पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जूगादजवळ वर्धा नदीस मिळते. हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो. कयाधू, अरुणावती, अडाण, वाघाडी, पूस इ. पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्त्व असून, अपर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले जात आहे. त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जाईल. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही पैनगंगा नदीखोऱ्यातील महत्त्वाची शहरे आहेत.

सावंत, प्र. रा.