पोशाख व वेशभूषा : सामान्यपणे स्त्री-पुरुष जे कपडे वापरतात, त्यांना पोशाख म्हटले जाते. कपडे, पेहेराव, वस्त्रे किंवा वस्त्रप्रावरणे हे शब्द याच अर्थाचे आहेत. इंग्रजीतील ‘ड्रेस’ या शब्दाचा एक अर्थ असाच आहे. वेशभूषा म्हणजे पोशाखपद्धतीचे एक विशिष्ट स्वरूप, असे म्हणता येईल. ही विशिष्टता म्हणजे एकूण पेहेरावपद्धतीला हेतुपूर्वक व योजनापूर्वक दिलेला उठाव होय. असा उठाव देण्यासाठी विशिष्ट प्रकारची वस्त्रे, शिरोभूषणे [→शिरोभूषणे व शिरोवेष्टाने], ⇨कंठभूषणे, ⇨कटिभूषणे, ⇨कर्णभूषणे, ⇨पादभूषणे, ⇨बाहुभूषणे यांसारखे अलंकार, पादत्राणे, केशभूषा व विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने यांचा अवलंब केला जातो.इंग्रजीतील ‘कॉस्च्युम’ हा शब्द याच अर्थाचा आहे. प्रत्यक्षात पोशाख व वेशभूषा हे शब्द पुष्कळदा पर्यायी म्हणून वापरले जातात. या विषयाच्या विवेचनातही त्यांच्यातील काटेकोर फरक राखणे कठीण आहे.

पोशाखासंबंधी विचार करताना पुष्कळदा एक ढोबळ असे वर्गीकरण केले जाते. समाजातील सर्वसाधारण स्त्री-पुरुष व मुले सर्वसामान्य व्यवहारात जी पोशाखपद्धती वापरतात, तिचा एक वर्ग आणि त्या समाजात गटवार आढळणारी विशिष्ट पेहेरावपद्धती हा दुसरा वर्ग. या दुसऱ्या वर्गात धर्मगुरू आणि त्यांचे अनुयायी यांचे नित्यनैमित्तिक धर्मकार्यातील विशिष्ट पेहेराव, सैनिकी क्षेत्रातील,शाळा-महाविद्यालयातील किंवा इतर संघटनांचे (उदा., बालवीर, वीरबाला) गणवेश वकीलवर्गासारख्या व्यावसायिकांचे विशिष्ट कपडे, आद्यौगिक कामगारांचे तसेच कचेऱ्यांतील शिपाईवर्गाचे गणवेश, विविध खेळांतील खेळांडूची खास पोशाखपद्धती, रंगभूमीवरील पात्रांची वेशभूषा, प्रत्येक राष्ट्राने निश्चित केलेला राष्ट्रीय पोशाख, विद्यापीठातील पदवीदानप्रसंगी कुलगुरू आणि स्नातक यांनी वापरावयाचा विशिष्ट पोशाख यांसारख्या वैशिष्ट्यापूर्ण पोशाख-प्रकारांचा अंतर्भाव होतो. हे गटवार पोशाख-प्रकार प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही काळांत आढळून येतात. आधुनिकपूर्व समाजात वर्गविशिष्ट वा जातिविशिष्ट किंवा व्यवसायविशिष्ट पोशाख-प्रकारांचे संकेत निर्माण झालेले होते. त्यातून वस्त्रधारकाचे स्थान व दर्जा सूचित होईपण हा प्रकार आधुनिक काळात कमी झालेला आहे व पोशाख-प्रकारांत एकसारखेपणा येऊ लागलेला आहे. प्रस्तुत लेखात या वर्गविशिष्ट किंवा गटविशिष्ट पेहेराव-प्रकारांचा विचार विस्तारभयास्तव टाळलेला आहे.

पोशाख वापरण्यामागील प्रेरणांचा अभ्यास आधुनिक मानवशास्त्रज्ञांनी केलेला आहे. शरीराचे संरक्षण, लज्जारक्षण, सौंदर्यवर्धन व प्रतिष्ठाप्रदर्शन यांसारख्या विविध प्रेरणा वस्त्रपरिधानामागे असतात, असे म्हटले जाते. स्त्रियांची वेशभूषा ही पुरुषांना आकृष्ट करण्यासाठी केली जाते आणि त्यासाठी स्त्रीदेहाचे सौंदर्य वाढविण्याचा व त्याचे सूचक दर्शन घडविण्याचा हेतू त्यामागे असतोतर पुरुषांच्या वेश-भूषेमागेही स्त्रीला आकृष्ट करण्याची प्रेरणा असू शकते. वस्त्रधारणेमागील यांसारख्या प्रेरणा मतभेदातीत असल्या, तरी त्यांचा ऐतिहासिक उत्क्रांतिक्रम मात्र वादग्रस्त आहे. उदा., वस्त्रधारणेमागील आद्य प्रेरणा ही लज्जारक्षणाची की देहरक्षणाची हे निर्विवादपणे सांगता येणार नाही. ‘फॅशन’ ही आधुनिक काळातील एक महत्त्वाची प्रेरणा मानली जातेतथापि ती सर्वकाळी व सर्वत्र सारखीच अस्तित्वात होती, असे म्हणता येणार नाही. उदा., पारंपरिक ग्रामीण समाजात ही प्रेरणा फारशी आढळत नाही. सामान्यत: पुरुषवेश हा सामाजिक स्थान आणि दर्जा सुचविणे, तर स्त्रीवेश हा पुरुषांना आकृष्ट करणे या प्रेरणांनी सिद्ध होतोतथापि सोईचे किंवा उपयुक्ततेचे तत्त्व या दोन्ही प्रेरणांना योग्य ती मुरड घालत असते, असे म्हणता येईल.

आदिम समाजात पोशाखपद्धतीमागील इतर प्रेरणांप्रमाणेच आणखी एक विशिष्ट प्रेरणा महत्त्वाची होती. ती म्हणजे जादूटोणा किंवा भूतपिशाच यांपासूनचे संरक्षण. यासाठी आदिम स्त्री-पुरुष विशिष्ट अवयव विशिष्ट प्रकारे रंगवीत, अंगावर गोंदवून घेत व ताईत, मणी [→मणि] इत्यादींचा वापर करीत. विशेषतः कवड्यांचा उपयोग याबाबतीत लक्षणीय ठरतो. कवड्यांच्या माळा धारण करणे, म्हणजे वंध्यत्वदायी करणीपासून संरक्षण करणे, असे मानले जाई.

समाजातील पोशाख आणि वेशभूषा निश्चित होत जाताना त्यांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. पोशाखपद्धती ही समाजविशिष्टच असते. समाजाच्या धार्मिक, सामाजिक,आर्थिक,शासकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचा व कल्पनांचा त्यावर फार मोठा परिणाम होतो. पोशाखपद्धतीच्या निश्चितीत समाजाच्या भौगोलिक परिस्थितीचाही घटक महत्त्वाचा असतो. हवामान आणि कापूस, लोकर, लिनन ह्यांसारखी वस्त्रमाध्यमे त्या त्या प्रदेशात जशी व ज्या प्रमाणात उपलब्ध असतात, त्यावर पोशाखपद्धतीचे आकार-प्रकार अवलंबून असतात. उष्ण कटिबंधातील व शीत कटिबंधातील पेहेरावपद्धतीत मूलभूत फरक पडतो, तो हवामानामुळेच. इतर समाज आणि देश यांच्याशी घडणाऱ्या संपर्कामुळेही पोशाखपद्धती ठरते किंवा बदलते.त्याचप्रमाणे वस्त्रमाध्यमांची निर्मिती व उपलब्धता, वस्त्र विणण्याच्या व शिवण्याच्या कलेचा विकास आणि या क्षेत्रातील यांत्रिक-तांत्रिक प्रगती यांमुळेली पोशाखपद्धतीत स्थित्यंतरे घडून येतात.

पोशाखनिश्चितीच्या या विविध घटकांचा ढोबळ ऐतिहासिक दृष्टीने विचार करतान काही गोष्टी लक्षात येतात. उदा., अगदी प्राचीन काळी आदिम समाजात जनावरांच्या कातड्याचा तसेच झाडांच्या साली, पाने, गवत यांचाही वस्त्रप्रावरणासाठी उपयोग केला जाई. अंगावर गुंडाळून घेण्याची वस्त्रे ही शेतीच्या उदयकाळी वापरात असावीत. प्राचीन व्याधसंस्कृतीच्या काळात हाडांच्या सुयांचा वापर करून कातडी कोट किंवा पायजमे शिवण्याची प्रथा उदयास आली. पुढे हातमाग आले व त्यांतून कापडाचे लहान अरुंद तुकडे विणले जाऊ लागले. उत्तरीय व अधोंशुक म्हणता येईल अशा कापडाच्या दोन तुकड्यांना केवळ टाचून-बांधून अंगाभोवती लपेटून घेता येईल अशी ढगळ अंगवस्त्रे तयार झाली. शरीराचे मोजमाप घेऊन त्यानुरूप कापड कापून आणि हालचालीस सुकर असे तुकडेजोड हातशिवणीने करून कपडे तयार करण्याची प्रथा पुढे सुरू झाली. सोळाव्या शतकात मोजे तयार करण्याचे यंत्र (स्टॉकिंग फ्रेम) व एकोणिसाव्या शतकात शिवणयंत्र प्रचारात आले आणि वस्त्रनिर्मितीत वेगाने बदल झाला. प्राचीनकाळच्या प्रारंभी लोकर व लिनन हे विशेषत्वाने उपलब्ध होते. चीनमधून रेशीम सर्वत्र पसरले. कापसाचे उत्पादन चीनप्रमाणेच भारत आणि आग्नेय आशियाई देशांत प्राचीनकाळापासून होत होते. या सर्व वस्त्रामाध्यमांचा कमीअधिक प्रमाणात सर्वत्र वापर झाल्याचे दिसून येते. विसाव्या शतकात नॉयलॉनसारख्या संश्लिष्ट कापडाची निर्मिती होऊ लागली. कृत्रिम धाग्यांचे इतरही कापड-प्रकार पुढे आले आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण व संपर्क वेगाने वाढल्याने त्यांचा जगभर प्रसार झाला. शिवणकलेचे तंत्र व यंत्र यांतही फार मोठी प्रगती घडून आली. आधुनिक पोशाखपद्धतीवर या सर्व घटकांचा फार मोठा परिणाम झालेला आहे.

जगातील पोशाखपद्धती : जगातील विविध समाजांत आणि देशांत विविधप्रकारच्या पोशाखपद्धती आढळतात. यांतील काही समाज आणि देश इतिहासजमाही झालेले आहेत. शिवाय विद्यमान जागतिक समाजांत आणि देशांत ज्या पोशाखपद्धती रूढ आहेत, त्यांच्यामागेही वेगवेगळ्या प्रकारचा ऐतिहासिक विकासक्रम आहे. येथे अत्यंत स्थूल दृष्टीने काही जागतिक पोशाखपद्धतींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.


 प्राचीन सुमेरियन संस्कृतीत वस्त्रप्रावरणांसाठी बकऱ्याच्या व मेंढीच्या कातड्यांचा उपयोग करीत. पुढे लोकरीचे व लिननचे कापड वापरात आले. स्त्रियांचा पोशाख कातडीच, पण अधिक लांब व सर्वांग झाकणारा असे. उत्तरकालात सुमेरियन समाजात सुती व रेशमी, भरतकाम केलेली, झालर व धातूचे बारीक गोळे लावलेली सुशोभित वस्त्रे वापरात आली. उच्च स्तरातील लोक खांद्यावर वस्त्र अडकविण्यासाठी सोन्याचा हूक (फिब्यूला) वापरीत. बॅबिलोनियन संस्कृतीत अशीच पोशाखपद्धती रूढ होती. शिलाईचे कपडे त्या काळी प्रचारात नव्हते.

प्राचीन ईजिप्शियन पुरुषवेश म्हणजे एक कटिवस्त्र व खळ लावून कडक केलेल्या पांढऱ्या शुभ्र लिननचा झगा. झग्याला खाली चुण्या असत. स्त्रिया पारदर्शक लिननचे एक वस्त्र अंगाभोवती लपेटून घेत. ट्यूनिक म्हणून त्याचाच पुढे पुरुषांनी थोड्याफार फरकाने स्वीकार केला. ईजिप्शियन पोशाखपद्धती पुढे झालर लावलेले लिनन कापड, जडजवाहीर, सौंदर्यप्रसाधने आणि ⇨ केसांचे टोप या साधनांनी अधिकाधिक भपकेदार होत गेली.

प्राचीन ग्रीक पोशाखात ‘चिटॉन’, ‘हिमेशन’ व ‘क्लॅमिज’ हे मुख्य प्रकार होते. चिटॉन हे स्त्री-पुरुषात समान असे उत्तरीय वस्त्र म्हणता येईल. मात्र स्त्रियांचे चिटॉन अधिक लांब असे. हिमेशन हे शालीवजा वस्त्र विविधप्रकारे अंगावर लपेटून घेतले जाई. क्लॅमिज हा हिमेशनचाच,पण लहान असा वस्त्रप्रकार होय. कमरपट्टा किंवा कमरबंध हे ग्रीक स्त्रीवेशाचे वैशिष्ट्य होते. प्राचीन रोमन पुरुषांच्या पोशाखात ट्यूनिक हे मुख्य वस्त्र होते. त्यांवर ‘टोगा’ हे झग्यासारखे वस्त्र, विशेषतः सार्वजनिक प्रसंगी, वापरले जाई. रोमन स्त्रियांचा पेहेराव ग्रीक स्त्रियांच्या पेहेरावाप्रमाणेच असे.

प्राचीन ईजिप्शियन शाही परिवेश, इ. स. पू. १४ वे शतक.

उत्तर यूरोपीय प्रदेश, प्राचीन इराण, मंगोलिया आणि उत्तर अमेरिकेचा काही भाग यांतील पुरुष लांबलचक पायजमा वापरत. मोजे आणि ट्यूनिक यांचाही वापर केला जाई. कधीकधी स्त्रियाही पायघोळ पायजम्याचा वापर करीत. प्राचीन रोमन लोक पायजमा हा रानटी लोकांचा म्हणून त्याचा तिस्कार करीतपरंतु मध्ययुगाच्या सुरुवातीला इटलीत प्रथम सैनिकांत व पुढे कामगारवर्गात त्याचा वापर होऊ लागला. पायाशी तंग बसणाऱ्या विजारीमध्ये त्याचे रूपांतर होऊन पुढे तो इटालियन पुरुषवेशात समाविष्ट झाला.

प्राचीन ग्रीक पोशाखपद्धती : इ. स. पू. ५ व्या शतकातील एक उत्थित शिल्प.

इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीलाच रोमन साम्राज्य विघटित झाले व प्राचीन पोशाखपद्धती बदलली. यानंतरच्या मध्ययुगात रोमन पोशाखपद्धतीत बायझंटिन भपकेबाज पेहेरावाचा जो प्रभाव होता, तो कमी झाला आणि बर्बर आक्रमकांच्या साध्या वेशभूषेचे अनुकरण होऊ लागले.

मध्ययुगीन रोमन स्त्री-पुरुष दुहेरी ट्यूनिक वापरीत. आतल्या ट्यूनिकला लांबलचक पण तंग बाह्या आणि उंच गळा असे.त्यावरून घालावयाचा ट्यूनिक किंवा झगा सैल बाह्यांचा असे तथापि मध्ययुगीन यूरोपीय पोशाखाचे सर्वसामान्य स्वरूप म्हणजे दोन किंवा तीन लंबकोनी आकाराची वस्त्रे अंगावर वेगवेगळ्या पद्धतीने लपेटणे हे होते.


 इसवी सनाच्या बाराव्या शतकानंतर यूरोपीय पोशाखपद्धतीत वेगाने बदल झाला. पूर्वेकडील आशियाई देशांतून त्या काळात उत्तमोत्तम व विविध प्रकारचे कापड उपलब्ध होऊ लागले. त्याचप्रमाणे कापड विविध प्रकारे कापून कपडे तयार करण्याची नवी कलाही विकसित झाली. फॅशन किंवा वस्त्रप्रावरणाच्या शैली यांची नवी जाणीव निर्माण झाली. योजनापूर्वक कापड कापण्याच्या आणि शिवणकलेच्या उदयाबरोबरच यूरोपीय प्रबोधनकालाची नवी दृष्टी उदयास येत होती. परिणामतः यूरोपीय पोशाखपद्धतीत झपाट्याने बदल होत गेले.

प्राचीन रोमन पुरुषवेश : एक रोमन शिल्पाकृती.

