक पुटी किंवा आवरण निर्माण करतात. नंतर या कोशिकेचे अनेक वेळा विभाजन होऊन अनेक कोशिका निर्माण होतात. यानंतर आवरण फुटते आणि हे अनेक एककोशिक प्राणी एकमेकांपासून अलग होऊन स्वतंत्रपणे जगू लागतात.

आडवे विभाजन :(अनुप्रस्थ विखंडन). काही बहुकोशिक प्राण्यांत आडवे विभाजन होते. गोड्या पाण्यात राहणाऱ्या ⇨ टर्बेलॅरियाह्या चापट कृमी या पद्धतीचा अवलंब करतात. हे कृमी शरीराच्या शेवटच्या भागाने आधारतलास घट्ट धरून ठेवतात व नंतर ग्रसनीच्या (तोंडाच्या पोकळीच्या लगेच मागे असलेल्या व सामान्यतः अतिशय स्नायुमय असणाऱ्या अन्ननलिकेच्या प्रारंभीच्या भागाच्या) थोड्या मागील भागात या प्राण्याचे आडवे विभाजन होते. ग्रसनी असलेला पुढील भाग मागील भागापासून अलग होतो. या भागावर मागील भाग तयार होतो व मागील भागावर पुढील डोक्याचा भाग तयार होऊन दोन प्राणी स्वतंत्रपणे जगू लागतात.

स्टेनोस्टोमम या चापट कृमीच्या शरीराचे चार-पाच आडवे खंड (भाग) पडतात. या खंडांची पूर्ण वाढ झाल्यावर प्रत्येकापासून एक स्वतंत्र प्राणी निर्माण होतो.

खंडीभवन :समुद्रातील काही ॲनेलिड प्राण्यांचे अनेक खंड पडतात. हा प्रत्येक खंड एकमेकांपासून अलग झाल्यावर त्याचा विकास होऊन स्वतंत्र प्राणी तयार होतो. प्रजोत्पादनाच्या या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. या पद्धतीने एका प्राण्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत अदमासे पंधरा हजार प्राणी उत्पन्न होतात, असे आढळले आहे. 


अनिषेकजनन :अनेक प्राण्यांत अनिषेचित अंड्यांपासूनही संतती निर्माणहोते. याला अनिषेकजनन असे म्हणतात. गोड्या पाण्यात राहणारे रोटिफर, क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी आणि जमिनीवर राहणारे कीटक या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या काही जातींत व काही पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांतही अनिषेकजनन आढळते. याचे निरनिराळे प्रकार आहेत.

तुरळकअनिषेकजनन: लायमँट्रिया आणि स्मेरिंथस हे पतंग या प्रकारचा अवलंब करतात. लैंगिक प्रजोत्पादन ही या कीटकांत प्रमुख पद्धत असली, तरी काही वेळा तुरळक अनिषेकजननाच्या पद्धतीने प्रजोत्पादन झाल्याचे आढळते. या पतंगाची मादी काही वेळा अनिषेचित अंडी पानांवर घालते. या अंड्यांपासून यथाकाल नर आणि मादी कीटक निर्माण होतात.

चक्रीयअनिषेकजनन: मावा (ॲफिड) या कीटकांत पिढ्यांचे एकांतरण [⟶ एकांतरण, पिढ्यांचे] आढळते. या प्रकारात लैंगिक प्रजोत्पादन व अनिषेकजनन प्रत्यावर्ती (आलटून पालटून) होत असते. जेव्हा निसर्गात अन्नाचा पुरवठा भरपूर असतो अशा वेळी मावा फक्त अनिषेकजनन पद्धतीचाच अवलंब करतो. चक्रीय अनिषेकजनन पद्धतीत लैंगिक पद्धतीने निर्माण होणाऱ्या संततीत नर व मादी हे दोन्हीही आढळतात पण अनिषेकजनन पद्धतीत म्हणजेच अनिषेचित अंड्यांपासून निर्माण होणाऱ्या संततीत फक्त माद्याच असतात. अशा तऱ्हेने अनेक वेळा संतती निर्माण केल्यावर हिवाळ्यात नर व मादी यांचे मीलन होऊन निषेचित अंडी घातली जातात. ही अंडी पाण्यातही बरेच दिवस जिवंत राहतात आणि यांपासून नर व मादी जातीची संतती निर्माण होते. माव्याप्रमाणेच हायमेनॉप्टेरा गणातील गाठी करणाऱ्या गांधील माश्यांमध्ये लैंगिंक प्रजोत्पादन व अनिषेकजनन आलटून पालटून होत असते.

नित्यअनिषेकजनन: मधमाश्या, गांधील माश्या, मुंग्या व उधई (वाळवी) हे कीटक सामाजिक जीवन जगतात. हे कीटक समूहाने राहतात व ते बहुरूपी असतात. या समूहात काही कीटक जननक्षम,तर काही वंध्य असतात. राणी व नर कीटक हे जननक्षम असतात तर कामकरी कीटक हे मादी जातीचे असून वंध्य होत. वंध्य कीटकांच्या जनन ग्रंथींची वाढ झालेली नसते. या सामाजिक जीवन जगणाऱ्या कीटकांत नित्य अनिषेकजनन आढळते. राणी व नर यांचे मीलन झाल्यानंतर राणी निषेचित अंडी घालते. या अंड्यांपासून मादी जातीचे वंध्य कामकरी कीटक निर्माण होतात. मीलनाच्या वेळी नराकडून मिळालेल्या शुक्राणूंचा (पुं-जनन कोशिकांचा) राणी आपल्या जनन तंत्रात साठा करून ठेवते. जेव्हा शुक्राणूंचा साठा संपुष्टात येतो तेव्हा पुन्हा नराबरोबर मीलन होईपर्यंत राणी अनिषेचित अंडी घालते व यांपासून फक्त नर कीटकच निर्माण होतात.

काही जातींतील कामकरी मुंग्यांच्या शरीरात जनन ग्रंथीची वाढ होते पण नराबरोबर मीलन न करता त्या अनिषेचित अंडी घालतात. या अनिषेचित अंड्यांपासून फक्त कामकरी मुंग्याच उत्पन्न होतात.

काही जातींच्या यष्टी कीटकांतही नित्य अनिषेकजनन आढळते. गोड्या पाण्यात राहणाऱ्या रोटिफर प्राण्यांच्या काही जातींत नर प्राणी आढळत नाहीत अगर ते दुर्मिळ आहेत. नेहमी आढळणारे रोटिफर प्राणी मादी प्रकारचे असतात. या माद्या अनिषेचित अंडी घालतात व त्यांपासून अनिषेकजननाने मादी प्रकारचे प्राणी निर्माण होतात. उन्हाळ्यात अशा प्रकारे अनेक पिढ्या प्रजोत्पादन चालते. पावसाळ्यात या माद्या लहान आकारमानाची काही अंडी घालतात व त्यांपासून अनिषेकजननाचे नर प्राणी उत्पन्न होतात. नर व मादीचे मीलन झाल्यावर मादी निषेचित अंडी घालते. या अंड्यांवरील आवरण जाड असते. त्यामुळे उन्हाळ्यात तळ्यातील पाण्याचे तापमान वाढले अगर तळे आटले, तरी ही अंडी जिवंत राहू शकतात. पुन्हा अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर या निषेचित अंड्यांचा विकास होऊन त्यांतून मादी प्रकारचे रोटिफर उत्पन्न होतात.

सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांत) सरड्यांच्या काही जातींत अनिषेकजनन आढळते. काही रशियन शास्त्रज्ञांनी १९५० साली लॅसर्टासॅक्सिकोला या जातीचे पाच हजार सरडे कॉकेशसच्या भागातून जमा केले. त्यांत त्यांना एकही नर आढळला नाही. निरनिराळ्या वेळी जमा केलेले सर्व सरडे मादी प्रकाराचेच होते. या माद्यांनी घातलेली अनिषेचित अंडी अनिषेक पद्धतीने यथाकाल वाढून नवीन मादी सरडे निर्माण होत होते. पुष्कळ माद्यांचे शरीर विच्छेदन केल्यावर त्यांच्या अंडनलिकेत कोठेही शुक्राणू आढळले नाहीत. यावरून या सरड्यांत अनिषेकजनन होते हे सिद्ध झाले.

काही पक्ष्यांत व सस्तन प्राण्यांतही अनिषेकजनन आढळले आहे. पॅट्रिशिया सरव्हेला या अमेरिकन शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातल्या कोंबडीच्या ८,५३२ अंड्यांतून चार अंडी अनिषेकजननाने वाढविली व या प्रकाराने निर्माण झालेल्या एका नराचे सामान्य मादीशी मीलन झाल्यावर निषेचित अंडी तयार झाली.

कृत्रिमअनिषेकजनन : ज्या प्राण्यांमध्ये नैसर्गिक रीत्या अनिषेकजनन आढळत नाही अशा प्राण्यांना रसायनांच्या, हॉर्मोनांच्या (उत्तेजक स्रावांच्या) साहाय्याने किंवा इतर काही रीतींनी उद्दीपित करून अनिषेकजनन घडविता येते. समुद्रात आढळणाऱ्या एकायनोडर्माटा संघातील अर्चिन या प्राण्याच्या अनिषेचित अंड्यांना किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बेडकाच्या अनिषेचित अंड्यांना टोकदार सुईने काही वेळा टोचले, तर अंड्यांचा विकास होऊ लागतो. काही कीटकांच्या अनिषेचित अंड्यांना बारीक मऊ कुंचल्याने गोंजारले, तर त्यांचा विकास होऊ लागतो.

सशासारख्या सस्तन प्राण्यावरही शास्त्रज्ञांनी या दृष्टीने काही प्रयोग केले आहेत. एका प्रयोगात सशाच्या गर्भाशयातून अंडे बाहेर काढून त्यावर काही रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आणि ते अंडे कमी तापमान असलेल्या खोलीत ठेवले असता त्याची वाढ होऊ लागली, असे दिसून आले. दुसऱ्या प्रयोगात गर्भाशयातील अंड्याचा शुक्राणूशी संबंध येऊ न देता ते अनिषेचित स्थितीत गर्भाशयात राहू देण्यात आले. या अवस्थेत मादीवर काही हॉर्मोनांची प्रक्रिया केली गेली. काही दिवसांनी गर्भाशयातील या अनिषेचित अंड्याचा विकास होऊ लागून मादीमध्ये या आभासी गर्भावस्थेची बाह्य लक्षणे दिसू लागली. वरील अनेक प्रयोगांत फक्त एकदाच अनिषेकजननामुळे अंड्यापासून सशाचे पिलू निर्माण करता आले [⟶ अनिषेकजनन]. 


 लैंगिक प्रजोत्पादन :अपृष्ठवंशी प्राण्यांत सर्वसाधारणपणे अलैंगिक व लैंगिक या दोन्ही पद्धतींनी प्रजोत्पादन होते, तर बहुतेक सर्वच पृष्ठवंशी प्राणी लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन करतात. प्राण्यांच्या शरीरातील जनन तंत्रात जनन (प्रजोत्पादक) ग्रंथी आणि इतर साह्यकारी अवयव असतात. [⟶ जनन तंत्र]. या ग्रंथींची रचना व कार्य नर आणि मादीत भिन्न स्वरूपाचे असते. या प्राण्यांच्या बाह्य लक्षणांवरूनही नर व मादी ओळखता येतात. सर्वसाधारणपणे अपृष्ठवंशी प्राण्यांत नर हा मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो, तर पृष्ठवंशी प्राण्यांत मादी ही नरापेक्षा आकारमानाने लहान असते व बहुतेक सर्व प्राणी एकलिंगी असतात.

प्राणी प्रौढावस्थेत आले म्हणजे त्यांच्या जनन तंत्राचा पूर्ण विकास होऊन ते कार्यक्षम बनते व प्राणी प्रजोत्पत्ती करू लागतात. जनन तंत्राचा विकास बाह्य परिस्थितीवरही अवलंबून असतो. दिवसाची लांबी आणि तापमान कमी असेल, तर जनन तंत्र उशिरा कार्यक्षम बनते, उदा., ध्रुव प्रदेशातील प्राणी. जर दिवसाची लांबी व वातावरणातील तापमान जास्त असेल, तर जनन तंत्र लवकर कार्यक्षम होते, उदा., उष्ण प्रदेशातील प्राणी. प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या अनेक ⇨ अंतःस्रावीग्रंथींच्या कार्यक्षमतेमुळे हॉर्मोने निर्माण होतात व ती प्रजोत्पादनावर नियंत्रण ठेवतात. अपृष्ठवंशी प्राण्यांत अनेक जातींच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात. पृष्ठवंशी प्राण्यांत असलेल्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी ⇨ पोषग्रंथी, ⇨ वृषणव ⇨ अंडकोशयांच्यापासून निर्माण होणाऱ्या हॉर्मोनांचे मुख्यतः प्रजोत्पादनावर नियंत्रण असते.

