प्रकृति : (आयुर्वेद). स्वभाव, निसर्ग, आरोग्य स्वाभाविक-नैसर्गिक-प्राकृतिक निरोगी शरीरातील आरोग्य. ज्या शरीरात दुःख नाही, दुःखद संवेदना ही निर्माण होत नाही, नित्य सुखद संवेदनांच्या सूक्ष्म छटांचा अखंड संचार शरीरात होत असतो म्हणूनच ज्याचा आत्मा, इंद्रिये, मन ही सदा प्रसन्न असतात, जो थंडी, वारा, ऊन, श्रम, कष्ट सहज चांगल्या तऱ्हेने सहन करू शकतो, ज्याचा अग्नी सर्व गुणांचे व रसांचे अन्न चांगल्या तऱ्हेने पचन करू शकतो, जो अती उंच ना ठेंगू (मध्यम), लठ्ठ ना बारीक (पुष्ट), अतिकाळा ना अतिगोरा (सावळा), अतिकेसी ना अकेसी (बेताचे केस असलेला) मनुष्य, ज्याची बुद्धी, स्मृती, धृती खाण्यापिण्याच्या मोहाला बळी पडत नाही असा निश्चयी, नियमित वागण्याचा स्वभाव असलेला मनुष्य निरोगी प्राकृतिक होय. बाकीचे अप्राकृतिक होत यांना चरकांनी दोषप्रकृतीचे म्हटले आहे. सुश्रुताचार्यांनी दोषप्रकृतीच्या लोकांना प्राकृतिक म्हटले आहे व प्राकृतांना समप्राकृतिक-सम म्हटले आहे. जन्मतःच शरीरात दोषांचे साम्य व वैषम्य आल्यामुळे अशी शरीरे असतात.
प्रकार : दोषप्रकृतीचे वात, पित्त, कफ आणि दोन दोन दोषांनी युक्त अशा सहा दोषप्रकृती व एक प्रकृती असे सात प्रकार होतात. वातप्रकृतीमध्ये वाताच्या दुष्टीची लक्षणे असतात. अशीच इतर प्रकृतींत त्या त्या दोषांची लक्षणे जन्मतःच असतात. ही लक्षणे दुःखदायीच असतात. वातप्रकृतीला नेहमी थंडी बाधते म्हणून थंड, रूक्ष, हलक्या अशा हवापाणी व अन्नाला जपावे लागते आणि उष्ण, स्निग्ध, जड अशांची जरूर क्षणोक्षणी भासते, त्यांनीच त्यांना बरे वाटते. त्याच्या शरीरात आरोग्याच्या स्वाभाविक सुखसंवेदनांचा अभाव असतो व नेहमी बाह्य उष्णादिकावर अवलंबून रहावे लागते, त्याला आत्मसुख नाही, त्याचे सुखस्वास्थ्य परावलंबी असते. त्याचे मनही प्रसन्न नसते, सदा अतृप्त व मत्सरी असते. तसेच पित्तप्रकृतीला सतत उष्णादिकांचे दुःख व शीतादिकांची आकांक्षा असते. प्राकृत-निरोगी शरीरात हे नको व हे पाहिजे अशी दुःख व दुःखदांचा द्वेष आणि सुखदांची भूक, ती न मिळाली तर पुन्हा दुःख ही नसतात. त्यांना सर्व चालते, शरीरात नित्य सुख व बाहेरही सुख. बाहेरचे अमके द्रव्य नको म्हणजे ते दुःखद म्हणून त्याचा द्वेष-हेही नसते. द्वेषादि भावनांच्या निर्मितीचेही प्रसंग नसतात.
कारणे व काही प्रकार : मातापित्यांच्या शुक्रधातू, ज्या वेळी गर्भधारणा होते तो काळ (ऋतू व वेळ), गर्भाशय (त्याचे दोषत्व वा निर्दोषत्व), तसेच महाभूतांचे विकार, आईचे आहारविहार यांचा गर्भशरीरावर इष्टानिष्ट परिणाम होऊन प्रकृती उत्पन्न होतात. त्या कारणाचा प्रभाव अधिक त्या कारणाचे नावही त्या प्रकृतीला द्यावे. तो प्रकार मानावा.
आणखी प्रकार : काही ग्रंथकार पांचभौतिक प्रकृती सांगतात. वात, पित्त व कफ या वर सांगितलेल्या प्रकृती क्रमाने वायू, अग्नी व जल प्रकृती होत, शिवाय आकाशीय व पार्थिव प्रकृती ते मानतात.
महाप्रकृती (मानसिक प्रकृती) : वर शरीराच्या भौतिक घटकांच्या प्रकारांना अनुसरून प्रकृती सांगितल्या. मानसिक गुणांच्या अधिक्यामुळे होणाऱ्या प्रकृती सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारच्या आहेत. सात्त्विक सात, राजस सहा व तामस तीन प्रकारच्या आहेत. यांना महाप्रकृती म्हणतात.
मूल प्रकृती : सर्व जगताच्या निर्मितीला जी कारण पण जिला कोणीही कारण नाही अशी सत्त्व, रज व तमोगुणात्म अशी मूल प्रकृती आहे. ही अविकृती आहे.
प्रकृती विकृती : मूल प्रकृतीपासून झालेल्या विकृती पण सर्व जगाला कारण असलेल्या प्रकृती सात आहेत. महान अहंकार व पंचतन्मात्रा या त्या होत.
चिकित्सा : दोषप्रकृती नाहीशी करून प्रकृती करणाऱ्या चिकित्सेला प्रकृतिस्थापनी चिकित्सा म्हणतात. ती महाप्रकृतींची सत्त्ववृद्धी व्हावी म्हणून अनुकूल आहारविहार देऊन नैष्ठिकी चिकित्सा करावी. प्रकृतिस्थापनी चिकित्सेत जन्मतः वात, पित्त, कफ यांपैकी एकेका वा दोन-दोन दोषांचे आधिक्य असलेल्या शरीरातील त्या अधिक दोषांचा नाश करणे अत्यावश्यक असते. अधिक दोषांच्या गुणांच्या विपरीत गुणी द्रव्यांचे सेवन करणे ही ती चिकित्सा होय. अग्नी सम होईपर्यंत असे सेवन केल्यानंतर ही चिकित्सा बंद करावी.
पहा : आयुर्वेदीय तत्त्वज्ञान व पदार्थविज्ञान सांख्यदर्शन.
जोशी, वेणीमाधवशास्त्री