पौष : हिंदू कालगणनेप्रमाणे दहावा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास चंद्र पुष्य नक्षत्रात असतो, त्यामुळे या महिन्याला पौष हे नाव पडले आहे. याचे वैदिक नाव तैष असून याला सहस्य असेही म्हणतात. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा महोत्सव नवरात्रासारखा असतो. पौष पौर्णिमेस पौर्णिमान्त माघ सुरू होतो, म्हणून या दिवसापासून माघस्नान सुरू करतात. पौष महिन्यात विवाहादि मंगलकार्ये करीत नाहीत. पौष आमावास्येला कधीकधी अर्धोदय अथवा महोदय पर्व असते.
ठाकूर, अ. ना.