लांबलचक कमरबंधाचा ट्यूनिक हा कोटासारखा स्त्री व पुरुष दोघेही वापरीत असत. त्यांवर बिनबाह्यांचा आणि रुंद काखांचा (म्हणजे जाकिटासारखा) सरखोच घातला जाई. घराणेनिदर्शक अशी बोधचिन्हे किंवा पदके कपड्यांवर मिरवण्याची वैशिष्ट्यापूर्ण व लोकप्रिय पद्धत मध्ययुगात उदयास आली. अंगासरशी नीटपणे बसणारे कपडे वापरण्यावर भर दिला जाऊ लागला. यासाठी वापरणाऱ्याच्या शरीराचे मोजमाप घेऊन त्यानुरूप कापड कापण्यावरही भर दिला गेला. याच सुमारास बटनांची प्रथा सोय व सजावट म्हणून प्रथमच सुरू झाली. लांब बाह्यांच्या पण बनियनवजा आतल्या खमीसावर अंगाशी तंग बसणारा आणि पट्टा लावलेला झगेवजा कोट वापरात आला. मोज्यांचा वापर पाय झाकण्यासाठी विशेषतः पुरुषवर्गांत रूढ झाला. सु. इ. स. १३५० या कालावधीत ओव्हरकोट आणि त्याबरोबर कॉलरचा प्रवेश यूरोपीय वस्त्रप्रावरणात पहिल्यांदाच झाला. स्त्रिया काचोळीवजा पोलक्यावर इंग्रजी ‘व्ही’ च्या आकाराचा गळा असलेला लांबलचक व घोळदार झगा वापरीत. कमरेजवळच्या उंच पट्ट्यावर पुढे झगा खोचत. मध्ययुगीन पोशाखाचे आत्यंतिक स्वरूप विस्तृत लोंबणाऱ्या बाह्या, टोकदार पादत्राणे आणि चित्रविचित्र शिरोभूषणे यांतून दिसून येते. मध्ययुगातल्या सर्वसामान्य पुरुषवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अंगासरशी अगदी तंग व काटेकोरपणे बसणारे कपडे आणि स्त्रीवेश म्हणजे नितंबापर्यंत अगदी घट्ट बसणारे व त्याखाली अगदी ढगळ, चुणीदार जमिनीपर्यंत पसरणारे झगे होत. लांबलचक व ढगळ पोशाखाचे उच्च स्तरावरील वर्गांचे वैशिष्ट्य या काळात नष्ट झालेतथापि राजघराण्यातील लोक, धर्मोपदेशक, विद्वान लोक तसेच न्यायाधीश यांसारख्या ठराविक वर्गात मात्र ढगळ व सैल पेहेरावपद्धतीचे प्राची वैशिष्ट्य टिकून राहिले.

राजघराण्यातील यूरोपीय स्त्रीची वेशभूषा, १६ वे शतक.

पंधराव्या शतकाच्या उतरार्धात पेहेरावपद्धतीत गॉथिक शैलीचे टोकदार वळण कमी झाले व प्रबोधनकालीन चौकोनी आकृतिबंधांवर भर देण्यात येऊ लागला. कृत्रिम जाड अस्तर लावून तयार केलेल्या बंड्या, भरगच्च असे मोजे, लहान झगे आणि चौकोनी टोकांचे बूट, रुंद व चौकोनी खांदे आणि फुगीर बाह्या यांसारखी वैशिष्ट्ये तत्कालीन पुरुषवेशात दिसून येतात. पूर्वीची बंडी या काळात बिनबाह्यांची झाली व ती सदऱ्यावर घालण्यात येऊ लागली. तिच्यावर जर्किन घातले जाई. स्त्रीपेहेरावात चौकोनी गळ्याचा झगा व त्याच्या आत पुढे लेस लावलेली कंचुकी असे. या झग्याच्या वरच्या चुन्या पाठीमागे कमरेजवळ एकत्र खोचलेल्या असत व सजवलेला परकर दिसावा म्हणून झग्याचा पुढचा भाग खुला ठेवला जाई. या काळात वेशभूषेत मखमल आणि इतर भडक सजावट यांवर भर दिला जाई. पंधराव्या शतकातील या पोशाखपद्धतीत मूळची शरीराकृती झाकून तिला विस्तृत, ऐसपैस असा भपकेबाज बाह्य आकार दिग्दर्शित करण्यावर भर असे. या शतकाच्या उत्तरार्धात पुरुषवेशात अंगासरशी बसणारे जाकीट, पोटऱ्यांपासून मांड्यांपर्यंत घातलेले तंग मोजे व सैलसर ओव्हरकोट आणि झगा यांचा विशेष प्रचार होता. या काळात स्त्रीवेशामधील पूर्वीचा अनैसर्गिक अवाढव्यपणा कमी झाला आणि अंगासरशी बसणारे झगे किंवा परकर वा उत्तरीय वस्त्रे वापरण्याची पद्धत पुन्हा रूढ झाली. सोळाव्या शतकात यूरोपीय पेहेरावपद्धती नाविन्य आणि विविधता यांसारख्या स्वच्छंदतावादी (रोमँटिक) कल्पनांनी प्रभावीत झाली होती. या शतकाच्या शेवटी पुन्हा एकदा देहाकृतीशी न जुळणारी ऐसपैस पोशाखपद्धती प्रभावी ठरली. इंग्लंडमधील एलिझाबेथ राणीच्या कालखंडातील भपकेबाज पोशाखात खळ लावून कडक केलेली, झालरीवजा कॉलर, लेसने सजविलेली कोटाची टोके, खांद्याजवळ कृत्रिमपणे फुगवलेल्या अलंकृत बाह्या अंतर्भाव होतो. सतराव्या शतकातील पेहेरावात रेशमी व सॅटिन कापडाचा वापर लोकप्रिय होता. पुरुषवेशात विस्तृत ब्रिचेस, उंच बूट, खांद्यावर ऐसपैस रूळणारी कॉलर व बाह्यांची रुंद टोके ही वैशिष्ट्ये दिसून येतात. उलट्या शंकूच्या आकाराच्या काचोळ्या स्त्रियांत रूढ झाल्या. उत्तर यूरोपात पोशाखातील ही अतिरिक्त शैली विशेष रूढ होती. अठराव्या शतकात फ्रान्समधील चौदाव्या लुईच्या काळात पॅरिस हे फॅशनचे केंद्र बनले. भरतकाम, रेशमी वस्त्रे, केसांचे टोप ही या काळातील पोशाखाची वैशिष्ट्ये होती. या शतकाच्या प्रारंभी रूसोच्या विचारप्रभावाने ग्रामीण व नैसर्गिक साधेपणाकडे लोकाभिरुची वळली आणि अंगासरसे कपडे वापरण्याची प्रथा पुन्हा प्रचलित झाली. अठराव्या शतकात पुरुषवेशात बकल लावलेल्या गुडघ्यापर्यंतच्या ब्रिचेस किंवा चोळणे रूढ झाले. कमरेइतक्या लांबीचा कोटही पुरुष वापरीत.

औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती यांच्या प्रभावाने यूरोपीय पोशाखपद्धतीत एक नवीन लोकशाहीची दृष्टी निर्माण झाली. पुरुषांच्या पोशाखात साधे, सौम्य रंग आणि भारदस्त लोकरी कपडे यांना प्राधान्य मिळाले. पोशाखाचे श्रेष्ठ-कनिष्ठ असे वर्गीय फरक कमी होत गेले. एकोणिसाव्या शतकारंभी फ्रान्समधून पोशाखपद्धतीमधील साम्राज्यशैली उदयास आली. तिचा फ्रान्सच्या जोझेफीईनशी निकटचा संबंध होता. या शैलीचा भर अभिजात साधेपणावर व मलमलीच्या कपड्यांवर होता. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया राणीचा कालखंडही भारदस्त पोशाखपद्धतीवर भर देणारा होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यूरोपीय स्त्रीच्या पारंपरिक पोशाखाबरोबरच स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाचा प्रभाव पडून पुरुषी वेशभूषेला वाव मिळाला, त्यांत जॅकेट, सदरा साधा गडक पण भडक न वाटणाऱ्या रंगाचा साधा स्कर्ट यांचा अंतर्भाव होतो. पहिल्या महायुद्धाच्या काळात स्त्रियांचा अनेक कार्यक्षेत्रांत प्रवेश झाला. परिणामतः त्यांच्या स्कर्टची उंची कमी होत गेली. १९२० च्या दशकात हे स्कर्ट गुडघ्यापर्यंत वर आले आणि १९६० च्या दशकात तर ते मिनीस्कर्ट म्हणून अधिकच आखूड झाले. या आखूड होत गेलेल्या स्कर्टबरोबरच सुरुवातीच्या काळात रेशीम, रेयॉन, नायलॉन यांचे व १९६० च्या दशकात याहून अधिक जाड अशा विविध प्रकारच्या विणीचे आणि उजळ रंगाचे पायमोजे वापरण्याची पद्धत रूढ झाली.


पहिल्या महायुद्धानंतर यूरोपीय पुरुषवेशातील कडक, गंभीर औपचारिकपणा कमी झाला आणि त्यात व्यक्तिविशिष्ट विविधता, वैचित्र्य व सहजता येऊ लागली. याचा अर्थ सणासमारंभाच्या किंवा सार्वजनिक प्रसंगांच्या वेळचे सांकेतिक, औपचारिक पोशाख दुर्लक्षित झाले असे नव्हे तर प्रासंगिक व सांकेतिक वेशभूषा टिकूनच राहिलीतथापि युवकवर्गात कातड्यासारख्या नव्या माध्यमांचा प्रवेश होऊन लांब कापडांच्या व लांब केसांच्या वेशभूषेत वस्त्रप्रकारांच्या वैचित्र्याला अधिक वाव मिळाला. एकोणिसाव्या शतकात स्त्रीवेशात अखंडपणे व वेगान फॅशन निर्माण होतपरंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुरुषवेशातील फॅशनप्रवृत्ती काही किरकोळ फरकांपुरतीच सीमित राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुरुषांच्या कलात्मक पेहेरावांकडे जो कल निर्माण झाला होता, त्याचे ठळक असे प्रत्यंतर विसाव्या शतकाच्या प्रारंभी टि्‍वडकपडे व रंगीबेरंगी शर्ट यांतून येऊ लागले. पुरुषवर्गातील कपड्यांची रूपरेखा सौम्य राखण्याची दृष्टी नॉरफोक जॅकेटसारख्या प्रकारात दिसून येते.

यूरोपीय पोशाखपद्धतीच्या या स्थूल अशा ऐतिहासिक विकासक्रमात फॅशनची काही केंद्रेही निर्माण झाल्याचे दिसून येते. प्राचीन ग्रीक समाजापुढे ईजिप्शियन पेहेरावाचे आदर्श होते. रोमन लोकांनी ग्रीक पोशाखपद्धतीचे अनुकरण केले. बायझंटिन पोशाखपद्धतीत ख्रिस्ती-रोमन व पौर्वात्य शैलीचा समन्वय आढळतो. फ्लॉरेन्स व पॅरिस ही चौदाव्या शतकातील आणि बर्गंडी हे त्यांच्याबरोबरच पंधराव्या शतकातील फॅशनचे केंद्र होते. पॅरिसचे या क्षेत्रातील केंद्रीय स्थान एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकून होते. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडला फॅशन केंद्र म्हणून महत्त्व आलेतथापि स्त्रियांच्या पोशाखपद्धतीचे फॅशन केंद्र आजतागायत पॅरिसच राहिले आहे. विसाव्या शतकात पुरुषवेशाच्या क्षेत्रात अमेरिकेकडे पुढाकार आलापण १९६० नंतर इंग्लंड आणि १९७० नंतर इटली यांना केंद्रीय महत्त्व प्राप्त झाले.

भारतीय मखमली झग्यातील यूरोपीय नवपरिणिता मूलभूत नावीन्याच्या दृष्टीचे यूरोपीय पोशाखांच्या इतिहासात काही गोष्टी उल्लेखनीय आहेत. चौथ्या शतकातील बायझंटिन पोशाखपद्धती तिच्यातील पौर्वात्य प्रभावामुळे वैशिष्ट्यपूर्ण होती. पंधराव्या शतकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दशकांत इटलीत पुरुष वापरत असलेले चित्रविचित्र पिसाऱ्याच्या पक्ष्यांचे सिल्हूट, त्याच सुमारास उत्तर यूरोपीय स्त्रिया वापरत असलेली भव्य आणि वैचित्र्यपूर्ण शिरोभूषणे, इंग्लंडमध्ये पहिल्या एलिझाबेथ्‌च्या काळात रूढ असलेली कडक इस्त्रीची गळ्याभोवतीची झालर आणि सतराव्या शतकातील केसांचे टोप तसेच विसाव्या शतकात आखूड होत गेलेला स्त्रियांचा स्कर्ट या काही नावीन्यपूर्ण गोष्टी होत. पुरुषी पोशाखाच्या धर्तीवरील बेलबॉटम शर्ट, मॅनिला यांची अलीकडे निर्माण झालेली तरुण स्त्रियांतील फॅशनही अपूर्व आहे. यूरोपीय पोशाखपद्धतीत प्रदेशविशिष्ट पोशाख दिसून येतातच. त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात, न्यायालयीन क्षेत्रात, विशिष्ट अशा पोशाखपद्धती अजूनही रूढ आहेततथापि पोशाखपद्धतीमधील वर्गीय उच्चनीचता, व्यावसायिक किंवा गटात्मक वेगळेपणा, सामाजिक स्थान व दर्जा यांचे दिग्दर्शन यांसारख्या गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत आणि पोशाखपद्धतीत एकप्रकारची समानता येऊ लागली आहे.

उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्व आशियातील अरब लोकांत प्राचीन इराणी धर्तीवर पारंपरिक पोशाखपद्धती उदयास आली. संपूर्ण शरीर झाकून टाकणारी सैल, ढगळ वस्त्रप्रावरणे हे अरबी पेहेरावाचे खास वैशिष्ट्य. त्याचे कारण वाळवंटी प्रदेशातील तीव्र विषम हवामान हेच होय. याशिवाय शरीराचे प्रदर्शन वा प्रसाधन न करण्याचा व साध्या राहणीचा धार्मिक संकेत हेही त्याचे एक पूरक कारण मानले जातेतथापि उंची कापड, जडजवाहीर व दागदागिने यांचा वापर मात्र अरब लोक करीत असत. या प्रदेशातील भटक्या टोळ्या सोडल्या, तर जागोजाग स्थायिक झालेल्या मुस्लिम समाजात उंच गळ्याचा व लांब बाह्यांचा ट्यूनिक किंवा झगा, ढगळ किंवा तंग पायजमे हा पुरुषांचा पेहेराव होता. पुष्कळदा कमीअधिक लांबीचे जाकीट, कोट किंवा बंडी यांचाही वापर केला जाई. पूर्वेकडील ऑटोमन साम्राज्यातील मुस्लिम समाजात व इराणमध्ये ‘इराणी कफतान’ म्हणजे भरगच्च भरतकाम केलेला किंवा ⇨ किनखाबाचा लांब कोट हा शिष्टसंमत होता. बाहेर जाताना अंगावर झगा घेण्याची पद्धत सार्वत्रिक होती. सॅंडल किंवा कातडी स्लीपर वापरण्याचीही प्रथा होती. डोक्यावर फेज टोपी किंवा काही लोक भारतीय पद्धतीचा फेटाही वापरीत व तो पुष्कळदा फेज टोपीभोवती गुंडाळीत. फेज टोपी शंकूच्या आकाराची व उंच असे. १९२५ साली फेज टोपीवर तुर्कस्तानात बंदी घालण्यात आली होती. वस्त्रे नेसण्याची पद्धत, त्यांचा रंग आणि अलंकार यांतून सामाजिक स्थान किंवा प्रतिष्ठा सूचित केली जाई.


पारंपरिक परिवेशातील अरब स्त्री अरबी पोशाखात लांब बाह्यांचा लांबलचक पांढरा सदरा विशेष प्रचारात होता. उंटाच्या केसापासून तयार केलेल्या झग्याचा सणावारी उपयोग केला जाई. याला ‘अबा’ (Aba)असे म्हणत. अरब लोक सुती टोपी घालून मग डोक्याभोवती विशिष्ट प्रकारे कापड गुंडाळत व त्याचे पदर दोन्ही खांद्यांवर रूळतील असे राखून कपाळाच्या वरच्या बाजूने काळ्या लोकरी पट्टीने हे शिरोवस्त्र बांधत. वालुकामय प्रदेशातील तीव्र उन्हाच्या झळा व वाळूची वादळे यांपासून शिरोभागांचे संरक्षण करण्यासाठी या पद्धतीचा फार उपयोग होई. वरच्या थरातील मुस्लिम स्त्रियांत रेशीम, लिनन किंवा मलमल यांचा सदरा, याच कापडांची किंवा मखमली वा किनखाबी सलवार व लांब आखूड कंचुकी वापरण्याची प्रथा होती. स्त्रियांचा पेहेराव अंगासरशी बसणारा किंवा लांबलचक व सैलही असे. इराणमध्ये विशिष्ट प्रकारचे कफतान स्त्रिया वापरीत. त्यांवर पुष्कळदा जाकिटासारखा बिनबाह्यांचा कोट घालीत. अरबस्तान, मेसोपोटेमिया व ईजिप्तमध्ये अशा इराणी कफतानऐवजी रेशमी किंवा निळ्या रंगाचा सुती, लांबरुंद ट्यूनिक (झगा) वापरीत. तुर्कस्तान व इराणमधील स्त्रिया पुष्कळदा कातडी स्लीपर वापरीत. बेदूईन टोळ्यांतील अरब स्त्रियांत बूट वापरण्याची प्रथा होती. बाहेर जाताना स्त्रिया अंगाभोवती चादर वा शाल लपेटून घेत. बुरख्याची पद्धत उच्च स्तरातील स्त्रियांतच होती. ग्रामीण कामकरी स्त्रिया बुरखा वापरीत नसत. १९२८ साली तुर्कस्तानात बुरख्यावर बंदी घालण्यात आली.

