प्रगर्भरक्षी : (प्रोजेस्टेरॉन). अंडकोशातून [⟶ अंडकोश] स्रवणाऱ्या एका हॉर्मोनास [सरळ रक्तात मिसळणाऱ्या  उत्तेजक स्रावास ⟶ हॉर्मोने] प्रगर्भरक्षी किंवा गर्भरक्षक म्हणतात. अंडाकोशातून स्रवणाऱ्या दुसऱ्या हॉर्मोनास ⇨स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) म्हणतात. स्त्रीजीवनात ऋतुकालाच्या सुरुवात होण्याच्या वयापासून ऋतुनिवृत्तीच्या काळापर्यंत ही दोन हॉर्मोने कमी अधिक प्रमाणात अंडकोशाच्या विशिष्ट कोशिकांपासून (पेशींपासून) स्रवतात [⟶ ऋतुनिवृत्ती ऋतुस्राव व ऋतुविकार]. स्त्रीमदजन विशिष्ट कोशिकांच्या वृद्धीस व स्त्रीत्त्वदर्शक उपलक्षणांच्या निर्मितीस कारणीभूत असते. प्रगर्भरक्षी गर्भाशयाची गर्भधारणेकरिता व स्तनांची दुग्धनिर्मितीकरिता तयारी करण्याचे कार्य करते.

बहुतेक सर्व प्रगर्भरक्षी अंडमोचनानंतर अंडकोशात तयार होणाऱ्या पीतपिंडापासून (पीत पुटकापासून) ऋतुचक्राच्या दुसऱ्या अर्ध्या भागात तयार होते. ⇨ अधिवृक्क ग्रंथी अत्यल्प प्रमाणात प्रगर्भरक्षी किंवा त्याच्यासारखीच क्रियाशीलता असणारी संयुगे स्रवतात. गर्भारपणात वारेपासून फार मोठ्या प्रमाणात, नेहमीपेक्षा दसपटींनी अधिक, प्रगर्भरक्षी स्रवले जाते. पुरुषातही वृषणातून (पुं-जनन ग्रंथीतून) स्रवणाऱ्या  ⇨पौरुषजन हॉर्मोनांच्या उत्पादनातील मध्यस्थ पदार्थ म्हणून प्रगर्भरक्षीचे उत्पादन होते. अधिवृक्क ग्रंथीच्या कॉर्टिकोस्टेरॉइड हॉर्मोनांच्या उत्पादनातही प्रगर्भरक्षी मध्यस्थाचे काम करते.

निरोगी पुरुषात दररोज ३·९-६·८ मिग्रॅ., निरोगी स्त्रीमध्ये ऋतुचक्राच्या पहिल्या अर्ध्यात म्हणजे अंडपुटक अवस्थेत २·३-५·४ मिग्रॅ. आणि दुसऱ्या अर्ध्यात म्हणजे पीतपिंड अवस्थेत २२-४३ मिग्रॅ. आणि गरोदरावस्थेत २७ ते ४० व्या आठवड्यात १८८-५६३ मिग्रॅ. प्रगर्भरक्षी तयार होते.

जैव संश्लेषण : (साध्या संयुगांच्या संयोगाने जटिल संयुग तयार होण्याची जैव प्रक्रिया). प्रगर्भरक्षी प्रामुख्याने कोशिका द्रव्यातील ॲसिटील को-एंझाइम-ए पासून [⟶ एंझाइमे] तयार होते. ते ⇨ कोलेस्टेरॉलापासूनही बनू शकते. ॲसिटेट, कोलेस्टेरॉल, प्रेग्नेनोलॉन व प्रोजेस्टेरॉन (प्रगर्भरक्षी) या क्रमाने हे जैव संश्लेषण होते. प्रगर्भरक्षीसारखीच क्रियाशीलता असणारी आणखी कमीतकमी दोन हॉर्मोने अंडकोशातून स्रवतात परंतु ती अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे गौण आहेत.

