पट्ट्याचे हात : (फेन्सिंग). तलवारीने खेळावयाच्या द्वंद्वांचे क्रीडाप्रकार. यात ‘फॉइल’, ‘एपी’ व ‘सेबर’ अशा तीन प्रकारच्या विशिष्ट टोकदार ⇨ तलवारी वापरतात. हल्ला व प्रतिकार या दोन क्रिया या द्वंद्वात महत्त्वाच्या असतात. तलवारींनी द्वंद्व करताना जखम होऊ नये, म्हणून तोंडावर लोखंडी जाळीचा मुखवटा वा शिरस्त्राण (हेल्मेट), हातात कातड्याचे मोजे आणि छातीवर कातड्याचे जाकीट अशी संरक्षक साधने वापरली जातात. तसेच जाड कापडाची किंवा विणकाम केलेली व अंगावर तंग बसणारी शर्ट व पँट वापरतात.

प्राचीन काळी बॅबिलोनियन, इराणी, ग्रीक व रोमन लोकांत तलवारींची ⇨ द्वंद्वयुद्धे खेळली जात. त्या द्वंद्वयुद्धांतूनच आधुनिक फेन्सिंगचा उगम झाला. या खेळाचा प्रसार यूरोपमध्ये पंधराव्या शतकापासून होऊ लागला. अठराव्या शतकात पट्ट्याच्या हातांना खेळ म्हणून मान्यता प्राप्त झाली. नंतर एकोणिसाव्या शतकात हा प्रकार अमेरिकेत गेला. तंटे सोडविण्यासाठी द्वंद्वयुद्धे करावय़ाची पद्धत मध्ययुगात रूढ होती, तेव्हा प्रत्येक व्यक्ती या खेळाचे शिक्षण घेत असे. हळूहळू या खेळात कौशल्य व गतिमानता येत गेली. आता ऑलिंपिक सामन्यात त्याला महत्त्वाचे स्थान असून या खेळाची एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झालेली आहे. त्या संस्थेची पंचावन्न सभासद राष्ट्रे आहेत. १८९१ साली हौशी खेळांडूंचा संघ अमेरिकेत स्थापन झाला. तो विभागीय आणि राष्ट्रीय सामने भरवतो. तेथे अनेक महाविद्यालयांतून पट्ट्याच्या हातांचे शिक्षण दिले जाते व आंतरमहाविद्यालयीन सामनेही भरवले जातात. स्त्रियाही या खेळात पुरुषांच्या बरोबरीने भाग घेतात.

फॉइल, एपी आणि सेबर या तिन्ही प्रकारांतील तलवारद्वंद्वात प्रतिस्पर्ध्याच्या शरीरास आपल्या तलवारीने स्पर्श करणे, हे उद्दिष्ट असते. फॉइल व एपी या प्रकारच्या तलवारींनी भोसकण्याची क्रिया करतात, तर सेबर हत्याराने खेळताना भोसकता येते आणि वारही करता येतो. या प्रत्येक प्रकारच्या खेळाचे नियम वेगवेगळे आहेत.