नर प्राण्याच्या शरीरात जनन ग्रंथींची एक जोडी असते. या ग्रंथीला वृषण असे म्हणतात. वृषणामध्ये युग्मके तयार होतात. त्यांना शुक्राणू म्हणतात. शुक्राणू हजारोंनी निर्माण होतात. ते सूक्ष्म आकारमानाचे असून सर्वसाधारणतः त्यांना अंडाकृती डोके व शेपटी असते. शेपटीच्या साह्याने त्यांना चपळपणे हालचाल करता येते. शुक्राणू शरीराबाहेर वाहून नेण्यास शुक्रवाहिनी असते. याशिवाय इतर साहाय्यक ग्रंथी असतात. यांच्या स्रावांत शुक्राणू मिसळूनरेत तयार होते व ते शिश्नावाटे शरीराबाहेर टाकण्यात येते. [⟶ शुक्राणु].

मादीच्या शरीरात जनन ग्रंथींची एक जोडी असून तिला अंडकोश म्हणतात. अंडकोशामध्ये अंडी निर्माण होतात. अंड्याची वाढ होत असताना त्यात पीतकाचा (निर्जीव पोषक द्रव्याचा) साठा करण्यात येतो. किती पीतक साठविले आहे यावर अंड्याचे आकारमान अवलंबून असते. जे प्राणी आपली अंडी शरीराबाहेर टाकतात त्यांना अंडज म्हणतात. सर्वसाधारणतः ही अंडी आकारमानाने मोठी असतात. जे प्राणी निषेचित अंडी आपल्या शरीरात वाढवितात त्यांना जरायुज म्हणतात. ही अंडी आकारमानाने लहान असतात. अंड्याचे शुक्राणूकडून निषेचन केले जाते. हे निषेचन मादीच्या शरीरात झाल्यास त्याला अंतःनिषेचन व शरीराबाहेर झाल्यास त्याला बाह्य निषेचन अशी संज्ञा आहे.

संयुग्मनकिंवाआभासीलैंगिकपद्धत:प्रोटोझोआ संघातील प्राण्यांमध्ये जनन ग्रंथी नसतात. या प्राण्यांत युग्मके ही केंद्रकापासून तयार होतात. गोनियम व पॉलिस्टोमेला या प्राण्यांची युग्मके एकसारखी असतात. त्यांना समयुग्मके म्हणतात. व्हॉल्‌व्हॉक्स या प्राण्याची युग्मके एकसारखी नसतात. त्यांना विषमयुग्मकी म्हणतात. स्कायटोमोनास या प्राण्याच्या कोशिकेचेच युग्मकात रूपांतर होते. पॅरामिशियम या प्राण्यात युग्मके तयार न होता केंद्रकावरच प्रजोत्पादनाची जबाबदारी असते. हे प्राणी संयुग्मनाच्या पद्धतीने प्रजोत्पादन करतात. ही पद्धत म्हणजे एक प्रकारची आभासी लैंगिक पद्धत आहे. या प्राण्यात नर आणि मादी असा लिंगभेद करता येत नाही परंतु त्यांच्यात वेगवेगळे प्रकार असतात. संयुग्मनाच्या क्रियेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी भाग घेतात. या भाग घेणाऱ्या दोन प्राण्यांना संयुग्मक म्हणतात. दोन संयुग्मक एकमेकांजवळ येऊन कडेच्या बाजूने एकमेकांस चिकटतात. प्रत्येक संयुग्मकाच्या कोशिकेत एक बृहत्‌केंद्रक आणि एक लघुकेंद्रक असतात. बृहत्‌केंद्रक संयुग्मनाच्या क्रियेत भाग घेत नाही. संयुग्मक एकमेकांना चिकटल्यावर तो नाश पावतो. लघुकेंद्रकाचे दोन वेळा अर्धसूत्रण विभाजन [⟶ कोशिका] होते आणि चार लघुकेंद्रके निर्माण होतात. या चारांपैकी दोन लघुकेंद्रके नाश पावतात. उरलेल्या दोन लघुकेंद्रकांपैकी एक लघुकेंद्रकमूळ जागीच राहते व दुसरे लघुकेंद्रक या संयुग्मकाला चिकटलेल्या दुसऱ्या संयुग्मकात घुसून तेथे असलेल्या लघुकेंद्रकास मिळते. अशा तऱ्हेने लघुकेंद्रकांची परस्पर देवाणघेवाण होते. दोन वेगवेगळ्या संयुग्मकांच्या लघुकेंद्रकांचे मीलन झाल्यावर युग्मज केंद्रक निर्माण होते. यानंतर दोन्ही संयुग्मक एकमेकांपासून दूर जातात. वेगळे झाल्यानंतर युग्मज केंद्रकाचे विभाजन होते आणि दोन असमान केंद्रक तयार होतात. जो केंद्रक मोठा असतो त्याला बृहत्‌केंद्रक आणि लहानास लघुकेंद्रक म्हणतात.

संयुग्मनाची क्रिया म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजोत्पादन नव्हे. या पद्धतीत संतती निर्माण न होता प्राण्यांची संख्या मूळचीच राहते. या क्रियेत फक्त केंद्रकातील पदार्थांचीच देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण फक्त दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांतच होते. जर एकाच प्रकारचे प्राणी एकत्र ठेवले, तर संयुग्मनाची क्रिया होत नाही. ही क्रिया पॅरामिशियमाला फायद्याची असते कारण केंद्रकातील जननिक पदार्थाची देवाणघेवाण झाल्यामुळे पुनर्युवीकरण झालेले निरोगी, बळकट पॅरामिशियम तयार होतात आणि ते चांगल्या प्रकारे द्विभाजनाने संतती निर्माण करतात. अशाच प्रकारची संयुग्मनाची पद्धत ब्लेफॅरिस्मा या प्रोटोझोआ संघातील प्राण्यांत आढळते. 


युग्मकांचीनिर्मितीवदुय्यमलैंगिकलक्षणे:नराच्या जनन ग्रंथीत शुक्राणू ही युग्मके तयार होतात व मादीच्या जनन ग्रंथीत अंडी तयार होतात. त्यांचे पोषण या ग्रंथीतच होते. अर्धसूत्रण विभाजनामुळे शुक्राणू व अंडे यांच्यामधील गुणसूत्रांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या मूळ संख्येच्या निम्मी म्हणजे एकगुणित असते. अंडे व शुक्राणू यांचे  मील न झाल्यावर युग्मज तयार होतो. युग्मजातील गुणसूत्रांची संख्या मूळ संख्येइतकीच म्हणजेच द्विगुणित होते.

जनन ग्रंथी कार्यक्षम बनून युग्मके तयार होत असताना प्राण्यांच्या शरीरावर दुय्यम लैंगिक लक्षणे निर्माण होतात. याला जनन ग्रंथीत निर्माण होणारी हॉर्मोने कारणीभूत असतात. प्राण्यांच्या शरीरावर आकर्षक रंग निर्माण होतात. शरीराला विशिष्ट वास येतो. युका जातीच्या खेकड्यांच्या नरांची उपांगे वाढतात, पक्ष्यांना भडक रंगाची पिसे येतात, माशांच्या अंगावर निरनिराळे रंग निर्माण होतात, नर कासवांच्या नखांची वाढ होते, सस्तन प्राण्याच्या मादीचे स्तन आकारमानाने मोठे होतात व नरांच्या अंगावरचे केस वाढतात, माकडाच्या जननेंद्रियाभोवतालच्या भागावर भडक रंग दिसू लागतात इत्यादी.  काही प्राण्यांत प्रजोत्पादनाचा काल संपला म्हणजे ही लक्षणे नष्ट होतात.

पृष्ठवंशी प्राणी प्रौढावस्था प्राप्त झाल्यावरच प्रजोत्पादन करू शकत असले, तरी यासही काही अपवाद आहेत. अँब्लिस्टोमा हा उभयचर वर्गातील (पाण्यात व जमिनीवरही राहणाऱ्या प्राण्यांच्या वर्गातील) प्राणी आहे. याच्या भ्रूणाची वाढ पाण्यात होते परंतु याचा प्रौढ जमिनीवर राहतो. याच्या भ्रूणावस्थेला ॲक्झोलोटल डिंभ असे म्हणतात. डिंभावस्थेत असलेल्या ॲक्झोलोटलाच्या शरीरातील जनन ग्रंथींची वाढ होऊन त्या कार्यक्षम बनलेल्या असतात. म्हणून हा डिंभ प्रजोत्पादन करू शकतो. या घटनेला ⇨ चिरडिंभताअशी संज्ञा आहे.

  

बाह्यनिषेचनवअंतःनिषेचन:नर व मादी प्राणी यांनी आपल्या जनन ग्रंथीत निर्माण केलेल्या युग्मकांच्या जेव्हा संयोग होतो त्या क्रियेला निषेचन असे म्हणतात. ही निषेचन क्रिया मादीच्या शरीराबाहेर झाली, तर त्याला बाह्य निषेचन म्हणतात. ही पद्धत सर्वसाधारणपणे अपृष्ठवंशी प्राणी (काही अपवाद सोडून) व पृष्ठवंशी प्राण्यांपैकी मासे आणि उभयचर प्राणी यांत आढळते. निषेचन क्रिया जर शरीरात झाली, तर तिला अंतःनिषेचन म्हणतात. ही पद्धत अपृष्ठवंशी प्राण्यांत काही कीटक, गोगलगाई वगैरे प्राणी व पृष्ठवंशी प्राण्यांत सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी यांत आढळते.

जे प्राणी लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन करतात त्या प्राण्यांत साधारणपणे ⇨ लैंगिकद्विरूपता(एकाच जातीच्या नर आणि मादीत ठळक लैंगिक फरक असणे) आढळते. मीलनाच्या दृष्टीने याला फार महत्त्व आहे. मैथुनापूर्वी नर व मादी लैंगिक द्विरूपतेमुळेच एकमेकांस आकर्षित करतात व त्यांचे ⇨प्रणयाराधन सुरू होते. कोंबडे व मोरपक्षी आपले डौलदार पिसारे उभारून मादीला आकर्षित करतात. काही नर पक्षी व कीटक गोड व विशिष्ट आवाज करतात. नर कबुतरे आपले अंग फुगवून विशिष्ट आवाज काढतात. नर विंचू व कोळी मादीपुढे नृत्य करतात. मासे, उभयचर, सरीसृप आणि सस्तन प्राण्यांतही प्रणयाराधन आढळते. काही प्राण्यांत ते थोडे तासच असते, तर काहींत ते बरेच दिवस चालते. प्रणयाराधनानंतर नर व मादी एकत्र येऊन मैथुनक्रिया सुरू होते.

बाह्यनिषेचन: हे प्रामुख्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांत आढळते. या पद्धतीत अंडे व शुक्राणू यांचे मीलन होण्याची क्रिया सर्वस्वी बाह्य परिस्थितीवर अवलंबून असल्याने ती अनिश्चित असते. त्यामुळे ही पद्धत अवलंबणारे प्राणी हजारोंच्या संख्येने आपली युग्मके पाण्यात सोडतात. कारण यांतील बरीच युग्मके पाण्यातील इतर प्राणी खाऊन टाकतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर कित्येक युग्मके वाहून जातात त्यामुळे बऱ्याच युग्मकांचा नाश होत असतो. नर व मादी प्राण्यांची युग्मके एकाच वेळी पक्व होऊन ती पाण्यात सोडली जातात आणि पाण्यातच त्यांचा संयोग होऊन निषेचन होते.

अंतःनिषेचन: हे प्रामुख्याने जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांत आढळते. नर प्राण्याला मैथुनांगे असतात व यांच्या साह्याने नर प्राणी मादीच्या जनन तंत्रात जननरंध्रावाटे शुक्राणू सोडून देतो. या पद्धतीत निषेचन क्रिया मादीच्या जनन तंत्रात निश्चित होण्याची शक्यता असते म्हणून अंतःनिषेचन अवलंबणारे प्राणी युग्मके कमी संख्येने निर्माण करतात. तसेच अंड्यांचे निश्चित निषेचन होत असल्याने मादीने संभोगानंतर घातलेल्या अंड्यांची संख्या कमी असते.

जी मादी निषेचित अंडी शरीराबाहेर टाकते तिला अंडज असे म्हणतात. माशी, डास, फुलपाखरे यांसारखे कीटक शेकडो निषेचित अंडी एका वेळेला घालतात. पक्ष्यासारखे प्राणी थोडी म्हणजे ५—७च अंडी एका वेळेला घालतात. या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या पिलाचे पक्षीण संगोपन करते.