प्रगर्भरक्षी : रासायनिक संरचना सूत्र

रासायनिक गुणधर्म : हॉर्मोनांच्या स्टेरॉइड गटापैकी प्रगर्भरक्षी हे एक असून त्याचे स्फटिक घन, शुभ्र व स्थिर असतात. ते लोलकाकार आणि सूच्याकृती या दोन प्रकारच्या बहुरूपांत (निरनिराळ्या तापमान पल्ल्यांत स्थिर राहणाऱ्या  वेगवेगळ्या रूपांत) मिळते. लोलकाकार १२८° से. तापमानावर, तर सूच्याकृती १२१° से.वर वितळतात परंतु त्यांची शारीरिक क्रिया सारखीच असते. प्रगर्भरक्षीचे रासायनिक संरचना सूत्र वरीलप्रमाणे आहे.

प्रगर्भरक्षी पाण्यात पूर्णपणे अविद्राव्य (न विरघळणारे) असून पेट्रोलियम ईथर, अल्कोहोल, ॲसिटोन व पिरिडीन यांखेरीजकरून बहुतेक सर्व कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थात) विद्राव्य असते. ते तेलात विद्राव्य असून रक्तरसात मध्यम प्रमाणात विद्राव्य असते. रासायनिक दृष्ट्या ते डायकीटोन असून त्याचे अनुजात (त्यापासून तयार केलेली इतर संयुगे) कीटोन प्रकारचे असतात [⟶ कीटोने].

चयापचय व उत्सर्जन : (चयापचय म्हणजे शरीरात होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडी आणि उत्सर्जन म्हणजे शरीरातून बाहेर टाकले जाण्याची क्रिया). वार आणि पीतपिंड यांमध्ये एंझाइमांच्या ऑक्सिडीकरणामुळे [⟶ ऑक्सिडीभवन] पूर्वगामी पदार्थापासून प्रगर्भरक्षी तयार होते. स्त्रीमदजनापेक्षा या हॉर्मोनाचे उत्पादन कितीतरी पटींनी अधिक असते परंतु त्याची शक्ती बरीच कमी असते. स्रवणानंतर काही मिनिटांतच बहुतेक सर्व प्रगर्भरक्षी रक्तप्रवाहातून यकृतात पोहोचते आणि तेथे त्याचे अपघटनाने (मोठ्या रेणूचे लहान रेणूंच्या रूपात तुकडे होण्याच्या क्रियेने) अज्ञात संयुगात व क्षपणाने [⟶ क्षपण] प्रेग्नेनेडिओलामध्ये रूपांतर होते. प्रेग्नेनेडिओल जैव दृष्ट्या अक्रिय असते व त्याचे ग्लुकुरॉनिक अम्लाशी संयुग्मन होऊन ते दैहिक रुधिराभिसरणात मिसळते व वृक्काद्वारे (मूत्रपिंडाद्वारे) मूत्रातून उत्सर्जित होते. प्रगर्भरक्षीच्या एकूण मूळ स्रावापैकी १०% भागाचे प्रेग्नेनेडिओलामध्ये रूपांतर होत असल्यामुळे या पदार्थाच्या उत्सर्जन प्रमाणावरून एकूण मूळ उत्पादनाचा अंदाज करता येतो.

 कार्य : प्रगर्भरक्षीच्या शरीरावरील परिणामांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते.

