पोर्ट आर्थर – २ : अमेरिकेतील टेक्सस राज्याच्या जेफर्सन परगण्यातील शहर व प्रवेश बंदर. लोकसंख्या ५७,३७१ उपनगरांसह १,१६,४७४ (१९७०). हे बोमाँटच्या आग्नेयीस सु. २७ किमी. सॅबीन सरोवराच्या पश्चिम किनारी वसले आहे. हे दळणवळणाचे केंद्र असून कालव्याने मेक्सिकोच्या आखातास जोडले आहे. १८४० मध्ये ‘अरॉरा’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर एके काळी अवैधपणे चालणाऱ्या आफ्रिकी गुलाम व्यापाराचे केंद्र होते. १८९५ मध्ये आर्थर स्टिलवेल याने कॅनझस सिटीहून येणाऱ्या लोहमार्गाच्या अंतिम स्थानकाची येथे उभारणी केली त्याच्या नावावरूनच यास ‘पोर्ट आर्थर’ असे नाव पडले. १८९९ मध्ये जहाजगामी पोर्ट आर्थर कालवा खणण्यात आल्याने व १९०१ मध्ये येथून १६ किमी. अंतरावरील स्पिंडलटॉप येथे तेल झऱ्याचा शोध लागल्याने शहराचा जलद विकास झाला. येथे जहाजबांधणी, पोलाद व ॲल्युमिनियम वस्तुनिर्मितीउद्योग, तेलवेधन, यंत्रनिर्मितीउद्योग, खनिज तेलशुद्धीकरण, रसायन निर्मिती संयंत्रे, रबरी वस्तू, कृत्रिम रबर निर्मिती इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. जगातील सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण व खनिज तेल रसायने उद्योगकेंद्रांमध्ये या शहराची गणना होते. जॉन गेट्स या टेक्सस ऑईल कंपनीच्या संस्थापकाने शहराच्या विकासास मोठा हातभार लावला. त्याने शहरात पोर्ट आर्थर महाविद्यालय तसेच इस्पितळ बांधले व त्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ ग्रंथालय उभारले. येथून खनिज तेल, खनिज तेल रसायने, कातडी वस्तू इत्यादींची निर्यात होते. येथे प्रतिवर्षी तेल उत्पादने प्रगति-सप्ताहामध्ये चार दिवसांचा कॅव्हॉइलकेड उत्सव साजरा करण्यात येतो.
गाडे, ना. स.
“