मावा कीटक, काही जातींच्या माश्या, काही मासे व सर्व सस्तन प्राणी निषेचित अंडी आपल्या शरीरात धारण करतात. तेथेच त्यांचा विकास होऊन भ्रूण तयार होतात व त्या भ्रूणांना किंवा पिलांना मादी जन्म देते. अशा प्राण्यांना जरायुज म्हणतात. 


अपृष्ठवंशी प्राण्यांचे प्रजोत्पादन :प्रोटोझोआसारख्या कनिष्ठ दर्जाच्या एककोशिक प्राणिसंघात अलैंगिक प्रजोत्पादनाची पद्धत आढळते परंतु याला काही अपवाद आहेत. गोनियम या प्राण्याच्या कोशिकेत एकाच प्रकारची समयुग्मके तयार होतात, तर व्हॉल्‌व्हॉक्समध्ये वेगळ्या प्रकारची युग्मके तयार होतात. या युग्मकांना विषमयुग्मके म्हणतात. क्रमविकासामुळे प्राण्यांची शरीररचना गुंतागुंतीची बनत जाते, त्यांच्या जनन तंत्राचा विकास होतो व लैंगिक प्रजोत्पादन हेच प्रजोत्पादनाचे मुख्य तंत्र बनते. सीलेंटेरेटा संघातील हायड्रा या प्राण्याचे लैंगिक प्रजोत्पादन त्याच्या शरीरावर निर्माण होणाऱ्या मुकुलांच्या कार्यक्षमतेमुळे होते. ठराविक ऋतूत हायड्र्याच्या शरीरावर युग्मके निर्माण करणारे मुकुल उत्पन्न होतात. प्रथम शुक्राणू निर्माण करणारे मुकुल शरीराच्या तोंडाकडील भागावर तयार होतात व नंतर अंडी निर्माण करणारे मुकुल शरीराच्या पाठीमागच्या भागावर तयार होतात. या प्राण्यांत प्रथम शुक्राणू तयार होतात व म्हणून यांना पूर्व-पुंपक्व प्राणी म्हणतात. शुक्राणू निर्माण करणाऱ्या मुकुलांमधील कोशिकांचे अनेक वेळा विभाजन होऊन अनेक शुक्राणू उत्पन्न होतात. शुक्राणू कशाभिकायुक्त [चाबकाच्या वादीसारख्या किंवा दोरीसारख्या लांब संरचनायुक्त ⟶ कशाभिका] असतात. हे शुक्राणू भोवतालच्या पाण्यात सोडले जातात व कशाभिकेमुळे ते सहज संचार करतात. दुसऱ्या हायड्र्याच्या शरीरावरील अंडी निर्माण करणारे मुकुल कार्यक्षम होऊन अंडी जर पक्व झालेली असतील, तर आजूबाजूच्या पाण्यात संचार करणारे शुक्राणू, या अंडी निर्माण करणाऱ्या मुकुलात प्रवेश करून अंड्यांचे निषेचन करतात. निषेचनापूर्वी अंड्यावरील आवरण नष्ट झाल्याने शुक्राणूंचा अंड्यात सुलभपणे प्रवेश होतो. शुक्राणूंची संख्या जरी जास्त असली, तरी अंड्यांची संख्या नियमित असते. एका मुकुलात एकाच अंड्याची पूर्ण वाढ झालेली असते. मीलनानंतर अंड्याचे युग्मजात रूपांतर होते व युग्मजाभोवती एक कवच निर्माण होते. या कवचात युग्मजाचा विकास होऊन लहान हायड्रा तयार होतो आणि हिवाळ्यात कवचावरण फोडून तो बाहेर पडतो. कालांतराने तो मूळ हायड्र्याच्या शरीरापासून दूर होऊन स्वतंत्र जीवन जगू लागतो. हायड्र्याच्या बहुतेक जाती उभयलिंगी (एकाच व्यक्तीत पुं-आणि स्त्री-जननेंद्रिये असलेल्या) असल्या, तरी शुक्राणू आणि अंडी यात्याच प्राण्यात निरनिराळ्या वेळी उत्पन्न होत असल्याने स्वनिषेचन टाळले जाते. हायड्राऑलिगॅक्टीसया जातीत मात्र नर आणि मादी वेगवेगळे असतात.

 

प्लॅटिहेल्मिंथिस (चापट कृमी) संघातील टर्बेलॅरिया वर्गाचे प्राणी उभयलिंगी असतात. त्यांच्या शरीरात दोन्ही बाजूंना शेकडो लहान वाटोळे वृषण असतात. त्यांत शुक्राणू तयार होतात. सर्व वृषणे शुक्रवाहिकेने एकमेकांना जोडलेले असतात. दोन्ही बाजूंच्या शुक्रवाहिका एकमेकींना मिळतात व एक शुक्रवाहिनी तयार होते. या शुक्रवाहिनीत शुक्राणू साठविले जातात म्हणून तिला रेताशय (किंवा शुक्राशय) असेही म्हणतात. या रेताशयास स्नायूंनी युक्त असे शिश्न जोडलेले असते. शिश्न हे इतर वेळी विसावलेले असते आणि मैथुनाच्या वेळी ते जननरंध्रामधून बाहेर पडून शुक्राणुविसर्जन करते.

चापट कृमींच्या शरीराच्या पुढील भागात अंडकोशांची एक जोडी असते. अंडकोशापासून निघणाऱ्या वाहिन्या एकमेकींना जोडल्या जाऊन योनिमार्ग तयार होतो व तो जननकोठीपर्यंत (जननरंध्राच्या आत असणाऱ्या लहान पोकळीपर्यंत) जातो. अंडवाहिन्यांना मिळणाऱ्या पीतक ग्रंथी अंड्यामध्ये पीतकाचा साठा करतात. गर्भाच्या पोषणासाठी पीतकाचा अन्नासारखा उपयोग होतो. मादीच्या जननकोठीला एक जननरंध्र असते. मैथुनाच्या वेळी दोन कृमी एकत्र येतात. नर आपल्या शिश्नाच्या साह्याने मादीच्या जननरंध्रात शुक्राणुविसर्जन करतो. नंतर दोन्ही प्राणी एकमेकांपासून दूर होतात. योनिमार्गात विसर्जित केलेले शुक्राणू नंतर अंडवाहिनीत प्रवेश करून तेथे असणाऱ्या अंड्यांचे फलन करतात. निषेचित अंडी योनिमार्गाकडे येत असताना त्यांच्याभोवती पीतकाचा थर दिला जातो आणि नंतर जननकोठीतील कोशिका त्यावर एक पुटीसारखे आवरण चढवितात. अशा तऱ्हेने निषेचित अंड्यांना संरक्षण मिळून नंतर ती जननरंध्रावाटे शरीराबाहेर पडतात व दगडास किंवा पानांस चिकटतात. नंतर कृमी इतरत्र निघून जातो. उन्हाळ्यात घातलेल्या अंड्यांचा लवकर विकास होतो परंतु हिवाळ्यात त्यांच्या विकासाला जास्त अवधी लागतो. पूर्ण विकासानंतर अंड्यातून लहान आकारमानाचे चापट कृमी बाहेर पडतात. हे नंतर स्वतंत्रपणे हालचाल व भक्षण करतात आणि वाढीस लागतात. काही जातींचे चापट कृमी निषेचित अंडी आपल्या शरीरातच ठेवून घेतात. त्यांचा विकास झाल्यावर लहान आकारमानाचे कृमी जननरंध्रातून बाहेर पडतात आणि स्वतंत्र जीवन जगू लागतात.

ट्रिमॅटोडा हा चापट कृमींचाच एक वर्ग आहे. [⟶ ट्रिमॅटोडा]. या वर्गातील प्राणी उभयलिंगी असून त्यांचे जनन तंत्र आणि प्रजोत्पादनाची पद्धत टर्बेलॅरियासारखीच असते. पट्ट कृमींच्या प्रत्येक खंडात नर व मादी अशी जनन तंत्रे असून त्या प्राण्यात स्वनिषेचन किंवा परनिषेचन आढळते.

ॲनेलिडा संघातील ⇨ पॉलिकीटागणात नर व मादी वेगवेगळे असून बाह्य निषेचन आढळते. या प्राण्यात जनन ग्रंथी व जननवाहिनी (अंडवाहिनी अथवा शुक्रवाहिनी) नसतात. बहुतेक प्रत्येक खंडात युग्मजांचे समूह असतात परंतु काही जातींत असे समूह ठराविक खंडात असतात. युग्मज हे देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) सोडले जातात आणि उत्सर्जन तंत्राच्या (शरीराला निरुपयोगी असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर ज्या तंत्राद्वारे टाकण्यात येतात त्या तंत्राच्या) कार्यामुळे किंवा खंडाला छिद्रे पाडून युग्मज शरीराबाहेर पडतात. नंतर समुद्राच्या पाण्यात शुक्राणू व अंडे यांचे मीलन होते. काही वलयी प्राणी विणीच्या हंगामात आपल्या शरीराचे खंड एकमेकांपासून तोडतात आणि मग खंडातील युग्मज भोवतालच्या पाण्यात मिसळतात.

ॲनेलिडा संघातील ⇨ ऑलिगोकीटागणातील प्राणी उभयलिंगी असतात पण नर व मादी जनन तंत्रे वेगवेगळी असतात. मैथुनाच्या वेळी दोन प्राणी एकमेकांजवळ येऊन परस्परांचे शुक्राणू व अंडी यांची देवाणघेवाण करतात. यामुळे अंड्यांचे निषेचन होते. निषेचित अंडी शरीरावर चिकट पदार्थात साठविली जातात. या चिकट पदार्थाचा कोश बनून तो शरीरापासून दूर होतो व या कोशात निषेचित अंड्यांची वाढ होते. पूर्ण वाढ झाल्यावर कोश फुटून त्यातून लहान प्राणी बाहेर येतात. 


आर्थ्रोपॉड (संधिपाद सांधेयुक्त पाय असलेल्या) प्राण्यांमध्ये नर व मादी वेगवेगळी असतात. पुष्कळदा लिंगभेद ओळखण्यासारखी बाह्य लक्षणे या प्राण्यांत आढळतात. क्रस्टेशिया वर्गात नराची जननरंध्रे पायाच्या पाचव्या जोडीवर असतात व मादीची तिसऱ्या जोडीवर असतात. या प्राण्यात बाह्य निषेचन असते. मादीच्या वलयासारख्या उपांगावर निषेचित अंडी चिकटलेली असतात व तेथेच त्यांची वाढ होते.

कीटकांमध्ये नर व मादी वेगवेगळी असतात. फक्त कॉक्सिड जातीचे पानावरील काही कीटक उभयलिंगी असतात. नर व मादी कीटकांत जनन तंत्राची चांगली वाढ झालेली असते. कीटकांत काही अपवाद सोडून अंतःनिषेचन असते. मादी निषेचित अंडी पानावर, पाण्यात, मातीत इ. ठिकाणी घालते. सर्वसाधारण डिंभांचे जे अन्न असेल अशा वस्तूवर अंडी घातली जातात. नर कीटकात मैथुनांगाची वाढ झालेली असते तर मादी कीटकांत अंडनिक्षेपकाची (अंडी घालण्यासाठी स्वतंत्र इंद्रियाची) वाढ झालेली असते.