फॉइल (निधारी, बोथट तलवार) हे फेन्सिंगचे मूळ शस्त्र आहे. ते चौकोनी, निमुळते, लवचिक असून टोकाशी बोथट केलेले असते किंवा त्याच्या टोकाला गोळी बसविलेली असते. पंजाच्या संरक्षणासाठी मुठीवर गोल पत्रा बसविलेला असतो. त्याचे वजन ५०० ग्रॅम व लांबी १·१० मी. असते. यात शरीराच्या कमरेपासून मानेपर्यंतच फक्त वार करता येतात. या खेळाचे विशिष्ट नियम असून त्यातूनच खेळाचा क्रम ध्यानात येतो. केलेला वार अडविल्यानंतरच वार करणाराला हल्ला करता येतो. वार अडविल्यानंतरच तो अडवणाऱ्याला हल्ला करण्याचा अधिकार प्राप्त होतो. दोन्हीही खेळाडूंनी एकमेकांना स्पर्श केला, तर प्रथम स्पर्श करणाराला गुण मिळतो. दोघांनीही एकदमच स्पर्श केला, तर ज्याला हल्ला करण्याचा अधिकार असेल त्याला गुण मिळतो. प्रतिस्पर्ध्याने हूल दिल्यास त्याचा वार मुठी जवळच्या जाड भागाने अडवतात. अशा प्रसंगी आपल्या हातातील शस्त्राचे टोक प्रतिस्पर्ध्याकडे रोखलेले असते. खेळाचा पवित्रा घेताना प्रतिस्पर्ध्यासमोर तिरपे उभे राहिले, म्हणजे बचाव करणे सोपे होते. प्रतिस्पर्ध्याने जोरात वार केला, तर त्याचा तोल जाऊन त्याच्यावर उलट वार करावयास संधी सापडते. शिकाऊ खेळाडूने वार आणि बचाव सावकाश करणे इष्ट असते. प्रत्येक हात चांगल्या प्रकाराने येऊ लागला, की पुढील हात शिकणे योग्य होय. चांगला सराव झाल्यावर खेळाची गती वाढवणे सुलभ ठरते. स्त्रिया फक्त फॉइलनेच पट्ट्याचे हात खेळतात. धारेच्या तलवारीने पट्ट्याचे हात फक्त लष्करी शाळांतूनच खेळले जातात. जर्मनीत या शस्त्राप्रमाणेच एकेरी काठी (सिंगल स्टिक) नावाचा पट्ट्याच्या हातांचा खेळ प्रचलित आहे.

एपी या शास्त्राचे द्वंद्वयुद्धातील तलवारीशी बरेच साम्य आहे. एपीची लांबी फॉइलइतकीच असली, तरी तिचे वजन ७५० ग्रॅम असते. आकार तिकोनी असून टोक तीक्ष्ण असते. बाजूंना धार नसते. हाताच्या संरक्षणासाठी आवरण असते. ते १२ सेंमी. व्यासाचे असते. फॉइलप्रमाणेच या द्वंद्वातही वार अडवेपर्यंत हल्ला करण्याचा अधिकार नसतो. दोघांनी एकदमच एकमेकांना स्पर्श केल्यास, दोघांनाही गुण मिळतात. शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श करता येत असला, तरी तो पात्याच्या टोकानेच करावा लागतो. सेबर (बाकदार पात्याची तलवार) या शस्त्राचे पाते वक्र, चपटे आणि पातळ असते. त्याचे टोक तीक्ष्ण असून पात्याच्या पुढल्या दोन्ही बाजूंना कापता येण्यासारखी धार असते. याची लांबी १·०५ मी. असते. साध्या खेळासाठी टोक वाकविलेले हत्यार वापरतात. हाताच्या बोटांना इजा होऊ नये, म्हणून मुठीवर आवरण असते. या खेळात कमरेपासून डोक्यापर्यंतच्या शरीराच्या कोणत्याही भागावर वार करता येतो. या क्रीडापद्धतीला फॉइलचेच नियम लागू होतात.

वरील तिन्ही शस्त्रांचे हात, वार करण्याचे व प्रतिकाराचे तंत्र आणि तोडी करावयाचे प्रकार वेगवेगळे आहेत. खेळावयास तयार होताना डावा पाय मागे व उजवा पाय पुढे ठेवून, त्यांचा काटकोन करून त्यांच्यात सु. ०·४५ मी. (दीड फूट) अंतर ठेवतात. पाय गुडध्यात वाकविले, म्हणजे तोल सांभाळून वार करता येतात.


