पोकर : पत्त्यांचा एक खेळ. पोकर हा शब्द ‘प्रौढी मारणे’ या अर्थाच्या ‘Pochen’ या जर्मन शब्दापासून आला असावा. या खेळाचे आद्य स्वरूप ‘अस्’ किंवा ‘अस् नास’ या प्राचीन इराणी खेळात असावे. अमेरिकेत सुरुवातीला खेळला जाणारा पोकर अस् नासशी अगदी मिळताजुळता होता. ‘ब्रॅग’ नावाच्या खेळातही त्याचे बीज असावे, असे १७३०मधील एका पोवाड्यावरून दिसते. हॉईल या पत्त्यांच्या क्षेत्रातील आद्य तज्ञाने या पोवाड्याचे वर्णन केले आहे (१७५१). तथापि या खेळाचा नेमका उगम सांगणे कठीण आहे.

पोकर हा खेळ आडाखे बांधण्यावर तसेच शीघ्र निर्णयबुद्धीवर अवलंबून आहे. पाच पत्ते हातात असलेला कोणताही खेळाडू आपल्या विरुद्ध जाईल किंवा नाही, याची अटकळ बांधणे या खेळात आवश्यक असते. हातातील डाव कसा आहे, याची किंचितही कल्पना प्रतिपक्षाला येऊ नये याची दक्षता या खेळात घ्यावी लागते. यातील मुरब्बी खेळाडूच्या मख्ख चेहऱ्यावरूनच ‘पोकर फेस’ असा वाक्‌प्रचार रूढ झाला आहे.

पोकर एकावेळी जास्तीत जास्त सात खेळाडूंना खेळता येतो. पत्ते वाटणारा खेळाडू ‘अ’ हा प्रत्येकाला पाच-पाच वाटतो. ‘अ’ च्या डाव्या बाजूला बसलेला ‘ब’ हा खेळाडू आपले पत्ते पाहण्यापूर्वीच खेळीची रक्कम- ‘अँटी’ (ante) टेबलावरील गंगाजळीत देतो. यानंतर सर्व खेळाडू आपापले डाव पहातात. ‘ब’ च्या डाव्या हाताला बसलेल्या ‘क’ या खेळाडूला यानंतर ‘ब’ ने भरलेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम भरावी लागते किंवा ते त्याला नको असेल, तर तो निवृत्त होऊ शकतो. उरलेल्या खेळाडूंना यानंतर खेळात भाग घ्यावयाचा की निवृत्त व्हावयाचे, हे ठरविण्याचा अधिकार असतो. ज्यांना खेळावयाचे असेल त्यांना किमान शेवटच्या खेळाडूइतकी किंवा त्यांच्या कुवतीनुसार जास्त रक्कमही लावता येते. खेळात लावावयाची कमाल रक्कम सुरुवातीलाच सर्वानुमते ठरवितात. सर्व खेळाडूंची एक फेरी झाल्यानंतर ‘ब’ ची इच्छा असेल, तर त्याला शेवटच्या खेळाडूइतकीच रक्कम लावता येते, वा त्यापेक्षा अधिक रक्कमही लावता येते किंवा मूळ रक्कम गमावण्याची तयारी ठेवून निवृत्तही होता येते. खेळात भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी लावलेली रक्कम समान होईपर्यंत या फेऱ्या चालतात. यानंतर खेळाचा दुसरा टप्पा सुरू होतो. खेळाडूंना पाळीपाळीने हवी असतील तितकी हातातली पाने टाकून संचातील तितकीच पाने घेता येतात. यानंतर ‘ब’ या खेळाडूला पुन्हा रक्कम लावण्याचा अधिकार असतो किंवा लावलेली रक्कम गमावण्याच्या तयारीने निवृत्त होता येते. यानंतर उरलेल्या सर्व खेळाडूंना सगळयांची रक्कम समान होईपर्यंत आळीपाळीने खेळात भाग घेता येतो. या पद्धतीने हा खेळ खेळाडूंच्या मर्जीप्रमाणे हवा तितका वेळ चालविता येतो. हळूहळू सर्व खेळाडू निवृत्त झाले, तर जो खेळाडू शेवटपर्यंत राहील त्याला खेळात लावलेली सर्व रक्कम मिळते. एकच खेळाडू खेळात राहिलेला असल्यास त्याला हातातील पाने दाखवून डाव प्रकट करावा लागत नाही. मात्र समान रक्कम लावलेले जास्त खेळाडू शेवटपर्यंत खेळत असतील, तर त्यांना हातातील पाने दाखवावी लागतात. त्यांपैकी ज्याचा डाव भारी असेल तो जिंकतो. खेळाडूला आपल्या हातातील पाच पत्त्यांचे वेगवेगळे डाव रचता येतात. त्यांचे मूल्यांनुसार उतरत्या भांजणीने होणारे प्रकार पुढे दिले आहेत : (१) रॉयल फ्लश : एकाच चिन्हाची एक्का, राजा, राणी, गुलाम व दश्शी (२) सरळ (स्ट्रेट) फ्लश : एकाच चिन्हाची एकापाठोपाठची क्रमरचनेनुसार (सीक्वेन्स) पाच पाने (३) चौकडी (फोर्स) : एकाच मूल्याची चार पाने (उदा., चार एक्के किंवा चार राजे वगैरे) आणि एक किरकोळ पान (४) सगळी पाने (फुल हाऊस किंवा फुल हँड) : एकेका मूल्याची तीन आणि दोन पाने (उदा., तीन राजे व दोन दुऱ्या) (५) फ्लश : एकाच चिन्हाची कोणतीही पाच पाने–ती क्रमरचनेत नसली तरी (६) सरळ (स्ट्रेट) : कोणत्याही चिन्हांची एकापाठोपाठची पाच पाने: (७) तीन (थ्रीज) : एकाच मूल्याची तीन पाने (उदा., ३अठ्ठ्या वगैरे) आणि दोन किरकोळ पाने (८) दोन जोड्या (टू पेअर्स) : एकेका मूल्याची दोन-दोन पाने (उदा., दोन एक्के, दोन पंज्या इं.) आणि एक किरकोळ पान (9) एक जोडी (पेअर) : एका मूल्याची दोनच पाने व तीन किरकोळ पाने आणि (१०) संकीर्ण पाने (मिसलेनिअस) : सर्वच पाने एकमेकांशी न जुळणारी म्हणजे संकीर्ण असल्यास सर्वांत वरचढ पत्त्यावरून डावाचे मोल ठरवतात.