चीन : प्राचीन चिनी पोशाखात ‘पावो’ (Pao) हा वैशिष्ट्यपूर्ण रेशमी झगा स्त्री आणि पुरुष दोघेही वापरीत. हान कालखंडात (इ. स. पू. २०२ ते इ. स. २२०) उदयास आलेला हा झगा त्यानंतर कित्येक शतके टिकून होता. हा झगा अत्यंत सैल असे. त्याच्या बाह्यांत हात पूर्णपणे लपले जात. हळूहळू या झग्यावर विशिष्ट रंग आणि विशिष्ट प्रकारचे विणकाम [→सुईचे विणकाम] किंवा भरतकाम करण्यात येऊ लागले. ही सजावट सामाजिक दर्जाची निदर्शक समजली जाई. चिनी स्त्रिया अंगासरशी बसणारा झगा घालीत. मात्र नितंबाभोवती जादा वस्त्र गुंडाळीत. पिना, कंगवे, फुले यांचा उपयोग करून उभट व उंच केशभूषा करीत. बारीक पावले हे स्त्रीसौंदर्याचे लक्षण मानल्याने चिनी स्त्रिया आपल्या पायांचे तळवे लहानपणापासूनच बुटाने बांधून ठेवत. त्या छोटे भरतकाम केलेले कापडी बूटही वापरीत. स्त्री-पुरुष लांब नखे राखत व त्यांवर सोन्याचे किंवा तत्सम मौल्यवान स्वरूपाचे टोपण बसवीत. पंखासारख्या कडांची काळी हॅट चिनी पुरुष वापरीत.

इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून पायजमा, ट्यूनिक (झगा) व बूट हा मध्य आशियातील आक्रमक टोळ्यांचा पेहेराव चीनमध्ये, विशेषतः चिनी शिलेदारवर्गात रूढ झाला. त्या वेळी सुती चड्ड्या आणि जाकीट हा चिनी शेतकरी स्त्री-पुरुषांचा समान असा पोशाख होता. त्याचा रंग सामान्यतः निळा असे. लोकरीच्या अभावामुळे थंडीच्या दिवसांत भरण केलेले (पॅडेड) रेशमी किंवा सुती कपडे एकावर एक घालण्याची पद्धत होती. पांढरे पायमोजे आणि कापडी स्लीपर वापरात होते. खुल्या जागी काम करताना स्त्री-पुरुष गवताच्या हॅट वापरीत.

मिंग राजवटीत (१३६८ ते १६४४) परंपरागत पावो झगा अधिकच आखूड झाला व त्याची बेतणीही काटेकोर झाली. स्त्री व पुरुष दोघेही तो पायजम्यावर वापरू लागले. झग्यावर जाकीट किंवा सैलसर बाह्यांचा वा बिनबाह्यांचा खुला कोट वापरला जाई. औपचारिक प्रसंगी स्त्रिया चुणीदार घागरा वापरून त्यावर पावो झगा घालीत. मांचू कालखंडात म्हणजे १६४४ नंतर चिनी पुरुषांना या परक्या आक्रमकांच्या पद्धतीची वेणीसदृश केशभूषा करण्याची सक्ती करण्यात आली. मांचू राज्यकर्त्यांनी पारंपरिक चिनी झग्याचे रूपांतर कफतानमध्ये घडवून आणले. या कफतानची लांबलचक पण तंग बाह्यांची टोके (कफ्स) घोड्याच्या खुराच्या आकाराची असत. हा कफतान कमरेशी तंग असे. कपड्याचे रंग हे सामाजिक दर्जाचे निदर्शक मानले जात. उदा., पिवळा रंग हा सम्राटाच्या किंवा राजकुलातील लोकांच्या वस्त्रांचा द्योतक समजला जाई. झग्यावरची मागचीपुढची नक्षी वा हॅटवर असलेली अलंकृत बटणे हीदेखील सामाजिक दर्जाची निदर्शक समजली जात. विसाव्या शतकात हा पारंपरिक मांचू कफतान अधिकच तंग, आखूड व बिनबाह्यांचा झाला. पुढे त्याचे रूपांतर आधुनिक शहरी स्त्रियांच्या ‘चिपाओ’ ह्या झग्यात झाले. विसाव्या शतकात पश्चिमी पोशाखपद्धतीचा प्रसार वरच्या वर्गातील चिनी पुरुषवर्गात झाला. विद्यमान कम्युनिस्ट राजवटीत पॅंट व बंद गळ्याचा कोट हा सर्वसाधारण प्रतिष्ठित व्यक्तींचा आणि निळ्या किंवा करड्या रंगाचे पुढच्या बंदांचे जाकीट व पायजमा हे कामगारांचे खास पोशाख ठरले.

‘किमोनो’ : जपानी स्त्रीचा वैशिष्ट्यपूर्ण परिवेश.

जपान : प्राचीन जपानी पेहेरावपद्धती चिनी धर्तीवरच होती. जाकीट व पायजमा हा सर्वसामान्यांचा पारंपरिक जपानी पोशाख होता. इसवी सनाच्या सातव्या शतकात सरदारवर्गात चिनी पावो झग्याच्या धर्तीवर रेशमी ‘किमोनो’ रूढ झाला. इसवी सनाच्या ८ते १२ शतकांच्या दरम्यान जपानी दरबारी पोशाख चिनी धर्तीवरच पण विशेष प्रकारे झगझगीत होत गेला. स्कर्टप्रमाणे असलेले ‘हाकामा’ नामक पायजमे त्या काळात पुढे आले. अंगात पंख्यासारख्या रुंद पदरांचे पण अंगाशी तंग बसणारे कपडे घालण्यात येत. या काळात पुरुषवर्गात केस न राखण्याची प्रथा होती. कडक कडांची व काळ्या फिती लावलेली रेशमी हॅट पुरुष वापरीत. या काळात पोशाखातील रंगसंगती साधण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाई. १६ ते १९ या शतकांच्या दरम्यान जपानी पोशाखपद्धती साधेपणाकडे झुकली. जमिनीवर लोळतील अशा उंचीचे किमोनो स्त्री-पुरुष वापरीत. त्याच्या आत पुरुष सदरा किंवा छोटा किमोनो किंवा कटिवस्त्र घालीत. स्त्रिया परकर वापरीत. तत्कालीन वस्त्रांवर मोठी वेधक व भरगच्च छपाई किंवा भरतकाम केलेले असे. घराबाहेर वावरताना स्त्रिया गुडघ्याइतक्या उंचीचा रेशमी कोट वापरीत. त्यावर कुलचिन्ह छापलेले असे. हा कोट किमोनोवर वापरण्याची चाल होती. जपानी पारंपरिक पोशाख ‘नो’ व ‘काबुकी’ ह्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण नाट्यप्रकारांतील वेशभूषेत अजूनही टिकून आहे. विसाव्या शतकात जपानमध्ये पश्चिमी पद्धतीचा पोशाख स्त्री-पुरुषात रूढ झाला.

भारतातील पोशाख व वेशभूषा : भारतातील परंपरागत पुरुषवेश म्हणजे धोतर किंवा लुंगी, चादर किंवा उपरणे व पगडी किंवा पागोटे आणि स्त्रीवेश म्हणजे साडी किंवा लुगडे अथवा कमरेला घागरा, वर चोळी किंवा कंचुकी, तसेच ओढणी व दुपट्टा असा आहे तथापि गेल्या २,००० वर्षांत ह्या सर्वसामान्य भारतीय वेशभूषेत प्रदेशविशिष्ट बदल होत आलेला दिसतो. हा बदल वेशभूषेची माध्यमे, त्यांचे आकार-प्रकार, त्यामागील सौंदर्यदृष्टी व उपयुक्तता इ. बाबतींत दिसून येतो. तसेच देशात बाहेरून आलेल्या लोकांच्या पेहेरावपद्धतीचाही परिणाम भारतीय वेशभूषेवर झालेला आढळतो. शिलाईचे कपडे भारतात सोळाव्या शतकातील मुसलमानी आक्रमणानंतर रूढ झाले, हा समज मात्र चुकीचा आहे. कारण शिवलेल्या कपड्यांचे उल्लेख वैदिक काळापासून आढळतात. प्राचीन भारतातील वेशभूषेसंबंधी डॉ. मोतीचंद्र यांनी आपल्या प्राचीन भारतीय वेश-भूषा या हिंदी पुस्तकात (१९५०) संशोधनपूर्वक विवेचन केले आहे. या ग्रंथाधारे प्राचीन भारतीय वेशभूषेसंबंधीचे वर्णन स्थूलमानाने पुढे दिलेले आहे.


भारतात प्रागैतिहासिक काळातील काही गुहाचित्रांतून नग्न स्त्री-पुरुषांची चित्रे आढळत असली, तरी त्यावरून सार्वत्रिक स्वरूपाचे अनुमान काढता येत नाही. तत्कालीन लोक टकळीच्या साह्याने सूत कातीत आणि त्याचे वस्त्र विणीत असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. मोहें-जो-दडो आणि हडप्पा संस्कृतीच्या काळी (इ. स. पू. ३५००—१५००) सूतकताई व विणकाम या कला प्रगत अवस्थेत असल्याचे दिसून येते.

आर्यांचे भारतात आगमन झाल्यावर त्यांनी एतद्देशीयांकडून काही वेशभूषा-प्रकार घेतले. सूत कातणे व त्याचे वस्त्र विणणे ही तर आर्य संस्कृतीची प्रमुख अंगे होती. त्यांचा कल ऊनी वस्त्रे वापरण्याकडे अधिक असे. ते त्यांना ‘आविक’ म्हणत. घोंगडे (कंबल) व ‘शामुल्य’ ही तत्कालीन ऊनी वस्त्रेच होत तथापि वैदिक काळात कृष्णाजिन अधिक पवित्र मानण्यात येई. यज्ञयागादी विधी करताना त्याचा वापर अपरिहार्य असे. वैदिक ऋषींप्रमाणेच तत्कालीन आदिम जमाती व व्रात्य लोकही चर्मवस्त्रांचा वापर करीत असत. [→चर्मकलाकाम].

ऊनी वस्त्रांप्रमाणेच वनस्पतीच्या धाग्यांपासून बनविलेली वस्त्रे उदा., ‘बरासी’ किंवा ‘क्षौम’ हीदेखील वापरात होती ती कदाचित रेशमी वस्त्रे असावी असा एक तर्क आहे. कापसाचा सर्वप्रथम उल्लेख आश्वलायन श्रौतसूत्रात आढळतो. यावरून त्याकाळी सुती वस्त्रे विणण्यात येत असावी, असे विद्वानांचे मत आहे.

वस्त्रे विणण्याचे काम मुख्यतः स्त्रियांकडे असे. विणकर स्त्रियांना त्याकाळी ‘वायित्रि’ आणि ‘सिरी’ म्हणत व पुरुष विणकरांना ‘वाय’ (विणकर) म्हणत. हातमागाचे अस्तित्व दर्शविणारे निर्देशही पुढीलप्रमाणे आढळतात : ‘ओतु’ (बाना), ‘तंत्र’ (ताण), ‘तंतु’ (सूत), ‘बेमन’ (चरखा) व ‘मयूख’ (धोटा) इत्यादी. ‘वासस’ आणि ‘वसन’ असे शब्दप्रयोग त्याकाळी वस्त्रप्रावरणांसाठी करीत असत. ‘सुवासस्’, ‘सुवसन’ व ‘सुरभि’ इ. शब्दप्रयोगांवरून अंगभर आणि नीटनेटकी वस्त्रे वापरण्याची प्रथा तत्कालीन स्त्री-पुरुषांमध्ये असावी, असे दिसते. या वस्त्रांवर ते क्वचित ⇨ खडीकाम व भरतकामही करीत असत तर कधी त्यांना झालर लावून वा त्यांवर नक्षीकामयुक्त वेधक किनारी जोडून ती अधिक सुंदर बनवीत. साध्या शुभ्र कपड्यांप्रमाणेच रंगीत वस्त्रे परिधान करण्याकडेही त्यांचा कल असे. भरतकामाला त्याकाळी ‘पेशस’ व भरतकाम करणाऱ्याला ‘पेशकारी’ असे म्हणत.

खोचून शरीरावर परिधान करण्यात येणाऱ्या वस्त्रांमध्ये ‘नीवि’ हे एक वस्त्र असे. नीवि ही लंगोटी वा लुंगीसदृश असे. तिच्या एका लोंबकळणाऱ्या व न विणलेल्या टोकाला गोंडे लावून आणि दुसऱ्या साध्या टोकाला ‘तूष’ (लहान झालर) लावून ती सुशोभित करण्यात येई. ती बांधताना अशाच तऱ्हेने बांधण्यात येई की सुरकुत्यांनी ती शोभून दिसावी. नीवि म्हणजे निऱ्या हा मराठीत रूढ असलेला अर्थ या दृष्टीने सूचक आहे.

अंगावर पांघरण्यात येणाऱ्या वस्त्रांत स्त्री-पुरुषांची काही वस्त्रे समान असून त्यांत ‘उपवसन’, ‘पर्याणहन’ इत्यादींचा समावेश होतो. उपवसन म्हणजे एकप्रकारचे उत्तरीय वस्त्रच. वधूने परिधान केलेल्या व हवेमुळे फडफडणाऱ्या या वस्त्राचे उल्लेख ऋग्वेदात आढळतात. पर्याणहन मात्र एखाद्या चादरीसारखे लांबरुंद पण हलकेसे वस्त्र असून त्याचा वापर अंगावर लपेटून घेण्याकडे करण्यात येई तर ‘अधिवास’ हे राजांचे उत्तरीय व ‘प्रतिनिधी’ म्हणजे एकप्रकारचे स्तनपट्ट असून विवाहप्रसंगी वधूकन्या ते परिधान करीत.

शिवलेल्या कपड्यांमध्ये वैदिक काळात ‘अत्क’ व ‘द्रापि’ यांचे उल्लेख सापडतात. अत्क म्हणजे आधुनिक कुडताच. संपूर्ण शरीरावर घट्ट बसणारे व संपूर्ण शरीर झाकणारे हे लांब वस्त्र भरतकामयुक्त असून त्याचा वापर फक्त पुरुष करीत तर द्रापि हे घट्ट बसणारे, सध्याच्या कोटाप्रमाणे वाटणारे भरतकामयुक्त वस्त्र स्त्री-पुरुष दोघेही वापरीत.

‘उष्णीष’ म्हणजे पगडी.उष्णीषचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेद तसेच ब्राह्मण ग्रंथांत आला असून त्याचा वापर राजा व व्रात्य करीत असल्याचे दिसते. विशेषतः वाजपेय राजसूय व यज्ञाच्या वेळी राजाकडून उष्णीष धारण करण्यात येई. सम्राज्ञी म्हणून इंद्राणीनेही उष्णीषाचा उपयोग शिरोभूषण म्हणून केल्याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात आढळतो. व्रात्यांचा उष्णीष शुभ्र पांढरा असून फेट्याप्रमाणे तो गुंडाळलेला असे. स्त्रियांच्या पोशाखात यज्ञसमयी ‘वसना’ म्हणजे कडदोऱ्याचा (करगोट्याचा) समावेश असे.

वैदिक काळी यज्ञप्रसंगी नूतन वस्त्र परिधान करण्याची रीत होती. ती शास्त्रशुद्ध समजण्यात येई. कारण वस्त्रनिर्मितीच्या वेळी सर्व खबरदारी घेऊनच ते विणण्यात येई. वस्त्राच्या विविध भागांवर विविध देवदेवतांचा अधिवास असल्याची समजूत त्या काळी रूढ होती म्हणून ते पवित्र करूनच वापरात आणले जाई. त्यामुळे वस्त्रावर जादूटोण्याचा परिणाम होत नाही तसेच भूतप्रेतपिशाचादींचाही प्रभाव त्यावर पडत नाही, अशीही एक कल्पना प्रचलित होती.

राजेलोकांचा संपूर्ण पोशाख म्हणजे पायात ‘उपनहन’,अंगावर पर्याणहन व डोक्यावर उष्णीष असा असे. मात्र तो परिधान करण्याची शैली कशी होती, याचा अंदाज घेणे कठीण आहे.

व्रात्यांचा सर्वसाधारण पोशाख मात्र वेगळा असे. डोक्याला उष्णीष, अंगावर काळ्या किनारीचे वस्त्र किंवा बोकडाच्या चामड्याचे वस्त्र व पायांत जोडे असत. त्यांच्यातील अनुयायांच्या कपड्यांना लाल किनार असून त्यांची टोक लांब असत.ज्यांनी दीक्षा प्राप्त केली आहे अशांनी ‘चंडातक’ घातलेले असे. चंडातक अर्थात ‘अर्धोरुक’ हे जांघेपर्यंत रुळणारे गोल वस्त्र होते.यज्ञसंस्थेत यालाच ‘दहर’असे म्हणत.


महाजनपद काळात तसेच शैशुनाग आणि नंद यांच्या काळी (इ.स.प. ६४२—३२०) संस्कृतीचा विकास बराच झाला होता.जैनांची ‘सूत्रे’ बुद्धांची ‘पिटके’ व ‘ब्राह्मण-सूत्र’ ग्रंथादी साहित्यात तत्कालीन पोशाख-वेशभूषा आणि जनरीतीसंबंधीची सामग्री उपलब्ध होते. या काळातील संस्कृतीचा ओघ ग्रामीण भागाकडून नगराकडे होता. कापूस, क्षौम, रेशीम व ⇨लोकर यांपासून बनलेल्या वस्त्रप्रावरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर होई. कापूसउत्पादन विशेष प्रमाणात होऊ लागल्यामुळे ठिकठिकाणी कापूस पिंजणे, सूत कातणे व त्याच्या गासड्या तयार करण्याचे काम चाले. त्यामुळे अर्थातच कापसाची वस्त्रे विशेष प्रमाणात वापरली जात. वाराणसीचा कापूस त्या काळी प्रसिद्ध होता. लाल, निळ्या, पिवळ्या व पांढऱ्या शुभ्र रंगांत सुती वस्त्रे तयार केली जात. चीनमधून रेशमी वस्त्रे [→रेशीमकाम]आयात करण्यात येत. तसेच अळशी (जवसा) च्या टरफलाच्या तंतूंपासून तयार केलेले ‘क्षौम’ कापड, गांधार येथील रक्तवर्ण घोंगडी यांचाही वापर विशेषत्वाने करण्यात येई. क्षौम कापड विलोभनीय व वेधक असे तर पठाणकोट येथील कौटुंबरनामक ऊनीवस्त्र आकर्षक दिसत असे. किनखाबी वस्त्रांना त्या काळी ‘हिरण्यवस्त्र’ ही संज्ञा होती.