पाय पुढे टाकून वार करावयाची क्रिया (लंज) आणि प्रतिकाराची क्रिया (पॅरी) असे या खेळाचे दोन घटक आहेत. वार करावयाचे आठ प्रकार असून शरीराच्या ज्या भागावर वार करावयाचा असेल तो भाग आणि हातात शस्त्र धरावयाची पद्धत यांवरून हे प्रकार ओळखले जातात. तलवारीच्या मुठीकडील पात्याच्या जा़ड भागानेच प्रतिकार किंवा रोख करावयाचा असतो. खेळण्याचा पवित्रा घेताना दोघेही खेळाडू एकमेकांच्या शस्त्रांना शस्त्रे भिडवितात. केवळ हात लांब करून प्रतिस्पर्ध्याला वार करता येऊ नये, म्हणून जो पवित्रा घेतात त्याला ‘सावधान पवित्रा’ (ऑन गार्ड) म्हणतात. प्रतिस्पर्ध्याच्या हाताखालून पाते काढून त्याच्या छातीच्या असंरक्षित भागावर वार करण्याच्या क्रियेला ‘सोडवून वार करणे’ (डिसएंगेज अँड लंज) असे म्हणतात. त्याचप्रमाणे असंरक्षित भागावर वार करण्याला ‘कट ओव्हर’ असे म्हणतात. हा वार चुकविण्यासाठी झटकन पवित्रा बदलावा लागतो. सावधान आणि संरक्षणात्मक ‘पॅरी क्वार्ट’ (चौथा प्रतिकार-प्रकार) या प्रकाराने शरीराच्या उजव्या बाजूचे संरक्षण होते  तर डाव्या बाजूच्या संरक्षणासाठी ‘पॅरी सीक्स्ट’ (सहावा प्रतिकार-प्रकार) उपयुक्त ठरतो. तलवारीचे सर्व वार सफाईने, वेगाने व सरळ हाताने करावे लागतात. खेळाचा चांगला सराव असल्यावाचून प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देऊन त्याच्या असंरक्षित बाजूवर वार करता येत नाही.

पट्ट्याच्या हातांच्या क्रीडास्पर्धा सु. १२ मी. X १ मी. या आकाराच्या लिनोलियमवर किंवा हातरीवर होतात. स्पर्धांचे निर्णय एक अध्यक्ष (प्रेसिडेंट) आणि चार पंच (ज्यूरी) करतात. महत्त्वाच्या फॉइल आणि एपीच्या स्वर्धांच्या निर्णयासाठी विद्युत्‌यंत्र वापरतात. पुरुषांच्या स्पर्धेत पाच आणि स्त्रियांच्या स्पर्धेत चार स्पर्श करणारा किंवा ठराविक वेळेत (६ मिनिटे पुरुषांना व ५ मिनिटे स्त्रियांना) अधिक स्पर्श करणारा खेळाडू विजयी होतो.

भारतात पट्ट्याच्या हातांचे ‘फेन्सिंग’ या आंग्ल प्रकाराशी साम्य असलेले अनेक प्रकार प्रचलित आहेत. एकधारी, दुधारी, एकहाती पट्टा, दोहाती पट्टा, बनेटी पट्टा, लकडीपट्टा व दांडपट्टा असे पट्ट्यांचे (पट्यांचे) अनेक प्रकार भारतात लोकप्रिय आहेत. एकधारी पट्ट्याचे पाते खोबड्याजवळ ०·४५ मी. लांब असून त्याच्या एका अंगास धार असते आणि पुढील पाते दुधारी असते. दुधारी पट्ट्याच्या दोन्ही बाजूंना धार असते. खोबडा, चिमटा, जाते, मूठ आणि कडी असे पट्ट्याचे पाच भाग असतात. ⇨ फरीगदग्याप्रमाणेच पट्ट्याच्या खेळांत डोके, कानशिले, खांदे, बरगड्या, कंबर, मांड्या, पोटऱ्या, घोटे इ. भागांवर वार करतात. राहा, पलटी, काट, काढणी, मोहोरा फिरविणे, डूब मारणे, काटछाट या पट्ट्याच्या खेळांतील काही क्रिया होत. पट्ट्याची फेक, घाई किंवा हात, हूल, काट, वार, पलटी वगैरे ठराविक क्रिया मिळून एक ‘राहा’ होते. ‘पलटी’ म्हणचे तोंड मागे फिरवून व काही काटी करून मागे फिरण्याची पद्धत. ‘काट’ म्हणजे वार मारण्याची क्रिया. वार मारताना अगर वार मारल्यानंतर पट्टा पायाच्या मधून अथवा उडी मारून पायाच्या खालून काढून घेण्याच्या पद्धतीस ‘काढणी’ असे म्हणतात. ‘मोहोरा फिरविणे’ म्हणजे तोंड फिरविणे. वार मारून अथवा हूल मारून बगलेखालून निघून जाणे किंवा हात टेकून पुढे अगर मागे उडी मारणे, यास ‘डूब मारणे’ असे म्हणतात. वार मारून कापणे म्हणजे ‘काटछाट’ होय. पट्ट्याचे सर्व हात बिनचूक आणि तडफदारपणे दोन, चार किंवा आठही दिशांना करतात. पट्ट्याचे द्विमुखी, चौमुखी, अष्टमुखी असे अनेक पवित्रे आहेत. हे पवित्रे एका हातात (एकहाती) किंवा दोन्ही हातांत (दोहाती) पट्टे घेऊन करतात. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात ‘बनेटी’ (दोन्ही टोकांस चेंडू असलेली काठी) घेऊन बनेटीपट्टा खेळला जातो. त्याचप्रमाणे एका हातात ‘लकडी’ (बांबूची किंवा वेताची काठी) व दुसऱ्या हातात पट्टा घेऊन लकडीपट्टा हा खेळ खेळला जातो. पूर्वी पट्ट्यांचा उपयोग हातधाईच्या लढाईत चांगला होत असे. आता लढाईचे स्वरूपच पालटले असल्याने पट्ट्याच्या खेळाला केवळ दिखाऊ स्थान प्राप्त झालेले आहे.

