पोन्न : (सु.९५०). एक प्राचीन कन्नड कवी. कन्नड साहित्यात सांप्रदायिक दृष्ट्या ज्याला जैनयुग (पाचवे ते बारावे शतक) म्हणतात तसेच कॅनरिज लिटरेचर (१९२१) या इंग्रजी ग्रंथाचा लेखक ई. पी. राईसने ज्या युगाला ‘हळगन्नड’ म्हणजे जुने कन्नड युग म्हटले आहे, त्या युगातील ‘रत्नत्रया’ पैकी पोन्न हा एक कवी. या रत्नत्रयातील दुसरे दोन कवी म्हणजे ⇨ महाकवी पंप आणि ⇨रन्न हे होत. ह्या युगातील जैन काव्याची वैशिष्ट्ये स्थूलमानाने अशी : (१) धर्मप्रचारासाठी रचलेली तीर्थकरांवरील पुराणे (२) गद्यपद्यमिश्रित ‘चंपू’ शैलीचा वापर व (३) संस्कृत वृत्ते आणि अलंकार यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग. ही वैशिष्ट्ये पोन्न कवीच्या काव्यामध्येही प्रकर्षाने आढळतात.
आदिकवी पंपाचा समकालीन असलेला हा कवी वेंगीहुन कर्नाटकात आला होता. पूर्वाश्रमीचा तो वैदिक कवी. नंतर त्याने जैन धर्म स्वीकारला. त्याच्या कन्नड आणि संस्कृत या भाषांवरील प्रभुत्वामुळे राष्ट्रकुट राजा कृष्णराज ( कार. ९३९–९६८) याने त्यास ‘उभयकविचक्रवर्ती’ असा किताब बहाल केला. त्याने आपल्या दोघा गुरुबंधुंच्या सांगण्यावरून आपले गुरू जिनचंद्रदेव यांच्या निर्वाणाचा स्मारकग्रंथ म्हणून शांतिपुराणाची रचना केली. त्यात शांतिनाथ तीर्थकरांचे चरित्र आले आहे. त्याने जिनाक्षरमाले आणि अन्य ग्रंथ रचल्याचे उल्लेख आढळतात पण ते उपलब्ध नाहीत. त्याचा रामकथे हा ग्रंथ उपलब्ध नसला, तरी त्यातील काही उतारे नंतरच्या कन्नड साहित्यातून आढळतात.
आदिकवी पंप आणि रन्न या कवींच्या तुलनेने पोन्न हा सामान्य कवी वाटतो. पोन्नाच्या काव्यामध्ये पंपाचे अनुभववैविध्य व अर्थसघनता नाही आणि रन्न कवीचा कल्पनाविलासही नाही तथापि त्याचे काव्य सर्वगुणसंपन्न पंडिती काव्य आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.
देसाई, शांतिनाथ
“