हलक्या प्रतीचे कपडे बहुधा सनताग, भांगेच्या वनस्पतीचे धागे, कुशादिकांसारखी तृणे, फळांचे तंतू इत्यादींपासून तयार केलेले असत. तसेच नाना प्रकारच्या चामड्यांचाही उपयोग त्याकडे करण्यात येई. विशेषतः दक्षिणापथ या दृष्टीने अग्रेसर होता.

तपोनिष्ठ ब्राह्मण व जैन श्रमण हे सनतागापासून वा त्याज्य चिंध्या किंवा लोध्र वृक्षाच्या धाग्यापासून तयार केलेल्या कपड्यांचा वापर करीत. तसेच ‘अजिनानि’ (मृगचर्म), ‘कुशचीर’, ‘वाकाचीर’ (वल्कल),‘फलकचीर’, ‘केसकंबल’ (माणसाच्या केसांपासून तयार केलेले घोंगडे) ‘बालकंबल’ (घोड्याच्या शेपटीच्या केसांपासून बनविलेले घोंडगे) व ‘उलूकपक्ख’ (घुबडाच्या पंखांपासून निर्मिलेले, कपडे) परिधान करीत असत. बौद्ध भिक्षु-भिक्षुणींची वस्त्रे एकसारखीच असून ती पीतवर्णी असत. कमरेभोवती गुंडाळण्यात येणारी ‘संघाटी’ अंगाखांद्यावर घेण्यात येणारे ‘अंतरवासक’ व वरून लपेटण्यात येणारी चादर म्हणजे ‘उत्तरासंग’ ही ती वस्त्रे होत.

नागरजनांच्या वापरात मात्र अंतरवासक, उत्तरासंग व उष्णीष यांचा समावेश असे. ‘कंचुका’चा वापर स्त्री-पुरुषांत समान असे. अंगात घट्ट बसणारे व स्वतःच्या शरीरवर्णाला शोभून दिसणारे रंगीबेरंगी कपडे परिधान करण्यात त्यांना विशेष रुची होती. सौंदर्यदृष्टी बाळगूनच धोतर व साड्या खास शैलीने नेसण्याची त्यांना हौस होती. त्यामुळे ‘हस्तिशौंडिक’, ‘मत्स्यवालक’, ‘चतुष्कर्णक’, ‘तालवृन्तक’, ‘शतवल्लिक’ अशा विविध शैली त्या काळी निर्माण झाल्या होत्या. ‘कायाबंध’ अर्थात ‘कमरबंधा’चेही नानाप्रकार व शैली त्या काळी रूढ होत्या. उदा., दोरीपासून तयार केलेला ‘कलाबुक’, जलसर्पदृश असा ‘डेड्‌डूभक’, ढोलाच्या आकाराचा ‘मुरज’ व अलंकारयुक्त ‘मद्दवीन’ अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण नावे होती कलात्मक पद्धतीने कायाबंध बांधण्याची पद्धत विशेषत्वाने स्त्रियांमध्येच अधिक प्रचलित होती. हे कायाबंध वेळूचे तंतू, कातडे, लोकर, चोल व सूत यांपासून कलात्मक रीतीने गुफूंन वा वळून तयार करण्यात येत. त्याला अनुसरून त्यांना दिलेली ‘विलीव’, ‘चर्मपट्ट’,‘दुस्सपट्ट’,‘दुस्सवेणी’, ‘दुस्सवट्टी’, ‘चोलवट्टी’, ‘चोलवेणी’ अशी नावे बौद्ध साहित्यात आढळतात.

कपड्यांबरोबरच पादत्राणे व पादुका (खडावा) यांनाही त्या काळी पोशाखाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. पादत्राणे सिंह, व्याघ्र, मृग, चित्ता, ऊद मांजर, मार्जार, खार व घुबड यांच्या कातड्यापासून तयार करण्यात येत. त्यांचे आकार व रंग यांत बरीच विविधता असे. तसेच ते ‘एकचलांसिक’ (एकतळी), ‘द्विपटल’ (दुतळी), ‘तिपटल’ (तीनतळी) असत आणि निळा, लाल, मंजिष्ठ, काळा, नारिंगी व पिवळा या रंगांचे तयार करण्यात येत. विविध रंगी किनारी लावून त्यांना सजविण्यात येई. त्यांच्या आकारावरून ‘पुटबद्ध’, ‘पालिगुंठिम’, ‘खल्लकबद्ध’, ‘वृश्चिकालिक’, ‘मोरपिंछ परिसिब्बित’ आणि ‘तित्तिरपट्टिक’ अशी अनेक नावे दिलेली असत. त्या काळी पादत्राणे बांधण्याची कला बरीच विकसित झाली असल्याचा उल्लेख कामजातकात सापडतो. गृहस्थाखेरीज भिक्षु-भिक्षुणींना पादत्राणे वापरण्याची त्या काळी मनाई असे. पादत्राणांप्रमाणेच लाकडाच्या पादुकाही वापरात होत्या. त्यांना सोने, चांदी, स्फटिक, वैडूर्य, कासे, काच, कथील, शिसे आणि तांबे इत्यादींनी अलंकृत करण्यात येई. यांखेरीज मुंज, वल्वजनामक तृण, गवत, रानटी खजुर, कमलकाष्ठ व घोंगडी यांपासून बनविलेली पादत्राणे वापरण्याची रूढी होती.

त्या कालखंडात शिवणकला बरीच प्रगत झालेली होती. तिच्याशी संबंधित असे अनेक शब्द बौद्ध वाङ्‌मयात सापडतात. कपडे शिवण्यात शिंपी कुशल असत.

त्यापुढील मौर्य, शुंग, शक-सातवाहन काळात (इ. स. पू. तिसरे शतक-इ. स. पहिले शतक) संस्कृतीचा विकास मोठ्या प्रमाणावर घडून आला. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्या विकासाच्या खुणा दिसतात. ‘कान्तानावक’ म्हणजे नीलवर्णीय, चर्म, ‘प्रैयक’ म्हणजे शुभ्र पांढऱ्या व निळ्या रंगच्छटांचे ठिपके-रेषायुक्त चर्म, हिमालयातील ‘गुलदार श्यामिका’, काळ्या भुरकट रंगाचे ‘कदली चर्म’ तसेच हिरव्या रंगाचे ‘नलतूला’ व काळ्या रंगाचे ‘सातीना’ या ऊद मांजराचे चर्म, असे अनेक उल्लेख त्यात आले आहेत. शालींचेही अनेक नमुने त्या काळी होते. पांढरा, केवळ तांबडा व मिश्र तांबडा रंग शालींना देण्यात येई. मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या या शालींची वीण मोठी कौशल्यपूर्ण असे. ज्या शालीवर विणीमध्येच आकृतिबंध उठविण्यात येत तिला ‘वानचित्र’ आणि अनेक तुकडे जोडून केलेल्या शालीला ‘खंड संघात्य’ अशी नावे दिलेली आढळतात. यांखेरीज दुकूल वृक्षाच्या सालीतील धाग्यांपासून बनणारे ‘दुकूल’ वस्त्र विविधरंगी असे. बंगालचे दुकूल शुभ्र पांढरे मुलायम, ‘तर पुंड्र देशचे दुकूल निळे व गुळगुळीत असून सुवर्णकुड्याचे (?) दुकूल तांबूस झाक दिलेले असे. दुकूलाच्या विणीवरून त्याला ‘मणिस्निग्धोदकवान’, ‘चतुरस्रकवान’ आणि ‘व्यामिश्रवान’ अशी विविध नावे दिलेली असत.

दुकूलाप्रमाणे पुंड्र व काशी येथील ‘क्षौम’ वस्त्रही विशेष प्रसिद्ध होते. त्याच्या विणीवरून त्याचेही अनेकविध प्रकार पाडण्यात आले होते. ‘पत्रोर्ण’ हा एक वेगळाच वस्त्रप्रकार असून तो नागवृक्ष, लिचुक, बकुल आणि वटवृक्षाच्या सालीपासून काढलेल्या धाग्यांचा बनविलेला असे. त्याची नावे स्थानपरत्वे वेगवेगळी असत. उदा., मगधातील ‘मागधिका’, पुंड्रमधील‘पौंड्र’ इत्यादी. पत्रोर्ण वस्त्राचा रंग गव्हाळा, शुभ्र पांढरा व लोण्यासारखा असे.

रेशमी वस्त्रांमध्ये कोशकार देशीचे ‘कौशेय’ व चीनमधील ‘चीनपट्ट’ प्रसिद्ध होते तर सुतीकपड्यांमध्ये स्थानिक नावांनी ख्यातनाम असलेली वस्त्रे लोकप्रिय होती. उदा., मदुरेचे ‘माधुर’, अपरांताचे ‘अपरान्तक’, कलिंगाचे ‘कालिंगक’, काशीचे ‘काशिक’, पूर्व बंगालचे ‘वांगक’, वत्सदेशीचे ‘वात्सक’ व महिषदेशीचे ‘माहिषक’ इत्यादी.


कोषाध्यक्षाला देश, काल व वस्त्रांचा वापर यासंबंधीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असे. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्याचीच असे तर सूत्राध्यक्षाला राजवस्त्रनिर्मितीची व्यवस्था पहावी लागे.

(१) गांधार—मथुरा शैलींतील राजपुरुषाची वेशभूषा, चुनीदार वस्त्रभूषा. (२) द्वारपालाची वेशभूषा : मौक्तिकजडित पगडी, उजव्या खांद्यावरून घेतलेला दुपट्टा, टाचेपर्यंत धोतर व कमरपट्टा, सातवाहनकाल, इ. स. पू. १ ले शतक. (३) मध्ययुगीन धूपदानीधारक स्त्री : डोक्याला शिरोवेष्टन, पायधोळ भरतकामयुक्त कंचुक, (४) गांधारशैलीतील स्त्रीवेश : उत्तरीय वस्त्राचा कमरेत खोचलेला पदर. (५) गुप्तकालीन ब्राह्मणवर्गाची वेशभूषा : कटीला धोतर व खांद्याला उपरणे. (६) गुप्तकालीन चवरी ढाळणाऱ्या दासीची वेशभूषा : टोकदार टोपी व अंगावर चादर. (७) गांधारशैलीतील वैशिष्ट्यपूर्ण स्त्रीवेश : वाह्यांचा कंचुक, अंगभर साडी व खांद्यावर उत्तरीय.


  

मौर्यराजवटीनंतरच्या व शुंगराजवटीच्या प्रारंभीच्या काळात म्हणजे इ. स. पू. दुसऱ्या शतकात पोशाखाच्या पद्धतीत फारसा बदल झाला नाही. गुडघ्यापर्यंत अर्धे व घोट्यापर्यंत पूर्ण धोतर नेसण्याची, खांद्यावर सुरगाठ मारलेला दुपट्टा घेण्याची, कमरेभोवती कमरबंद गुंडाळण्याची आणि डोक्यावर क्वचित पगडी बांधण्याची प्रथा पुरुषांत होती तर स्त्रियांत टाचेपर्यंत साडी, कमरेला गोंडेदार मेखला आणि अंगाखांद्यावर दुपट्टा घेण्याची चाल रूढ होती. साधुबैरागी कोपीन आणि त्यांच्या स्त्रिया साडी व चादर यांचा वापर करीत. स्त्रिया क्वचित आपले डोके रुमालाने झाकून घेत.

इ. स. पू. दुसऱ्या शतकात वस्त्र शृंगारण्याकडे विशेष कल दिसून येतो. सांची येथील चित्रांत त्याचे पडसाद उमटलेले आढळतात. त्या काळात स्त्रिया सकच्छ लुगडी नेसत व कमरेभोवती मेखला परिधान करीत आणि कधी साडीचाच पदर कमरेभोवती गुंडाळून घेत. अंगावरील ओढणीचेही नानाविध प्रकार अस्तित्वात होते. उदा., शंखाच्या आकाराची ओढणी, दुहेरी काठाची ओढणी, पेचदार ओढणी, पंखाकार ओढणी अशा विविध प्रकारच्या ओढण्या आणि राजमुकुटसदृश टोपी, गोल किनारयुक्त टोपी, अर्धखंडित झालरदार टोपी, वरील बाजूकडे निमुळती टोपी अशा अनेक प्रकारच्या टोप्या तसेच उजव्या बाजूने घातलेल्या वेढ्यांचा साफा, मोत्यांच्या लडींनी युक्त वेधक साफा, लंबाकार भोवरासदृश साफा, बेलाप्रमाणे वाटणारा गोल साफा व तिरपा गोलसर साफा असे विविध प्रकारचे साफे आणि चक्करदार पगडी, लाटण्याच्या आकाराची पगडी, तिकोनी अलंकारयुक्त पगडी, हलकी पगडी, शीर्षपट्टयुक्त पगडी व शंखाकार पगडी अशा नाना प्रकारच्या आकर्षक आणि वैविध्यपूर्ण पगड्या तत्कालीन स्त्री-पुरुषांच्या वापरात असत.

इसवी सनाच्या पहिल्या तीनशे वर्षांत भारत व मध्य आशिया यांच्यातील व्यापारउदीम वाढला. त्यामुळे हिरेरत्ने, सुगंधी द्रव्ये, स्फटिकमणी, भांडीकुंडी व वस्त्रभूषणे यांची देवाणघेवाण होऊ लागली. तत्कालीन वस्त्राभरणाचे अनेक उल्लेख पेरिप्लस ऑफ द एरीथ्रियन सी नामक ग्रंथात आढळतात. कलिंग, गुजरात, त्रिचनापल्ली, तंजावर, मुसलीपट्टम्, काशी वा डाक्का येथील मलमल अतिशय मुलायम असे. रोम, उत्तर व पूर्व आफ्रिका, अरबस्तान इ. ठिकाणी तिची निर्यात करण्यात येई तर सिंधू नदीच्या बाब्रिकन बंदरातून रेशमी वस्त्रे लोकरी दुकूल व पश्मिनी रुमाल [→चंबा रुमाल]यांची निर्यात करण्यात येई.

लोकरी व सुती कपड्यांप्रमाणेच ‘क्षौम’, ‘सनताग’ यांची ‘दुकुले’, रेशमांचे ‘पट्टांशुक’, सोनेरी कलाबतूचे ‘हिरिवस्त्र’, काशीचे ‘काशी-कांशु’, अपरांतकाचे ‘अपरान्तक’, पुष्पपट्टचे ‘किनखाब’आणि छीटसदृश ‘फुट्टक वस्त्र’ ही त्या काळी अतिशय प्रसिद्ध होती.

गुप्तकाळात (इ. स. तिसरे-चौथे शतक) समाजातील सर्व वर्गांच्या पोशाखातही लक्षणीय बदल घडून आले. विदेशी पोशाखाचा प्रभव या काळात झालेला दिसतो. भारतीय व विदेशी व पद्धतींच्या समन्वयातून नव्या पोशाखांची निर्मिती झाली.

विविध तऱ्हांचे, सुंदर, आकर्षक, छपाईकाम केलेले, भरतकामयुक्त कपड्यांचे उल्लेख जैन साहित्यात सापडतात. उदा., ‘आइणन’ (चर्मवस्त्र), ‘सहिणकल्लण’ (रंगीत व भरतकामयुक्त), ‘आजक’ (बोकडाच्या केसांचे), ‘हंस दुकूल’ (हंसाकृतींनीयुक्त सुंदर), ‘देस-राग’ (जाटदेशीय रंगीत), ‘अमिला’ (खळयुक्त), ‘गज्जफल’ (कडकडणारा), ‘फालिय’ (पारदर्शी), ‘कोयव’ (ताठ केसवाला) इ. दुपट्टे वा घोंगडीसदृश कपडे आणि ‘उद्र’ (ऊद मांजराचा रुमाल), ‘पेस’ (सुईने केलेल्या विणकामाने युक्त), पेसलाणि (पश्मिनीपासून केलेली चादर), ‘नीलमिगाइणग’, (नीलगायीच्या चामड्याची ओढणी), ‘गोरमिगाइणग’ (पांढऱ्या पशूच्या चामड्याची चादर) ‘कणग’ (सोनेरीकामयुक्त चादर), ‘कणगफुल्लिय’ (कलाबतूयुक्त फुलांची चादर), ‘प्रावार’ (ऊंट, वाघ व चित्याच्या चामड्याची चादर), ‘आभरण’ (वेलबुटीकामयुक्त चादर), ‘वडग’ (टसर – रेशमी – कापड) अशा नाना चादरी व शाली त्या काळात प्रचलित होत्या.