एका हातात वेळूची लांब काठी (दांड) व दुसऱ्या हातात पट्टा घेऊन दांडपट्टा खेळला जातो. या खेळाली एेतिहासिक महत्त्व असून मराठेशाहीत बलोपासना करण्याचा तो एक लोकप्रिय प्रकार होता. दांडी म्हणजे एका टोकास मोठी गाठ असलेली काठी अथवा लाठी. तिला मोगरही म्हणत. मोगर फिरवीत हल्ला करणारे पदाती अथवा पाईक असत. पट्टा म्हणजे अत्यंत पातळ पानाची तलवार. पट्ट्याचे पान लवचिक असून ते वाटेल तसे वाकते. म्हणून पट्ट्यास ‘खड्‌गलता’ असे अन्वर्थक नाव दिले गेले. या खड्‌गलतेचा निर्देश ज्ञानेश्वरीत आला आहे. विजयानगरचा कृष्णदेवराय (सोळावे शतक) दांडपट्ट्याच्या हातांचा नियमित व्यायाम घेत असल्याचे उल्लेख सापडतात. त्याच्या राज्यातील स्त्रियाही दांडपट्टा खेळण्यात निपुण होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसेच उत्तरकालीन पेशवाईतही दांडपट्टा हा व्यायामाचा व क्रीडेचा प्रकार म्हणून रूढ होता.

पट्ट्याच्या सर्व हातांत ‘काट’ महत्त्वाची, कौशल्यपूर्ण आणि चमत्कृतिजन्य असते. तोंडात धरलेली लवंग कापणे, उताण्या निजलेल्या माणसाच्या पोटावर ठेवलेला बटाटा किंवा लिंबू कापणे, रुमाल न कापता त्यात बांघलेले केळे वा विड्याची पाने कापणे इ. पट्ट्याच्या हातांचे अनेक प्रेक्षणीय प्रकार आहेत.

 

हा खेळ आरोग्यदायक असून, त्यात एकाग्र दृष्टी, शक्ती व दमदारपणा, खेळणाराचे कौशल्य यांना महत्त्व असते. या खेळात दोन्ही हातांना व्यायाम मिळतो व निरनिराळ्या पद्धतींनी शरीराच्या आणि हातापायांच्या हालचाली कराव्या लागत असल्याने शरीर बांधेसूद व पीळदार होते.

 

संदर्भ : 1. Anderson Bob. All about Fencing, 1970.

2. De Beaumont, C. L. Fencing : Ancient Art and Modern Sport, 1970.

३. करंदीकर (मुजुमदार), द. चिं. संपा. व्यायाम ज्ञानकोश, खंड सातवा, बडोदे, १९४३.

४. भोपटकर, ल. व. दांडपट्टा, पुणे, १९२७.

 

गोखले, श्री. पु.