(अ) गर्भाशयावरील परिणाम :प्रगर्भरक्षीचे सर्वांत जास्त महत्त्वाचे कार्य म्हणजे गर्भाशय अंतःस्तरातील स्रावक बदल घडवून आणणे हे होय. या बदलामुळे निषेचित (शुक्राणूशी संयोग पावलेल्या म्हणजे फलन झालेल्या) अंडाच्या रोपणास योग्य परिस्थिती निर्माण होते. हे कार्य प्रत्येक ऋतुचक्रात पीतपिंड अवस्थेत शिगेस पोहोचून गर्भाशय अंतःस्तराची जाडी दुपटीने वाढून ४ ते ६ मिमी. बनते. या बदलांना गर्भधारणापूर्व अवस्था असेही म्हणतात. त्यांचा हेतू अतिस्रावक गर्भाशय अंतःस्तर तयार करण्याचा तसेच पोषक पदार्थांचा (जे पदार्थ पुढे निषेचित अंडाचे रोपण झाल्यास त्याच्या पोषणास मदत करतील अशा पदार्थांचा) साठा तयार करण्याचा असतो. अंडनिषेचनापासून अंडरोपणाच्या काळापर्यंत अंडवाहिनी (अंडकोशातून अंड बाहेर पडल्यावर ज्या नलिकेद्वारे ते गर्भाशयात जाते ती नलिका) व गर्भाशय यांच्या अंतःस्तरापासून स्रवणारे स्राव या अंडाचे पोषण करतात. या स्रावांना ‘गर्भाशयाचे दूध’ म्हणतात. गर्भाशय अंतःस्तरावरील हे सर्व परिणाम फक्त स्त्रीमदजनाने पूर्वीच संवेदनाशील केलेल्या गर्भाशयात आढळतात म्हणजेच स्त्रीमदजनाची प्रगर्भरक्षीच्या कार्यशीलतेकरिता आवश्यकता असते. 


(आ) अंडवाहिनीवरील परिणाम : अंडवाहिन्यांच्या श्लेष्मल (बुळबुळीत स्राव स्रवणाऱ्या) अंतःस्तरात प्रगर्भरक्षी स्रावक बदल घडवून आणते. हे बदल स्रावोत्पादन वाढवतात आणि हा स्राव वर सांगितल्याप्रमाणे निषेचित अंडाच्या नलिकेतील प्रवासात पोषक पदार्थ पुरवतो.

(इ) स्तनावरील परिणाम : प्रगर्भरक्षी स्तनातील खंडिकांची व ग्रंथिकांची वाढ करते [⟶ स्तन]. ग्रंथिकांतील कोशिका आकारमानाने वाढून स्रावक बनतात. प्रगर्भरक्षीमुळे प्रत्यक्ष दुग्धस्रवण होत नाही, तर त्याची तयारी केली जाते. दुग्धस्रवणाकरिता ⇨ पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या (प्रोलॅक्टिनाच्या) चेतनेची आवश्यकता असते. प्रगर्भरक्षीमुळे स्तन भरून येतात. काही अंशी हा फुगीरपणा खंडिका व ग्रंथिका यांच्या वृद्धीमुळे आलेला असतो. स्तनांच्या अधस्त्वचीय (त्त्वचेच्या सर्वांत आतील थरातील) ऊतकातून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातून) द्रवसंचय होऊन त्यात भर पडते.

(ई) विद्युत्‌ विच्छेद्य पदार्थांच्या शरीरातील संतुलनावरील परिणाम : (विद्युत्‌ विच्छेद्य पदार्थ म्हणजे जे वितळलेल्या अवस्थेत वा एखाद्या विद्रावकात विरघळलेल्या अवस्थेत विद्युत्‌ प्रवाह वाहून नेऊ शकतात असे पदार्थ). स्त्रीमदजने, पौरुषजने व अधिवृक्क बाह्यकाची हॉर्मोने यांच्याप्रमाणेच जादा प्रमाणात असल्यास सोडियम क्लोराइड व पाणी या पदार्थांचे दूरस्थ वृक्क नलिकांतून होणारे पुनःशोषण प्रगर्भरक्षी वाढवते आणि तरीदेखील प्रगर्भरक्षी पुष्कळ वेळा सोडियम व पाणी यांचे उत्सर्जन वाढविते. ही क्रिया त्याच्या अल्डोस्टेरॉन या हॉर्मोनाच्या बरोबर असणाऱ्या चढाओढीमुळे होते. वृक्कनलिका कोशिकांतर्गत विशिष्ट प्रथिनाशी संयुग्मित होण्याची ही चढाओढ असते. एकदा प्रगर्भरक्षीने शिरकाव केल्यानंतर अल्डोस्टेरॉनाला जागा मिळत नाही. परिणामी अल्डोस्टेरॉनाच्या क्रियाशीलतेत अडथळा येतो आणि सोडियम व पाणी यांचे निव्वळ उत्सर्जन होते.