वस्त्र विपण्याची कला प्रगत अवस्थेला पोचली होती. उदा., मथुरेची ‘डोरिया’, आसामची ‘जाती पट्टिका’ (चमेलीच्या फुलांनी अलंकृत ‘मूंगा’)व ‘कोमल चित्रपट’ (चित्रांकित वस्त्र). अमरकोशात कापड विणण्याच्या प्रक्रियेचे उल्लेख सापडतात. मागावरून उतरविलेल्या कापडाला ‘निष्प्रवाणि’ व मागावर चढविलेल्या कापडाला ‘तंत्रक’ म्हणत. तसेच कापडाच्या काठाला ‘दशा’ वा ‘वसति’, लांबीला ‘दैर्घ्य’, ‘आयाम’ व ‘आरोह’ आणि रुंदीला ‘परिणाह’ व ‘विशालता’ म्हणत. किमती वस्त्रांसाठी ‘सुचेलक’ व ‘पट’ आणि साधारण कपड्यासाठी ‘बराशि’ व ‘स्थूलशाटक’ आणि इस्त्री न केलेल्या कपड्यांना ‘अनाहत’ असे शब्द आलेले आहेत. गुजरातचा ‘पुलकबंध’ (बांधणी वा चुनरी) [→ बांधणी] ही वस्त्रे कलापूर्ण असून ती त्या काळी विशेष प्रसिद्ध होती. राजघराण्यातील विवाहप्रसंगी देण्यात येणाऱ्या भेटवस्त्रांमध्ये ‘क्षौम’, ‘बादर’ (सुतीवस्त्र), दुकूल, ‘लालातंतुज’ (विलोभनीय रेशमी कपडा) व ‘नेत्र’ (एक वैशिष्ट्यपूर्ण रेशमी कपडा) यांचा अंतर्भाव असे.

सर्वसाधारण लोक गुप्तकाळात जे धोतर नेसत असत त्याला त्या काळी ‘अंतरीय’, ‘उपसंव्यान’, ‘परिधान’ व ‘अर्धोशुक’ अशी नावे होती तर चादरीसाठी ‘प्रावार’, ‘उत्तरासंग’, ‘वृहतिका’, ‘संव्यान’ आणि ‘उत्तरीय’ असे शब्दप्रयोग करण्यात येत. त्याचप्रमाणे अर्ध्या जांघेपर्यंतच्या कटिवस्त्राला ‘चंडातक’ आणि थंडीच्या दिवसांत घालावयाच्या कापूस भरलेल्या पायघोळ डगल्याला ‘नीशार’ आणि पायापर्यंत लोंबकळणाऱ्या अंगरख्याला ‘प्रपदीन’ असे म्हणत.

या काळातील स्त्रिया साडी, चादर, ‘वैकक्ष्य’ यांचा वापर करीत. कधी कधी मात्र विविधरंगी ‘कंचुक’ व ‘चंडातक’ नेसत. त्यांच्या साड्यांवर फुलांचे व चिमण्यांचे भरतकाम केलेले असे. वस्त्रांचा वापर ऋतुमानानुसार करण्यात येई. उदा., वसंत ऋतूत केशरी साडी व तांबड्या रंगाचे ‘स्तनपट्ट’ आणि ग्रीष्म ऋतूत हलके व नाजूक ‘दुकूल’ वापरण्याची प्रथा होती.

 राजे लोक नेहमी रेशमी धोतर, तारांकित दुपट्टे व ‘हंस दुकूल’ परिधान करीत तर पदाति सैनिक कंचुक, रुमाल व कमरबंध ही वस्त्रे वापरीत आणि घोडेस्वार दुकुलाची पगडी व ‘वारबाण’ घालीत. युद्धप्रसंगी मात्र सामंतगण पाजामा, कंचुक, ‘स्तवरका’पासून बनविलेले वारबाण, ‘चीनचोलक’ व ‘कूर्पासक’ इत्यादींचा वापर करीत. केशरी रंगाचे वस्त्र ते डोक्याला गुंडाळीत व त्यात कर्णोत्पलाचे देठ खोवीत. वस्त्रांची प्रसंगविशिष्ट नावेही त्या काळी रूढ होती. उदा., आंघोळीनंतरचे ‘नित्यनिवसन’ व ‘मज्‍जनिक’, सणसमारंभसमयीचे ‘क्षणोत्सविक’, राजदर्शनप्रसंगीचे ‘राजद्वारिक’ इत्यादी.


त्या काळी कपड्यांची निगा उत्तम रीतीने ठेवण्यात येई. यासंबंधात ‘धौत’ (धुलाई), घृष्ट (इस्त्री), ‘मृष्ट’ (सुशोभन) व ‘संप्रधूमित’ (सुवासन) असे उल्लेख सापडतात. यावरून कपड्यांना इस्त्रीबरोबरच सुवासिक करण्याचीही पद्धत त्या काळी रूढ होती, हे जैन छेदसूत्रावरून कळते. त्याचप्रमाणे ‘अल्पपरिकर्म’ व ‘बहुपरिकर्म’ या शब्दांद्वारे कपड्याचे कात्रण व शिवण यांचा बोध होतो. अंगानेटके कपडे कापून ते शिवण्याची पद्धत या काळीही होती. त्यांचा वापर विशेषत्वाने नर्तकी, दासी व नटींकडून करण्यात येई.

इसवी सनाच्या सातव्या शतकातील भारतीय पोशाखाचे वर्णन यूआन च्वांग या चिनी प्रवाशाने केलेले आढळते. त्यावरून त्या काळी पुरुष पांढरे शुभ्र धोतर व वैकक्ष्य आणिक स्त्रिया कंचुक, साडी व चादर वापरीत असत, असे दिसते. उत्तर भारतात त्या काळी थंडीच्या दिवसांत ‘तातारी’ पद्धतीची बंडी वापरीत असून इत्सिंग (६३४—७१३) या चिनी प्रवाशाच्या मतानुसार काश्मीरपासून मंगोलियापर्यंत खमीज, पाजामा आणि ‘रेफनाम’ हे जाकीटसदृश वस्त्र घालण्याचा रिवाज होता.

(१) राजा बिंबिसाराची वेशभूषा : लाल व निळ्या पट्ट्यांचे धोतर, गोंडेदार कमरपट्टा आणि डोक्याला शिरपेचयुक्त किरीट, गुप्तकाल. (२) अजिंठा शैलीतील राणी : घोट्यापर्यंत परिधान केलेला रेषारेषांचा परकर. (३) हंसदुकूल : चवरी ढाळणाऱ्या दासीचा पोशाख. (४) गांधार शैलीतील सैनिकी-वेशभूषा : डोक्याला शिरोवेष्टन, अंगात चिलखत, आखूड धोतर व कमरपट्टा. (५) सिंधु-संस्कृतीकालीन पुरुषी वस्त्रभूषा, मोहें-जो-दडो. (६) कुशाणयुगीन पुरुषी वेशभूषा : पांढऱ्या शुभ्र रंगाचे उष्णीष व त्यावर पृष्पांनी अलंकृत केलेले शीर्षपट्ट. (७) गुप्तकालीन राजभृत्यांची वेशभूषा : फुलाफुलांचा आकृतिबंध असलेला किनखाबी अंगारखा. (८) गुप्तकालीन स्त्रियांची वेशभूषा : डोक्यावरून घेतलेले उत्तरीय, फासा असलेला बाह्यांचा कुडता व कटीला परकर. (९) अजिंठा शैलीतील बालकाची वेशभूषा : गळ्यात छन्नवीर (दागिना) व कमरेला करगोटा.

 तथापि गुप्तकालातील राजांच्या सर्वसाधारण पोशाखात रेशमी धोतर वा चुणीदार पाजामा, भरतकामयुक्त अर्ध्या बाह्यांचा अंगरखा, कमरबंध, शीर्षपट्टयुक्त पगडी यांचा अंतर्भाव असे. विश्रांतीच्या वेळी ते धोतर व टोपी घालीत, तर घोड्यावर स्वार होताना कमरबंध आणि शिकारीच्या वेळी कंचुक, कमरबंध, धोतर व शिरस्त्राण धारण करीत. सामंत बहुधा धोतर, वैकक्ष्य व रत्नजडित मुकुट यांचा वापर करीत तर मंत्रिगण कंचुक, चादर व कूर्पासक घालीत. सैन्यातील घोडेस्वारांच्या पेहेरावात पूर्ण बाह्यांचा कंचुक, कूर्पासक व जांघिया माहुताच्या पोशाखात कूर्पासक, जांघिया व लांब कंचुक पदातींच्या गणवेशात धोतर, डोक्याला पट्टी वा रुमाल यांचा समावेश असे. यांखेरीज विविध थरांतील लोकांच्या पेहेरावातही वैशिष्ट्यपूर्णता असे. पारधी व व्याध लोकांच्या वर्गात आखूड धोतर, कंचुक व पाजामा अंतःपुरातील दासदासी व अन्य सेवकगण यांच्या पोशाखात कंचुक व दुपट्टे गायक-वादकांच्या पेहेरावात तऱ्हेतऱ्हेच्या टोप्या, कंचुक पाजामा वा धोतर द्वारपालांच्या पोशाखात चापूनचोपून नेसलेले धोतर, सजविलेले कमरबंध, कंचुक, अंगरखा व टोपी राजसेवकांच्या पोशाखात शिवलेले कपडे, धोतर, वेलबुटीचे कंचुक विदूषकाच्या पोशाखात कंचुक, पादत्राणे, धोतर, दुपट्टा व टोपी जादूगाराच्या पोशाखात चौकड्याचे धोतर व दुपट्टा आणि सर्वसाधारण नागरजनांच्या वा ग्रामीण लोकांच्या पोशाखात धोतर, दुपट्टा व पगडी यांचा उपयोग केला जाई.


नागर व ग्रामीण स्त्रियांच्या वेशभूषेत बहुधा साडी, कंचुक, स्तनपट्ट, चादर व कूर्पासक यांना प्राधान्य असे. त्या कधी कधी जाळीदार टोपीचाही वापर करीत. राजकुटुंबातील स्त्रियांत प्रायः रेघारेघांची साडी, वेलबुटीदार परकर आणि चोळी वापरण्याचा प्रघात होता. प्रसंगविशेषी काठांचा परकर, कंचुक, स्तनपट्ट किंवा आखूड लेंग्यावर चोळी असाही वेश केला जाई. मुलांच्या पेहेरावात धोतर किंवा आखूड चड्डी, कंचुक, डोक्याला फीत, टोपी किंवा पटका, गळ्यात छन्नवीर (दागिना) व पायतण यांचा समावेश असे. तत्कालीन वस्त्रप्रावरणांवर प्रायः फीत या वेलबुटीदार आकृतिबंध भरण्यात येऊन त्यांचे सौंदर्य वाढविण्यात येई.

प्रागैतिहासिक काळापासून इ. स. सातव्या शतकापर्यंतच्या भारतीय वेशभूषेत एकाप्रकारचा विकासक्रम दिसून येतो. नागरजनांच्या अभिरुचीनुसार त्यांच्या पोशाखात प्रसंगोपात्त बदल घडत गेल्याचे लक्षात येते. विदेशियांच्या संपर्कामुळे झालेले परिवर्तन लक्षणीय ठरले, तरी मूळ भारतीय साच्यातच ते समावून घेण्यात आले. भारत हा मूलतःच उष्ण कटिबंधातील देश असल्यामुळे शिवलेल्या कपड्यांना विशेष वाव न देण्याचीच वृत्ती प्राचीन काळात होती तथापि सौंदर्यदृष्टी व नीटनेटकेपणा यांची आवड मनुष्य स्वभावात मूलतःच असल्यामुळे साध्या कपड्यांतही वेधकता निर्माण करण्याचा प्रयत्न सतत होत आल्याचे आढळते.

मध्ययुगीन भारतीय वेशभूषा : इसवी सनाच्या सातव्या शतकापासून पुढे मुसलमानी सत्ता भारतात उदयास येईपर्यंतच्या काळात भारतीय वेशभूषेत झालेल्या बदलांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. हा कालखंड सोडला तर मात्र अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या काळात भारतीय पेहेरावावर मुस्लिम पेहेरावपद्धतीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. तरीही भारतीय वैशिष्ट्य त्यात टिकून राहिलेच. पंजाब, राजस्थान, गुजरात व उत्तर-पश्चिम भारतीय प्रदेशांत पुरुषवर्ग घोट्यापर्यंत लांबीचा चुडीदार पायजमा, गुडघ्याच्या खालपर्यंत पोहोचणारा ‘जामा’ (लांब अंगरखा) आणि मोगली पद्धतीची किंवा राजस्थानी पद्धतीची पगडी घालीत.पगडीचे इतरही प्रकार असत. जाम्याच्या अस्तन्या तंग व मनगटापर्यंत लांब असून त्यांना गोल घड्या पडत. त्याचा छातीवरील उजवा बंद डाव्या काखेखाली फितीने बांधला जाई. याच काळातील इराणी, मोगली किंवा तुर्की दुहेरी छातीच्या (डबल ब्रेस्टच्या) लांब कोटाचा डावा पदर उजव्या काखेखाली फितीने बांधीत. पंजाबी व राजस्थानी लोक दुपट्टा खांद्यावर घेण्याऐवजी त्याचा कमरबंधासारखा उपयोग करीत. त्याला तऱ्हेतऱ्हेच्या किनारी वा भरजरी काठ-पदर असत. राजेशाही थाट व खानदानीपण दाखविण्यासाठी ते खांद्यावर आणखी एक दुपट्टा घेत.

 या प्रदेशातील ब्राह्मण लोक धोतर (धोती) नेसत. ते पाठीमागे कासोटा घालीत, पण एकदा पुढे मध्यावर निऱ्या खोचल्यानंतर महाराष्ट्रीय लोकांप्रमाणे त्या परत दुमडून खोचीत नसत. अठराव्या शतकाच्या शेवटी ब्राह्मण लोक डाक्क्याच्या मलमलीचा, भरतकाम केलेला तंग अंगरखा व रुंद लाल रेशमी काठांची नागपुरी धोतरे नेसत. बाहेर जाताना ते नडियादचा गडद लाल रंगाचा फेटा बांधीत. धोतर कधी कधी कमरेभोवती पायघोळ गुंडाळून घेऊन समोर गाठ मारीत. ही धोतरे उत्तम रंगाची वेलबुटीची किंवा भरतकाम केलेली असत. बंगाली लोक धोतर नेसत व अंगावर लांबरुद चादर (शाल) घेत. काही लोक फेटा बांधीत. दाक्षिणात्य लोकांत गुडघ्यापर्यंत धोतर नेसण्याची प्रथा अद्यापिही आढळते. पंजाबी महिला लांब बाह्यांचा व पाठीमागे गुंड्या असलेला कुडता वापरीत आणि त्यावर पुढे सुटे असलेले बिनगुंड्यांचे जाकीट घालीत. तसेच डोक्यावरून दुपट्टा घेत. राजस्थान व उत्तर प्रदेश इ. प्रदेशांतील स्त्रिया पाच-सहा वार साडी (लुंगी) नेसत. तिचा पदर उजव्या खांद्यावरून व डोक्यावरून पुढे घेऊन डावीकडे कमरेला त्याचे एक टोक खोचीत. या साड्या भपकेदार नक्षीच्या व रुंद काठपदराच्या असत. श्रीमंत व उच्चकुलीन महिला पायाला अगदी तंग बसेल अशी तुमान घालून त्यावरून मलमलीचा बंद गळ्याचा व तंग बाह्यांचा टाचेपर्यंत लोंबणारा घोळदार झगा (जुगली) घातील. खाली घोळाला सुंदर नक्षीचे अरुंद काठ असत. सुंदर ओढणी वेधक पद्धतीने त्या डोक्यावरून घेत. सर्वसामान्य स्त्रिया सुंदर नक्षीचा घागरा नेसत. वरती कोपरापर्यंत बाह्यांची आखूड चोळी घालीत व डोक्यवारून दुपट्टा घेत.

मोगल सम्राट शहाजहान : १७ व्या शतकातील शाही मुस्लिम पेहेराव.

आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा म्हणजे काही स्त्रिया कधी कधी छानदार काठांचा घोळदार घागरा नेसून त्यावरून साडीपद्धतीप्रमाणे पुढे थोड्या निऱ्या घालून त्या भरजरी कमरपट्ट्याने बांधीत. तिची टोके तुऱ्याप्रमाणे पुढे लोंबती ठेवीत किंवा निऱ्या घागऱ्यात खोचीत. ओढणीचा उर्वरित भाग डाव्या बाजूने वरती घेऊन तो डोक्यावरून पाठीमागे सोडीत. मोकळे टोक पाठीमागून उजव्या खांद्यावर घेत. सुबक कापडाची व्ही (V) किंवा वाय (Y) या इंग्रजी अक्षरांच्या आकाराच्या छोट्या तंग बाह्यांची उरोभागापुरती चोळी घाळीत. त्यावर भरजरी वेलबुटीचे नक्षीकाम असे. छातीखाली व बाह्यांना सुंदर आडवे काठ असत. काहीजणी आखूड गळ्याची तंग व पाठीमागे बंद असलेली चोळी घालीत. ही खास राजस्थानी पद्धत होय. गुजरातमधील स्त्रियांची वेशभूषा काहीशी वेगळी असून त्या लुंगी पद्धतीने चुण्या न करता कटिवस्त्र नेसत. वरती कमरेपर्यंत लांबीचे व कोपरापर्यंत बाह्यांचे पोलके घालीत. कधी कधी चोळीचाही वापर करीत. सुंदर काठपदराचा दुपट्टा त्या कधी ओढणीप्रमाणे, तर कधी साडीप्रमाणे वापरीत. त्यांची पदर घेण्याची पद्धत महाराष्ट्रीय महिलांच्या उलट असे. महाराष्ट्रात सामान्यपणे पुरुष कमरेएवढ्या कुडत्यावर गुडघ्यापर्यंत लांबीचा अंगरखा, धोतर किंवा पायजमा, डोक्यावर पागोटे व अंगावर शेला किंवा उपरणे घेत.सरदार व इतर श्रीमंत लोकांच्या पागोट्यावर तुरा, शिरपेच व कलगी असे. ते कमरेभोवती शेला गुंडाळीत. त्यांचा अंगरखा (बस्ता) तलम सुताचा असून तो नऊ ठिकाणी जोडलेला असे. सरदारवर्ग दरबारप्रसंगी जरीचा वा तत्सम घोट्याइतका लांब झगा वापरीत. महाराष्ट्रीय पुरुषाच्या डोक्यावर पागोटे, तिवट, पटका, मंदिल, फेटा व बत्ती यांपैकी काहीतरी असे. लहान मुले बंदाच्या टोप्या वापरीत. त्या जरीच्या किंवा मखमलीच्या देखील असत. श्रीमंतांची वस्त्रे जरीची, रेशमी व उंची लोकरीची असत. ते शालजोडी वापरीत. सामान्य लोक पासोडी वापरीत तर गरीब लोक कमरेला लंगोटी’, खांद्यावर घोंगडी व डोक्याला छोटेसे मुंडासे गुंडाळीत, महाराष्ट्रीय स्त्रिया नऊवारी लुगडी नेसून अंगात खणाची चोळी घालीत. लग्न-मुंजीसारख्या समारंभप्रसंगी शालू वा ⇨ पैठणी यांसारखी भरजरी पातळे नेसत व धार्मिक प्रसंगी रेशमी रंगीत वस्त्रे घालीत. विशेष प्रसंगी अंगावर शेला घेत.

