पोरस : (इ. स. पू. चौथे शतक). वेदकालीन पूरु वंशातील एक पराक्रमी व स्वाभिमानी राजा. याचे राज्य मध्य पंजाबात चिनाब व झेलम नद्यांच्या दुआबात होते. तक्षशिला ह्या त्याच्या शेजारील राज्याचा अंभी राजा पोरसचा शत्रू होता. पोरसच्या पराक्रमाची त्याला दहशत बसली होती. हिंदुस्थानावरील अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी (इ.स.पू. ३२६)अंभी अलेक्झांडरला मिळाला व पोरसचे काही नातेवाईक राजेही अलेक्झांडरला मिळाले. ज्या वेळी अलेक्झांडरने पोरसला आपणास मिळण्याविषयी निरोप धाडला, त्या वेळी या स्वाभिमानी राजाने ‘शस्त्रानेच रणांगणावर भेटेन’ म्हणून उत्तर धाडले, परिणामतः अलेक्झांडरने पूर आलेल्या झेलम नदीचा उतार पाहून आपल्या निवडक ११,००० सैन्यानिशी ती पार केली (इ.स.पू. मे. ३२६). पावसामुळे पोरसचे सैन्य निष्प्रभ ठरले कारण त्याच्या रथांची चाके चिखलातून चालेनात व उंच धनुष्यांना जमिनीवर टेकून बाणांचा वर्षाव करण्यास कोरडी जागा सापडेना. त्यामुळे ३०,००० पायदळाच्या, ४,००० घोड्यांच्या व ३०० रथांच्या पोरसच्या सैन्याला आगेकूच करता येईना. शिवाय पोरसचे २०० हत्तीही या युद्धात बिथरून माघारी फिरले व आपल्याच सैनिकांना तुडवू लागले. तरीसुद्धा पोरस शौर्याने लढला. या लढाईत त्याची तीन मुले व प्रमुख सेनाधिकारी ठार झाले. जेव्हा त्याला कैद करून अलेक्झांडर पुढे उभे करण्यात आले, तेव्हा त्याच्या अंगावर नऊ जखमा झालेल्या होत्या. अलेक्झांडरने विचारले ‘तुला मी कसे वागवावे?’ त्यावर त्याने ‘राजाप्रमाणे’ असे निर्भीड उत्तर दिले. या युद्धामुळे अलेक्झांडरला बराच मुलुख मिळाला परंतू त्याने पोरसला त्याचे राज्य परत दिले. शिवाय आणखी काही प्रदेश त्याच्या राज्यास जोडला व त्यास व्यास नदीपासून झेलम नदीपर्यंतच्या प्रदेशाचा क्षत्रप नेमले. त्यात त्या वेळची बरीच नगरराज्येही होती. पुढे पोरसने काही दिवस राज्य केले. तो निश्चितपणे केव्हा निवतला याची माहिती उपलब्ध नाही. त्याचा पुढे खून झाला असावा, असाही एक तर्क आहे.
देशपांडे, सु. र.
“