गोड्या पाण्यात स्फीरोडिमा या नावाचे कीटक राहतात. या कीटकांत अंतःनिषेचन असते. मादी निषेचित अंडी नराच्या पाठीवर चिकटवून ठेवते त्यामुळे अंड्यांचा सांभाळ होतो. अंड्यामधून डिंभ बाहेर पडतात. काही कीटकांचे लैंगिक वर्तन मोठे वैशिष्ट्यपूर्ण असते. मैथुनापूर्वी नर कीटक प्रणयाराधन करतात. आपल्या स्पर्शिका (सांधेयुक्त स्पर्शेद्रिये) हालवून, पंखांची हालचाल करून किंवा मादीच्या अंगाला स्पर्श करून, ते मादीचे लक्ष वेधून घेतात. मधमाश्या, मुंग्या, वाळवी यांसारख्या कीटकांत मैथुन उड्डाण आढळते. स्कॅरॅबिड भुंग्याचे नर शेणाचे छोटे गोळे जमवून ते मादीला प्रेमाची भेट म्हणून देतो. कारण भुंगे शेणामध्येच राहतात व शेणातूनचअन्न घेतात. या जातीचा नर मादीला घरटे बांधण्यासही मदत करतो. इकँथस जातीच्या नाकतोड्यात नर आपल्या वक्षावरून विशिष्ट ग्रंथीमधून एक प्रकारचा रस पाझरवितो. तो खाण्यासाठी मादी जवळ आल्यावर तो तिच्याशी मैथुनक्रिया करतो. मँटिस जातीच्या कीटकात (उदा., खंडोबाचा किडा) मादी मैथुनानंतर नराला खाऊन टाकते. थायसॅन्यूरा गणातील थर्मोबिया या कीटकाचे प्रणयाराधन मोठे मजेशीर असते. नर कीटकांना मैथुनांगे नसतात. त्यामुळे नर कीटक मादीसमोर नृत्य करून तिचे लक्ष वेधून घेतो आणि आपले शुक्राणुधर जमिनीवर टाकतो. या शुक्राणुधरात हजारो जिवंत शुक्राणू असतात. मादीला हे शुक्राणुधर दिसले की, ती ते उचलून आपल्या जनन तंत्रात जननरंध्रावाटे सारते. जनन तंत्रात शुक्राणुधराचे बाह्यावरण विरघळते व असंख्य शुक्राणू मोकळे होतात. या शुक्राणूंचा अंड्यांशी संयोग होऊन त्यांचे निषेचन होते.

ओडोनेटा या गणात चतुर या कीटकाचा समावेश होतो. चतुराच्या नराची मैथुनांगे कार्यक्षम नसतात. त्याऐवजी उदराच्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडातील खालील बाजूस एका दुय्यम मैथुनांग निर्माण होते. प्रणयाराधनानंतर नर कीटक आपल्या उदराच्या शेवटच्या खंडावरील पुच्छप्रवर्धांनी मादीच्या गळ्याजवळ घट्ट धरून ठेवतो. नंतर मादी आपले उदरखंड पुढच्या बाजूला वळवते व आपले आठव्या खंडावरील जननरंध्र नराच्या दुय्यम मैथुनांगासमोर आणते. या मैथुनांगाखाली एक खळगा झालेला असतो. या खळग्यात मैथुनापूर्वी शुक्राणूंचा साठा केलेला असतो. मैथुनक्रियेच्या वेळी नराचे दुय्यम मैथुनांग या शुक्राणूंचे मादीच्या जननरंध्रात विसर्जन करते.

आर्थ्रोपोडा संघात कोळी, विंचू यांचाही समावेश होतो. कोळ्यात लैंगिक द्विरूपता आढळते. नर मादीपेक्षा आकारमानाने लहान असतो. कोळ्याच्या जनन तंत्राची वाढ झालेली असली, तरी या प्राण्यांत मैथुनक्रिया मोठी विचित्र असते. नर आपल्या पादमृशाचा (शिरोवक्षावरील एका उपांगाचा) मैथुनांगासारखा उपयोग करतो. मैथुनापूर्वी नर छोटे जाळे विणून त्यावर आपले शुक्राणू सोडतो. हे शुक्राणू पादमृशाच्या टोकावरील शेवटच्या खंडात शोषून घेतले जातात. नंतर तो मादीपुढे नृत्य करून तिचे लक्ष आपणाकडे वेधून घेतो. तिच्यापासून तो नेहमी सुरक्षित अंतरावर राहण्याचा प्रयत्न करतो कारण मादी नराला खाण्याची शक्यता असते. काही काळ प्रणयाराधन झाल्यावर संधी मिळताच आपला पादमृश लांब करून तो मादीच्या जननरंध्रासमोर आणून तेथे शुक्राणूंचे विसर्जन करतो. दुर्दैवाने मादीने जर नराला पकडले, तर त्याची सुटका होत नाही. मादी त्याला खाऊन टाकते. शुक्राणूंनी अंडी निषेचित केल्यावर मादी एक कोश तयार करून त्यात ती ठेवते.

स्टेगोडायफस या कोळ्याची मादी हा कोश पायाच्या शेवटच्या जोडीवर धरून ठेवते व वारंवार उन्हात उलट सुलट फिरवते. त्यामुळे कोश सगळीकडून उबविला जातो. काही जातींच्या कोळ्यांच्या माद्या अंड्यातून डिंभ बाहेर पडेपर्यंत कोशाजवळ बसून राहतात, त्याचे रक्षण करतात व या मुदतीत अन्नग्रहण करीत नाहीत.

लायकोसीड कोळ्याचे डिंभ अंड्यांमधून बाहेर पडल्यावर ते मादीच्या पाठीवर चढून बसतात व काही दिवस तेथेच राहतात.

विंचवात नर व मादी निरनिराळे असतात. यांच्यातही मैथुनपूर्व प्रणयाराधन असते. नर विंचू नृत्य करून मादीस उद्दीप्त करतो. या प्राण्यात अंड्याचे अंतःनिषेचन होते व मादी पिलांना जन्म देते. मोठी होईपर्यंत पिले मादीच्या पाठीवरच राहतात. जेथे जेथे मादी जाईल तेथे तेथे ही पिले तिच्या पाठीवर असतात. यावरून ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ ही म्हण प्रचलित झाली असावी. 


मॉलस्का (मृदुकाय) संघात नर व मादी प्राणी सर्वसाधारण वेगवेगळे असतात. काही मॉलस्क प्राणी उदा., प्लॅनॉर्बिस, लिम्निया, ऑयस्टर आणि स्कॅलप उभयलिंगी आहेत. बहुतेक मॉलस्क प्राण्यात युग्मकवाहिन्या उत्सर्जक वाहिनीशी जोडलेल्या असतात. यामुळे उत्सर्जन रंध्रावाटे युग्मज आणि उत्सर्जक पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. काही प्राण्यांत अंतःनिषेचन असते, तर काहींत बाह्य निषेचन असते. प्लॅनॉर्बिस आणि लिम्नियासारख्या गोगलगाईंत स्वनिषेचन आढळते. हीलिक्स या उभयलिंगी गोगलगाईत शुक्राणू व अंडी एकाच वेळी तयार होतात परंतु अंड्यावर एक आवरण असल्याने शुक्राणू त्यांचे निषेचन करू शकत नाहीत. हे शुक्राणू दुसऱ्या गोगलगाईची अंडी निषेचित करतात. अशा तऱ्हेने गोगलगाईच्या शरीरातील शुक्राणूंचा साठा संपल्यावर मग तिच्या शरीरातील अंड्यावरचे आवरण फुटते व नंतर दुसऱ्या गोगलगाईकडून मैथुनाने मिळालेले शुक्राणू ह्या अंड्याचे निषेचन करतात. या प्रकाराने स्वनिषेचन टाळले जाते.

स्कॅलप या प्राण्यात जनन ग्रंथीचे दोन भाग पडतात. एका भागातून शिश्नापर्यंत शुक्राणू नेले जातात, तर दुसऱ्या भागातून अंडी योनिमार्गापर्यंत नेली जातात. शुक्राणू व अंडी यांचे पाण्यात विसर्जन झाल्यावर मग त्यांचे मीलन होते. बीटीयम आणि सेरिथिओप्सिस या प्राण्यांतही बाह्य निषेचन आढळते. गॅस्ट्रोपॉड प्राण्यांत निषेचित अंड्याचा विकास होऊन ट्रोकोफोर या नावाचा डिंभ तयार होतो. या डिंभाची वाढ होऊन त्याचे व्हेलिजर या डिंभात रूपांतर होते. नंतर काही दिवसांनी त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतरण होते. क्रेपिडुला हा प्राणी एक वर्षी नर, तर दुसऱ्या वर्षी मादी या क्रमाने आपले लिंग बदलतो. एकायनोडर्माटा संघात नर व मादी वेगवेगळी असतात. या प्राण्यांत बाह्य निषेचन होत असल्याने नर व मादी हजारोंच्या संख्येने समुद्राच्या पाण्यात युग्मज सोडतात. त्यांतील बरेच नाश पावतात. जी अंडी निषेचित होतात त्यांच्यापासून ब्रॅकिओलेरिया, बायपिनॅरिया, प्लुटियस, ऑरिक्युलॅरिया इ. प्रकारचे डिंभ तयार होऊन त्यांचे काही दिवसांनी प्रौढ प्राण्यांत रूपांतरण होते.

पृष्ठवंशी प्राण्यांचे प्रजोत्पादन :या प्राण्यांचे दोन गट करता येतात : (१) कनिष्ठ पृष्ठवंशी प्राणी व (२) उच्च पृष्ठवंशी प्राणी.

कनिष्ठपृष्ठवंशीप्राणी:या गटात हेमिकॉर्डेटा, यूरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा उपसंघांचा समावेश होतो.

हेमिकॉर्डेटा: बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी या उपसंघात मोडतो. यात नर व मादी वेगवेगळी असतात. त्यांच्या शरीरात जनन ग्रंथींच्या अनेक जोड्या असतात. युग्मके पाण्यात सोडली जातात व अंड्यांचे बाह्य निषेचन होते. या प्राण्यांच्या काही जातींत निषेचित अंड्यापासून प्रौढ प्राणी उत्पन्न होतो, तर काही जातींत अंड्यापासून टॉर्नारिया डिंभ तयार होतो. ही अवस्था काही दिवस राहून मग त्याचे प्रौढात रूपांतरण होते. [⟶ बॅलॅनोग्लॉसस हेमिकॉर्डेटा].

यूरोकॉर्डेटा: या उपसंघातील हर्डमानिया हा प्राणी उभयलिंगी असून समुद्राच्या पाण्यात राहतो. त्याची जनन ग्रंथी लांबट व खंडिकीय (पुढे आलेला गोलसर भाग असलेली) असते. त्याचा बाहेरील तांबड्या रंगाचा भाग हा नराच्या जनन ग्रंथीचे कार्य करतो, तर आतील फिकट गुलाबी रंगाचा भाग मादीच्या अंडकोशाचे कार्य करतो. या प्राण्यात प्रथम अंडी तयार होतात आणि नंतर शुक्राणू उत्पन्न होतात म्हणून हा प्राणी पूर्व-स्त्रीपक्व आहे असे म्हणतात. अंडी व शुक्राणू तयार झाल्यावर अवस्कर-रंध्रावाटे (ज्यात आतडे, युग्मकवाहिन्या व मूत्रवाहिन्या उघडतात, अशा शरीराच्या मागच्या टोकाकडील समाईक कोष्ठाच्या रंध्रावाटे) हे बाहेर समुद्रात सोडले जातात. तेथे अंड्यांचे बाह्य निषेचन होते. निषेचित अंड्यापासून ॲसिडियन टॅडपोल हा डिंभ तयार होतो. हा डिंभ बेडकाच्या डिंभासारखा दिसतो म्हणून त्याला टॅडपोल म्हणतात. या डिंभाचे परागामी रूपांतरण होऊन काही दिवसांनी त्याचे प्रौढ ॲसिडियनामध्ये रूपांतरण होते.[⟶ रूपांतरण यूरोकॉर्डेटा].

सेफॅलोकॉर्डेटा: या उपसंघातील ⇨अँफिऑक्ससया प्राण्यात लिंगभेद असला, तरी लैंगिक द्विरूपता नसल्याने नर व मादी बाहेरून एकसारखी दिसतात. जनन ग्रंथी शरीराच्या २५ ते ५१ व्या खंडांपर्यंत, प्रत्येक खंडात एक जोडी याप्रमाणे पसरलेल्या असतात. प्राण्यात युग्मकवाहिनी नसल्यामुळे युग्मके अलिंदगुहेमध्ये (ग्रसनीच्या भोवतालच्या पोकळीत) सोडली जातात. अलिंदछिद्रावाटे युग्मके भोवतालच्या पाण्यात मिळसतात आणि बाह्य निषेचन होते. निषेचित अंड्यापासून डिंभ तयार होतो. डिंभ समुद्राच्या पाण्यातील प्लवकांवर (पाण्यात तरंगणाऱ्या सूक्ष्म जीवांवर) उदरनिर्वाह करतो व त्याचे प्रौढ प्राण्यात रूपांतरण होते. [⟶ सेफॅलोकॉर्डेटा].

उच्चपृष्ठवंशीप्राणी:या प्रकारात मासे, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी यांचा समावेश होतो. मासे व उभयचर यांच्यात बाह्य निषेचन असते, तर उरलेल्या वर्गांत अंतःनिषेचन आढळते. पृष्ठवंशी प्राण्यांच्या जनन तंत्राचा विकास चांगला झालेला असतो. जनन ग्रंथी, युग्मकवाहिनी, युग्मक कोशिका, जननेंद्रिय, आणि इतर साहाय्यक ग्रंथी यांचा या तंत्रात समावेश होतो. पृष्ठवंशी प्राणी लैंगिक पद्धतीने प्रजोत्पादन करतात.

