पोर्चुलॅकेसी : (लोणी-लोणिका कुल). फुलझाडांपैकी [ → वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एक लहान कुल. याचा अंतर्भाव कॅरिओफायलेलीझ गणात (पाटलपुष्प गणात) इतर सहा कुलांबरोबर (कॅरिओफायलेसी, चिनोपोडिएसी, ॲमरँटेसी, निक्टॅजिनेसी, फायटोलोकेसी व ऐझोएसी) करतात. ए. एंग्लर यांनी सेंट्रोस्पर्मी श्रेणीत वरील सातांशिवाय ⇨ बॅसेलेसी (मयाळ कुल) समाविष्ट केले आहे. जे. हचिन्सन यांच्या सुधारित पद्धतीत कॅरिओफायलेलीझ या प्रारंभिक गणात पोर्चुलॅकेसी घातले आहे मात्र त्यांनी सेंट्रोस्पर्मीचे दोन भाग पाडून एकात (कॅरिओफायलेलीझमध्ये) पोर्चुलॅकेसीबरोबर फक्त कॅरिओफायलेसी (पाटलपुष्प कुल) व ऐझोएसी [वालुक कुल → फायकॉईडी] या दोनच कुलांचा समावेश केला आहे इतर कुलांना चिनोपोडिएलीझ (चक्रवर्त गण) या अधिक प्रगत गणात टाकले आहे. आर्. वेटश्टाइन, एच्. हॅलियर,सी. ई. बेसी इ. शास्त्रज्ञांत गणांच्या व कुलांच्या उगमाबद्दल मतभेद असल्याने वर्गीकरणातील त्यांच्या स्थानाबद्दलची त्यांची मते भिन्न आहेत. बॅसेलेसी या कुलाचे पोर्चुलॅकेसीबरोबर जवळचे नाते आहे. ए. बी. रेंडल यांच्या मते पोर्चुलॅकेसी कुलात १९ वंश व सु. ५०० जाती आहेत. (जे. सी. विलिस यांच्या मते १७ वंश व २२५ जाती जी. एच्. एन्. लॉरेन्स यांच्या मते १६ वंश व ५०० जाती). या जाती बहुशः अमेरिकेत आढळतात. ⇨ घोळ (लोणी, लोणा, लोणिका) ही भारतातील सामान्य वनस्पती या कुलाची प्रातिनिधिक जाती समजता येईल त्यावरून कुलनाम व गणनाम घेतले आहे. घोळीच्या वंशातील एकूण २०० जातींपैकी ७ भारतात आढळतात.
या कुलातील वनस्पती बहुतेक ओषधीय [लहान आणि नरम → ओषधि] किंवा उपक्षुपीय (लहान झुडपे) असून त्यांचा प्रसार बहुतेक सर्वत्र परंतु त्यातल्या त्यात उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आहे. यांना समोरासमोर किंवा एकाआड एक पाने येतात व ती मांसल असून त्यांना केसाळ उपपर्णे (तळाजवळची उपांगे) असतात. फुले नियमित व द्विलिंगी असून त्यांना संदले व प्रदले असतात व ती फुले एकेकटी येतात आणि त्याखाली पानांचा झुबका असतो. संदले दोन, प्रदले चार किंवा पाच, सुटी व परिहित (कळीमध्ये परस्परांवर टेकून) असतात केसरदले चार किंवा कमीअधिक व पाकळ्यासमोर असतात किंजदले तीन ते पाच जुळलेली पण किंजले सुटी किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अर्धवट अधःस्थ असून त्यात एकच कप्पा असतो बीजके दोन किंवा अधिक असून त्यांना लांब देठ (बीजबंध) असतात. ती वाकडी (वक्र) असून मध्यवर्ती सुट्या अक्षावर (दांड्यावर) चिकटलेली असतात [→ फूल]. फळ शुष्क (बोंड) असून आडव्या मध्यरेषेवर तडकते (करंड फळ उदा., कुरडू). कधीकधी बोंड उभे तडकून टोकास २–३ शकले दिसतात, तर कधी फळ तडकत नाही. बी चपटे व त्यात पिठूळ परिपुष्क (गर्भाभोवतीच्या अन्नाला वेढणारा वेगळा अन्नांश) असून प्रत्यक्ष गर्भ वाकडा असतो. या कुलातील कित्येक वनस्पतींच्या शरीरात पाणी साठवून ठेवणाऱ्या व श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थाने भरलेल्या कोशिका (पेशी) असतात तसेच कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे स्फटिक-पुंजही आढळतात हे पुंज कसे तयार होतात व त्यांचा वनस्पतीस काय उपयोग होतो हा एक खास संशोधनाचा विषय आहे. तसेच प्रकाशसंश्लेषणाची (प्रकाशीय ऊर्जेचा उपयोग करून होणाऱ्या अन्ननिर्मितीची) क्रिया येथे काहीशी वेगळी असणे शक्य आहे, असे मानतात. या कुलातील फारच थोड्या वनस्पती सामान्य व्यावहारिक उपयोगाच्या आहेत. घोळीची भाजी करतात घोळीची बागेतील लोकप्रिय जाती [रोझ मॉस, चायना रोझ → घोळ] फुलांच्या सौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहे. टॅलिनम पोर्चुलॅसिफोलियम ही शोभिवंत पानांफुलांकरिता बागेत लावतात. टॅ. ट्रॅन्ग्युलेर (हिं. पासटी) ही जाती श्रीलंकेतून आयात केली असून द. भारतात तिची पाने व खोडे भाजीकरिता वापरतात. क्लेटोनिया वंशातील जातींत उपपर्णे नसतात व फुलोरा वल्लरी [→ पुष्पबंध] प्रकारचा असतो.
संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants,
2. Santapau. H. Henry, A. N. A Dictionary of the Flowering Plants in
परांडेकर, शं. आ.