मुसलमानी अंमलात मराठी पुरुष तंग तुमान व अंगरखा घालीत. पुढेपुढे खांद्यावर घट्ट बसणारा व पुढे सुटा असलेला लांब व सैल झगा (चोगा) घालण्याची पद्धत पडली. त्यानंतर अचकन (गुडघ्यापर्यंत पोहचणारा व पुढे गुंड्या असलेला लांब कोट-शेरवानी) प्रचारात आली.

मुसलमानांचाही असाच पेहेराव असे. ते विविध प्रकारच्या टोप्या वापरीत. वायव्य सरहद्द प्रांत (सध्या पाकिस्तानात) व पंजाबमधील (भारत आणि पाकिस्तान) मुसलमान पगडी घालीत.इतर भागांत राजे-सरदार वगैरे विशेष प्रसंगीच पगडी वापरीत. प्रथम मुसलमानी स्त्रियांचा पोशाख पुरुषांप्रमाणेच असे. फक्त रंग तेवढा वेगळा. बाहेर जाताना त्या बुरखा घेत. पुढेपुढे त्या सैल कपडे घालू लागल्या. तसेच डोळे व नाकाजवळ जाळी असलेला डोक्यापासून पायापर्यंत सर्वांग झाकणारा काळा किंवा रंगीत बुरखा त्या वापरू लागल्या.


  

आधुनिक कालखंड (एकोणिसावे-विसावे शतक) : एकोणिसाच्या विसाव्या शतकात पारंपरिक भारतीय वेशभूषा हीच कमीअधिक फरकाने व आपापली प्रादेशिक वैशिष्ट्ये राखून स्थिरपद झाल्याचे दिसून येते. विशेषतः इंग्रज व इतर यूरोपीय लोकांच्या संपर्कामुळे सुशिक्षित भारतीय समाजात पाश्चिमात्य पेहेरावपद्धतीचे अनुकरण होऊ लागले. पुष्कळदा पाश्चिमात्य पद्धतीचा सूट व डोक्यावर मात्र पुणेरी पगडी असे विचित्र भासणारे नव्या-जुन्याचे मिश्रणही या अनुकरणातून दिसू लागले. बहुसंख्य ग्रामीण समाजात मात्र पारंपरिक पेहेरावपद्धती टिकून राहिली. जसजसा कापड उद्योगाचा आणि या क्षेत्रातील आयात-निर्यात व्यापाराचा विस्तार होऊ लागला, तसतसी विविध प्रकारच्या कापडाची उपलब्धता वाढू लागली व हळूहळू ग्रामीण समाजात त्याचा प्रसार होऊ लागला. गिरणीच्या कापडाची उपलब्धता व शहरीकरण इत्यादींमुळे भारतीय समाजात पश्चिमी वळण उमटू लागले आणि ते पहिल्यांदा सर्वत्र एकसारखे दिसू लागले.

स्वातंत्र्य आंदोलनात टिळकांची स्वदेशी चळवळ व महात्मा गांधीची ग्रामोद्धाराची चळवळ यांमुळे खादीचे कपडे वापरण्याची लोकांना एक राष्ट्रीय सवयच निर्माण झाली. खादीची गांधीटोपी, नेहरूशर्ट, त्यावर जाकीट आणि पैजमा किंवा धोतर हा पोशाख म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाची देणगी होय. पश्चिमी व देशी पेहेरावपद्धतींच्या वेगवान सरमिसळीच्या या कालखंडात भारतात प्रदेशविशिष्ट जी पोशाखपद्धती रूढ होती, तिचे स्थूल असे वर्णन पुढे दिले आहे :

महाराष्ट्र : एकोणिसाव्या शतकात बारीक काठाचे धोतर, अंगात बाराबंदी, डोकीला पगडी, पागोटे किंवा फेटा आणि अंगावर उपरणे अशी महाराष्ट्रीय पुरुषाची एकंदर वेशभूषा असे. या काळात करवती काठी व रुईफुली काठी धोतरेही वापरात होती. विशेषतः बाजीरावी धोतरजोडा प्रसिद्ध होता. याला फूट-दीडफूट लांबीचे काठ असत. पुरुष बाहेर कधी उघड्या डोक्याने जात नसत. ठराविक प्रसंगी उच्च थरातील लोक बाराबंदीवर लांब कोट घालून खांद्यावर उपरणे घेत. धार्मिक व सणसमारंभ प्रसंगी जरीकाठी धोतर व रंगीत जरीकाठी उपरणी वापरली जात. शेला (रेशमी भरजरी उपरणे) व पागोटे यांवरून पुरुषाचा समाजातील दर्जा सूचित होई. संन्यासी लोक काषाय रंगाचा (स्वामी विवेकानंद) आणि खानदानी मराठा केशरी रंगाचा (प. बाजीराव) पटका बांधीत. ब्राह्मण लोक पगडी घालीत तर मराठा, माळी व इतर जातींचे पुरुष पागोटे घालीत. पगडी गोलाकार, लाल रंगाची व बांधीव असून रचनेवरून तिचे विशिष्ट प्रकार पडत. पागोटे लांबट, चौकोनी किंवा तिकोनाकृती व बांधीव असे. गंधार व नागार्जुनकोंडामधील शिरोभूषेशी या पागोट्यांचे बरेच साम्य दिसून येते. गोव्याचे सारस्वत ब्राह्मण, कर्नाटक व महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे ब्राह्मण आणि काही इतर जातींचे लोक वर चार टोके असलेली लाल किंवा शेंदरी रंगाची टोपी वापरीत. सोनकोळी लोक अशीच पण मध्यावर नालाचा आकार असलेली टोपी वापरीत व अजूनही काही लोक ती वापरतात.

आदिवासी ठाकूर स्त्री

या काळात महाराष्ट्रीय महिला नऊवारी लुगडे नेसत व त्यावर कोपरापर्यंत बाह्मंची तसेच इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकाराच्या गळ्याची आणि मध्यावर गाठ मारलेली खणाची चोळी घालीत. चोळीला दंडावर व खाली ओटीपोटावरील भागावर रुंद काठ असत. काही स्त्रिया लहान गळ्याची व वर एक गुंडी असलेली चोळी वापरीत. नेहमीच्या वापरात लाल किंवा हिरव्या रंगाचे रुंद काठ असलेली धारवाडी, माहेश्वरी, इरकली व नागपुरी लुगडी विशेष प्रचारात होती. त्या लुगड्यांना आतल्या अंगास वेगवेगळे गडद रंग, लहानमोठा रास्ता, लहानमोठा चौकडा किंवा उभा धागा एक रंगाचा व आडवा धागा वेगळ्या रंगाचा असे दुरंगी (अंजिरी वगैरे) पोत असे. त्यांना लाल किंवा हिरवा ‘टोपपदर’ (एकाच रंगाचा पदर) किंवा ‘गंडेरी पदर’ (पट्ट्या-पट्ट्यांचा पदर) असे. स्त्रिया बाहेर जाताना अंगावर शाल घेत. डोक्यावरून पदर घेण्याची प्रथा ब्राह्मण स्त्रियांचा अपवाद वगळता जवळजवळ सार्वत्रिक होती तथापि काही ब्राह्मण स्त्रियाही बाहेर जाताना डोक्यावरून पदर घेत. पूजा-विधीप्रसंगी स्त्रिया रेशमी रंगीत वस्त्रे नेसत, तर लग्नमुंज वगैरे विशेष प्रसंगी शालू-पैठणी, काळी चंद्रकळा अशी ठेवणीतली भरजरी काठापदराची रेशमी पातळे नेसून त्यांवर जरीच्या खणाची चोळी व वरती भरजरी शेला पांघरीत. शेला पांघरणे हे प्रतिष्ठितपणाचे समजले जाई.

विसाव्या शतकात बारीक काठाचे पांढरे धोतर, बाराबंदीऐवजी स्टँड कॉलरचा, सैल ब्राह्यांचा व पुढे कफ असलेला, मध्यावर निम्म्या भागापर्यंत बटनपट्टीयुक्त आणि अर्ध्या मांड्यांपर्यंत लांब असा पांढरा सदरा, डोक्याला फेटा किंवा टोपी व खांद्यावर उपरणे अशी पुरुषांची वेशभूषा रूढ झाली.

या काळातील ग्रामीण पुरुषवेश म्हणजे जाडेभरडे गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंद गळपट्टीचा ढगळ कुडता किंवा पैरण व डोक्याला गडद रंगाचा पटका वा रुमाल हा होय.

इतर भारतीय लोकांहून महाराष्ट्रीय लोकांची धोतर नेसण्याची पद्धत खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे धोतर चार ते साडेचार बार (सु. ३·६५७ मीटर) लांब व पन्नास ते बावन्न इंच (सु. १२७ सेंमी. ते १३२ सेंमी.) रुंद असते. ब्राह्मण वगैरे उच्च वर्गीय लोकांच्या धोतराचा पाठीमागे खोचलेला काचा थोडा डावीकडे झुकलेला असतो. समोरील भागावरील निऱ्या नाभीजवळ खोचल्यानंतर परत खाली उरलेले टोक वर घेऊन त्याच्या बारीक चुण्या करतात व त्या नाभीजवळ थोडेसे डाव्या बाजूला खोवतात. यामुळे कलात्मक चुण्या पडून काठाची एक पट्टी उजव्या पावलापासून तिरकी वर कमरेपर्यंत डावीकडे येते. त्या काळी धोतराचे टोक बाहेर येणे, असभ्यपणाचे व अप्रतिष्ठितपणाचे समजले जाई.

फेटा बांधण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पटका बांधणे, पटका हा सामान्यतः एक फूट (सु. ०·३० मीटर) रुंद वा बावन्न फूट (सु. १५·८५ मीटर) लांब असतो. यात एका बाजूच्या घड्या दुसऱ्या बाजूच्या घड्यांपेक्षा उंच झालेल्या असतात. सबंध फेट्याचा आकार थोडा एका बाजूला झुकलेला व दुसरी बाजू बसकट असून त्याने एक कान झाकला जातो. त्याचा एक शेव तुऱ्यासारखा वर ठेवतात किंचा आत खोचतात. दुसरा शेव नेहमी मानेवरून पाठीवर लांब घड्यांसह सोडतात. ही शेमलाची पद्धत बहुतेक खानदानी मराठ्यांत किंवा राजपूत लोकांत रूढ आहे. दुसरी पद्धत म्हणजे रुमाल बांधणे. हा रुमाल १२ X १२ फूट (३·६५ X ३·६५ मीटर) असा लांब-रुंद असतो. त्याच्या दोन्ही बाजूंच्या घड्या सारख्याच उंचीच्या असतात. दोन्ही शेव आत खोचले जातात. नेहमीच्या वापरात पांढरा, अबोली किंवा गुलाबी रंगाचा रुमाल असतो. विशेष प्रसंगी जरीकाठी पांढरा किंवा रंगीत रुमाल वापरला जातो. भारी फेट्याला जरीचा आकर्षक चौकडादेखील असतो.


ब्रिटिशांच्या प्रभावामुळे प्रतिष्ठित पुरुष, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, अध्यापक-प्राध्यापक, कारकून वगैरे लोक अंडाकार हंगेरियन काळी टोपी, पॅंट किंवा विजार व शर्टवर लांब कोट (फार्सी कोट) अशी वेशभूषा करू लागले. पुढे विद्यार्थिवर्गात यूरोपीय पद्धतीचा आखूड कोट व पँट प्रचारात आली. काही लोक गोल टोपी वापरू लागले. पुढेपुढे बरेच लोक काळी लांबट टोपी, तर काही हॅट वापरू लागले. स्वातंत्र्यआंदोलनाच्या काळात खादीची गांधीटोपी व नेहरूशर्ट, जाकीट, तुमान किंवा धोतर हा पेहेराव रूढ झाला. लहान मुले अर्धी चड्डी, सदरा व डोक्याला रंगीत वा रेशमी किंवा जरीची वेलबुटी असलेली टोपी वापरीत. लहान मुली चुणीच्या झालरच्या पफ्‌च्या उडत्या बाह्यांचे, तऱ्हेतऱ्हेच्या कॉलरचे अंब्रेलाकट वा पायपीन बॉर्डरचे असे नाना नमुन्यांचे फ्रॉक घालू लागल्या, तर जरा मोठ्या मुली विविध प्रकारची परकर-पोलकी वापरू लागल्या.

विसाव्या शतकात स्त्रियांची गेल्या शतकातील वेशभूषाच कायम राहिली. इचलकरंजी, कोईमतूर, नागपूर, नगर, इंदोर वगैरे पेठांची ८० नंबरी, १००नंबरी सुताची लुगड्याहून तलम अशी यंत्रमागाची पातळे प्रचारात येऊ लागली. त्यांचे काठ-पदर रेशमी किंवा जरीच्या नक्षीचे असून लुगड्याहून ते लहान असत. प्रत्येक पेठचे वेगळे वैशिष्ट्य असे. हळूहळू निरनिराळ्या डिझाईनची छापील पातळे स्त्रियांच्या अंगावर झळकू लागली. पुढेपुढे शेला किंवा शाल वापरण्याचे प्रमाण कमी झाले. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे पुष्कळशा पांढरपेशा स्त्रिया चोळीवर बिनहाताचे जाकीट किंवा चोळीऐवजी ब्रेसियरवर ब्लाऊज घालू लागल्या. त्याने पाठपोट झाकले जाते. पोलके किंवा ब्लाऊजसाठी हातमाग किंवा यंत्रमागावरील तलम, रंगीत, साधे, रेघारेघांचे, चौकड्याचे किंवा चिटाचे (छापील) कापड वापरू लागल्या. तऱ्हेतऱ्हेच्या कॉलरची पफ्,चुण्या, उडती झालर, पायपीन असलेल्या बाह्यांची हनीकोम-भरतकाम केलेली व निरनिराळ्या बेतणीन शोभायमान अशी विविध प्रकारची पोलकी प्रचारात आली. काही स्त्रिया व महाविद्यालयीन विद्यार्थिनी पाच-सहावारी साड्या परकरावर नेसू लागल्या.

सकच्छ लुगड्यातील महाराष्ट्रीय युवती

महाराष्ट्रीय महिलांची नऊवारी साडी नेसण्याची पद्धत (सकच्छ) खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात सर्वांग कलात्मक पद्धतीने झाकले जाऊन शरीरसौष्ठव दिसून येते. या पद्धतीत शालीनता व भारदस्तपणा असून शरीराच्या हालचालीस सुटसुटीत अशी ही पद्धत आहे. या पद्धतीत कटीला बांधलेल्या पदरात (नाभीजवळ) गुंडाळलेल्या निऱ्यांना केळासारखा आकार येतो. अलीकडे काही स्त्रिया त्या आत खोचून टाकतात. साडीचा वरचा पदर उजव्या काखेखालून घेऊन तो पुढून छातीवरून डाव्या खांद्यावर पाठी मागे टाकला जातो. एकीकडचे काठ छातीवरून गळ्याभोवती व नंतर पाठीमागे जातात, तर दुसरीकडच्या काठाची पट्टी साधारण उजव्या गुडघ्याखालून वर तिरकी जाऊन डाव्या खांद्यावरून ती पाठीमागे जाते व पाठीमागे पदरावरील आकृतिबंध दिसतो. हा पदर स्त्रिया आपल्या इच्छेनुसार कमीजास्त घेतात. खालच्या बाजूला पावलाजवळ निऱ्यांना काठ असतात. पाठीमागे मध्यावर कमरेपासून घोट्याच्या खालपर्यंत कासोट्याची दुहेरी किनारपट्टी येते. काही स्त्रिया, विशेषतः मराठमोळ्या स्त्रिया मधल्या भागाचे किंवा पट्टीचे दोन भाग करतात आणि ते जरा दोन्ही बाजूंना थोड्या चुण्या करून खोचून टाकतात. यामुळे पुढच्या निऱ्यांचा घोळ कमी होतो व पाठीमागे थोड्याशा अर्धगोलाकार अशा सुंदर चुण्या पडून दोन किनारपट्ट्या दिसतात. बहुतेक स्त्रिया कामाच्या किंवा खेळाच्या वेळी पाठीमागच्या पदराचे उजवीकडील टोक पुढे घेऊन डावीकडे खोचतात. काही ब्राह्मण स्त्रिया पुढच्या बाजूला उजव्या पायाकडील खालच्या निऱ्यांचा काठाकडील भाग वर घेऊन तो तिरका डाव्या बाजूला कमरेला खोचतात. त्यामुळे उजव्या पायाकडून डाव्या बाजूला तिरके काठ येतात. यामुळे नेसणे जास्त सुंदर दिसते. याला खोचण म्हणतात. घाटावरच्या काही मराठा स्त्रिया, काही जैन स्त्रिया व कनिष्ठ थरातील स्त्रिया नऊवारी साडी कासोटा न घालता (गोल नेसण) नेसतात. वारली, शेतकरी वगैरे स्त्रिया जरा कमी लांबीचे लुगडे गुडघ्यापर्यंत नेसतात. त्यांची चोळी उंचीला जास्त व बाह्या कोपराहूनही लांब असतात. सोनकोळी स्त्रिया नऊवारी साडी गुडघ्यापर्यंत खोवून घेतात. पदर लांब काढून पुढे डावीकडे खोचतात. तो सुंदर पक्ष्याच्या आकाराप्रमाणे दिसतो. गळ्याभोवती छातीचा भाग झाकेल या तऱ्हेचे त्या दुपट्टा घेतात.