जनन ग्रंथीची वाढ होऊन ती कार्यक्षम होण्याच्या वेळी अनेक प्रकारची हॉर्मोने शरीरात निर्माण होतात आणि त्यांमुळे प्राण्यांच्या शरीरात अनेक बदल घडून दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. टेलिऑस्ट जातीचे मासे आणि काही जातींचे पक्षी यांच्या नराच्या शरीरावर वेगवेगळे रंग उत्पन्न होतात. काही जातींच्या नर कासवांच्या नखांची वाढ होते. सस्तन प्राण्यांच्या मादीचे स्तन आकारमानाने मोठे होतात. नर प्राण्यांच्या अंगावर केस निर्माण होतात. बहुतेक सर्व पृष्ठवंशी प्राण्यांतील नराच्या जनन ग्रंथी मादीच्या जनन ग्रंथीपेक्षा आकारमानाने लहान असतात, कारण शुक्राणू हे हजारोंच्या संख्येने निर्माण होत असले, तरी ते आकारमानाने सूक्ष्म असतात. याउलट अंडी संख्येने कमी असली, तरी आकारमानाने मोठी असून त्यांत पीतकाचा भरपूर साठा असतो परंतु सस्तन प्राण्यांत याच्या उलट परिस्थिती असते. त्यांची अंडी आकारमाने सूक्ष्म असून एका वेळी सर्वसाधारणपणे फक्त एकच अंड्याचा विकास झालेला असतो. युग्मकांची निर्मिती होत असताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे नर व मादी परस्परांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे उपाय योजित असतात.

मासे: हे एकलिंगी प्राणी आहेत. ते भोवतालच्या पाण्यात अंडी घालतात. प्लॅटिपोईसीलसमॅक्युलेटस या माशाची मादी निषेचित अंड्यातून पिले बाहेर पडेपर्यंत ही अंडी आपल्या जनन तंत्रात ठेवून घेते. गुडीडी कुलातील माशांच्या माद्या अंडी न घालता पिलांना जन्म देतात. काही जातींच्या माशांचे नर अंडी आपल्या तोंडात ठेवून त्यांचे रक्षण करतात, तर काही जातींचे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर हवेच्या बुडबुड्यांची घरटी करून त्यांत आपली अंडी ठेवतात. सामन मासे सुरक्षित ठिकाणी अंडी घालण्यासाठी फार दूरचा प्रवास करतात. ईल मासे अंडी घालण्यासाठी समुद्राच्या खाऱ्या पाण्यात फार दूरवर स्थलांतरण करतात. 


उभयचरप्राणी: या वर्गातील सर्व प्राणी पाण्यात किंवा ओलसर जागीआपली अंडी घालतात. प्रामुख्याने जमिनीवर राहणारे सॅलॅमँडर व भेक (टोड) यांसारखे प्राणीदेखील आपली अंडी पाण्यातच घालतात. नर सॅलॅमँडर पाण्यामध्ये शुक्राणुधर सोडतात. यानंतर मादी पाण्यातून पोहत जात असताना आपल्या अवस्कर-रंध्रावाटे हे शुक्राणुधर अवस्करात ओढून घेते. तेथे शुक्राणुधर जनन वाहिकेत शिरतात. शुक्राणुधराचे आवरण नष्ट होऊन शुक्राणू मोकळे होतात व अंड्याचे निषेचन करतात. नर भेक व बेडूक मैथुनापूर्वी मादीच्या पाठीवर आरूढ होऊन तिला आपल्या पुढील पायांनी घट्ट धरून ठेवतात. नंतर मादी आपली अंडी एकापाठोपाठ एक अशी माळेसारखी पाण्यात सोडते. या अंड्यांवर नर आपले शुक्राणू सोडतो आणि बाह्य निषेचन होते. अंड्यांच्या मालिकेवर जेलीसारख्या पदार्थाचे आवरण असल्याने अंड्यांचे रक्षण होते. धात्री-भेक (मिडवाइफ टोड), सुरिनाम भेक आणि चिलीयन बेडूक हे प्राणी आपली अंडी आपल्या पाठीवरील लहानलहान खाचांमध्ये धारण करतात व तेथेच त्यांची वाढ होते. नेक्टूरस व ॲक्झोलोटल या प्राण्यांत चिरडिंभता आढळते.

सरिसृपप्राणी: या प्राण्यांत अंतःनिषेचन असते. या वर्गातील कासवासारखे प्राणी पाण्यात अंडी घालतात व ती अंडी नदीच्या काठावरील किंवा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत एक खड्डा करून त्यात ठेवतात. ही अंडी उबविण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी मादी वारंवार या खड्ड्याकडे येत असते. मोठ्या आकारमानाची कासवे अशा तऱ्हेने उबदार वाळूत ५०० पर्यंत अंडी घालतात. अंड्याचे कवच कातडीसारखे असून त्यांत पीतक बऱ्याच प्रमाणात असते. तसेच गर्भाची वाढ होत असताना त्याभोवती अनेक आवरणे निर्माण होतात. जमिनीवर राहणारे सरडे, पाली व घोरपडी यांसारखे प्राणी भुसभुशीत मातीत खड्डे करून ५ ते १० अंडी घालतात. अंड्याची वाढ होत असताना हे प्राणी त्याकडे लक्ष देत नाहीत .

पक्षी : पक्ष्यांमध्ये अंतःनिषेचन असते. तेआपली अंडी घरट्यात, गवतावर, पाणथळ जागी किंवा इतर संरक्षित जागी घालतात. मादीच्या शरीरातील फक्त डाव्या बाजूचाच अंडकोश कार्यक्षम असतो. नर पक्ष्यांमध्ये वृषणांची एक जोडी असते. नरांना मैथुनांगे नसतात. जननरंध्रे आणि उत्सर्जन तंत्राचे रंध्र एकच असते. त्याला अवस्कर-रंध्र म्हणतात. अवस्कर-रंध्रावाटे शुक्राणू मादीच्या जनन तंत्रात सोडले जातात. अंडी युग्मकवाहिनीत असतानाच निषेचित होतात. नंतर त्यांवर पीतकाचा थर चढविला जातो व पुढे तीन संरक्षित आवरणे निर्माण होतात. सर्वांत शेवटचे आवरण चिवट कवचाचे असते. अंडी सुरक्षित ठिकाणी घातल्यावर एकटी मादी, किंवा नर आणि मादी दोघेही, त्यांची काळजी घेतात. अंड्यांतून बाहेरपडणाऱ्या पिलांचे संगोपन केले जाते. कोंबड्यासारख्या पक्ष्यांची अंडी फुटून बाहेर पडणारे पिलू कोंबडीच्या पाठोपाठ हिंडू लागते. बदकाचे पिलू जन्मतःच पोहू लागते परंतु इतर पक्ष्यांत अंड्यांतून बाहेर पडणारी पिले काही काळ परावलंबी असतात. त्यांचे पंख पूर्णपणे वाढलेले नसतात व त्यांना सहजपणे हालचाल करता येत नाही. त्यांच्या चोचीत मादीस अन्न भरवावे लागते. चिमणी, कबुतरे, घारी इ. पक्ष्यांची पिलेअशा तऱ्हेची असतात.

सस्तनप्राणी: सस्तन प्राण्यांत अंतःनिषेचन असते. सस्तन प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी अंडी न घालता पिलांना जन्म देतात परंतु याला काही अपवाद आहेत. डकबिल प्लॅटिपससारखे कनिष्ठ दर्जाचे सस्तन प्राणी निषेचनानंतर अंडी घालतात. अंड्यातूनबाहेर पडणाऱ्या पिलाचे दुधासारख्या पदार्थाने मादी पोषण करते. या पदार्थाचा स्राव मादीच्या उदरीय ग्रंथीतून होतो. मादीस स्तनाग्रे नसतात. ऑपॉस्सम या प्राण्यात मादीच्या गर्भाशयात पिलाची पूर्ण वाढ होणापूर्वी पिलाचा जन्म होतो. हे पिलू मादीच्या उदरावर असलेल्या शिशुधानी या पिशवीपर्यंत प्रवास करून तेथेच राहते. शिशुधानीमध्ये असलेल्या स्तनामधील दुधावर त्याचे पोषण होते. पूर्ण वाढ होईपर्यंत हे पिलू शिशुधानीमध्ये राहते व नंतर बाहेर पडते. कांगारूमध्येही असाच प्रकार आढळतो.

इतर सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या गर्भाशयात पिलाची वाढ होते. सस्तन प्राण्यांत उत्सर्जन व जनन तंत्रे वेगळी असल्याने जननरंध्रे आणि उत्सर्जन रंध्र वेगळी असतात. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे मासे, उभयचर, सरीसृप आणि पक्षी या प्राण्यात अवस्कर-रंध्रावाटेच उत्सर्जक पदार्थ आणि युग्मज शरीराबाहेर सोडले जातात. सस्तन प्राण्यांमध्ये वृषण उदरात न राहता उदराबाहेर असणाऱ्या मुष्कात (पिशवीसारख्या अवयवात) राहतात. अधिवृषण (प्रत्येक वृषणाच्या वरच्या भागाला जोडलेले लांबट पिंड) हे रेताशयाला जोडलेले असतात. वृषणात निर्माण होणाऱ्या शुक्राणूंत कूपर (कौपर) ग्रंथी [कंदमूत्रमार्ग ग्रंथी ⟶ जनन तंत्र ] आणि ⇨ अष्ठीलाग्रंथीयांचे स्राव मिसळले जातात व त्याचे रेत तयार होते. रेतामध्ये शुक्राणू चपळपणे हालचाल करीत असतात. मैथुनाच्या वेळी शिश्नावाटे रेत मादीच्या योनिमार्गात सोडले जाते. [⟶ जनन तंत्र].

मादीमध्ये दोन अंडकोश असतात. परिपक्व झालेली अंडी देहगुहेत पडतात कारण अंडकोश व अंडवाहिनी एकमेकांना जोडलेल्या नसतात. अंडवाहिनीच्या पक्ष्माभिकायुक्त (केसासारख्या वाढींनी युक्त असलेल्या) खुल्या तोंडामुळे अंडे अंडवाहिनीत खेचले जाते. वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांत अंडोत्सर्गाचा (ऋतुस्रावाचा) काळ निरनिराळा असतो. हरिणामध्ये वर्षातून एकदा तर मानवात महिन्यातून एकदा अंडोत्सर्ग होतो. हॅमस्टर या प्राण्यात दर पाच दिवसांनी अंडोत्सर्ग होतो. अंड्याचे निषेचन मैथुनाच्या वेळी ग्रहण केलेल्या शुक्राणूमुळे अंडवाहिनीच्या वरच्या भागातच होते. निषेचित अंडे अंडवाहिनीतून सरकत खाली येत असताना गर्भाशयात रोधले जाते. गर्भाशयाच्या एका बाजूला ते चिकटते. नंतर त्याभोवती चार पोषक आवरणे निर्माण होतात व भ्रूणाची वाढ होते. जरायू, उल्ब, अपरापोषिका आणि पीतककोश ही ती चार आवरणे होत  [⟶ गर्भकला]. जरायूच्या एका भागावर पुच्छासारख्या अनेक संरचना निर्माण होऊन त्या गर्भाशयाच्या आतील पोकळीत घुसतात. यामुळे जरायूवर रसांकुर (दोऱ्यासारख्या वाढी) निर्माण होतात. यांच्याशी गर्भाच्या ज्या भागाचा संबंध जुळतो त्याला अपरा (वार) असे म्हणतात. अपरेमुळे गर्भ आणि गर्भाशय एकमेकांशी जोडले जातात. उल्बामध्ये असणाऱ्या द्रव पदार्थात गर्भ बुडालेला असतो. या द्रव पदार्थास उल्बद्रव म्हणतात. अपरेच्या साह्याने गर्भाचे रक्ताभिसरण तंत्र व मादीचे गर्भाशय यांतील वायूची देवाणघेवाण होते. पीतककोशाला काहीच काम नसते कारण गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्न मादीच्या रक्तातून अपरेच्या साह्याने अभिसरणाने मिळते. अपरा व पीतककोश यांच्यापासून नाळ बनते. गर्भाला नाळेद्वारे रक्तपुरवठा न होता अपरेवाटे अभिसरणाने होत असतो.

सस्तन प्राण्यामध्ये गर्भावधी निरनिराळ्या मुदतीचा असतो. हा काल सरासरीने उंदरात २१ दिवस, मांजर ६० दिवस, कुत्रा ६३ दिवस, घोडा ३३५ दिवस, मानव २८० दिवस आणि हत्तीत ६२१ दिवस असतो. [⟶ गर्भावधि]. 