(उ) प्रथिन अपचयात्मक परिणाम : ग्लुकोकॉर्टिकॉइडे [⟶ अधिवृक्क ग्रंथि] ही हॉर्मोने ऊतक कोशिकांतील ⇨ ॲमिनो अम्ले बाहेर आणून रक्तद्रवातील ॲमिनो अम्लांत ज्याप्रमाणे वाढ करतात, त्याप्रमाणे प्रगर्भरक्षी प्रथिनांवर सौम्य अपचयात्मक परिणाम (जटिल संयुगाचे अपघटन करणे) करू शकते. प्राकृतिक (सर्वसामान्य) लैंगिक आवर्तनामध्ये ही क्रिया फारशी महत्त्वाची नाही परंतु गरोदरावस्थेत वाढत्या गर्भाची प्रथिनांची गरज भागविण्याकरिता ती उपयुक्त असावी.

(ऊ) इतर परिणाम : प्रगर्भरक्षी हे स्त्रीमदजनाच्या योनिमार्ग अधिस्तरावरील परिणामात परिवर्तन घडवून आणते. ते पृष्ठस्थ थरातील कोशिकांच्या विशल्कनास (झडून पडण्यास) आणि तेथे श्वेतकोशिका गोळा होण्यास कारणीभूत असते. याशिवाय कोशिकांच्या शल्कीभवनास (खवल्यासारख्या कोशिकांत रूपांतर होण्यास) ते प्रतिबंध करते. स्त्रीमदजनाच्या प्रभावामुळे योनीमार्गाचा स्राव पातळ पाण्यासारखा व विपुल असतो, तर प्रगर्भरक्षीमुळे तो घट्ट, चिकट व अल्प बनतो. ही कृती प्रत्येक ऋतुचक्रात होत असते. ऋतुचक्राच्या पीतपिंडावस्थेत मूल शारीरिक तापमानात (पूर्णतः विश्रांत अवस्थेत असलेल्या शरीराच्या तापमानात) जी वाढ होते, त्यास प्रगर्भरक्षी करणीभूत असते. ही तापमान वाढ अंडमोचनाशी संबंधित असते.

गरोदरावस्थेत गर्भाशयाच्या स्नायूंच्या वृद्धीस प्रगर्भरक्षी मदत करते, तसेच त्यांचा नेहमीचा तान (संपूर्णतया शिथिल न होता शिल्लक असणारे स्नायूंतील आंशिक आकुंचन) मंदावण्यास कारणीभूत असते. काही प्राण्यांच्या (उदा., गिनीपिग) जननमार्गातील जघन संधीच्या व त्रिक संधींच्या बंधांवर परिणाम करून सांधे सैल पडण्यास ते मदत करते. या क्रियेची प्रसूतीच्या वेळी गरज असते. प्रगर्भरक्षीचे मोठ्या प्रमाणावर किंवा सतत उत्पादन होत राहिल्यास अंडकोशाच्या अंडमोचन क्रियेस प्रतिबंध होतो व अंडपुटकांची वाढ रोखली जाते.