येथे बहुतेक जातींतील वधू लग्नाच्या वेळी मामाने दिलेली नवीन जरीची व पिवळ्या रंगाची साडी (अष्टपुत्री-पटवस्त्र) गोल नेसते. ब्लाऊजही त्याच रंगाचा असतो. काही जातींत वधूची साडी पांढरी असून काठपदर पिवळ्या रंगाचे असतात (पूर्वी साडी किंवा काठपदर हळदीने पिवळे रंगवीत). वधू अंगावर कोणत्याही रंगाची रेशमी शाल किंवा भरजरी शेला पांघरते. वरातीच्या वेळी वधू सासरकडून मिळालेली कोणत्याही रंगाची मूल्यवान, सुंदर पैठणी किंवा बनारसी शालू नेसते. अलीकडे कृत्रिम धाग्याच्या उत्तम प्रतीच्या साडीवर जीग, सोनेरी किंवा रुपेरी टिकल्या, कलाबतू वगैरे वापरून काठपदर व अंग (पोत) यामध्ये नक्षीकाम केलेली जरीसाडी वराती-प्रसंगी वापरतात. वधूची एकतरी साडी हिरव्या रंगाची असतेच.


वधूपक्षाकडून बहुधा सीमान्तपूजनाच्या वेळी मिळालेला पोशाख घालून वर लग्नाला सज्ज होतो. गेल्या शतकात हा पोशाख म्हणजे रेशमी किनारीचे तलम धोतर, उंची कापडाचा (बहुधा रेशमी) अंगरखा, रंगीत जरीकाठी शेला किंवा उपरणे व डोक्याला पागोटे, रुमाल, फेटा किंवा पगडी असा असे. अलीकडे मात्र नवरा मुलगा बहुधा टेरिलिन, पॉलिस्टर, नॉयलॉन, प्युअर सिल्क, वूलन, स्ट्रेचलॉन अशांसारख्या वस्त्रांचा शिवलेला सदारा व सूट वापरतो.

पंजाब : येथील पुरुष ‘चुडीदार’ पायजमा किंवा सैलसर पण घोट्याजवळ एकत्रित केलेला उभ्या चुण्यांचा पायजमा व सलवार किंवा लांब बाह्यांचा डाव्या बाजूच्या बटनांचा कुडता घालतात. समारंभप्रसंगी विशिष्ट प्रकारचा सदरा व त्यावर लांब कोट (अचकन) घालतात. फार कमी लोक धोतर हे लुंगीप्रमाणे नुसते गुंडाळून नेसतात. ब्राह्मण वगैरे लोक मात्र धोतराला थोड्या निऱ्या घालून पुढे मध्यावर खोचतात. स्त्रिया घोट्याजवळ एकत्रित केलेल्या उभ्या चुण्यांची पायघोळ भपकेदार सलवार (सुथन) व अर्ध्या मांडीपर्यंत लांबीचे आणि मनगटापर्यंतच्या तंग बाह्यांचे अंगाबरोबर बसणारे खमीस घालून त्यावर रंगीत दुपट्टा घेतात.

वधूची सलवार (सुथन) लांब असून घोट्याजवळ तिच्यावर भरगच्च नक्षीकाम केलेले असते. ओढणी जरीकाठी व लाल रंगाची असून सर्व पोशाखावर लांब कोटासारखा शिवलेला गळ्यापासून घोट्यापर्यंत येणारा लाल ‘चोला’ तिला घालावा लागतो. हे वस्त्र भारी व झिरझिरीत असते. नववधूने विवाहप्रसंगी वा अन्य स्त्रियांनी सणसमारंभाच्या वेळी अंगावर ⇨ फुलकरी वा ‘बाग’ घेण्याची प्रथा फार जुनी आहे.

सिंधी ब्राह्मण व बनियाखेरीज इतर सिंधी लोक चुणीदार पायजमा (सुथन), डाव्या बाजूच्या बटणांचा, रुंद बाह्यांचा कमरेपर्यंत किंवा त्याहून लांब असा नक्षी असलेला सदरा (पेहेरान) वापरतात. काही लोक घरी साधी सफेद टोपी घालतात, तर काही कशिद्याची टोपी वापरतात. उच्चवर्णीय बाहेर जाताना त्यावर लांब कोट (अंगरखा) घालून वर रंगीत दुपट्टा घेतात. कधीकधी त्याचा कमरेला बांधण्याकडे उपयोग करतात. तसेच डोक्याला घट्ट बसणारे, अरुंद किनार सभोवार असलेले आणि जाती व प्रदेशानुरूप आकार, रंग आणि बनावट यांत थोडाफार फरक असलेले असे पागोटे घालतात. सर्वजण समारंभप्रसंगी एक फूट (सु. ०·३० मीटर) उंचीची, सिलेंडरच्या आकाराची सिराई टोपी वापरतात. ठराविक प्रसंगी सरकारी नोकर साफा बांधतात. एकोणिसाव्या शतकात सिंधमधील हैदराबादचे (हल्ली पाकिस्तान) मीर लोक सुंदर, तलम व जाळीदार अशा ८० वार (सु. ७३ मीटर) वस्त्राचा भला मोठा फेटा बांधीत. सिंधी स्त्रिया सुथन व पेहेरान वापरतात. डोक्यावर त्या पातळ कापडाचा बुरखा घेतात. प्रतिष्ठित स्त्रिया बाहेर जाताना त्यावर पेरांगीर (घागरा) घालतात व डोक्यावरून ओढणीप्रमाणे चादर घेतात.

राजस्थानी खानदानी पुरुषवेश

 राजस्थान : गुडघ्यापर्यंत धोतर, आखूड व बंद असलेला ‘बांदिया’ नामक वैचित्र्यपूर्ण सदरा, डोक्याला आकर्षक पद्धतीने बांधलेला रुमाल (पोटिया) व खांद्यावर उपरण्याची घडी, अशी येथील सर्वसामान्य पुरुषांची वेशभूषा आहे. काहीजण छातीच्या खाली जवळजवळ उभ्या चुण्या असलेला ‘पाशाबंदी’ (केडियू) नामक अंगरखा घालतात. श्रीमंत लोक तलम धोतर नेसतात. डावीकडील शेवाचा पाठीमागे काचा घालून उजवीकडील भागाच्या निऱ्या पुढे खोवतात. सुशिक्षित लोक चुडीदार पायजमा, बिनकॉलरचा, कफ् नसलेला कुडता घालून त्यावर अचकन वापरतात. मारवाडी लोक ‘पागरी’ नामक निरनिराळ्या नमुन्याची पागोटी घालतात. हे लोक कधी कधी गळ्याभोवती दुपट्टा घेऊन त्याचा बाकीचा भाग कमरेला बांधतात तर कधीकधी पागोट्याभोवती व हनुवटी किंवा मानेभोवती हातरुमालदेखील गुंडाळतात.


स्त्रिया बराच मोठा घोळदार लेहंगा (घागरा), उघड्या पाठीची पाठीमागे बांधण्याची चोळी (काचलीवो) आणि डोकीवरून नक्षीदार काठाची ओढणी (बांधणी) वापरतात. ओढणीचा एक पदर पुढे खोवून दुसरा पदर डाव्या बाजूने छातीवरून व डोक्यावरून घेऊन पाठीमागे सोडतात किंवा पुढे घेऊन छातीजवळ वा पुढे कमरेला डावीकडे खोचतात. उच्च थरातील स्त्रिया बाहेर जाताना घागऱ्याच्या मध्यावर समोर एक अरुंद वेगळ्या रंगाचे व नक्षीचे ‘फेटिया’ नामक वस्त्र (सौभाग्यचिन्ह) नेसतात आणि त्या सर्व पेहेरावावर एक पांढरी चादर (थिरमा) लपेटून घेतात.

 बहुतेक जातींत वधू लाल रंगाची व जरीकाठी झिरझिरीत ओढणी, लाल मारवाडी पद्धतीची चोळी किंवा ब्लाऊज, रंगीबेरंगी (नवरंग, सौरंग वगैरे) भला मोठा घागरा नेसते व डोक्यावरून ओढणीचे घुंघट घेते. उंची धोतर, सदरा, कोट व पटका किंवा पगडी असा वराचा पोशाख असतो.

कशिदाकामाने सजविलेला राजस्थानी युवतीचा भपकेबाज पेहेराव

सौराष्ट्र व कच्छ : या भागातील पुरुष गुडघ्याच्या खाली तंग असलेला पायजमा, सुरवार (सुरवाल), अंगात विशिष्ट प्रकारचे जाकीट, त्यावर रुंद बाह्यांचा अंगरखा आणि वरून उपरण्यासारखे एक वस्त्र लपेटून घेतलेले तसेच कमरेभोवती नक्षीदार फितीने बांधलेले व त्याची दोन टोके पुढे त्रिकोणाकृती झालेली आणि डोकीस मोटे पागोटे, अशी वेशभूषा करतात तर शेतकरी-कामकरी ‘पाशाबंदी’ (केडियू) नावाचा अंगरखा घालतात. ब्राह्मण व काही बनिये वगैरे पायजम्याऐवजी धोतर (राजस्थानी धोतराप्रमाणे), अंगात लांब अंगरखा (वाघो), वर दुपट्टा व डोक्यावर पगडी किंवा फेटा बांधतात. शेतकरी-कामकरी स्त्रिया उघड्या पाठीची पाठीमागे बांधायची चोळी, राजस्थानी पद्धतीप्रमाणे ओढणी व जाडेभरडे लाल किंवा तपकिरी छोटे वस्त्र लुंगीप्रमाणे नेसतात. ब्राह्मण, रजपूत वगैरे स्त्रिया ‘फुलफगरनो’ (नागमोडी), ‘पाचपटानो’ (पाच रंगांचा) असा विविध नमुन्यांचा वीस वार (सु. १८ मीटर) कापडाचा खूप घोळदार घागरा, उघड्या पाठीची पाठीमागे बंदाला घुंगरे असलेली व छातीच्या भागावर बहुधा मोराचे भरतकाम केलेली चोळी व ‘नवरंग’, ‘सौरंग’, ‘शालू’, ‘कीर’ अशा नमुन्यांची ओढणी वापरतात. पतिगृही जाताना नववधू बहुधा ‘दक्खनी कीर’ नेसते.

भारतीय पुरुष—पेहेराव : (डावीकडून) (१) शिख, (२) पंजाब—हरियाणातील हिंदू, (३) उत्तर प्रदेशातील मध्यमवर्गीय.

गुजरात : बहुतेक पुरुष सौराष्ट्रातील पद्धतीप्रमाणे धोतर, अंगात दुहेरी छातीचा तंग व गळ्याबरोबर बसणारा, अरुंद बाह्यांचा, चार बंदांचा (चौबगला) आणि कमरेपर्यंत लांबीचा बंडीवजा सदरा घालतात. येथे पायजम्याचा वापर कमीच. ब्राह्मण लोक मात्र ब्राह्मणी पद्धतीने धोतर नेसतात. सणसमारंभप्रसंगी प्रतिष्ठित लोक यावर लांब अंगरखा (जामा-वागो) व डोक्यावर पगडी किंवा फेटा आणि अंगावर उपरणे असा वेश करतात.

स्त्रिया परकर किंवा घागऱ्यावर पाच-सहावारी साडी गोल पद्धतीने नेसतात पण पदर महाराष्ट्रीय स्त्रियांच्या उलट व तो डावीकडे पाठीमागे नेऊन कंबरेला खोचलेला असतो. त्यामुळे पदराचे डिझाईन समोरील भागावर दिसते. त्या बाहेर जाताना डोक्यावरून पदर घेतात. सौराष्ट्रीय पद्धतीची चोळी त्या वापरतात. मात्र प्रौढ व उच्चवर्णीय महिला पुढच्या गाठीची चोळी घालतात.

काही जातींत वधूची साडी लाल रंगाची, रेशमी व रुपेरी पानांच्या काठपदरांची (पानेतर) किंवा रेशमी लाल रंगाची, पण काठपदर वेगळ्या रंगाचे असलेली (घरचोल) अक्षी असते. भाटिया, सोनार, गुजर, मेवाड, श्रीमाळी वगैरे जातींत वधूची साडी पांढऱ्या रंगाची रेशमी असते आणि त्याच रंगाची सॅटिनची किंवा रेशमी वगैरे उंची कापडाची काचोळी (हल्ली बहुधा ब्लाऊज) असते. काही ठिकाणी वधूचा मामा वधूला लाल रंगाची रेशमी ⇨ पाटोळा पद्धतीची हातमाग साडी देतो. ही साडी येथे लोकप्रिय आहे. वर रेशमी धोतर किंवा पीतांबर नेसून अंगावर रेशमी शाल व डोक्याला पटका बांधतो. अलीकडे भारी कापडाचा सदरा, सूट व डोक्याला टोपी असाही वराचा परिवेश असतो.


उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओरिसा व आसाम : या प्रदेशांतील बहुतेक पुरुष ब्राह्मणी पद्धतीने ‘धोती’ व अंगात आखूड, घट्ट बसणारी दुहेरी पडद्याची आणि वरचा बंद डाव्या बाजूला असलेली ‘बगलबंदी’ घालतात तर शेतकरी-कामकरी जरा वेगळ्या तऱ्हेने धोतर नेसून छातीच्या मध्यावर खालच्या बाजूला एक बंदजोडी असलेली बंडी घालतात. बाहेर जाताना हे लोक खांद्यावर उपरणे आणि शिरोवस्त्र वापरतात. श्रीमंत लोक समारंभप्रसंगी ‘चुडीदार’, ‘बोरदार’ (वरून खालपर्यंत समान रुंदीचा) इ. वेगवेगळ्या नमुन्यांचे पायजमे (सुरवार), लांब, अर्घ्या वा बिनबाह्यांचा, मध्यावर किंवा कडेला बटनांचा किंवा बंदाचा कुडता आणि वरती ‘जामा’ घालतात. शिरोवस्त्राचे तिन्ही प्रकार येथे प्रचारात आहेत परंतु पांढरी ‘भय्याटोपी’ विशेष प्रचारात आहे. लहान मुले कान झाकून टाकणारी लांब ‘माकडटोपी’ (कुलाह) वापरतात. काही लोक फेटा बांधून त्याचा उरलेला शेवटचा भाग दुपट्ट्याप्रमाणे अंगावर घेतात.

स्त्रिया कळीदार पायजमा (लेहंगा), चोळी (अंगियापुरती किंवा सलुका) घालतात. या अंगियावर जरीच्या फुलांची सजावट असते. अंगियावर त्या ओढणी घेतात. प्रतिष्ठित स्त्रिया बाहेर जाताना अंगभर पांढरी चादर लपेटून घेतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल आणि बिहार येथील बहुतेक पुरुषांचा मुख्य पोशाख म्हणजे बिनकाठाची पांढरी धोती नेसणे अंगावर चादर पांघरणे. काही लोक अंगात पैरण घालतात.

बंगाल-बिहार-आसाम व ओरिसातील लोक शिरोवस्त्र वापरीत नाहीत. शेतकरी-कामकरी लोक अंगावरील उपरणे (गमचा) काम करताना कमरेला बांधतात आणि उन्हाच्या वेळी तो डोक्याला गुंडाळतात. ओरिसातील लोक महाराष्ट्रीय पद्धतीने धोतर नेसतात. कार्यालयात जाणारे बंगाली बाबू पायजामा, अंगात बंडी व अधूनमधून त्यावर लांब अंगरखा घालून वरून चादर पांघरतात. प्रतिष्ठित लोक चादरीऐवजी सैलसर ओव्हरकोट (चोगा) घालतात.