उभयलिंगता :प्राणिसृष्टीत अशी काही उदाहरणे आहेत की, ज्यांत नर व मादी यांची जनन तंत्रे एकाच प्राण्याच्या शरीरात असतात आणि हा प्राणी शुक्राणू व अंडी उत्पन्न करतो. अशा प्राण्यांना उभयलिंगी प्राणी म्हणतात. इतर प्राण्यांत जशी नर व मादी प्राण्यांची बाह्य लक्षणे वेगवेगळी असतात तसा प्रकार येथे नसतो. हायड्रा गांडुळासारखे ॲनेलिड प्राणी हीलिक्स, बायव्हाल्व्ह यांसारखे मॉलस्क प्राणी चापट कृमी, हर्डमानिया इ. प्राणी उभयलिंगी असतात. या प्राण्यांत स्वनिषेचन अगर परनिषेचन आढळते. सर्वसाधारणपणे उभयलिंगी प्राणी स्वनिषेचन टाळतात. सायोनासारख्या प्राण्यात स्वतःचेच शुक्राणू आणि अंडी एकाच वेळी तयार झाली, तरी त्यांचे स्वनिषेचन होत नाही. या प्रकारास स्वयंवंध्यत्व म्हणतात. दोन निरनिराळ्या प्राण्यांच्या शुक्राणू व अंड्याचे व मीलन होऊन निषेचन होते. [⟶ उभयलिंगता].

बहुभ्रूणता व डिंभजनन :अनेक जातींचे कीटक या पद्धतीने प्रजोत्पादन करतात. बहुभ्रूणता या पद्धतीत एका निषेचित अंड्यापासून विभाजनाने शेकडो भ्रूण तयार होतात. ही पद्धत परजीवी हायमेनॉप्टेरा या कीटक गणात आढळते. प्लुसिया या पतंगाच्या अंड्यामध्ये लिटोमॅस्टिक्स या परजीवी कीटकाची मादी अंडी घालते. एका अंड्यापासून विभाजननाने सु. १,५०० कीटक उत्पन्न होतात. पर्णकृमीत बीजाणुपुटी या नावाची एक डिंभावस्था असते. प्रत्येक बीजाणुपुटीत अनेक रेडिया नावाचे डिंभ तयार होतात. त्यांचे नंतर सरकॅरिया डिंभात आणि मग प्रौढ प्राणी असे रूपांतरण होते. [⟶ पर्णकृमि ट्रिमॅटोडा]. मिॲस्टर या कीटकात डिंभाच्या शरीरात दुसरा डिंभ तयार होतो, असे आढळले आहे.

अशा प्रकारे विविध जातींचे प्राणी विविध मार्गांनी प्रजोत्पादन करतात. प्राण्यांच्या प्रजोत्पादनाचे ज्ञान मनुष्यास झाल्याने त्रासदायक प्राण्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करण्यास बरीच मदत झाली आहे.

  रानडे, द. र.

वनस्पतींचे प्रजोत्पादन 

वनस्पती सजीव असल्यामुळे त्यांच्यातील सर्व जातींना आपले सातत्य राखण्याकरिता प्रजोत्पादन करावे लागते. हे तीन निरनिराळ्या पद्धतींनी घडून येते त्या पद्धती येणेप्रमाणे : (१) शाकीय, (२) अलैंगिक व (३) लैंगिक प्रजोत्पादन.

शाकीय प्रजोत्पादन : (शरीराच्या पोषणप्रधान भागापासून होणारे प्रजोत्पादन). वनस्पतींतील प्रारंभिक मानलेल्या ⇨ शैवले उपविभागातील कित्येक नील-हरित शैवले व यूग्लीनासारख्या एककोशिक वनस्पती (हिला काही शास्त्रज्ञ प्राणी मानतात) यांमध्ये संपूर्ण व्यक्ती आणि कोशिका एकच असून सर्व व्यवहार एकट्या कोशिकेद्वारेच होतात. त्यांपैकी एक म्हणजे स्वतःचे विभाजन त्यामुळे दोन कोशिका निर्माण होतात. त्या वेगळ्या झाल्यावर प्रत्येक कोशिकेचे स्वतंत्र जीव म्हणून कार्य सुरू होते. क्रमविकासातील प्रजोत्पादनाची ही सर्वांत प्रारंभिक पद्धती होय. सूक्ष्मजंतूंतही विभाजन म्हणजे द्विभंजन असते व मूळे कोशिकेचे दोन भाग वेगळे होतात. यावरून असे दिसून येईल की, प्रजोत्पादनाची यंत्रणा कोशिका-विभाजनावर [⟶ कोशिका] आधारलेली आहे मग ते शाकीय, अलैंगिक किंवा लैंगिक प्रजोत्पादन असो पण शाकीय प्रकारात केवळ साधी विभाजनक्रिया घडून येत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या कोशिका समलक्षणी असतात. त्यांची जनुकविधा (नवीन पिढीच्या गुणदोषाबद्दल जबाबदार असलेल्या आनुवंशिक घटकांचा संच) सारखीच असते म्हणून जनुकांप्रमाणेच (गुणसूत्रांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक घटकांच्या एककांप्रमाणेच) संतती समलक्षणी राहते त्यांच्यात भेद नसतात, म्हणजे क्रमविकासाच्या दृष्टीने या प्रजोत्पादनाचा जातीला उपयोग नसतो.

काही तंतुमय शैवलांत (उदा., स्पायरोगायरा) तंतू तुटतो आणि तुटलेल्या प्रत्येक भागाचे स्वतंत्रपणे नवीन जीवन चालू राहते. काही ⇨ कवकांतही (उदा., यीस्ट) अशा प्रकारे प्रजोत्पादन होते. ⇨ शैवाकात (दगडफुलात) प्रजनी नावाचे गोलाकार किंवा खवल्यासारखे कण निर्माण होतात. एक किंवा अधिक शैवलकोशिकांवर थोड्या कवक तंतूंचे आवरण असते. शैवाकाच्या कायकाभ (अत्यंत साध्या) शरीरावर हे कण बनतात व ते गळून पडल्यावर वाऱ्याने इतस्ततः पसरतात व अनुकूल परिस्थिती लाभताच त्यापासून नवीन शैवाक वनस्पती बनतात.

शेवाळींपैकी (हरितांपैकी) मार्केन्शियासारख्या साध्या कायक वनस्पतीत मूळच्या शरीराचा जुना भाग नाश पावताच शाखा अलग होऊन त्यांपैकी प्रत्येक शाखा स्वतः नवीन वनस्पती बनते, हा ⇨ पुनर्जननाचा प्रकार होय. कधीकधी मुख्य शरीराला आगंतुक शाखा फुटून त्या स्वतंत्र होऊन नवीन वनस्पती निर्माण होतात. कित्येक शेवाळींत गोलसर किंवा मुद्‌गलाकृती, सवृंत (देठयुक्त) व बहुकोशिक व मुकुलिकाद्वारे शाकीय प्रजोत्पादन सामान्यपणे घडून येते. ⇨ नेचांपैकी काही (नेफ्रोलेपिस,टेरिसइ.) वंशांतील जातींत ग्रंथिक्षोडापासून [⟶ खोड] नवीन वनस्पती येतात. प्रकटबीजी वनस्पतींपैकी ⇨ सायकससारख्या वनस्पतीत खोडाच्या बुंध्यापासून ज्या कंदिका (लहान किंवा द्वितीयक कंद) येतात त्या अनुकूल परिस्थितीत अंकुरल्या (रुजल्या) जाऊन नवीन झाडे निर्माण होतात.


 फुलझाडांसारख्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] उच्चतम वनस्पतींतही शाकीय प्रजोत्पादन सामान्यपणे आढळते. केळ, आले, हळद व अळू यांसारख्या वनस्पतींची भूमिस्थित खोडे [मूलक्षोड, ग्रंथिक्षोड, दृढकंद इ. ⟶ खोड] शाकीय प्रजोत्पादनाची साधने असतात. पेरी व त्यावरच्या खवल्यात कळ्या असलेल्या तुकड्यांपासून नवीन झाडे उगवतात. हरळी व ब्राह्मीसारख्या वनस्पतींच्या धावत्या खोडांचे तुकडे पडतात त्या प्रत्येकाला मुळे व कळ्या असतात त्यांमुळे त्याचे नवीन झाड बनते. शेवंतीचे अधश्चर (बुंध्यापासून निघणारे धुमारे), घायपाताच्या कंदिका, कांद्याच्या झाडाचे कंद, बटाट्याचे ग्रंथिक्षोड इत्यादींपासून नवीन झाडे येतात. बटाट्याच्या ‘डोळ्या’सह असलेल्या तुकड्यापासून त्यावरची कळी अंकुरल्यामुळे तो जमिनीत पेरल्यास नवीन झाड येते म्हणून अशा तुकड्यास ‘बियाणे’ म्हणतात. ⇨ कलांचोच्या पानांच्या कडांवरच्या कंदिकांपासूनही नवीन झाडे येतात ⇨ पानफुटीचे पान जमिनीवर पडल्यावर कडांवरच्या खाचेत नवीन कळ्या येऊन त्यापासून नवीन झाडे येतात. गुलाब, क्रोटॉन वगैरे झाडांच्या जून फांद्यांचे तुकडे (कलमे) कापून ते जमिनीत लावल्यास खालच्या टोकास आगंतुक मुळे फुटून व वरच्या भागावरच्या कळ्यांचा विकास होऊन नवीन फांद्या येतात.

वरील सर्व प्रकारांवरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की, प्रजोत्पादन हे प्रत्येक क्रियाशील कोशिकेचे कार्य असून जेव्हा अनुकूल परिस्थिती असते तेव्हा ते घडून येते. शाकीय प्रजोत्पादन पद्धतीत संतती केवळ लवकरच निर्माण होत नाही, तर तिच्या संख्येतही सपाटून वाढ होते पण या पद्धतीत भेदांना स्थान नसल्यामुळे तिचे स्वरूप जड असते.

अलैंगिक प्रजोत्पादन :बहुकोशिक वनस्पतींत सामान्य कोशिका-विभाजनामुळे प्रजोत्पादन होत नसून व्यक्तिगत वाढ मात्र होते. कोशिका-विभाजनापासूनची ही मध्यावस्था एका नवीन प्रकारच्या अलैंगिक प्रजोत्पादनाशी निगडित झालेली आहे. जोपर्यंत प्राकल (कोशिकेतील जीवद्रव्य) कोशिकावरणामुळे व्यक्तीच्या चौकटीत बंदिस्त आहे तोपर्यंत नवीन व्यक्ती जन्मास येऊ शकत नाही. जनकापासून स्वतंत्र झाल्याशिवाय ही गोष्ट होऊच शकत नाही. शैवलांमध्ये हे फार साध्या रीतीने घडून येते. कोशिकावरणांपासून प्राकल वेगळा होतो आणि तो परिसरात येऊन पडतो. यालाच आता ‘बीजुक’ म्हणतात. वास्तविक जनकापासून सुट्या झालेल्या या प्राकलात काही विशेष नवीन सामर्थ्य निर्माण झालेले नसते. नवीन परिसरात त्याच्यात श्रेणीने विभाजन होऊन जनकापासून वेगळे असल्यामुळे नवीन व्यक्तीचा जन्म होतो इतकेच म्हणजे त्या प्राकलाला योग्य संधी मिळाल्यामुळेच त्याच्यापासून प्रजोत्पादन होते. बीजुकाचा अर्थ मूळ वनस्पतीपासून वेगळा झालेला आणि नवीन वनस्पती निर्माण करणारा प्राकल हा होय. जेव्हा शाकीय क्रियाशीलता मंद होते, त्या वेळी बीजुकनिर्मितीस सुरुवात होते पण अशा अलैंगिक बीजुकनिर्मितीत गुणसूत्रांचे न्यूनीकरण (अर्धसूत्रण) घडून येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे शाकीय प्रजोत्पादनाप्रमाणेच जनकासारखीच जनुकविधा असलेली संतती निर्माण होते व ती त्यासारखीच समलक्षणी राहते. भेद निर्माण होत नाहीत म्हणून क्रमविकासाच्या दृष्टीने शाकीय किंवा अलैंगिक प्रजोत्पादन एकाच प्रकारचे होय. त्यांचा नवीन जाती निर्मिण्याकरिता उपयोग होत नाही.

