पोलिश भाषा : पोलिश ही मध्य यूरोपातील, पश्चिम स्लाव्हिक गटातली एक महत्त्वाची भाषा आहे. पोलंडची ती सरकारी व लोकव्यवहाराची भाषा आहे. पोलंडचे राजकीय जीवन कित्येक शतके अतिशय अनिश्चित होते. त्याच्या भौगोलिक सीमाही एकसारख्या बदलत होत्या. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर त्याच्या राजकीय जीवनात पुन्हा एकदा स्थिरता आल्यासारखी दिसते. अनेक आक्रमणे, क्रांत्या व स्थित्यंतरे यांमुळे हा देश आज बहुभाषिक दिसत असला, तरीही बहुसंख्य लोक पोलिशच बोलतात. याशिवाय पोलंडच्या आसपासच्या देशांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या (युनायटेड स्टेट्सच्या) उत्तरेकडील औद्योगिक क्षेत्रात आणि दक्षिण अमेरिकेत-मुख्यत: ब्राझिलमध्ये-बरेच पोलिश भाषिक आहेत. तिच्या भाषिकांची एकंदर संख्या साडेतीन ते चार कोटींच्या दरम्यान असावी.

पोलिशच्या चार प्रमुख पोटभाषा आहेत : माझोव्हियन (माझुरियन), पोझ्नेनियन, क्राकोव्हियन व रुथेनियन.

पोलिशचा लिखित पुरावा चौदाव्या शतकापासून मिळतो. पंधराव्या शतकापासून पोलिशमध्ये साहित्यनिर्मिती सुरू झाली. पुढेपुढे हे साहित्य इतके समृद्ध झाले, की राजकीय अस्थिरतेमुळे ससेहोलपट होत असलेल्या पोलिश लोकांची अस्मिता टिकवायला त्याची फार मदत झाली.

लिपी आणि उच्चार : पोलिश भाषा लॅटिन लिपीचा उपयोग करते मात्र काही विशिष्ट उच्चारांसाठी काही अक्षरांना जादा चिन्हे जोडली जातात. लॅटिन q, v , x ही अक्षरे वापरली जात नाहीत.

90-1

शब्दातील आघात सामान्यपणे उपांत्य अवयवावर होतो.

व्याकरण : नामात तीन लिंगे, दोन वचने आणि पंचमी सोडून व संबोधन धरून सात विभक्त्या आहेत. लिंगानुसार विभक्तिप्रत्ययात फरक होतो. उदाहरणार्थ : पु. वुय् ‘चुलता’ याची रूपे पहा : ए.व. १ वुय् २ वुया ३ वुयेम् ४ वुयोवि ६ वुया ७ वुयु ७ वुयु अ.व. वुयोव्ये, वुयूव्, वुयामि, वुयाम्, वुयूव, वुयु, वुयाव्ये – स्त्री. बाबा ‘म्हातारी’ : ए.व. बाबा, बाबे, बाबां, बाब्ये, बाबि, बाब्ये, बाबो अ.व. बाबि, बाबि, बाबामि, बाबोम्, बाबाख्, बाबि-न पोले ‘शेत’ : ए.व. पोले, पोले, पोलेम्, पोलु, पोला, पोलु, पोले अ.व. पोला, पोला, पोलामि, पोलेम्, पोल्, पोलाख, पोला.

विशेषणांना संबंधित नामांचेच लिंगवचनदर्शक प्रत्यय लागतात. मूळ विशेषणाला sz हा प्रत्यय लागून तुलनात्मक रूप व तुलनात्मक रूपाला नाय् हे उपपद लागून श्रेष्ठत्वदर्शक रूप तयार होते : स्तार्-इ ‘जुना’, स्तार्-इ-श् ‘अधिक जुना’, नाय्-स्तार्-इ-श् ‘सर्वात जुना’.

सर्वनामांची रूपे नामांप्रमाणेच विभक्तिप्रत्यय लावून होतात. सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत : पुरुषवाचक .व. या ‘मी’, ती ‘तू’, ओन् ‘तो’, ओना ‘ती’, ओनो ‘ते’ अ.व. मी ‘आम्ही’, वी ‘तुम्ही’, ओनी ‘ते, त्या’, ओने ‘ती’. दर्शक ए.व. तेन् ‘हा’, ता ‘ही’, तो ‘हे’–अ.व. ची ‘हे’, ते ‘ह्या, ही’. संबंधी क्तो ‘जो, जी, जे’. प्रश्नार्थक चो ‘काय’, इत्यादी.

पोलिश क्रियापद अतिशय विकारक्षम आहे. सामान्य क्रियापदवाचक रूप धातूला च् हा प्रत्यय लावून होतो. काही उदाहरणे पुढील प्रमाणे :

वर्तमानकाळ

बिच् ‘असणे’

कोखाच् ‘प्रेम करणे’

पिसाच् ‘लिहिणे’

ए.व. १ येस्तेम्

कोखाम्

पिशे

येस्तेश्

कोखाश्

पिशेश्

येस्त्

कोखा

पिशे

अ.व. १ येस्तेश्मि

कोखामि

पिशेमि

येस्तेश्च्ये

कोखाच्ये

पिशेच्ये

सां

कोखायां

पिशां

काही वाक्ये : क्तो ताम् यस्त? ‘तिकडे कोण आहे?’- याक् सिएं पान् नाझिवा? ‘तुमचं नाव काय?’ – ची पान् रोझुभ्ये? ‘तुम्हाला समजतं का?’- न्ये रोझुभ्येम्. ‘मला समजत नाही.’ – केल्नेर्, प्रोशे मि दाच कार्तें. ‘वेटर, मला मेनू द्या.’ – येस्तेम् बार्जो ग्लोद्‌नि. ‘मला फार भूक लागली आहे’.

संदर्भ : 1. Meillet, Antoine, Les lagues dans I’Europe nouvelle, Paris, 1928.

2. Ostermann, G. F. V. Manual of Foreign Languages, New York, 1959.

3. Pai, M. A. The World’s Chief Languages, London, 1954.

कालेलकर, ना. गो.