अधोथॅलॅमस, पोष ग्रंथी व अंडकोश यांचे हॉर्मोनविषयक परस्परसंबंध : अधोथॅलॅमस [मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भाग ⟶ तंत्रिका तंत्र], पोष ग्रंथी आणि अंडकोश यांचा गर्भाशयाच्या कार्याशी जवळचा संबंध आहे. पोष ग्रंथीच्या अग्र व पश्च दोन्ही खंडांपासून स्रवणारी हॉर्मोने गर्भाशयावर अंडकोशाच्या हॉर्मोनांमार्फत परिणाम करतात. अग्र खंडांतून स्रवणाऱ्या तीन जनन ग्रंथी पोषक हॉर्मोनांची अनुक्रमे (१) पुटकोद्दीपक (फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हॉर्मोन एफ एस एच), (२) पीतपिंडकर (ल्युटिनायझिंग हॉर्मोन एल एच) आणि (३) पीतपिंडपोषक (ल्युटिओट्रोपिक हॉर्मोन, एल टी एच) अशी नावे आहेत. प्रगर्भरक्षीच्या प्रत्यक्ष स्रावोत्पादनास पीतपिंडपोषक हॉर्मोन चेतना देते. प्रगर्भरक्षीचा पूर्वगामी पदार्थ पीतपिंडकर या हॉर्मोनाच्या चेतावणीमुळे अगोदरच तयार झालेला असतो. ऋतुचक्राच्या एकविसाव्या दिवशी प्रगर्भरक्षीचे उत्पादन पराकोटीस पोहोचते व गर्भधारणा झाल्यास वारेतून पुरेसे उत्पादन होऊ लागेपर्यंत म्हणजे गर्भारपणाच्या ३-४ महिन्यांपर्यंत चालूच राहते. गर्भधारणा न झाल्यास ऋतुस्राव सुरू होण्याच्या सुमारास त्याची क्रियाशीलता कमी होते.

पोष ग्रंथीच्या जनन ग्रंथि-पोषक हॉर्मोनांच्या उत्पादनावर अधोथॅलॅमसातील मुक्तिकारक हॉर्मोनांचा परिणाम होतो. [→ पोष ग्रंथी].

स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी गर्भाशय अंतःस्तरातील मासिक बदलांना तसेच ऋतुस्राव सुरू करण्यास जबाबदार  असतात. अंडकोशातील या हॉर्मोनांचे उत्पादन पोष ग्रंथीतील जनन ग्रंथि-पोषक हॉर्मोनाच्या संतुलनावर नियंत्रण करते. उदा., स्त्रीमदजनाचे रक्तातील प्रमाण वाढताच पोष ग्रंथीच्या उत्पादनवर परिणाम होऊन एका जनन ग्रंथि-पोषकाची पातळी कमी होते. अंडकोशाची दोन्ही हॉर्मोने गर्भाशय अंतःस्तरावरील प्रत्यक्ष परिणामास कारणीभूत असली, तरी अधोथॅलॅमस आणि पोष ग्रंथीच शेवटी खऱ्या अर्थाने नियंत्रक असतात. 


प्रगर्भरक्षीचे उत्पादन व औषधी उपयोग : पीतपिंडापासून अनेक क्रियाशील पदार्थ मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. जी. डब्ल्यू. कॉर्नर आणि डब्ल्यू. एम्‌. ॲलन यांनी १९३० मध्ये प्रगर्भरक्षीसारखा क्रियाशील असलेला पदार्थ मिळविला. आडोल्फ बूटेनांट यांनी स्टिग्मास्टेरॉलापासून [एका वनस्पतिजन्य स्टेरॉलापासून ⟶ स्टेरॉल व स्टेरॉइडे] आणि मूत्रातून उत्सर्जित होणाऱ्या प्रेग्नेनेडिऑलापासून प्रगर्भरक्षी संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) तयार केले. त्यानंतर प्रगर्भरक्षी निरनिराळ्या संश्लेषण पद्धती वापरून तयार करता येऊ लागले. प्रेग्नेनोलॉनाचे ऑक्सिडीकरण लवकर होऊन प्रगर्भरक्षी तयार होते म्हणून बहुतेक सर्व संश्लेषण पद्धतींत प्रेग्नेनोलॉनाच्या निर्मितीस महत्त्व आहे.

नैसर्गिक प्रगर्भरक्षी यकृतातील चयापचयाद्वारे केवळ सहा मिनिटांत रूपांतरित होते व अक्रिय बनते. संश्लेषित प्रगर्भरक्षी व त्याचे काही अनुजात तोंडाने घेतल्यास किंवा अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास अधिक काळपर्यंत रक्तद्रवात राहू शकतात. याशिवाय मात्रा व प्रभाव निश्चित स्वरूपाचे आणि विश्वासार्ह असतात. त्यांच्या शरीरावरील परिणामातही थोडाफार फरक असल्यामुळे त्यांचा वापर आवश्यकतेनुसार करता येतो.