हिरव्या शैवलांत समावेश असणाऱ्या क्लॅमिडोमोनॅसया एककोशिक वनस्पतीत अलैंगिक प्रजोत्पादन चर-बीजुकांनी (हालचाल करू शकणाऱ्या बीजुकांनी) घडून येते, ते असे : शाकीय कोशिका केसले (पक्ष्माभिका) आत ओढून घेऊन स्थिर होते आतील प्राकलाचे २, ४ किंवा ८ प्राकलांत विभाजन होते आणि प्रत्येकाभोवती नवीन आवरण बनते व त्याच्यावर दोन केसले उगवतात. मूळचे कोशिकावरण फुटून लहान कोशिका बाहेर पडतात ह्यांना चर-बीजुके म्हणतात. नंतर प्रत्येक कोशिका मोठी होऊन शाकीय कोशिका म्हणून कार्य करू लागते. अलैंगिक प्रजोत्पादनातील ही अत्यंत प्रारंभिक पद्धती होय. पँडोरीना, युलोथ्रिक्स, इडोगोनियम इ. शैवलांतही हीच पद्धती आढळते. पँडोरीना, युडोरीनाह्यांसारख्या हरित-शैवल वनस्पती म्हणजे अनेक कोशिकांची वसाहत असते. यातील कोशिकांतील प्रकल (केंद्रक) निश्चित स्वरूपाचा असून प्रत्येक कोशिकेचे एकसमयावच्छेदेकरून विभाजन होते. जनक वसाहतीत जितक्या कोशिका असतात तितक्याच प्रत्येक कोशिका विभाजनाने निर्माण करते असे कोशिका-समूह मग एकमेकांपासून वेगळे होतात आणि प्रत्येक समूह स्वतंत्रपणे जगतो.

युलोथ्रिक्समध्ये सामान्य कोशिकेतील (दृढबंध सोडून) प्राकलाचे विभाजन होऊन जातीनुसार १, २, ४, ८, १६ किंवा ३२ चर-बीजुके प्रत्येक प्राकलापासून निर्माण होतात व ते जनक कोशिकेच्या कोशिकावरणातील छिद्रांतून बाहेर पडतात. काही दिवस पाण्यात पोहत राहिल्यानंतर त्यांची हालचाल बंद होते, केसले नाहीशी होतात, भोवती कोशिकावरण निर्माण होते व कोशिका लांबट होतात. पुढे विभाजन क्रियेने नवीन वनस्पतीचा तंतू बनतो. इडोगोनियममध्ये चर-बीजुक चर-बीजुककोशात एकएकटे निर्माण होते.

ॲस्कोमायसिटीज (धानी कवक) नावाच्या कवकांमध्ये अलैंगिक प्रजोत्पादन विबीजुकाद्वारे (विशेष प्रकारच्या बीजुकाद्वारे) घडून येते. तंतुमय कवक शरीराच्या वायवी बारीक तंतूंच्या टोकास विबीजुकधर निर्माण होतात. प्रत्येक विबीजुकधराच्या टोकास सारख्या शाखांचा झुबका येतो व या प्रत्येक शाखेपासून दाटीने वसलेल्या उपशाखांचा पुन्हा एक झुबका येतो या अंतिम शाखांना प्रांगुल म्हणतात. या प्रांगुलापासून अंडाकृती, जाड कोशिकावरणाची अनेक विबीजुके साखळीने तयार होतात. यांचा वाऱ्याने फैलाव होतो योग्य स्थानी ती विबीजुके रुजून कवक तंतू व कवक शरीर निर्माण होते.

बीजुकनिर्मितीच्या क्रमविकासाच्या मार्गावरील नंतरचा टप्पा म्हणजे बीजुककोशाचे प्रभेदन (श्रमविभागणीनुसार होणारा बदल) हा होय. वनस्पतीतील काही कोशिका फक्त बीजुककोश निर्मितात आणि त्यांतूनच फक्त बीजुके उत्पन्न होतात. बहुकोशिक वनस्पतीतच ही गोष्ट शक्य असते. तिच्यातील सर्व शाकीय कोशिकांचे बीजुकनिर्मितीचे सामर्थ्य श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार नष्ट होते. याचे उदाहरण म्हणजे पिंगल (फिओफायटा) शैवलांपैकी एक्टोकार्पस होय. कवकांपैकी शैवल-कवकांमध्येही (फायकोमायसिटीजमध्येही) बीजुके किंवा चर-बीजुके बीजुककोशात उत्पन्न होतात. त्यांच्या विकिरणानंतर (फैलाव झाल्यानंतर)  अंकुरण होऊन नवीन कवक तंतू बनतात.

शेवाळी किंवा त्यापेक्षा उच्चतर वनस्पतींतील बीजुकनिर्मिती विशिष्ट अवयवात होते व ती बीजुकधारीवर असतात पण ही बीजुके व वरच्या वर्णनात आलेली बीजुके यांत मोठा फरक आहे. येथे बीजुकनिर्मिती न्यूनीकरणामुळे घडून येते. न्यूनीकरण लैंगिक प्रजोत्पादनाचे प्रमुख अंग आहे. बीजुकधारीची उत्पत्ती फलनामुळे होते म्हणून ह्या उच्च स्तरातील वनस्पतींची बीजुके न्यूनीकरणात होत असलेल्या पारगतीमुळे (जनुक-विनिमयामुळे) जनकासारखी असतीलच असे नाही त्यांच्यात भेद असतात. 


टेरिडोफायटापैकी [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] सायलोटमसारख्या प्रारंभिक वनस्पतीत बीजुककोश खोडावरील वरच्या भागात असलेल्या पानांच्या कक्षेत असतात. ही पाने आणि शाकीय पाने यांत काही फरक नसतो. लायकोपोडियमसिलॅगोमध्ये असेच असते [⟶ लायकोपोडिएलीझ]. बीजुककोश धारण करणारी पाने व न धारण करणारी पाने यांचे भाग आलटून पालटून खोडावर असतात पण ला.क्लॅव्हेटममध्ये बीजुक (कोश) धारी पानात रूपांतर घडून येते त्यांचा समूह इतर पानांहून उठून वेगळा दिसतो. या अग्रस्थ समूहाला ‘शंकू’ म्हणतात. यापुढील अवस्था म्हणजे बीजुकाच्या आकारमानात फरक होणे. मोठी बीजुके संख्येने कमी असतात आणि त्यांच्या कोशिकांत अन्नसाठा जास्त असतो. ह्यांना ‘गुरुबीजुके’ म्हणतात व ती गुरुबीजुककोशात निर्माण होतात. लहान आकारमानाचे बीजुक म्हणजे ‘लघुबीजुक’ व ती लघुबीजुककोशात निर्माण होतात. या बीजुकांतील प्रभेदनाला विषमबीजुकत्व म्हणतात. लघुबीजुके रुजून पुं-गंतुकधारी व गुरुबीजुकापासून स्त्री-गंतुकधारी बनतात [उदा., सिलाजिनेला ⟶ सिलाजिनेला] अशा रीतीने समबीजुकत्वापासून विषमबीजुकत्वापर्यंत क्रमविकसित झालेली अवस्था म्हणजे बीजनिर्मितीच्या मार्गावरील मुख्य पायरी होय. लघुबीजुककोश धारण करणारी पाने ती लघुबीजुकपर्णे व गुरुबीजुककोश धारण करणारी ती गुरुबीजुकपर्णे होत. सिलाजिनेलात ती सारखी परंतु प्रकटबीजीत ती भिन्न असतात ही त्या पलीकडची पायरी होय.

प्रकटबीज वनस्पतीतील [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] गुरुबीजुके सिलाजिनेलातल्याप्रमाणे बीजुककोशातून बाहेर पडत नसून तेथेच रुजून त्यात स्त्री-गंतुकधारी बनतो. यात सर्वांत मोठा भाग पोषक कोशिकेचा असतो. वरच्या भागातील कोशिका लहान असतात व ह्याच भागापासून बीजकरंध्रानजीक अंदुककलश (अचर स्त्री-जननकोशिका धारण करणारे कलशासारखे भाग) विकसित होतात. लघुबीजुके (परागकण) विकसित झाल्यावर (सुटून पसरल्यावर) गुरुबीजुककोशावर (बीजकावर) येतात व त्यांचे परागसंपुटात अंकुरण होते. म्हणजे पर्यायाने गुरुबीजुकपर्ण, गुरुबीजुककोश आणि गुरुबीजुक म्हणजे अनुक्रमे किंजदल, बीजक व गर्भकोश आणि लघुबीजुकपर्ण, लघुबीजुककोश व लघुबीजुक म्हणजे अनुक्रमे केसरदल, परागकोश व परागकण होत. ही वास्तविक लैंगिक प्रजोत्पादनाची अंगे होत कारण स्त्री-गंतुकधारी व पुं-गंतुकधारी पिढ्या त्यांच्यापासून निर्माण होतात आणि पूर्वोक्तात अंदुक व उत्तरोक्तात रेतुके बनतात. आवृतबीजीत हीच स्थिती असते.

लैंगिक प्रजोत्पादन :या पद्धतीचे वैशिष्ट्य असे की, नवीन प्रजा उत्पन्न होण्यापूर्वी ती ज्या कोशिकेपासून निर्माण होणार ती दोन भिन्नलिंगी कोशिकांच्या (गंतुकांच्या) संयोगाने बनलेली असते. ही गंतुके म्हणजे वास्तविक शारीरिक दृष्ट्या आकारमानाने अतिशय लहान असलेली व लागोपाठ होणाऱ्या विभाजनामुळे निर्माण झालेली बीजुकेच होत. बीजुके व गंतुके यांतील मुख्य फरक हाच की, गंतुकांचे जोडीने मीलन होते व बीजुकांचे होत नाही (उदा., युलोथ्रिक्स). शाकीय क्रियाशीलतेस परिस्थिती अनुकूल असल्यास बीजुके किंवा गंतुके ह्यांपैकी कोणतीच निर्माण होत नाहीत परिस्थिती कमी अनुकूल असते तेव्हा बीजुके बनतात व पुढे जेव्हा क्रियाशीलता (प्रतिकूल परिस्थितीमुळे) बरीच कमी होते तेव्हा गंतुके बनतात.

  

आता प्रश्न असा की, गंतुके जोडीने एकत्र का येतात व गंतुकांचा संयोग का होतो? जरी युलोथ्रिक्सची गंतुके शारीरिक दृष्ट्या सारखी दिसत असली, तरी ती तितकी नसतात कारण ती सारखी असती, तर त्यांच्यात पारस्परिक आकर्षण राहिले नसते. या आकर्षणामुळे ती एकत्र येतात. द्विलिंगी जीवनाची आणि गंतुकांच्या निर्मितीची ही सुरुवात होय. त्यांच्या मीलनाची निष्पत्ती म्हणजे रंदुक किंवा गंतुकबीजुक होय. यामध्ये सामान्य बीजुकाप्रमाणे नवी व्यक्ती निर्मिण्याचे सामर्थ्य असते पण ते बीजुकाप्रमाणे लागलीच रुजत नाही. त्याच्या निर्मितीला अनुकूल असलेली परिस्थिती त्याच्या क्रियाशीलतेस अनुकूल नसते आणि तिला तोंड देण्यासाठी त्याच्याभोवती जाड आवरण बनून त्यातला प्राकल सुप्तावस्थेत (निष्क्रिय) राहतो. तो पुढे रुजतो त्या वेळी जास्तीत जास्त शाकीय क्रियाशीलतेस परिस्थिती अनुकूल असते.

शारीर दृष्ट्या युलोथ्रिक्समधील गंतुके दिसण्यात व आचरणात सारखीच असतात, म्हणून याला समगंतुकत्व म्हणतात पण त्यांच्यातील पारस्परिक आकर्षण आणि युग्मन (जोडीत असणे) त्यांच्यातील फरक दर्शवितात याचा अर्थ त्यांच्यात लिंगभेद आहे व त्यांच्यापैकी प्रत्येक विरुद्धलिंगी आहे. यापुढची लिंगभेदाची अवस्था म्हणजे विषमगंतुकत्व होय. दोन गंतुकांतील फरक बाह्यतः स्पष्ट झाला म्हणजे विषमगंतुकत्वाला सुरुवात होते.

बऱ्याच हिरव्या आणि पिंगल शैवलांत समगंतुकत्व दिसून येते (उदा., स्पायरोगायरा, एक्टोकार्पस, क्लॅमिडोमोनॅसइ.). त्यांच्यात विषमगंतुकत्वाप्रत जगणाऱ्या भिन्नभिन्न अवस्थाही दिसून येतात. याबाबतीतली शेवटची अवस्था म्हणजे स्त्री-गंतुकाचे अंदुकात व पुं-गंतुकाचे रेतुकात रूपांतर (उदा., फ्यूकस) होय.