येथील सर्वसामान्य स्त्रिया गोल पद्धतीने सहावारी साडी नेसतात व पदर महाराष्ट्रीय स्त्रियांप्रमाणेच घेतात, पण तो लांब काढून डोक्यावरून घेऊन परत पाठीमागून उजव्या काखेखालून पुढे घेऊन डाव्या खांद्यावरून पाठीमागे सोडतात आणि त्याच्या टोकाला किल्ल्यांचा जुडगा बांधतात. साडीला काठ असणे सौभाग्याचे समजतात. त्यांच्या साड्यांची नावे ‘नीलांबरी’, ‘मेघडंबर’, ‘मयूरकंठिया’ अशी असतात. बंगाली वधूच्या साडीवर दुर्गेचे नाव लिहिलेले असते. बंगाली नवरदेव उंची तलम धोतर व अंगावर रेशमी शाल वापरतो. बिहारी वधू रेशमी किंवा सॅटिनचा भरजरी घोळदार घागरा नेसून त्यावर जरीबुट्यांची चोळी व चुनरी (लांब ओढणी) घेते. काही चुनरींना रुपेरी जरीची छोटी छोटी गोल पाने अंतराअंतरावर शिवून लावलेली असतात. हल्ली बहुधा त्यावर त्याच रंगाचा ब्लाऊज घालतात. मखमलीवर परंपरागत पद्धतीने ⇨ जामदानी कलाकाम केलेल्या व रेशमी पटावर ⇨ बालुचार बुटीदारकामयुक्त साड्यांचा वापर पूर्वी बराच केला जाई. नवरदेव उंची दर्जाच्या कापडाचा कुडता, चुडीदार पायजमा व शेरवानी वापरतो आणि डोक्याला फेटा बांधतो.

ब्रिटिश अंमलामुळे पुष्कळसे उत्तर भारतीय सुशिक्षित व प्रतिष्ठित पुरुष पॅंट, शर्ट, लांब कोट किंवा स्टँडकॉलरचा आखूड कोट, टोपी, हॅट, हंगेरियन टोपी, शेरवानी व जोधपुरी कोट आणि राजस्थानी राजे, सरदार वगैरे जोधपुरी चोळणा वापरू लागले.

कर्नाटक : येथील पुरुष धोतर, अंगावर शेला (शल्ये) व डोक्याला पांढरा रुमाल (उरुमाली) बांधतात. येथे फेटादेखील प्रचारात आहे. काही लोक अंगात तंग बंडी घालतात. ब्राह्मण स्त्रियांखेरीज इतर स्त्रिया कासोटा न घालता नऊवारी साडी नेसतात. मात्र धार्मिकप्रंसंगी सर्वच जातींतील विवाहित स्त्रिया न दिसेल असा आतून कासोटा घालतात. पदर महाराष्ट्रीय स्त्रियांच्या पदरासारखाच घेतात. साड्यांचे काठपदर बरेच रुंद असतात. त्या अंगात चोळी व पोळके घालतात.

आंध्र प्रदेश : पुरुष चार वार (सु. ३ मीटर) लांबीचे धोतर बहुधा ‘पंचकट्‌टू’ (पाठीमागे काचा) पद्धतीने म्हणजे पुढे थोड्याशा निऱ्या, एका पदराचे वरचे टोक व काही भाग डावीकडे खोचलेला असे नेसतात. अंगावर उपरणे घेतात. वरच्या थरातील लोक धार्मिकप्रसंगी महाराष्ट्रीयांप्रमाणे धोतर नेसतात. डोक्याला काहीच नसते. ब्राह्मण स्त्रियांखेरीज अन्य स्त्रिया आठवारी साडी लुंगीप्रमाणे नेसतात. ब्राह्मण स्त्रिया साडीच्या निऱ्या पाडतात. त्या अंगात पुढील गाठीची चोळी वापरतात. येथील ⇨ कलमकारी पद्धतीने रंगविलेल्या छापील वस्त्रांचा अंतर्भाव पूर्वीपासूनच वेशभूषेत करण्यात येतो.

तमिळनाडू : बहुतेक पुरुष रंगीत काठाचे पांढरे धोतर नेसतात. ब्राह्मण लोक नेहमी धोतर दुहेरी करून लुंगीप्रमाणे गुंडाळून त्याची दोन्ही टोके दोन बाजूंना खोचतात. क्वचित नाडी व पट्टा वापरात. मात्र बहुतेक लोक धार्मिकप्रसंगी महाराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे म्हणजे ‘पंचगच्चो’ (पाचदा खोचून) धोतर नेसतात. ‘त्रीगच्चो’ (तीनदा खोचून) ही पद्धतही येथे रूढ आहे. उच्च थरातील लोक अंगावर उपरणे (अंगवस्त्रम्) वापरतात. ब्राह्मणांखेरीज इतर लोक फेटा बांधतात.

तमिळ स्त्रिया ७ ते १० वारांपर्यंत (सु. ६ मीटर ते ९ मीटर), लांबरुंद काठपदराच्या साड्या नेसतात. नेसण्याची पद्धत जातिपरत्वे व वयपरत्वे भिन्न असते. येथे मुख्यतः डाव्या खांद्यावरून पदर घेण्याची पद्धत आहे. या स्त्रिया आतून कासोटा घालून वरून गोल पद्धतीने साडी नेसतात. बराच मोठा पदर काढून व कमरेभोवती गुंडाळून तो पाठीमागे डावीकडे खोचतात. काही स्त्रिया मात्र उजवीकडे खोचतात व त्या चोळी वापरतात. 


 मलयाळम् : तुटपुंजा पोशाख हे येथील वैशिष्ट्य असून पुरुष पंचाप्रमाणे आखूड पांढरे धोतर (मुंडी) वापरतात. ब्राह्मण लोक फक्त धार्मिकविधीच्या वेळी लहान रंगीत काठाचे लांबरुंद धोतर ब्राह्मणी पद्धतीने नेसतात. क्वचित कोणी लहान वस्त्र डोक्याला गुंडाळतात. नंबुद्रिपाद ब्राह्मण अंगावर उपरणे घेतात. स्त्रियादेखील आखूड साडी पुरुषाप्रमाणे लुंगी पद्धतीने नेसतात व बाहेर जाताना मांडीपर्यंत पोचेल असे दुसरे पांढरे वस्त्र काखेखालून छातीवर गुंडाळून घेतात. ब्राह्मण स्त्रिया चारी वार साडी पाठीमागे व पुढे मध्यावर निऱ्या करून नेसतात. 

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय पेहेरावपद्धतीत प्रदेशविशिष्ट विविधता आणि वैचित्र्य टिकून असले, तरी विशेषतः तरुण सुशिक्षित स्त्री-पुरुष पेहेरावपद्धती बरीचशी एकसारखी होत चालल्याचे दिसून येते. ग्रामीण समाजातही नवी पिढी ही आधुनिक शहरी पोशाखच पसंत करते. तथापि पारंपरिक वेशभूषा ही लग्नकार्यादी समारंभ, धार्मिक सण व उत्सव, कुलाचार यांसारख्या प्रसंगी आवर्जून केली जाते. विशिष्ट वेशभूषेची काही व्यावसायिक क्षेत्रेही दिसून येतात. उदा., वकीलवर्ग, न्यायाधीश, उद्योगधंद्यातील कामगार इत्यादी. क्रीडाक्षेत्रातील क्रिकेट, टेनिस, फूटबॉल, जलतरण यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांत तर पोशाखाचे बाबतींत जागतिक एकसारखेपणाच दिसून येतो.

वेशभूषेतील नवनव्या टूम प्रसृत करणारी केंद्रस्थाने म्हणजे देशांतील मोठी शहरे होत. अभिनव फॅशनपद्धती या केंद्रांतून प्रसृत केल्या जातात. जगातील अद्ययावत फॅशनपद्धती त्या त्या देशात चटकन उचलल्या जातात. विविध प्रकारच्या तयार कपड्यांचा आधुनिक उद्योग हा जसा यास कारणीभूत आहे, तसाच नावीन्याची अभिज्ञता असणारा कुशल शिलाईतज्ञांचा वर्गही कारण आहे तथापि पोशाखातील फॅशनप्रकार प्रसृत करणारी प्रभावी संस्था म्हणजे देशी व परदेशी चित्रपट ही होय. चित्रपटातील नायक-नायिकांच्या वेशभूषेचे अनुकरण, विशेषतः तरुण स्त्री-पुरुषांत, तत्काळ केले जाते. याचे कारण यासाठी आवश्यक असे नवनवीन कापडप्रकार व अद्ययावत शिलाईतंत्र या गोष्टीही सुलभपणे उपलब्ध असणे, हे आहे [→ चित्रपटातील रंगभूषा आणि वेशभूषा].

 फॅशन-प्रदर्शनासारखे कार्यक्रमही वेशभूषेतील नव्या कल्पना दिग्दर्शित करीत असतात. वेशभूषेतील दागिन्यांचा सोस मात्र धार्मिक, कौटुंबिक, वैवाहिक सणसमारंभ सोडले, तर एरव्ही कमी झालेला आढळतो. एखाददुसराच निवडक अलंकार वापरणे स्त्री-पुरुष अधिक पसंत करतात. एकंदरीत स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय वेशभूषेत पारंपरिकता आणि फॅशनचे प्रयोग या दोन्ही अंगांची जशी विविधता दिसून येते, तसाच तरुण पिढीच्या पेहेरावातील एकसारखेपणाही दृग्गोचर होतो. त्यातही अनौपचारिकतेकडे असलेला विशेष कल उल्लेखनीय आहे.

 

भारतीय नागर पुरुषांच्या बहुतेक सर्व वयोगटांत पॅंट घालण्याचे प्रमाण वाढत आहे तथापि धोतराचा वापर ग्रामीण भागात विशेषतः जुन्या पिढ्यांतून टिकून आहे. नागर समाजात मात्र धार्मिकविधीच्या वेळी धोतर किंवा पीतांबर अधिक पसंत करतात. त्याचप्रमाणे बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, इ. प्रदेशांत अजूनही पुष्कळते पुरुष कार्यालयात धोतर किंवा लुंगी नेसून जातात. कोटाची पद्धतही आता मागे पडत असून अंगात आत बनियन व त्यावर फक्त मॅनिला वा बुशशर्ट घातला जातो. मात्र बेतणीच्या व शिवणीच्या निरनिराळ्या तऱ्हांवरून साधा शर्ट, नेहरूशर्ट, बुशशर्ट किंवा बुशकोट, मॅनिला, बेलबॉटम शर्ट, गुरुकुडता व झब्बा अशी वेगवेगळी नावे आहेत. पॅंटचेसुद्धा ड्रेन पाईप, बेल बॉटम, नॅरोकट वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत. हल्ली नॉयलॉन, रेयॉन, स्ट्रेचलॉन, टेरिलिन, टेरिकॉट, सिफॉन वगैरे कृत्रिम धाग्याचे कपडे जास्त प्रचारात असून ते नेहमीच्या वापरात आहेत. सदऱ्याचे कापड निरनिराळ्या गडद किंवा फिक्क्या रंगाचे, फुलाफुलांचे, लहान मोठ्या डिझाईनचे, निरनिराळ्या तऱ्हेच्या चौकड्यांचे, पट्ट्यापट्ट्याचे असे हरनमुन्याचे असते. पँटचे कापड पण विविधरंगी, विविध प्रकारचा चौकडा तसेच सळ्या वा दोरवा असलेले असते. पुष्कळसे तरुण आपल्या नेहमीच्या वेशभूषेत तऱ्हेतऱ्हेचा पोशाख वापरतात. उदा., सफारी पेहेराव. टोपी वापरण्याचे प्रमाणही नागर समाजात कमी होत आहे. मात्र ग्रामीण समाजात व शाळांच्या गणवेशात टोपीचा वापर अजूनही दिसून येतो.

भारतीय स्त्रिया पांच-सहावारी साडी गोल पद्धतीने नेसतात. तिचा पदर डाव्या खांद्यावरून पाठीमागे टाकला जातो. तो इच्छेप्रमाणे कमीजास्त काढला जाऊन पाहिजे तर पुढे उजव्या खांद्यावरून घेतला जातो. नाभीच्या जरा खाली साडी नेसण्याची फॅशनही निर्माण झाली आहे. सुती, सुती रेशमी, गर्भरेशमी, कृत्रिम रेशमी, नॉयलॉन, रेयॉन, सिफॉन, टेरिकॉट, टेरीवायल, चिकन, वुली, हॅंडलूम वगैरे नाना तऱ्हेच्या साड्या प्रचारात आहेत. त्यांतही पुन्हा जरीच्या, कटवर्कच्या, भरतकामाच्या कलाकुसरीने बनविलेल्या साड्याही वापरात आहेत. शालू-पैठण्यांचे महत्त्व अजून कायमच आहे.

पूर्वी कलाकुसरीनुसार साड्यांना विविध नावे दिली जात. उदा., सोनसळी, कळसपानी, रुद्रकाठी, गोमीकाठी, नारळीकाठी, असावरीकाठी इत्यादी. अलीकडे चित्रपटनायिकांच्या साड्यांचे व पेहेरावपद्धतीचे अनुकरणही नागर समाजाकडून करण्यात येते. यातूनच साड्यांना ‘शोले साडी’, ‘पिंजरासाडी’ अशा प्रकारची नावे रूढ होत आहेत. सुशिक्षित नागर समाजातील स्त्रिया डोक्यावरून पदर घेण्याचे टाळतात तथापि पारंपरिक वळणाच्या स्त्रीवर्गात ही पद्धत टिकून आहे. 


सध्या बहुतेक स्त्रिया ब्रेसियरवर पोलके घालतात. ही पोलकी आखूड हाताची किंवा बिनबाह्यांची, मागचा-पुढचा गळा मोठा असलेली, मागील किंवा पुढील बटनांची व चोळीप्रमाणेच उंचीला कमी असतात. पोलक्यांचे नाना प्रकार रूढ आहेत. हिवाळ्यात स्वेटर-मफलर किंवा सुंदर भरतकाम केलेला लोकरीचा कोट काही स्त्रिया वापरतात तर काही रेशमी काठपदराची शाल [→शाली] अंगावरून लपेटून घेतात. ‘टू बाय टू’, ‘चिकन’, ‘ऑरगंडी’, ‘क्रेप’,‘दोरवा’, ‘चीट’ किंवा ‘छीट’, ‘व्हेलवेट’ (मखमल), ‘पॉपली’, ‘सिल्क’, ‘क्रेप सिल्क’ यांसारख्या पोलक्यांच्या व साड्यांच्या कापडाचे रंगीबेरंगी विविध नमुने आढळतात.

चुण्या, झालर, पायपीन, लेस, शोभेची बटणे, भरतकाम व पॅचवर्क यांनी सुशोभित केलेले आणि निरनिराळ्या प्रकारचे फ्रॉक लहान मुली घालतात. अगदी साधा वनपीस-फ्रॉकही प्रचारात आहे. मध्यमवयाच्या मुली परकर-पोलक्याऐवजी बहुधा स्कर्ट-ब्लाऊज घालतात. काही मोठ्या मुलीदेखील स्कर्ट-ब्लाऊजचा वापर करतात. गुजराती पद्धतीचा ‘गरारा’ महाराष्ट्रातील मुलींना आवडतो. त्यात परकरपोलके एकाच रंगाचे असून पोलक्याला कोपराहून थोडे लांब हात तसेच गळपट्टीला व खालच्या बाजूला जरीकाठ असतात. परकराच्या घेरालाही खाली जरीकाठ असतात. पुष्कळशा शाळकरी आणि महाविद्यालयातील मुली गोलसाडी नेसतात, पण अलीकडे स्लॅक्स, बेलबॉटम पँट, मिनी स्कर्ट, सलवार-खमीज व मॅक्सी परिधान करतात. तरुण-तरुणींची वेशभूषा पुष्कळदा जवळजवळ सारखीच वाटते. त्यांच्या वेशभूषेत चित्रपटातील नायक-नायिकांच्या वेशभूषेचे अनुकरणही दिसून येते. अलीकडे नाना पद्धतींची मनगटी घड्याळे, वैशिष्ट्यपूर्ण खड्यांच्या अंगठ्या, विविध आकारांचे व शैलीयुक्त असे उन्हाचे चष्मे आणि रंगीबेरंगी स्वेटर व मफलर यांचाही अंतर्भाव एक वेशभूषेचा भाग म्हणून करण्याची प्रवृत्ती दिसून येते [→घड्याळ→अंगठी→चष्मा]. (चित्रपत्र).

 पहा : अलंकार आदिवासी कापड उद्योग केशभूषा खादी उद्योग गणवेश जडजवाहीर जर व कलाबतू तयार कपडे पट्टी पादत्राणे फॅशन फॅशनप्रदर्शन भरतकाम राजैश्वर्य वस्त्रकला वस्त्रे वेशभूषा रंगभूमीवरील शिवणकला साडी सौंदर्यसाधना सौंदर्यप्रसाधने होजियरी.

संदर्भ : 1. Assailly, G. D. Ages of Elegance : Five Thousand Years of Fashion and Frivolity, 1968.

            2. Black, Anderson J. Garland, M. A History of Fashion, 1975.

            3. Bradley, C. G. A History of World Costume, London, 1961.

            4. Dar, S. N. Costumes of India and Pakistan, Bombay, 1969.

            5. Davenport, Millia, The Book of Costume, New York, 1962.

            6. Howell, G. Ed. In Vogue : Six Decades of Fashion, 1975.

            7. Laver, J. Ed. Fashion from Ancient Egypt to the Present Day, 1965.

            8. Lynham, R. Paris Fashion, 1974.

            9. Payne, Blanche, History of Costume, New York, 1965.

           10. Squire, Geoffrey, Dress and Society, 1974.

          11. मोतीचंद्र, डॉ. प्राचीन भारतीय वेश-भूषा, प्रयाग, १९५७.

जाधव, रा. ग. जोशी, चंद्रहास आजगावकर अंबुजा


पोशाख व वेशभूषा