संश्लेषित प्रगर्भरक्षी आणि तत्सम पदार्थांच्या शोधानंतर स्त्रीरोगविषयक उपचारांमध्ये क्रांतिकारक बदल होत गेले. स्त्रियांच्या पुढील विकारांत वा अन्य कार्याकरिता संश्लेषित प्रगर्भरक्षी (ज्यांना मिळून ‘गर्भधारणापोषके’ असे म्हणतात) उपयुक्त आहेत.

(१) अपक्रियाजन्य गर्भानसताना होणारा रक्तस्राव.शय रक्तस्राव : जननेंद्रियांची व शरीराच्या इतर भागांची कोणतीही विकृती

(२) गर्भाशय अंतःस्तर अस्थानता : गर्भाशय अंतःस्तर ऊतकाची गर्भाशयाशिवाय इतरत्र (उदा., मूत्राशय, लहान आतडे, अंडकोश वगैरे ठिकाणी) होणारी अपसामान्य वाढ.

  

(३) स्तनशूल : २५ ते ४० वयाच्या दरम्यान कमी मुले झालेल्या स्त्रीत उद्‌भवणारी विकृती.

 

(४) ऋतुस्रावपूर्व मानसिक ताण.

 

(५) अतिदुग्धस्रवण : प्रमाणापेक्षा जादा दूध उत्पन्न होऊन गळत राहणे.

 

(६) कालपूर्व यौवनारंभ : वयाच्या दहाव्या वर्षापूर्वीच ऋतुस्राव सुरू होणे.

 

(७) अनार्तव : ऋतुस्रावाची सुरुवात न होणे. प्रगर्भरक्षी फक्त स्त्रीमदजन संवेदित गर्भाशयाच्या अंतःस्तरावर परिणाम करू शकत असल्यामुळे या दोन्ही हॉर्मोनांचा उपयोग करावा लागतो.

 

(८) वारंवार होणारा गर्भपात : गर्भधारणा होऊन सुरुवातीच्या काही महिन्यांतच गर्भपात होणे व ही प्रक्रिया लागोपाठ तीन वेळा होणे.

 

(९) गर्भधारणेच्या निदानाकरिता : गर्भधारणा होताच दुय्यम अनार्तव होतो. प्रगर्भरक्षी व स्त्रीमदजन यांचे मिश्रण दिल्यानंतर गर्भधारणा झाली असल्यास ही हॉर्मोने देण्याचे बंद करताच नेहमी सुरू होणारा प्रत्याहारी गर्भाशय रक्तस्राव सुरू होत नाही.

 

(१०) शूलार्तव : ऋतुस्रावापूर्वी किंवा चालू असताना ओटीपोटात वेदना होणे.

 

(११) गर्भनिरोधक गोळ्या : संश्लेषित प्रगर्भरक्षी व संश्लेषित स्त्रीमदजन यांच्या मिश्रणापासून बनविलेल्या गोळ्या.

 

(१२) गर्भाशय अंतःस्तराचा कर्करोग : प्रगर्भरक्षी मोठ्या प्रमाणात दिल्यास कर्कप्रक्षेप (शरीरातील इतर भागांत होणाऱ्या गौण गाठी) तात्पुरते नाहीसे होऊन जीवन काही महिने वृद्धिंगत होऊ शकते.

संदर्भ : 1. Clayton, S. G. and others, Ed. Gynaecology, London, 1974.

           2. Howkins, J. Bourne, G., Ed. Shaw’s Textbook of Gynaecology, Edinburgh, 1976.

           3. Kistner, R. W. The Use of Progestins in Obsetrics and Gynaecology, Chicago, 1969.

          4. Satoskar, R. S. Bhandarkar, S. D. Pharmacology and Pharmacotherapeutics, 2 Vols., Bombay, 1978.

          5. Wilson, A. and others, Applied Pharmacology, Edinburgh, 1979.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं. मिठारी, भू. चिं.