समगंतुकत्वात दोन्ही प्रकारची गंतुके बहुधा चर (हालचाल करणारी) असून लहान असल्यामुळे त्यांच्यात अन्नसंग्रह नसतो. उलट विषमगंतुकत्वात श्रमविभागणी होते. रेतुके चरच राहतात म्हणून ती आकारमानाने लहान असतात. अंदुकात अन्नसंग्रह असल्याने ते मोठे बनते, याचा फायदा गर्भाला मिळतो कारण वृद्धीसाठी त्याला अन्नाची गरज असते. त्याच्यापासून पुढे नवीन वनस्पती बनते. अंदुकाच्या फलनानंतर रंदुकात रूपांतर होते व त्यापासून विकासाने गर्भ बनतो.


लाल शैवलात विषमगंतुकत्व असते आणि रेतुके जरी अंदुकापेक्षा लहान असली, जरी ती अचर (स्वतंत्रपणे हालचाल न करणारी) असतात. शेवाळीपासून वरील सर्व उच्चतर वनस्पतीत विषमगंतुकत्व दिसून येते. शेवाळी, टेरिडोफायटा व प्रकटबीजीतील ⇨ सायकॅडेलीझआणि ⇨ गिंकोएलीझ या गणांतील रेतुके चर असतात त्यांकरिता त्यांना केसले असतात. पण इतर प्रकटबीजीत [⟶ कॉनिफेरेलीझ नीटेलीझ] व आवृतबीजीत मात्र ते चर नसतात व त्यांना केसलेही नसतात. अचरत्वाबरोबर पुं-गंतुक अंदुकापर्यंत फलनाकरिता पोहोचण्यास परागनलिकेची योजना झालेली आहे. ह्या दोन्ही गटांत परागाचे अंकुरण झाल्यावर परागनलिका बनतात व त्यात पुं-गंतुके (किंवा रेतुके) असतात. चर रेतुकांमुळे सायकॅडेलीझ व गिंकोएलीझ यांची सापेक्ष प्रारंभिकता दिसून येते.

बऱ्याचशा हरित शैवलांमध्ये शाकीय कोशिकेतूनच गंतुके बनतात पण विषम गंतुकनिर्मिती ज्या भागांपासून होते त्यांतही प्रभेदन सुरू होते. हे भाग म्हणजे गंतुकाशये होत. पुं-गंतुके रेतुकाशयात आणि स्त्री-गंतुके अंदुकाशयात उत्पन्न होतात. अशा रीतीने लैंगिक अवयव विकसित झाले आहेत. व्हाऊचेरियासारख्या काही हिरव्या व बहुतेक पिंगल आणि लाल शैवलांत लैंगिक अवयवांनी गंतुके धारण केलेली असतात. शिवाय हे अवयव शाकीय शरीराचा भाग नसतात. ती विशिष्ट प्रजोत्पादक अंगे किंवा शाखा म्हणून निर्माण झालेल्या असतात. ह्यात अंदुकाशयातील प्राकलाचे अंदुकात संघटन झालेले असते. एक्टोकार्पससारख्या पिंगल शैवलात जरी समगंतुकत्व असले, तरी गंतुकाशये विशिष्ट शाखांवर विकसित होतात.

शेवाळी व टेरिडोफायटा यांतील लैंगिक अवयव शैवलातील अवयवांपेक्षा जास्त विकसित झाले आहेत. ते बहुकोशिक असून त्यांच्यावर वंध्यकोशिकांचे बाहेरचे आवरण असते व ते बहुधाएका थराचे असते. या आवरणामुळे गंतुकांचे शुष्क हवेपासून संरक्षण होते. अंदुककलशाची ग्रीवा (मानेसारखा लांबट भाग) रेतुकांचा प्रवेशमार्ग असते. ग्रीवा-मार्ग-कोशिका नष्ट होऊन त्यांचे श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य बनते आणि त्यांच्यामधून रेतुके अंदुकाकडे तरंगत जातात. फलनानंतर अंदुस्थली (अंदुककलशाच्या तळाशी असणारा विस्तारित व चपटा भाग) मोठी होते व ती गर्भसंरक्षण करते. तिच्याद्वारे त्याला अन्न पोहोचते. यापुढची अवस्था म्हणजे लैंगिक अवयवांच्या कोशिकांची संख्या कमी होणे. ही प्रवृत्ती बीजी वनस्पतीत [⟶ वनस्पति, बीजी विभाग] सुरूच राहते. बीजी वनस्पतीत गुरुबीजुककोशातच (बीजकातच) गुरुबीजुक अंकुरात असल्यामुळे स्त्री-गंतुकधारीचे वास्तव्य तेथेच असते. म्हणून फलनानंतर गुरुबीजुककोशाचे रूपांतर बीजात होते. यानंतरची अवस्था म्हणजे बीजक किंवा बीजाला आवरण असणे. ही गोष्ट आवृतबीजीत दिसून येते. हे आवरण म्हणजे किंजपुट आणि तो किंजदलाचा प्रमुख भाग असतो.

कवकांमधील शैवल-कवकांमध्ये लैंगिक प्रजोत्पादन शैवलातल्याप्रमाणे असते. ॲस्कोमायसिटीज कवकामध्ये लैंगिक अवयवांच्या अवनतीच्या विभिन्न अवस्था आढळतात. जेव्हा ती पूर्ण विकसित असतात तेव्हा अंदुकाशय लाल शैवलातल्याप्रमाणेच दिसतो. रंदुकाचे सरळ धानीमध्ये (पिशवीसारख्या विशिष्ट बीजुककोशामध्ये) विकसन होते वा बहुधा त्यापासून पुढे धानी बनविणारे तंतू बनतात. ⇨ बॅसिडिओमायसिटीजमध्ये (गदाकवकामध्ये) लैंगिक अवयव बहुधा नसतात.

मार्केन्शियासारख्या यकृतामध्ये [⟶ शेवाळी] व्यक्तिगत लिंगप्रभेदन झालेले असते नर – आणि स्त्री-वनस्पती भिन्न असतात. स्फीरोकार्पसमध्ये तर नर-वनस्पती स्त्री-वनस्पतीपेक्षा लहान असते. सायकसचेही नर- व स्त्री-वृक्ष भिन्न असतात. आवृतबीजी वनस्पतीतील (फुलझाडातील) काही जातींत (उदा., एरंड) नर- व स्त्री-पुष्पे भिन्न असतात, तर काहींत (उदा., पपई, कुंकुम वृक्ष इ.) ती धारण करणारी झाडेही भिन्न असतात.

फुलझाडांत प्रकटबीजीतल्याप्रमाणेच फलनाआधी ⇨ परागणआवश्यक असते. बीजक किंजपुटात असल्याने पराग परागकोशातून बाहेर पडल्यावर किंजल्कावर भिन्न मध्यस्थांमार्फत येतात व तेथे ते रुजतात. या प्रक्रियेत परागनलिका बनते. त्यात एक नलिका-प्रकल व दोन पुं-गंतुके असतात. परागनलिका किंजलातून बीजकापर्यंत येऊन पोहोचतात. बीजकाला एक किंवा आवरणे असतात. ह्या आवरणाने प्रदेह (बीजकाचा गाभा) वेष्टिलेला असतो [⟶ फूल]. प्रदेहाशी बाहेरील संपर्क साधण्यासाठी बीजकावर बीजकरंध्र असते. प्रदेहात गर्भकोशाचा विकास होतो. सु. ७०% फुलझाडांमध्ये गर्भकोशात (गुरुबीजुकात) आठ प्रकल असतात. बीजकरंध्राच्या दिशेस असणाऱ्या तीन प्रकलांच्या तीन कोशिका असतात, या समूहाला ‘अंदुक-परिवार’ म्हणतात. बाजूस असणाऱ्या दोन साहाय्यक कोशिकांच्या मध्यभागी अंदुक असते. गर्भकोशाच्या तळाकडच्या बाजूस तीन तलस्थ कोशिका असतात मध्यभागी दोन ध्रुवीय प्रकल असतात [⟶ गर्भविज्ञान].

परागनलिकेचा बीजकात प्रवेश बीजकरंध्रातून (रंध्रयुती) किंवा बीजकाच्या तळातून [उदा., खडशेरणी ⟶ खडशेरणी] प्रदेहात होतो (तलयुती). तिचे टोक दुभंगते व पुं-गंतुके बाहेर पडतात. त्यांपैकी एकाचे अंदुकाशी मीलन होते व दुसऱ्याचे ध्रुवीय प्रकलांशी. याप्रमाणे येथे ‘द्विफलन’ होते. ध्रुवीय प्रकलांशी फलनानंतर बनणारे मीलन प्रकल गर्भपोषक अन्न (पुष्क) निर्माण करते. प्रकटबीजीत स्त्री-गंतुकधारीत फलनापूर्वीच पुष्क बनलेला असतो (आकृती पहा).

अंदुकाच्या फलनानंतर रंदुकाचे विभाजन होते. फुलझाडांच्या भिन्न जातींत गर्भविकास भिन्न रीतीने घडून येतो [⟶ गर्भविज्ञान]. बीजकाच्या आवरणापासून बीजाचे आवरण बनते. किंजपुटाचे फळात रूपांतर होते. 


पिटूनिया : (अ) द्विफलन : (१) परागनलिका, (२) अंदुक, (३) पुं-प्रकल (गंतुक), (४) ध्रुवीय संयोजित प्रकल, (५) गर्भकोश, (६) परागनलिकेचा दुभंगलेला भाग, (७) स्टार्च कण (आ) गर्भकोशाचा वरचा भाग : (१) परागनलिका, (२) रंदुक, (३) प्राथमिक पुष्क-प्रकलाचे विभाजन, (४) गर्भकोश.

लैंगिक प्रजोत्पादनात सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन गंतुक प्रकलांचा संयोग. यामुळे गुणसूत्रांचे दोन एकगुणित संच एकत्र येतात आणि रंदुकाचा द्विगुणित प्रकल बनतो. प्रत्येक संचात असंख्य जनुके असतात आणि ती आनुवंशिक लक्षणांचे संचरण (निर्धारण) करतात. गंतुक हे बीजुकातून निर्माण झालेले व बीजुक न्यूनीकरणाच्या प्रक्रियेमुळे उत्पन्न झालेले असतात म्हणून त्यांच्यात जनुकांच्या पुनःसंयोजनामुळे भेद आलेले असतात. गंतुकसंयोगानंतर पुढे न्यूनीकरण घडून येते आणि मागील फलनामुळे एकत्र आलेल्या पैतृक व मातृक गुणसूत्रांच्या संचात पुनर्रचना होऊन जनुक-विनिमय घडून येतो आणि अशा रीतीने लैंगिक प्रजोत्पादनामुळे, वांशिकतेच्या नात्यामुळे जवळ असलेल्या व्यक्तीत पुष्कळ भेद निर्माण होतात व क्रमविकासाला तो कच्चा माल म्हणून उपयोगी पडतो म्हणजे ह्या प्रकारच्या प्रजोत्पादनाने क्रमविकासाला गती मिळते.

असंगजनन :कधीकधी फलनाची प्रक्रिया घडून येत नाही पण प्रजोत्पादन होते. अफलित अंदुकातून गर्भाचे विकसन होते. या घटनेला अनिषेकजनन म्हणतात. कधीकधी ऑर्किस किंवा प्लॅटँथेरा यामध्ये हा प्रकार आढळतो. लिलियमच्या [⟶ लिली] काही जातींत साहाय्यक कोशिकेपासून गर्भ बनतो. याला आगंतुकजनन म्हणतात. यूपॅटोरियममध्ये गुरुबीजुकाच्या जननकोशिकेत न्यूनीकरण होत नाही त्यामुळे अंदुक द्विगुणित असते. या अफलित अंदुकापासून गर्भविकास होतो. याला अबीजुकजनन म्हणतात.

  

ज्ञानसागर, वि. रा.

पहा : अनिषेकजनन उभयलिंगता कवक गर्भविज्ञान जनन तंत्र जननक्षमता व प्रजननशीलत्व फूल भ्रूणविज्ञान वनस्पति, आवृतबीज उपविभाग वनस्पति, प्रकटबीज उपविभाग वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग शेवाळी शैवले.

संदर्भ :  1. Burton, J. Virgin Birth in Vertebrates, New Scientist, Vol. 59, 9th August 1973.

            2. Hampt, A. W. Plant Morphology, New York, 1953.

            3. Johansson, I. Rendle, J. Genetics and Animal Breeding, London, 1968.

            4. Maheshwari, P. An Introduction to the Embryology of Angiosperms, New York, 1950.

            5. Parker, A. S. Marshall’s Physiology of Reproduction, London, 1956.

            6. Parker, T. J. Haswell, W. A. A Textbook of Zoology, 2 Vols., London, 1960.

            7. Smith, G. M. Cryptogamic Botany, 2 Vols., New York, 1955.