पोकरचे इतर अनेक प्रकार आहेत. जोकर किंवा इतर चिन्हाचा पत्ता अस्थिर (वाइल्ड) ठरवून त्याचा पूरक पत्ता ज्यात धरण्यात येतो, असाही पोकरचा एक प्रकार आहे. जोकरचा पत्ता कोणत्याही पानाचा बदली पत्ता म्हणून वापरण्यात येतो.

पोकर खेळात यशस्वी होण्याकरिता फार मोठा चाणाक्षपणा लागतो. तसेच अचूक निर्णयक्षमता लागते. एखादा अनुभवी व चिवट खेळाडू हातात अगदी साधा डाव असला, तरी हुशारीने इतर खेळाडूंना निवृत्त होणे भाग पाडून स्वतः जिंकतो.

अमेरिकेचा मोठा खेळ म्हणून अमेरिकन लोक या खेळाचा अभिमानाने उल्लेख करतात. अमेरिकेत पोकर खेळणाऱ्या क्रीडामंडळांनी एखाद्या अभ्यासमंडळाप्रमाणे आपले वृत्तांत छापलेले आढळतात. तेथे पोकर खेळाच्या लोकप्रियतेमुळे त्या खेळातील अनेक शब्द दैनंदिन व्यवहारात रूढ झाले आहेत. पोकर या खेळात अपुऱ्या माहितीनिशी केवळ अंदाजावर आधारलेले धाडसी, धोकेबाज व अनिश्चिततेचे निर्णय वरचेवर घ्यावे लागतात. त्याच्या या निर्णयक्षमतेच्या वैशिष्ट्यामुळे अलीकडच्या काळात मानसशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ इ. विविध क्षेत्रांतील तज्ञांमध्ये या खेळाचे आकर्षण वाढले आहे व संगणकावर त्याच्या खेळांचे विविध प्रयोग केले जाऊ लागले आहेत.

गोखले, श्री. पु.

संगणक पोकर : वेगवेगळे डावपेच वापरून खेळी करण्याच्या आज्ञावली (प्रोग्रॅम) संगणकाला आधीच देऊन ठेवलेल्या असतात. अशी प्रत्येक आज्ञावली म्हणजे एक वेगळा खेळाडूच होय. संगणकाच्या साहाय्याने एका ऋणकिरण नलिकेच्या पडद्यावर खेळातील कोणत्याही वेळची परिस्थिती चित्रलेखित केली जाते. संगणकाबरोबर खेळणाऱ्या खेळाडूने स्वतःचे पत्ते पाहून प्राप्त परिस्थितीनुरूप खेळी करावयाची असते. ही खेळी संगणकावरील विशिष्ट गुंड्या दाबून तो संगणकाला आदान करतो. त्या खेळीनुसार संगणकातील ‘आज्ञावली-खेळाडू’ आपल्या खेळ्या क्रमाक्रमाने करीत जातात व त्या पडद्यावर चित्रलेखित होत जातात. याप्रमाणे संगणकाच्या साहाय्याने विविध वृत्तींच्या खेळाडूंशी पोकर खेळण्याचा सराव करता येतो.

पुरोहित, वा. ल.

संदर्भ : 1. Radner, S.H. The Key to Playing Poker and Winning, Baltimore, 1964.

          2. Reese, Terence  Watkins, A.T. Secrets of Modern Poker, New York, 1964.